Sunday, January 15, 2012

आकाशगंगेप्रमाणे असावे कुटुंब, प्रत्येक सदस्य स्वतंत्र कक्षेत दंग! तेथे भरावे आपुलकीचे रंग, सारेच पक्षी उडतील स्वच्छंद!


निसर्गाकडून  फक्त पक्षी स्वतंत्रपणे  घरटे  बांधतात व स्वच्छंदी  जगतात  हे  फक्त  माणसाला  उमजले , निसर्गातून सूर्य सर्वाना प्रकाश देतो, सागर सर्वाना समाविष्ट करतो, नदी सर्वाना सारखेच पाणी  देते, पृथ्वीचे मानवाने कितीही भाग पडले तरी ती एकसंध व सहनशील राहते, वारा सर्वाना सारखाच स्पर्श करतो, आकाश सर्वांनाच सारखे छत देते, वृक्ष सर्वाना सारखी सावली देतो, परंतु कोणीही फलाची अपेक्षा धरत नाही! मग या सारया गुणातून  मनाची विशालता, परोपकार, निरपेक्षता हे गूण कसे माणूस घेत नाही! त्याच्या सोयीचे ते उचलतो व अर्थ लावतो!  

                     आपल्या संस्कृतीचा अर्थ असता उमजला,तर कुटुंब संस्था ,समाज व देश असा रसातळाला  पोहोचला नसता! ना उमजला स्वधर्म,ना उमजले आपुले कर्म! स्वार्थाने पोखरला आहे मन, देह झाले आहे मनाचा गुलाम!  गृहस्थाश्रमातील व्यक्तींनी अर्थार्जन करणे आहे,त्यांच्यावर ज्ञानोपासना  करणारा वर्ग (ब्रम्हचार्याश्राम  ) वानप्रस्थाश्रम  व         संन्यास्थाश्रमाच्या सर्वच व्यति अर्थ या विषयावर अवलंबून असतात. काळा प्रमाणे जरी जगण्याचा मार्ग जो तो निवडत असला,तरी या गोष्टींचा विचार व्हायला नको का? माणसाने वानप्रस्थी   न होता अर्थार्जन करत राहणे याची गरज आता भासू लागली आहे.  वृद्ध माणसांची कार्य क्षमता  कमी झाली असें समजून तरुण वर्ग हे लोक आपल्या जागा अडवतात असें समजतात. वृधाश्रमानची व पाळणा घरांची संख्या वाढणे या गोष्टी घडत आहेत. आपण असलेली घडी जेव्हा कुटुंबसंस्थेची बदलतो,तेव्हा त्याचे सुपरिणाम व दुष्परिणाम दोन्हीही दिसून येतात! 

                       प्रत्येकाला आपले विचार स्वातंत्र्य  द्यावे, ज्याला हवे त्याने आपले स्वतंत्र घरटे बांधावे. निसर्गात जे घडते तेच घडणार! सोन्याचा पिंजरा करून कोणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही! प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. काही जण मुलांच्या विचार स्वातंत्र्यावर  गदा आणतात,तर काही  ठिकाणी  मूले पालकांच्या! जो मनाने कमकुवत असतो तो चेपला जातो!  मैत्रीचे नाते मुला-सुनांशी ठेवूनही परिस्थितीत फार बदल घडले असें नाही! शेवटी हे जिवन मार्गाचे प्रयोग आहेत. 

