Sunday, January 15, 2012

ज्ञानाची धरावी कास, पुरूषार्थ जागृत होईल सर्वात! गवसेल आत्मज्ञानाचा प्रवास! जय श्रीकृष्ण!


  •                 पुरूषार्थ म्हणजे मनुष्याने कृतार्थ होण्यासाठी धर्म,अर्थ,काम,मोक्ष या गोष्टी साधावयाच्या आहेत.  धर्म......शास्त्राने मान्य केलेली  समाजविषयक आणि ईश्वर  विषयक कर्तव्ये निष्ठेने करणे,
     अर्थ... न्याय्य मार्गाने मिळून योग्य  वापर करणे 
     काम..... हे न्याय मार्गाने विषय सुखांचा उपभोग घेवून वंश सातत्य राखणे
    मोक्ष ... सच्चिदानंद  परमात्म्याचा  अनुभव  घेणे . या  हरवलेल्या पुरुषार्थाला आपल्यात आपणच पुनः आणू  शकतो. त्यासाठी प्रथम हवा स्वतःवर विश्वास!  तेव्हाच आपण घडवून आणू  हा परिवर्तनाचा इतिहास! 

                  मनुष्यास मोहरूपी काळ सर्पाचे दंश होवून विष भिनते सुख-दुखाच्या भोवऱ्यात फसतो.कठीण प्रसंगी त्याचा धीर सुटतो.कारुण्य त्यात जागृत होते. बेडूक सर्पाला गिळू शकत नाही,मीठ पाण्याला पाझरू शकत नाही,तसे हा आपला मूढ पणा  बाजूला सारून अशा प्रसंगी दयावृत्ती कामाची नाही हे लक्षात येणे महत्वाचे असते. ज्यावेळी युद्ध-प्रसंग येईल,तेव्हा ते माझे नातेवाईक आहेत ,माझे सगे संबंधी आहेत,माझे गुरु आहेत,असें मनात आणून मन व्यथित करणे चूक आहे. मोहाने व्याकूळ झालेले चित्त या वेळेस मनातील धैर्य खचवते. आयुष्य व्यर्थ वाटू लागते. अशा वेळी समोर कोण आहे हे न पाहता त्यांची दुष्प्रवृत्ती शी मुकाबला करता यायला हवा!  सूर्याला काळ्या ढगांनी ग्रासावे ,ग्रीष्म काळात सर्वत्र वणवा पेटावा,तशी स्थिती होते, अंध झाल्या प्रमाणे सैरावरा धावू  लागते, तेव्हाच या वीजलहरी म्हणजेच अमृतज्ञानाची  म्हणजेच ईश्वराची मनुष्यरुपी अर्जुनावर कृपावृष्टी होते. विश्वरचना ज्याने केली,त्या विश्वकर्त्याचा विसर पडून मी कोणी आहे हा अहंकार माणसाला सुख-दुखात लोटतो त्यामुळे हा भ्रम दूर करणे आवश्यक आहे.

                      नसलेले आपण जन्मा कसे आलो व आलेल्या या जन्माच्या अस्तित्वाच्या  स्थितीचाही उद्या लय होवून पुनः नसण्याच्या स्थितीतच जाणार आहोत,तर या जन्म-मृतुच्या निसर्ग स्वभाव  अखंड आहे याचा  विसर पडून कस चालेल! जन्म आणि मृत्यू  हे दोन्हीही मायाभ्रम आहेत व दोन्हीचाही  खेद करीत नाही, हे विवेकी माणूसच बोधाने उमजू शकतो !   

                      अविनाशी आत्मा हा सागरासमान आहे. ज्याचा उत्पत्ती-विनाश नाही !   वायूच्या गतीने  पाण्याच्या लाटा बनून पाणी हलते, वायूचे स्फुरण थांबले की पाणी स्थीर होते. देह एक असला तरी वयोभेद असतातच ना! बालपण,तरुणपण संपतेच ना! या दशा निर-निराळ्या देहाच्या होतच असतात, या चैतन्याची सत्ता मात्र सर्वकाळ असते. 

                    इंद्रियांच्या अधीन झाल्याने ज्ञान उलगडत नाही व विषय त्याला ग्रासतात व  प्रेम-द्वेष, हर्ष-शोक,सुखं-दुखं,निंदा-स्तुती,गोड-कडू,सुगंध-दुर्गंध यामध्ये मनुष्य  गुंतला जातो!  मृगजळा  समान विषयाला खरे मानून त्यातच मनुष्य ग्रस्त होतो. सत्व-रज-तम यांकडे लक्श न देता केवळ आत्मसुख घ्यावे!   सुज्ञ लोक पाण्यात दुध मिसळले,तर निवडून काढणाऱ्या राजहंसा प्रमाणे ज्ञानाचा बोध करून घेतात. अग्नीत सुवर्ण शुद्ध होते, बुद्धी चातुर्याने दह्याचे ताक  घुसळून  लोणी काढले जाते ,भुसा आणि  बी पाखडून त्यातुन भुसा बाजूला  केला जातो, तसेच हा संसार शुद्ध मनाने सहजपणे करता यायला हवा! 

