Sunday, January 15, 2012

आकाशगंगेप्रमाणे असावे कुटुंब, प्रत्येक सदस्य स्वतंत्र कक्षेत दंग! तेथे भरावे आपुलकीचे रंग, सारेच पक्षी उडतील स्वच्छंद!


निसर्गाकडून  फक्त पक्षी स्वतंत्रपणे  घरटे  बांधतात व स्वच्छंदी  जगतात  हे  फक्त  माणसाला  उमजले , निसर्गातून सूर्य सर्वाना प्रकाश देतो, सागर सर्वाना समाविष्ट करतो, नदी सर्वाना सारखेच पाणी  देते, पृथ्वीचे मानवाने कितीही भाग पडले तरी ती एकसंध व सहनशील राहते, वारा सर्वाना सारखाच स्पर्श करतो, आकाश सर्वांनाच सारखे छत देते, वृक्ष सर्वाना सारखी सावली देतो, परंतु कोणीही फलाची अपेक्षा धरत नाही! मग या सारया गुणातून  मनाची विशालता, परोपकार, निरपेक्षता हे गूण कसे माणूस घेत नाही! त्याच्या सोयीचे ते उचलतो व अर्थ लावतो!  

                     आपल्या संस्कृतीचा अर्थ असता उमजला,तर कुटुंब संस्था ,समाज व देश असा रसातळाला  पोहोचला नसता! ना उमजला स्वधर्म,ना उमजले आपुले कर्म! स्वार्थाने पोखरला आहे मन, देह झाले आहे मनाचा गुलाम!  गृहस्थाश्रमातील व्यक्तींनी अर्थार्जन करणे आहे,त्यांच्यावर ज्ञानोपासना  करणारा वर्ग (ब्रम्हचार्याश्राम  ) वानप्रस्थाश्रम  व         संन्यास्थाश्रमाच्या सर्वच व्यति अर्थ या विषयावर अवलंबून असतात. काळा प्रमाणे जरी जगण्याचा मार्ग जो तो निवडत असला,तरी या गोष्टींचा विचार व्हायला नको का? माणसाने वानप्रस्थी   न होता अर्थार्जन करत राहणे याची गरज आता भासू लागली आहे.  वृद्ध माणसांची कार्य क्षमता  कमी झाली असें समजून तरुण वर्ग हे लोक आपल्या जागा अडवतात असें समजतात. वृधाश्रमानची व पाळणा घरांची संख्या वाढणे या गोष्टी घडत आहेत. आपण असलेली घडी जेव्हा कुटुंबसंस्थेची बदलतो,तेव्हा त्याचे सुपरिणाम व दुष्परिणाम दोन्हीही दिसून येतात! 

                       प्रत्येकाला आपले विचार स्वातंत्र्य  द्यावे, ज्याला हवे त्याने आपले स्वतंत्र घरटे बांधावे. निसर्गात जे घडते तेच घडणार! सोन्याचा पिंजरा करून कोणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही! प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. काही जण मुलांच्या विचार स्वातंत्र्यावर  गदा आणतात,तर काही  ठिकाणी  मूले पालकांच्या! जो मनाने कमकुवत असतो तो चेपला जातो!  मैत्रीचे नाते मुला-सुनांशी ठेवूनही परिस्थितीत फार बदल घडले असें नाही! शेवटी हे जिवन मार्गाचे प्रयोग आहेत. 