                      मुलीने व मुलाने दोघानेही आपले घर सोडावे व वेगळे राहावे हे तर चालू आहेच!  प्रश्न फक्त असा आहे की की स्वातंत्र्याच्या कल्पना जर इतक्या हव्या आहेत,तर या मुलांनी आपले शिक्षण स्वतःच्या कमाईवर  करावे. आपले कॉलेज चे शिक्षण,गाड्या पेट्रोल चा खर्च,मित्र-मैत्रिणच्या पार्टी ,स्वतचे लग्न सारा खर्च पालकांच्या खिशातून न करता स्वबळावर करावा. स्वातंत्र्याची  कल्पना ही परदेशातून उचलली ना, मग तेथील मूले स्वबळावर सारे करतात.  मैत्री, प्रेम किंव्हा लीविग इन रिलेशनशिप  वर्षानुवर्षा राहायचे, भारतीय संस्कृती प्रमाणे लग्न करायचे, देणी-घेणी मान-पान करायचे,  पालकानकडून सारे काही करून घेतल्यावर नविन घरट्यात जायचे . दोन्ही दगडीवर हात ठेवून तरुण पिढीतील अनेकांनी पालकांना ग्रस्त केले आहे.  मुलांच्या शिक्षणासाठी ,लग्ना साठी कर्ज काढून पालक हप्ते भरत राहतात. वृक्षाचे बांडगुळ बनून वृक्षाला कमकुवत करायचे ही प्रवृत्ती पण अनेक ठिकाणी दिसून येते. काही  पालक मुलांवर  आपले विचार लादून त्यांना हैराण करतात हेही चित्र दिसून येते. तरुण वर्गात  जात-पात न मानणे, स्व बळावर शिक्षण स्व बळावर लग्न, ,हुंडा पद्धतीचा विरोध, कौटुंबिक  जबाबदारीची जाणीव असें काही ठिकाणी चांगले चित्र पहावयास मिळते तर  काही पालक आपल्या आडमुठ्या स्वभावाने ,काळानुसार स्वतःत बदल न केल्याने मुलांच्या प्रगतीस अडसर आणणे किंव्हा त्रासदायक ठरत असतात. 

                     स्वतःची विचार प्रणाली स्वतःच्या जीवावर राबवावी मग ते पालक असोत नाहीतर मूले! कुटुंब संस्थेला मुळापासून उखडताना भाव-भावनांच्यात  गुंतून प्रेमाला व नात्यांना पारखे झालो, म्हणून गळा कोणीच काढू नये. गरजे पुरती  मैत्री व नाती, न देईल कोणास मनी तृप्ती! 

                          सोन्याचा पिंजरा आपल्या घराचा होवू देऊ नये हे अगदी बरोबर  आहे,परंतु  ज्या पालकांनी  दिले मुलांना मोकळे आकाश, त्या मुलांनी  का बरे समजला त्या घराला पिंजरा? का नाही ते राहू शकले आपल्या पालकान समवेत?  मोकळे आकाश दिले, म्हणून वृद्धाश्रम कमी होणार नाहीत! फक्त स्वतः साठी जगणे ही प्रवृत्ती कुटुंब , समाज  व देशाच्या प्रती काय आपली कर्तव्ये जाणणार?   कुटुंब, समाज व देशाची ही स्थिती का, यावर  आपण मग कोणीच ओरडा करू  नये! 

                        पृथ्वीचे जरी कितीही मानवाने भाग पडले,तरी पृथ्वी आपला एक संधपणा कायम ठेवते, वृक्ष सर्वाना सारखीच सावली देतो,सूर्य सर्वाना सारखाच प्रकाश देतो,हे गुणही निसर्गा कडून घ्यायलाच हवेत! नुसते पक्षी स्वतंत्र घरटे करतात इतकेच गूण घेवून उपयोग नाही! अधिकार समजतात,तर कर्तव्य, परोपकार ही अंगी असायलाच हवा ना! निसर्गच सांगत आहे हे!  
                         स्वतंत्र भरारी घेताना बंधन मुक्त जिवन जगायचे,तर तेथे  कोणतेच बंधन नसेल!  
आकाशगंगे प्रमाणे असावे कुटुंब,
प्रत्येक सदस्य स्वतंत्र कक्षेत असेल दंग!
तेथे भरावे  सर्वांनी आपुलकीचे रंग,
सारेच पक्षी उडतील  असें स्वच्छंद!  
                                       मंगला 


एका आईची ऐकत होते कथा! कथेतून मायाजाल उमजत गेला होता!


एका आईची ऐकत होते कथा! 
कथेतून मायाजाल उमजत गेला होता! 

डोळ्यात आसवे आणून सांगू लागली ती बाई......