                    पाण्याने भरलेल्या  कुंभातील  चंद्रबिंब  त्या कुंभातील पाणी सांडले म्हणून ते दिसत नाही,तरी चंद्र त्याच्या स्थानीच असतो,या आकाशात मठ बांधला तर तो मठाकार होतो,परंतु मठ भंगला तरी आकाशाचे मूळ स्वरूप तसेच राहते. तसेच हे शरीर जरी नष्ट झाले तरी आत्मतत्त्व  हे अमर आहे. जसे एक वस्त्र जीर्ण झाले म्हणून नवे घालावे,तसेच एका देहातून दुसऱ्या देहाचा स्विकारते  हे आत्मतत्व ! 

                   या आत्मतत्वाला  कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही, त्यास कोणताही  प्रलय बुडवू  शकत नाही, अग्नी त्यास जाळू शकत नाही व वायू त्यास शोषु शकत नाही असा हा अनादी, अनंत शाश्वत आत्मा आहे!  हा देह  धारण करणारा जीव दिसत नाही, हा आत्मा अनादी,निर्विकार,निराकार असून ,त्यास जाणला असता हे दुखं नाहीसे होते व उरतो फक्त परमानंद! 

                    नदीचा उगम पासून प्रवाह  असतो व ती मध्ये बरच संचय करीत-करीत शेवटी सागराला मिळत असते,तसेच  या प्राणीमात्राच्या उत्पत्ती -स्थिती-लय अशा तीन अवस्था अखंडित पणे चालू असतात! ना दिसणाऱ्या अमूर्ताचे ,जन्मतःच मूर्त स्वरूप होते व पुनः मृतुनंतर अमूर्त !  दुसऱ्याचा इच्छे प्रमाणे सुवर्णाचे जसे अलंकार घडतात  तसेच माये मुळे ही सृष्टी आकारली गेली आहे.  मनाची निश्चलता  अंतरात या परब्रम्हाचे स्वरूप अनुभवू शकते!  ज्याला साक्षात्कार होतो, तेथे संसार उरत नाही!  सर्वात भरून राहिलेले व सर्व देहात वसणारे चैतन्य हे एकच आहे हे उमजून या येण्या-जाण्याचे दुखं राहत नाही! जे काही भोगतो ते भोगणारे  हा ईश्वरच असतो,याचा विसर पडू देवू नये! 

                   संकल्प-विकल्प संपतील, अंतरात वैराग्य भावना  तेव्हाच जागरूक होईल व   स्थिरबुद्धीने समाधानी वृत्ती येईल.  तृप्त मनाने ,सत्कृत्य करण्याची प्रवृत्ती  अंगी बाणवून ,फलाची अपेक्षा न धरता आपल्या चित्ताची साम्यावस्था आणून , सर्वत्र एकरुपत्वाचा भाव  हृदयी आणणे गरजेचे आहे . कासव जसे आपली इच्छेप्रमाणे अवयव आवरून घेते,त्या प्रमाणे आपण आपल्या इंद्रियान वर ताबा ठेवला पाहिजे. यश,संपत्ती,कीर्ती या मुळे पुनः पुनः षड्रिपू जागृत होतात,म्हणून आसक्ती तून मुक्त होवू ,  तेव्हाच देह भावाचे भान हरपून सो अहं भावाचा प्रत्यय  येतो! 

                  सूर्य जसा आकाशात अलिप्त राहून आपल्या किरणांनी सर्व जगाला प्रकाशित करतो, तसेच मनुष्याचे  काम-क्रोध हीन , इंद्रियांशी उदासीन मन ,स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत जावून स्वतःतच विश्व पाहू लागते  व अखंड विश्वात ज्ञान रुपात वावरते .  

                   स्व धर्माचा विसर पडून  स्वतःवर दुसर्यांचे आघात झेलण्याची वेळ आली आहे. ज्यांनी स्वधर्म सोडला त्यांची अपकीर्ती झाली!  त्यासाठी आपला पुरुषार्थाला जाणून स्वधर्माने वागून मनी द्वेष न ठेवता अधर्म कृत्यांशी मुकाबला करायलाच हवा!  . 
                  श्री कृष्णार्पन्नमस्तु 
     ज्ञानाची  धरावी कास, पुरूषार्थ जागृत होईल सर्वात! गवसेल आत्मज्ञानाचा  प्रवास!  जय श्रीकृष्ण! 
                                                                                                                                                                                                              मंगला