जेथे जीव तेथे भाव, तेथे प्रेमाचा तो गाव! जेथे श्रद्धा आणि भक्ती ,तेथे भगवंताची प्रीती!
न करावे नुसते वाचन ,करावे त्यासह आत्मचिंतन ,श्रीमत् भगवतगीता देई ऐसे जिवन ज्ञान, अंतरी गवसे अमूल्य आत्मतेजो धनं! त्रिगुण,मन-बुद्धी यांनी खेळ मांडणारी प्रकृती म्हणजे माया व हिचा निर्माता निर्गुण तेजात्मा हे जेव्हा ज्ञान दृष्टीने उमजते, तेव्हाच कळते हे चैतन्य व मनुष्य जन्माचे प्रयोजन! उमजते की मी आहे ही आणि मी नाही ही!
आपले जिवन हीच खरे चालती बोलती गीता असते! त्यात क्षण-क्षणाला येणारे अनुभव हे आपल्याला काही शिकवून जात असतात! अज्ञानाने सत्य दिसत नाही,त्यासाठी ज्ञान दृष्टी लागते हे मात्र खरे ! निसर्गात,माणसात ,सजिव-निर्जीव साऱ्यात या चैतन्याची अनुभूती येते! स्वतःला जाण्याचे अनेक प्रकारचे मार्ग आहेत, कर्म योग,भक्ती योग इत्यादी, भक्ती मार्ग हाही एक साधन आहे! या भक्ती मार्गातून या विश्वकर्त्याला जाणणे साध्य होते! श्रद्धा व भक्ती व विश्वास आपल्यातील या चैतन्याला जाणून घेण्यास उपयुक्त ठरतात. नुसतीच श्रद्धा व भक्ती असून चालत नाही,तर आपले आचरण हे शुद्ध निर्मळ भावाने असणे गरजेचे असते.
अधर्माने वागणाऱ्या माणसाला त्याचे फळं याच जन्मी भोगावे लागते. अधर्मी व्यक्तीचा तामसपणा त्याला स्वतःच्या कृतींचे परीक्षण करण्यची बुद्धीच देत नसतो,त्या मुळे तो त्याच्या कर्मणा मध्ये खूष असतो. त्याच्या डोळ्यावर अज्ञाना ने झापड आलेली असते. देह म्हणजे मीच,आणि तो फक्त अनीतीने उपभोगण्यासाठी आहे अशी या माणसाची वृत्ती होते. दुसऱ्याचे ते आपले समजणे ,गैर व्यवहार करणे ,म्हणजे आपण दुसऱ्यावर अन्याय करीत आहोत हे या अधर्मी माणसाला समजतच नाही. जेव्हा त्याला उपरती होते, तेव्हा त्याचे डोळे उघडतात व स्वतःच्या कर्मांच्या चूक की बरोबर हे तो विचार करू शकतो व स्वतःत चांगले बदल घडवू शकतो . स्व धर्माने वागणे म्हणजे निती ,विवेक व भान ठेवून वागणे हे त्याला कळते. जो स्वतःला जाणेल,तोच दुसरयाला जाणू शकतो!
माणसातील रज-तम गुणांचा असर त्याला मी पणातून मुक्त होवू देत नाही,सत्व गुणांनी या गुणांवर मात करून तरीही शिल्लक राहिलेला मी नंतर निर्विकार स्थिती करून नष्ट करावा लागतो. तेव्हा येतो साक्षी भाव! निर्विकारतेतूनच हा निर्गुण अशा आत्मतेज सागराशी भेट होते! माणसाच्या जन्माचे प्रयोजन कळते. सत्व-रज-तम या त्रिगुणाना निर्मित केले या निर्गुण आत्मतेजाने. ज्ञानाने या त्रिगुणाना जिंकून उदासीनता आणणे म्हणजे निर्गुण आत्मतेजाशी मिलन होते. नदी सागराला मिळते तेव्हा तिची स्वतःची सारी खळ-बळ थांबवते वाऱ्या सारखे मन हलके फुलके होवून , सहज भाव अंगी येतो. देह म्हणजे मी नसून हे पंचतात्वानी घडवलेले अशाश्वत शरीर आहे हे कळते. त्रिगुण,मन-बुद्धी यांनी खेळ मांडणारी प्रकृती म्हणजे माया व हिचा निर्माता निर्गुण तेजात्मा हे जेव्हा ज्ञान दृष्टीने उमजते,तेव्हाच कळते हे चैतन्य व मनुष्य जन्माचे प्रयोजन! उमजते की मी आहे ही आणि मी नाही ही!
श्रीमत् भगवतगीता देई ऐसे जिवन ज्ञान, अंतरी गवसे अमूल्य आत्मतेजो धनं!
मंगला