काय असेल बरं या आई या शब्दात जादू?
आई हा शब्दं ऐकण्यास कान होतात बेकाबू! 
आई या शब्दातच  खरे तर आहे प्राण,
या शब्दाविना शरीर कसे होते बेजान!
नको तिला पैसा-अडका,नको जमिन जुमला,,
बाळानो, आई या शब्दांनीच बांधला तिने बंगला!
आई शब्दा शिवाय झाली रे ती भिकारी,
पदर पसरून करीत आहे ती लाचारी!
आई शब्दाची कळली  तिला  महती,
हाक न मारुनी कठोर शिक्षा देता किती?
गुन्हेगारानाही माफी असते रे,
आई ला एकदम अशी फाशी देवू नका रे!
असेन मी जगातील सर्वात वाईट आई,
पण प्रेम माझे नक्कीच रे खोटे  नाही ,बाळानो नक्कीच रे खोटे नाही!
मी भरवला तुम्हाला कावू-चीवूचा घास,
तुमच्या हास्यात माझ्या हास्याचा प्रवास!
गाईली  मी तुम्हा अंगाई,तुमच्या निजेतच मला निज येई!
तुमच्या किल-बिलीने घर होतं गुंजत,
फुललेला संसार पाहण्यास मन होतं रमत!
कितीही  मी  बदलले,तरी नाही तुम्ही मला समजून घेतले,
अपमानानच्या ओझ्यात जिवन जगणे मुश्कील झाले! 
 कळले मला, प्रेम असें मागून नाही ना मिळत !
का माझे जिवन साऱ्यानसाठी  बसले असें जाळत?
मला सुद्धा मुलां सारखी  धरता आली असती वाट,
पैसे देवून दूर वाढवले असते नाही का आरामात!
पण अशी जिवनकल्पना शिवलीच नाही  गं कधी मनात!

रडू लागली बाई बोलता बोलता  हमसून हमसून 
बाईंच्या कथे व व्यथेवर उत्तर दिले मी समजावून 

माझ्या आता पर्यंतच्या जीवनाने  शिकवले खूप,
कोणाचे वाईट केले नाही,याने झोप येते आपसूक!
माझ्या बाळांवर माझी आहे, अशी अखंड  प्रीती,
स्वतः साठी जगण्याची नव्हती कसली अनुभूती!
माझ्या बाळांनीच गुरु होवून मज शिकवली जिवन-नीती! 
आई या शब्दातील विशालता उमजून लाभली मनी  तृप्ती !

समाधानाने येते  शाश्वत  प्रेमाची  प्रचीती!
स्वशोधात आनंदाने गवसेल चैतन्याची ज्योती!

मंगला 


ठाई ठाई दिसे सृष्टित सर्वत्र गुरु, सदगुण अंगिकारून होवू ,स्वतः स्वतःचाच गुरु!


       माणूस जन्माला येतो तेव्हा प्रथम त्याला शिकवणारी त्याची माता ही गुरु असते. मुलाला बोलायला-चालायला सारे काही ती शिकवते. आपण लहानाचे मोठे होत असताना जे  कोणी आपणास मार्गदर्शन करतात,ते आपले गुरूच असतात. वडील आपले पालन पोषण करतात आपल्याला शिक्षण देतात,स्वतःच्या पायावर उभे करण्यास मदत करतात,तेही आपले गुरूच! शाळेत शिक्षक आपणास विद्याभ्यास शिकवतात, तेही आपले गुरु, म्हणून तर म्हणतात मातृदेवो भव,पितृदेवो भव,गुरु:देवो भव ! जे आपले गुरु तेच देवाच्या स्थानी असतात. तुकाराम महाराज म्हणतात ........

                                       सद्गुरूच्या संगे शिष्य बी घडले,
                                       शिष्य बी घडले, सद्गुरूची झाले!
                                       आम्ही बी घडलो ,तुम्ही बी घडाना! 

