जागतिक महिला दिन आपले शतक साजरे करीत आहे. १९११ साली ऑस्ट्रिया,डेन्मार्क,जर्मनी स्वित्झरल्यंड येथे प्रथम जागतिक महिला दिन साजरा केला गेला. जागतिक स्तरावर महिलांची आर्थिक,राजकीय,सामाजिक उन्नतीचा भूत-वर्तमान- भविष्याचा आढावा घेणे या हेतूने ८ मार्च या दिवशी जगात सर्वत्र साजरा केला जातो.
१७६७-१७९५ अहिल्या बाई होळकर , १८३५-१८५८ राणी लक्ष्मीबाई,१८४८ -१८९७ सावित्रीबाई फुले, ते १९६६-१९७७ इंदिरा गांधी इत्यादी, यांची कारकीर्द भारतीय महिलांना आदर्श देणारी आहे.आपल्या देशाचे उच्चतम अध्यक्ष स्थान एक स्त्री भूषाविते आहे २००७ साल पासून ... प्रतिभाताई पाटील!
प्रत्येक भू-भागाची भौगोलिक,धार्मिक, प्रांतिक,वांशिक,जातीवार रचना इत्यादी अनेक मुद्दे स्त्रीचे भवितव्य ठरवीत आहेत. जी स्त्री तिच्या स्वधर्माचे पालन करताना इतर सर्व समाजाच्या चौकटीना भेदते,तीच आपले कर्तृत्व सिद्ध करू शकते. चौकटीत राहूनही कर्तृत्व सिद्ध करता येते,परंतु त्याला मर्यादा येतात. उदा . स्त्रीने चूल-मुलं हेच आपले मर्यादित क्षेत्र ठेवावे अशा समजेचे पुरुष आणि स्त्रिया कुटुंबात आणि समाजात अजूनही भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत. स्त्रीच स्त्रीची मोठ्या प्रमाणावर शत्रू आहे. ती घरी-दारी ते शत्रुत्व करून स्त्रीच्या विकासात अडचण बनत असते.
भारतीय स्त्रीला खूपच आप्त-स्वकीय, समाजाशी लढा देत आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागते. ते इतके जिकीरीचे आहे,की सर्व सामान्य स्त्री पावूल पुढे टाकण्यास बिचकते. स्त्रीला खरया अर्थाने समानता देणारी पिढी आता तयार होत आहे. या पिढीतील पुरुषांचे निश्चित स्वागत आहे. भारतीय स्त्री ही वडील,भाऊ,नवरा,मुलगा यांच्या कोंदणात जिवनभर बसवलेली आहे. त्या कोंदणात तिची घुसमट झाली, ती बाहेर पडून स्वतःच्या गुणांना पैलू पाडण्याचा प्रयत्न करते. काही जणींना सहज,तर बहुतांश स्त्रियांना झगडून आपले स्वातत्र्य घ्यावे लागते. हा झगडा आपल्याच कुटुंबातील स्त्री-पुरुष सदस्य आणि समाज यांच्याशी करावा लागतो.
भारतीय मानसिकता ही अजूनही स्त्रियांना फार त्रास देणारी आहे. स्त्रीवर मातृत्व लादणे,मुलगा नसेल तर अवहेलना करणे,स्त्री-भ्रूण हत्या, बाल विवाह ,घटस्फोटिता ,विधवा, परित्यक्ता ,एकट्या राहणाऱ्या,कुमारीमाता,हुंडाबळी, घरातून मारहाण आणि जाच, इत्यादींचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. देह विक्रय करून अर्थार्जन हा तर समाजाला मोठा कलंक आहे. अनेक-स्त्री-पुरुष अर्थार्जना साठी हा मार्ग अवलंबत आहेत.यात स्त्रियांची संख्या मोठी आहे. काही जणींना बळजबरीने हा व्यवसाय करायला लावतात,तर काही जणी स्वतःच्या गरजा भागविण्या साठी स्वेच्छेने हा व्यवसाय करतात. माणूस हा प्राणीच आहे, हे वारंवार त्याच्या कृतीतून दिसून येते.
माणसातील माणुसकीचे जतन हे सर्वानीच करायला हवे. शिक्षण आणि आर्थिक सुधारणा या मानवाच्या विचार सरणीत बदल घडवून आणतात,परंतु त्याचे प्रमाण अजून कमी आहे. धार्मिक आणि जातीय पगडा हा अजून आपली पकड ठेवून आहे. या सारया चौकटीत राहूनही स्त्री-पुरुष समानता आणता येते,त्यासाठी प्रयत्नशील हवे. कोणत्याही सुधारणा एकदम होणार नाहीत ठावूक आहे,परंतु भारतीय गल्लीच्छ राजकारणाने सर्वच प्रश्न असे लोंबकळत ठेवले आहेत.