                      मुलीने व मुलाने दोघानेही आपले घर सोडावे व वेगळे राहावे हे तर चालू आहेच!  प्रश्न फक्त असा आहे की की स्वातंत्र्याच्या कल्पना जर इतक्या हव्या आहेत,तर या मुलांनी आपले शिक्षण स्वतःच्या कमाईवर  करावे. आपले कॉलेज चे शिक्षण,गाड्या पेट्रोल चा खर्च,मित्र-मैत्रिणच्या पार्टी ,स्वतचे लग्न सारा खर्च पालकांच्या खिशातून न करता स्वबळावर करावा. स्वातंत्र्याची  कल्पना ही परदेशातून उचलली ना, मग तेथील मूले स्वबळावर सारे करतात.  मैत्री, प्रेम किंव्हा लीविग इन रिलेशनशिप  वर्षानुवर्षा राहायचे, भारतीय संस्कृती प्रमाणे लग्न करायचे, देणी-घेणी मान-पान करायचे,  पालकानकडून सारे काही करून घेतल्यावर नविन घरट्यात जायचे . दोन्ही दगडीवर हात ठेवून तरुण पिढीतील अनेकांनी पालकांना ग्रस्त केले आहे.  मुलांच्या शिक्षणासाठी ,लग्ना साठी कर्ज काढून पालक हप्ते भरत राहतात. वृक्षाचे बांडगुळ बनून वृक्षाला कमकुवत करायचे ही प्रवृत्ती पण अनेक ठिकाणी दिसून येते. काही  पालक मुलांवर  आपले विचार लादून त्यांना हैराण करतात हेही चित्र दिसून येते. तरुण वर्गात  जात-पात न मानणे, स्व बळावर शिक्षण स्व बळावर लग्न, ,हुंडा पद्धतीचा विरोध, कौटुंबिक  जबाबदारीची जाणीव असें काही ठिकाणी चांगले चित्र पहावयास मिळते तर  काही पालक आपल्या आडमुठ्या स्वभावाने ,काळानुसार स्वतःत बदल न केल्याने मुलांच्या प्रगतीस अडसर आणणे किंव्हा त्रासदायक ठरत असतात. 

                     स्वतःची विचार प्रणाली स्वतःच्या जीवावर राबवावी मग ते पालक असोत नाहीतर मूले! कुटुंब संस्थेला मुळापासून उखडताना भाव-भावनांच्यात  गुंतून प्रेमाला व नात्यांना पारखे झालो, म्हणून गळा कोणीच काढू नये. गरजे पुरती  मैत्री व नाती, न देईल कोणास मनी तृप्ती! 

                          सोन्याचा पिंजरा आपल्या घराचा होवू देऊ नये हे अगदी बरोबर  आहे,परंतु  ज्या पालकांनी  दिले मुलांना मोकळे आकाश, त्या मुलांनी  का बरे समजला त्या घराला पिंजरा? का नाही ते राहू शकले आपल्या पालकान समवेत?  मोकळे आकाश दिले, म्हणून वृद्धाश्रम कमी होणार नाहीत! फक्त स्वतः साठी जगणे ही प्रवृत्ती कुटुंब , समाज  व देशाच्या प्रती काय आपली कर्तव्ये जाणणार?   कुटुंब, समाज व देशाची ही स्थिती का, यावर  आपण मग कोणीच ओरडा करू  नये! 

                        पृथ्वीचे जरी कितीही मानवाने भाग पडले,तरी पृथ्वी आपला एक संधपणा कायम ठेवते, वृक्ष सर्वाना सारखीच सावली देतो,सूर्य सर्वाना सारखाच प्रकाश देतो,हे गुणही निसर्गा कडून घ्यायलाच हवेत! नुसते पक्षी स्वतंत्र घरटे करतात इतकेच गूण घेवून उपयोग नाही! अधिकार समजतात,तर कर्तव्य, परोपकार ही अंगी असायलाच हवा ना! निसर्गच सांगत आहे हे!  
                         स्वतंत्र भरारी घेताना बंधन मुक्त जिवन जगायचे,तर तेथे  कोणतेच बंधन नसेल!  
आकाशगंगे प्रमाणे असावे कुटुंब,
प्रत्येक सदस्य स्वतंत्र कक्षेत असेल दंग!
तेथे भरावे  सर्वांनी आपुलकीचे रंग,
सारेच पक्षी उडतील  असें स्वच्छंद!  
                                       मंगला