                             रस्त्याने वाट दाखवणाराही गुरूच! निसर्ग आपणास सारे काही देत असतो,परंतु आपल्याकडून काही मिळण्याची अपेक्षा बाळगत नाही.फलाची अपेक्षा न धरता कर्म करावे हे निसर्ग आपणास शिकवत असतो! सूर्याकडून परोपकार, आकाशाकडून विशालता, सागराकडून अथांगता,चंद्राकडून शितलता, पृथ्वीकडून  सहनशिलता ,वायूकडून सहजता शिकण्यास मिळते. चंद्र कलेकलेने वाढतो व कलेकलेने  कमी होतो,तरी आपले शितल किरण देवून आल्हाद देण्याचे कार्य करीत राहतो. तसेच यश असो वा अपयश माणसाने न ढळता आपले कर्म नीतीने करीत राहिले पाहिजे. वारा सर्वत्र संचार करतो,एका जागेशी बांधील न राहाता विश्वची माझे घर हे आपणास शिकवतो!

                             वायुसम मन असावे हलके फुलके ,सहजच स्पर्शत जावे जगाचे गलके! 

                           पृथ्वीचे मानवाने कितीही खंड पडले,अक्षांश -रेखांश, सागराला विभक्त करण्याचा प्रयत्न केला,नकाशे तयार केले,तरी पृथ्वीचा एकसंधपणा भग्न पावत नाही! क्षमाशीलता व उदारातेची शिकवण पृथ्वी आपणास देते. अजगर आहारा पुरती हालचाल करतो व इतर वेळी पडून राहतो. सर्वकाळ संतुष्ट कसे राहावे हे त्याच्या कडून शिकण्यास मिळते. मधमाशी मध गोळा करते व मध गोळा करण्या पायी स्वतःच्या प्राणास मुकते, तिच्या कडून माणसाने संग्रह टाळावा ही शिकवण मिळते. हत्ती हा हत्तीणीच्या पाशात अडकतो व खड्ड्यात पडतो,तेव्हा मोहविवशता कशी टाळावी हे त्याचेकडून शिकण्यास मिळते. पतंग हा कीटक ज्योतीचा मोह धरून ज्योती जवळ जातो व सर्वनाश ओढवून घेतो,या वरून मोहाचा त्याग करण्याची शिकवण मिळते. 

                           सागरातून रत्न-माणिक-मोती मिळतात, तसेच त्यात विविध प्रकारचे लहान मोठे जलचरही असतात .सागर आपणास समतावृत्ती व आपले वैशिश्ठ्य कायम ठेवण्याची  शिकवण देतो! वृक्ष आपणास सावली देतात ,फळे-फुले देतात. वृक्षा कडून दुसऱ्यास सतत उपयोगी पडण्याची शिकवण मिळते. कुत्रा हा प्राणी त्याचा इमान राखण्याचा गूण आपल्यास शिकवतो. नारळाच्या झाडास कल्पवृक्ष म्हणले आहे,त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतो,तसेच आपणही सर्व तऱ्हेने, सर्वानसाठी उपुक्त ठरावे ही शिकवण मिळते. ग्रंथ आपणास जिवन ज्ञान देत असतात, ते आपले गुरूच होत. सृष्टित ठाई ठाई आपणास शिकवण मिळत असते व देणारे सारे गुरूच असतात,फक्त  हे जाणण्या साठी आपले डोळे उघडे हवेत व आचरण हवे. तसे झाले तर स्वतःच होतो स्वतःचा गुरु,  सहजभावाने ,नीतीने विवेकाने भानावर राहून ,या जन्माचे  प्रयोजन उमजते व तो आपल्यातील सूर्याला गवसणी घालून आत्मतेजात रंगून जातो! 

                                              तेजातून तेजाकडे जाणारा हा किनारा,

                                      स्वतःस शोधण्याचा जिवन सागराचा पसारा!

                                          ना ऐल तीरी कोणी,ना पैल तीरी कोणी,

                                       आत्मतेजाच्या रंगात अस्तित्वाची वाजेल धुनी! 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                            मंगला 

फुलांची साधी-सोपी रचना,मनास देई प्रसन्नतेचा खजिना!!!!!