खरया अर्थाने समाजाचा विकास हा स्त्रीच करू शकते. ५०% असलेली स्त्री,पुरूषाच्या बरोबरीने चालूनच हा खरा समाजाचा सर्वांगीण विकास होईल. स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे,स्त्री-शिक्षण,या महत्वाच्या गोष्टी करायला हव्यात. स्त्री कडे एक मादी म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. राजकारणात ज्या पद्धतीने स्त्रीला तिच्या बुद्धिमता आणि कर्तृत्वाचा विचार न करता,संख्या भरण्याच्या दृष्टीने वापरले जाते. जरी ती स्त्री सरपंच,महापौर,मुख्यमंत्री झाली,तरी बोलविता धनी पुरुष असतो.( याला अपवाद म्हणून काही बुद्धिवान स्त्रिया राजकारणात आहेत.) खूप कमी प्रमाणात महिला आपले कर्तृत्व त्या मुळे स्वबळावर सिद्ध करू शकतात.
स्त्रीच्या राहणीमानात बदल झाला,ती शिक्षित झाली,म्हणूनही तिच्या वरील अन्याय थांबले असे नाही. ती स्त्री आहे,म्हणून तिला डावलणे,तिची योग्यता असताना तिला वाव न देणे हे अजूनही चालू आहे. पुरुषाला त्याच्या कोणत्याही कृती विषयी फार चर्चा किंव्हा सामाजिक अवहेलना होत नाही,परंतु,स्त्री ला पदोपदी,सारया कौटुंबिक आणि सामाजिक अवहेलनेला तोंड द्यावे लागते.(पुरुषाचा व्यभिचार हा वैयक्तिक प्रश्न असे मानले जाते,स्त्रीला मात्र बहिष्कृत केले जाते. पुरुषाचा आर्थिक आणि नैतीक भ्रष्टाचार हा नजरेआड केला जातो. स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राचे पावित्र्य राखण्याचे प्रमाण काही स्त्रीया ,तिचा जोडीदार आणि समाज घटवत आहे. पुरुषाला पवित्र्याच्या चौकटीत बसवलेलेच नाही,जणू काही त्याला कशाचीही बंधने व चौकट नाही)एक-मेकांशी प्रामाणिक असणे ,येथे खरी स्त्री-पुरुषांना समान ठेवणारी मानसिकता हवी. बंधन कोणतेही कोणी घालायचे नसते,बंधन आपण स्वतः आपल्याला घालून घ्यायचे असते.
स्त्री स्वातन्त्र्याचा खरा अर्थ न उमजल्याने स्त्रीनेच गोंधळ निर्माण करून ठेवले. जसे आपला देश स्वतंत्र झाला,तर ते स्वातंत्र्य पेलण्याची वैचारिक क्षमता आपल्यात नव्हती,तसेच स्त्रीचे झाले असे मला वाटते. पुरुष करतो ती गोष्ट मी करणार हे स्त्री स्वातंत्र्य नसून, स्त्रीला तिचे स्वतःचे अस्तित्व,स्वाभिमान जपता येणे,निर्णय क्षमता असणे हा आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! स्त्रीने आपल्याला निसर्गाने दिलेल्या गुणांचे संवर्धन करावे. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत असताना,आपले अस्तित्व तिने टिकवावे. स्त्री हा समाजाचा मूळ आधार आहे. तिच्या संस्कार क्षमतेने समाज घडतो. पुरुषाला जन्म देणारी स्त्री आहे,म्हणून तिचे गुणांचे संवर्धन नितांत गरजेचे आहे. स्त्रीचे निसर्ग दत्त गूण ,मातृत्व, संगोपन,प्रेम, वात्सल्य,करुणा,सहनशीलता, क्षमाशिलता इत्यादी चा कुटुंबा साठी उपकारक ठरतात,समाजाच्याही ते हिताचे ठरतात!
आज आपल्या देशातील स्त्री देशातील उच्चतम स्थानावर विराजमान आहे अध्यक्ष ..प्रतिभाताई पाटील! इंदिरा गांधी यांनी जगात अधिक काळ स्त्री पंतप्रधान राहण्याचा मान पटकावला. कल्पना चावला, किरण बेदी अशा अनेक स्त्रियांनी त्यांच्या क्षेत्रात काम करून नाव उज्वल केले. अनेक स्त्रियानी यशस्वी उद्योजक,पोलीस अधिकारी, ते अंतराळात जाण्यापर्यत झेप घेतलेली आहे. आधुनिक शिक्षण आणि कॉम्पुटर या मध्ये स्त्री ही अग्रेसर ठरली आहे. स्त्रीची ही झेप,आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या पाठबळावर अशीच चालू राहो ,आणि तिच्या सह कुटुंब-समाज-देश-जग सार्यांचा विकास होवो ,ही जागतिक महिला दिनाच्या निम्मिताने सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment