Sunday, January 15, 2012

मनात जोपासू आपलेपणाची भावना, तेव्हाच साकार होईल कुटुंब-समाज व देशातील सुराज्याची कल्पना!


                           मी जेथे असेन,ते आपले आहे ,तेव्हा त्या त्या ठिकाणी आपली  प्रत्येक कृती ही आपलेपणानेच  असायला हवी. या पृथ्वीवरील  जे जे आहे ते सर्वांचे आहे व त्याचे जतन करायला हवे,त्याची काळजी घ्याला हवी हे माणसाला कळायला हवे. ज्या भूमीत जन्माला आलो,त्याचा फक्त फायदा घेण्यासाठी  आपण आहोत का? त्याच मातृभूमीच्या कुशीत जन्माला येवून ,मोठे होवून तिचे लचके तोडत राहणे,हे गिधाडापेक्षा ही भयंकर आहे. ही गिधाडे मेलेल्या माणसाना नोचतात,येथे तर माणूस माणसाला  जिवंतणीच  नोचत आहे! याचा अर्थ माणूस माणसाचे माणूसपण गमावून बसला आहे.

                           पृथ्वीला माता म्हणतो. तिच्यावरच सारी सृष्टी निर्माण झाली. पृथ्वी माता सारे चांगले-वाईट आपल्या सहन करते व तिचे कर्तव्य करीत राहते. ती विशाल हृदयाची माता आहे. एका चांगल्या गृहिणीने पतिव्रतेचे प्रेम,त्याग ,कर्तव्य,क्षमाशीलता,परोपकार, संगोपन  हे गूण अंगी ठेवून सदा प्रसन्न राहण्याचे काम करीत राहावे .ती आपल्या कुटुंबाचा विचार करते,तसेच आहे या पृथ्वी मातेचे! जसे बाह्य दर्शन ,तसेच अंतरात प्रतिबिंब दिसायला हवे! चंद्र जसा आकाशात दिसतो,तसेच त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसते. आपण आपले गूण विसरत चाललो आहोत. आपणही प्रत्येक जण आपले सद्गुणांचे रूप घडवले,तर त्याचे प्रतिबिंब सगळीकडे तसेच दिसेल! 

                            भाड्याचे घर आहे हा देह,तरी त्याला काय हवे,तो कसा सुंदर दिसेल,याची चिंता करतो,तसेच आपले घर हे फक्त माझे आहे हा भाव मनात न आणता ते आपले आहे ही भावना मनात सदैव असली पाहिजे. या आपलेपणाच्या भावनेने माणूस आपल्यांशी नेहमी सदवर्तन करतो,आपल्यांना फसवत नाही,त्यांचे भले चिंततो. आता विभक्त कुटुंब पद्धतीने आपलेपणाची भावनाच कमी केली. आपले आई-वडील ज्यांना आपले वाटत नाहीत,त्यांचे घर आपले वाटत नाही,तेथे ते समाज आपला ही भावना  स्वतःत कशी निर्माण करतील ? यात पालक व मूले या दोघांचीही सारखीच जबाबदारी आहे हा आपलेपणा टिकविण्याची!

                            भाड्याचे घर आहे म्हणून त्याला कसेही  वापर ,ते कुठे आपले आहे असें मनात आणणे ही वृत्ती, माणसाचा स्वतः मध्ये आपुलकीची भावना नष्ट करते.. या पृथ्वीतलावर वृक्ष तोड,धरणे बांधणे मोठ-मोठ्या इमारती तयार करणे,रसायने पाण्यात सोडून व इतर प्रदूषण करणे या कृतीने पृथ्वीला माणूस स्वतःच्या स्वार्था साठी खायीत लोटत  आहे.

                          जिने जन्म दिला तिची अशी अवस्था केली,तर ती कृश होणारच! या कृश झालेल्या पृथ्वीला l औषधोपचार  कोण करणार? तिचे सांत्वन कोण करणार? तिला राग आला की तिचे रूप ती दाखवत असते. प्रलय,भूकंप,वादळ हिम वर्षाव सारया कृतीतून ती आपला सात्विक राग दाखवीत असते, तिच्यातील ज्वालामुखी  खदखदत असतो,जेव्हा पृष्ठभाग नाजूक होतो,तेव्हा ती त्याला भंग  करून बाहेर आग ओकत  येते. तसेच झाले आहे आता देशाचे,हा प्रक्षोभाचा ज्वालामुखी खदखदत आहे, परंतु हा प्रक्षोभ कोणावर?  फक्त दुसर्याकडे बोट दाखवून प्रक्षोभ शांत कसा होईल?  मूळ आपलेपणाची भावना व सदवर्तन माणसाने प्रत्येकाने केले तर ही अराजकाची स्थिती येईल का?  आज चौकात पोलिसाने गाडी अडवली,म्हणू हातावर पैसे  देणे असो,नाहीतर माझे कोणतेही काम पटकन व्हावे म्हणून पैसे सरकवणे  असो,या सर्वातूनच भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते. आताचेच एक उदाहरण देते,पासपोर्ट काढायला माझी मैत्रिण गेली होती,,तर तेथे रंग,३०० रुपये  दिले तर  तुम्हाला लगेच आत सोडतो असें तेथील  एक जण म्हणतो , ती  अवाक झाली ,की हे ३०० रुपयेचे किती भाग आतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा  वाटा सांगत आहेत!  तिने पैसे  दिले नाहीत व रांगेत उभे राहूनच काम केले,परंतु असें किती जण करतात? 

                         देवाच्या दारात द्वारपाल असतो,द्वारपालाला जर चोरी करायला बसवले तर त्या देवळातील संपत्तीचे रक्षण कोण करे,त्या देवळाचे पावित्र्य कसे राखले जाईल. बाहेर आण्णा हजारेन चे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालू आहे ,आणि येथे सामान्य माणसावर खरा परिणाम झाला आहे का? की हे फक्त दुसऱ्याने भ्रष्टाचार करायचा नाही,मी केला तर चालेल, असें कसे? या साठी मूळ प्रत्येक माणसात आहे व ती प्रवृत्ती बदलायला हवी. 

                         हा देश आपल्या सर्वांचा आहे,या देशाचे नागरिक म्हणून माझी जी कर्तव्ये आहेत,ती मी करेन,माझ्या देशातील,सर्व बांधव माझे आहेत,त्यांच्याशी मी कर्तव्य भावनेने वागेन व त्यांच्या हिताचा विचार करेन ,हे सारे लहानपणा पासून जोरात प्रतिज्ञा म्हणत आलो,परंतु आचरण केले नाही! यात आपल्या  सर्वांचाच दोष आहे. आपले पणाची  भावना गमावून माणसाने दुखं पदरी ओढवून घेतलें आहे. मी आणि माझे ही वृत्ती माणसाला अहंकाराने  उन्मत्त करते व त्याची विचार करण्याची दिशाच बदलते. मला जे हवे ते मी मिळवणारच,ते कोणत्याही मार्गाने असो,दुसऱ्याचे मी ओरबाडून घेणार हे पाप नाही का? असें दुसऱ्याच्या हक्काचे कितीही माझे म्हणून जमा केले,तरी मरताना सारे येथेच राहणार! माझा देह माझा नाही,तर ही संपत्ती माझी कशी असेल हे कधी कळणार माणसाला!  

                      आपल्याकडे वेळ कमी,म्हणून आपण फास्ट विचार  बदलणार, फास्ट रिलेशनशिप करणार ,आपण फास्ट फूड खाणार, फास्ट व्यसन करणार, फास्ट गाडी चालवणार,फास्ट पैसे कमावणार,परंतु या फास्ट ला जर ब्रेक देवून विचार करा,की निसर्गाच्या विरुद्ध जाल तर हे फास्ट जाणे तुम्हाला एक दिवस दुखाच्या खाईत लोटेल.  अविचाराने केलेली कोणतीही कृती माणसाला तात्पुरती सुखं देणारी वाटली ,तरी ती त्याला दुखं व असमाधानाच बहाल करते. तेथे नव-नविन आजारांचे माहेर घर दिसेल,तेथे आपलेपणाचा अंकुर संपून फक्त भस्म करणारा मी चा अहंकार असेल! सारे काही जवळ असूनही तो माणूस खरा भिकारीच असेल!  नुसती बंगले,गाडी,पैसा ये भौतिक गोष्टी माणसाला फक्त सुखी करू शकत नाही,ते सुखाचे एक साधन आहे व ते योग्य मार्गानेच मिळवायला हवे. 

                     आपल्यातील दुष्प्रवृत्तीनचा अंत करणे हे प्रत्येक माणूस स्वतःच करू शकतो, तेव्हाच सद विचारांची गंगा  वाहील. हे विचार आपल्या भोवतालचा  भागही सदविचारांनी हिरवागार करतील, तेव्हाच कुटुंब-समाज व देश याचे  आपल्याला सुराज्य करता येईल! देवळात जावून माझ्या पापांची क्षमा नसते मागायची,तर मी पाप करणार नाही अशी बुद्धी व कृती गरजेची असते. देवाला मोठ्या देणग्या,अभिषेक चढवून पापे कमी झाली का? कधी कळणार रे ! आता तरी जागे व्हायला हवे आपल्याला,नाहीतर सारीकडे अराजक माजेल,त्यात आपणच एक-मेकांना संपवत असू व उरेल फक्त दुखं फक्त दुखं! या सुखाच्या डोहात समाधानी वृत्तीच राहू शकते व हे समाधान व आपलेपणाची भावना माणसाला सदवर्तनानेच मिळू शकते. या साठी आपण दर-रोज स्वतःशी बोलू या,स्वतःतील गूण दोषांचा हिशोब घेवू या, व दोषांना दूर करू या,हीच जनता जनार्दनाला माझी प्रार्थना! 

मनात जोपासू  आपलेपणाची भावना, तेव्हाच साकार होईल कुटुंब-समाज व देशातील सुराज्याची कल्पना! 
                                                                                                                                                                                                                            मंगला