फुलांच्या रचना करण्या बाबत काही जण कशा करतात हे जाणून घ्यायला उत्सुक आहेत,म्हणून मी कशा रचना करते ते लिहित आहे. मला प्रथम फुलांचे फोटो काढण्याची आवड होती. नंतर ती फुले फुलदाणीत ठेवायचे. हळू हळू कपाटातील काचेची विविध भांडी,शोभेच्या वस्तू,फुले,पणे असें एकत्रित ठेवून रचना करू लागले. सूर्य प्रकाशात त्याचे किरण त्यात रचनान मध्ये टिपणे आवडू लागले. या कलाकृती झोपाळ्यावर,किंव्हा टेबल वर ठेवून,त्यावर ओढण्या ठेवून त्यावर ही फुलांची रचना ठेवून रंग-संगती लावू लागले. जास्वंदी,तगर,जाई,जुई,सायली,रातराणी, विविध रंगाचे गुलाब,बाल्सम झेंडू,सोनटक्का,ऑफिस time , विविध रंगाची लिली ,alamanda ,गणेश फूल, व ऋतू प्रमाणे येणारी फुले इत्यादी फुले व  त्यात शतावरी,गवतासारख्या किव्हा इतर कुंडीत उगवणाऱ्या लहान वनस्पती वापरू लागले. कधी साबणाचा  फेसही घेवून  फुले खोवली,असें विविध प्रकार सुचू लागले. यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज नाही.  
             विविध रंगाचे शिपले,दगड, बाहुल्या,पक्षी,मेणबत्ती याचा वापर काल्कृतीत करता येतो. रात्री फोटो  मी आपल्या जेवण बनविण्याच्या ओट्यावर काढले आहेत. यासाठी खूप पैसा लागत नाही,घरच्य वस्तूंचा वापर करून आपण आपला हा छंद जोपासू शकतो. मी अगदी जपाची माळ देवांच्या मूर्ती,सारे काही कलाकृतीत वापरले आहे. ज्या वेळेस जे सुचेल ते घेते. या साठी एखद्या सध्या वस्तूकडे बघण्याची वेगळी दृष्टी हवी. फुलांचा आकार कसा आहे,ते कसे ठेवले तर त्याची रचना कसा आकार घेईल,हे विचार करून जमते. काही फुलांच्या पाकळ्या घेवून त्यावर दुसरी फुले ठेवून  रचना छान दिसू शकते. काही रंगीत पाने लहान असतील तर त्यांचा दुसऱ्या एखाद्या फुलाचे डोळे म्हणून वापर करता येवू शकतो,काही फुले गणपतीच्या सारखी दिसतात,त्यांना तसे ठेवून रचना करता येते. आपली एकाग्रता व काहीतरी कल्पना सुचून त्या प्रमाणे फुलांची  रचना होते. फोटो  काढण्याचेही मी प्रशिक्षण घेतलेले नाही,जसे येते तसा फोटो काढते. 
           मत्सालायाची काचेची पेटी  नुसती पडून होती,त्यात सुंदर रचना केली. यात वाळू,माती,लहान झाडांची रोपे,फुले बाहुल्या वापरून एखादे दृश्य बनवता येते व ते छान दिसते. त्यात तळे,दोनगर,देऊळ,घर असें काहीही दाखवता येते. अशा अनेक काचेच्या बरण्या, डिश मग,ग्लास,वाट्या साऱ्यांचा वापर करता येवू शकतो. विविध आकाराचे तरे असतील त्यांचाही वापर करता येवू शकतो.विजेच्या माळा मी फुलांच्या रचनान मध्ये वापरल्या आहेत. 
         फुले घरात असतील तर ती वापरावीत नाहीतर बाहेरून फुले आणून त्यांची रचना करावी,पण विकतची फुले आणण्यासाठी पैसा अधिक लागतो. मी माझ्या घरच्य टेरेस मध्येच जुने माठ,डबे,बदल्या,दुधाचे तरे,व लहान-मोठ्या कुंडी मध्ये अशी अनेक प्रकारची झाडे लावली,व त्यातूनच हा छंद जडला. ज्यानं आवड आहे,ते सह या फुलांच्या रचना करून त्याचा आनंद घेवू शकतात. त्या फुलांच्या सहवासात प्रसन्न वाटते,त्या मुळे दिवसाची सुरुवात छान झाली,की दिवसही उत्साहाने जातो! 
                                                                                                                                           मंगला 
https://fbcdn-sphotos-a.akamaihd.net/hphotos-ak-snc6/46966_1582737929027_1253087005_1592855_3012545_n.jpg

My Creative Greetings!