Wednesday, December 8, 2010
Friday, December 3, 2010
Wednesday, December 1, 2010
देवाजीच्या पुस्तकातील एक पान.........!जितेपणी आपुल्या मानसासी पुसा! पितरांच्या नावान त्या कावळ्यासी का रे देसा?
काव!काव!.....काव!काव! शेजारच्या घरातील घरातले सगळेजण लहान-मोठे हात जोडून त्या कावळ्याला विनवणी करीत होते! कावळा मात्र येरझार करीत त्याला यायचे तेव्हाच चोच मारून गेला! तो पर्यंत हे काव-काव चालूच होते! माझ्यासाठी हा प्रसंग नविन होता! हा काय प्रकार आहे म्हणून सासू बाईना विचारले. त्या म्हणाल्या माहित नाही का तूला ? आज पितरी आमावस्या आहे!
मी कुतूहल म्हणून पाहायला गेले. तर आणखीन पलीकडे ताट तयार करून आणले होते. त्यात भजी,वडे,जिलबी,सुरमई माशाची तळलेली तुकडी,आणि वर अजून अजब प्रकार म्हणजे,दारूची बाटली आणून थोडी दारू त्या ताटावर शिपडली! मला अगदीच राहावे नाही,म्हणून मी सुनीलला विचारले हा काय प्रकार आहे. तर तो अगदी भोळे-भाबडे पणाने सांगू लागला" काकू! त्या सचिनचा आजा गेला ना,त्यो ना , दारू लै ढोसायचा!,अन त्याला ही सुरमई तर लैच आवडायची बघा! कधी-मधी ग्वाड भी खायचा,म्हणूनशान जलेबी भी थेवलिअया . आता कावल्याला काय पसंद पडल,अन तोचं मारलं,ते ह्या म्हाताऱ्यानी खाल्लं असा तुम्ही समजा! तो कावळा तोचं मारल्या बिगर काव काव करत राहायचा! आपला पितर येतो नाही का त्यो'! हे ऐकून कपाळाला हात लावला मी!
घरी परत आले ,तर अलीकडे-पलीकडे सगळीकडे तोचं काव-काव चा आवाज! सकाळी लवकर उठून गृहिणीनी त्यांच्या घरातील जे कोणी स्वर्गवासी झाले होते,त्यांच्या आवडीचे पदार्थ केले होते. खिशात पैसे नाही तर उधार-उसनवार केली,कारण पितरांना जेवायला घालायचे होते. अनेक ठिकाणी मास-मच्छी,आणि दारू शिपडणे ताटावर चालू होते.कावळे ते इतकं सार खावून आणि दारूच्या नशेने झीन्गतच असावेत! त्यामुळे कोणाचे ताटात कावळ्याने आधी टोच मारली त्यांची काव-काव थांबली! आणि तृप्त झालेले व झिंगलेले कावळे येत नाहीत तर चर्चा चालू,"बया कावळा नाय ग तो शिवला अजून,म्हातारीची विच्छा अधुरीच राहिली".,तर कोणी म्हणे म्हातार्याची इच्छा अधुरी राहिली. चर्चेला वाव मिळत होता! मला हे सगळा पाहून हसू येत होत.
जिवंतपणी या लोकांचे हाल चालले होते. खायला मिळत नाही म्हणून भांडणे चालायची. इतकी बरस खाल्लात ना? जीव नाय भरला का म्हातारे?(काहीं ठिकाणी म्हातार्या) त्या पोरांच्या त्वांदातून घास काढून काय तूला देवू काय? असे संवाद खूप वेळा ऐकले होते. जी माणसे असे म्हणायची तीच हात जोडून कावळ्याला पितरे म्हणून खाण्यासाठी येण्यास विनंती करीत होती! सारा काहीं अजबच प्रकार!
मी खूप विचार केला,कि या विषयावर काहीं तरी करायला हवे. नंतर एक दिवस मीटिंग बोलावली मरीआईच्या देवळात. सर्वांच्या पुढे शांतपणे विषय मांडायचा ठरवले. त्यांच्या भावनाही दुखवायच्या नव्हत्या.
सर्वांना मी म्हणाले की" अरे जितेपणी आपल्या मानसासी पुसा,पितरांच्या नावान त्या कावल्यासी का देसा"? म्हणजे जिवंतपणी आपल्या माणसाला जे हवे-नको ते बघा,तो गेल्यावर तो पितर होऊन कावळ्याच्या रुपात येईल म्हणून त्याला का देता? कावळ्यात पितर तुम्हाला दिसतो आहे का? ही माणसे जिवंत तुमच्या समोर जेव्हा दिसतात तेव्हा त्यांना द्या! त्यांना पहा!
हा विषय त्यांना नीट समजावला. की असा गेलेला माणूस दारू प्यायला,मासे खायला येणार आहे का? दारू ही काय देण्याची वस्तू आहे का? मी त्यांना म्हणाले,त्यातले काहीं बाहेख्याली होते,त्यांना बाई आवडायची,मग तिलाही पानावर ठेवणार कि काय? तेव्हा हशा पिकला. सर्वजण हसू लागले. काकू काय बी बोलताय तुम्ही. मी म्हणाले खरे तेच सांगितले. त्या पेक्षा जिवंतपणी एक तीळ सात भावांनी खाल्ला, त्या प्रमाणे जे असेल ते सर्वांना देत जा. कधी म्हातार्या माणसाला काहीं वेगळं खावंसं वाटते,ते द्यावे. म्हातारी माणसे हे लहान मुलेच असतात. त्यांचा मान राखायला हवा,त्यांना जिवंत पणीच हवे ते मिळाले,तर त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला. मग काहीजण हा,बराबर सांगतायत काकू! असे म्हणाले. मी हेही सांगितले की दारू किंव्हा इतर व्यसनांचे लाड करू नका. पोटभर,हवे ते शक्य असेल तसे खायला द्या. त्यांची मनापासून आजारपणात सेवा करा. थोड्या-फार प्रमाणात तरी घरातल्या म्हातार्यांना हवे ते मिळू लागले .काव-काव मात्र थांबली नाही. ती अजूनही थोडीफार चालू आहे.
हे फक्त गावातच आणि गरिबांच्या घरात चालते असे नाही तर सुशिक्षित आणि शिकलेल्यान्च्या,श्रीमंतांच्या घरात वेगळ्या पद्धतीने चालते. प्रकार एकच की आधी जिवंतपणी आपल्या माणसाना नीट पहात नाहीत. त्यांना जिव्हाळ्याने वागवत नाहीत,आणि ते गेल्यावर आपल्याला त्रास देऊ नये म्हणून श्रद्धा-पक्ष करीत बसतात.
सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या माणसाना आपुलकीने जिवंतपणीच वागवा, त्यांना काय हवे ते द्या ,म्हणजे ते गेल्यावर काहीं असली कर्म-कांडे करण्याची गरज भासणार नाही!(ज्या लोकांना कर्म-कांडात रस आहे ,त्यांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही,मी त्यांची मी माफी मागते. मूळ लेखाचा हेतू समजून घ्यावा,गैरसमज करू नयेत!)
Subscribe to:
Posts (Atom)