Sunday, January 15, 2012

प्रमेय रुचीस आले !


                                प्रमेय म्हणजे सिन्धांत! या जिवनगीतेला जाणून घेणे , जन्माचे  प्रयोजन जाणून घेणे, यासाठी ज्या स्मृती,पुराणे,सहा शास्त्रे ,वेद,या साऱ्यात धर्म व समाजशास्त्र नियम आत्मसात करून ज्यांनी  या शब्दांच्या संपत्तीला शास्त्र्यता आणली  व ब्रम्हज्ञानाने मृदुता येवून साक्षीभाव अंगीकारता येतो हे सांगितले त्यांच्या या ज्ञानाचा सिद्धांत समजून घेण्याची आपली मन व बुद्धीची बैठक तयार करणे.

                              सो अहं भाव  म्हणजे सच्चिदानंदाचे  परमात्म्याचे मूळ स्वरूप निधीध्यास पूर्वक अभ्यास  "मी " रूपाने जाणणे होते. साहित्यातील नवरस शृंगार,वीर,करून,अदभूत,हास्य,भयानक,बिभत्स्य,रौद्र,शांत हे या प्रमेयाला जाणून घेण्याचे माधुर्य आणतात हे जाणून घेणे म्हणजे प्रमेय रुचीस आले याची अनुभूती येते! ज्या प्रमाणे भ्रमर फुलाच्या पाकळ्या व पराग कणांनाही न दुखावता मधुसेवन करतो, चंद्रविकासी कमळ  स्वस्थानी राहूनच चंद्र उदयास आलिंगन देते,तसाच या प्रीतीचा संभोग  घ्यावा!  प्रीती ही अतीन्द्रियानी अनुभवायची असते. मन व इंद्रियांच्या द्वारे अनुभवली जाणारी प्रीती ही शाश्वत नसते. 

                               संसार हा आत्म स्वरूपाच्या विस्मरणामुळे भासमान होणारा ,सतत बदल होत असणारा ,अत्यंत अस्थिर व क्षणभंगुर आहे.  सुखं-दुखे माणसाला खरी वाटू लागतात . प्रेम म्हणजे आसक्ती असें समजून तो त्यात सुखं-दुखं ओढवून घेतो. यातून त्याला चिरंतन आनंद लाभत नाही. त्यासाठी अखंड,चिरंतन व अवीट असें ज्ञान जेव्हा तो अतिद्रीयांच्या द्वारा ज्ञाना संबंधी चर्चा,विचार साधनेतून मिळवतो,तेव्हा त्याला आत्मज्ञानाची अनुभूती येवून या ज्ञान तेजाचे रूप अनु-रेणूत सारया विश्वात आहे याची जाणीव होते. अखंड प्रेमाचा झरा त्याच्या हृदयी वसतो. 

                              जिवन सरितेला या सागराशी मिलन होण्याची जाणीव होते. सरिता  वाहत असताना जसे आसपासचे झरे ,नाले , सर्वांचे पाणी घेवून काट्या कुत्यातून दगडातून ठेचकाळत ,बाजूचा परिसर हिरवा गार करीत सागराच्या दिशेने वाटचाल चालू ठेवते,तसेच जिवनात येणाऱ्या सुखं-दुखानचा अडसर दूर सारून या ज्ञान सागराची ओढ आपण ठेवली पाहिजे. 

                            या जिवन कलेच्या सिद्धांताची  रत्ने  नम्रपणे  व वासना विरहित,अहंकारमुक्त ,स्थीर मनाने  जो जिवन गीतेचा मतितार्थ जाणतो तो अतीन्द्रियानी या प्रमेयाची खुण समजून घेतो. सामान्य माणूस  मन व इंद्रिये यांच्या द्वारे जे ज्ञान मिळेल तेच आकलन करतो,परंतु या अपरा प्रवृत्तीचे पृथ्वी,आप,तेज,वायू,मन,बुद्धी,अहंकार,या आठ विभागांची साम्यावस्था म्हणजे समत्वाने राहणे  हे अतीद्रियानीच जाणले जावू शकते.हे जाणले तरच  ज्ञानाग्नीतून विवेक अंगी बाणला जातो व विरक्तता येते.

                             व्यवहारी जिवनात राहूनही  साक्षीभाव अंगी बाणवून निरिच्छ  व समाधानी  हृदयात शाश्वत, समभाव दृष्टीचे प्रेम वसते . ज्ञान हेच तेज व अज्ञान हे तेज रहित असते याची जाणीव ज्ञानात रमल्यानेच होते.  जिवन गीता उमजली व सच्चिदानंदाचे स्वरुपाची अनुभूती येण्याची क्षमता आली  ब्राम्हज्ञानाशी आलिंगन झाले हे प्रमेय रुचीस आले !
                                                                                                                                                                                                      मंगला