मनात विचार-चक्र चालू होते. मैत्रीचा अर्थ या मुलांना न उमजल्यामुळे, आज सुप्रियाला आपले प्राण गमवावे लागले होते. ज्याला ती आपला प्रियकर म्हणत होती,त्याने माझी-तिची ओळख नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. ज्यांचे सोबत मैत्रीण म्हणून गेली,त्या मुलीनीही मैत्रीची पाठ फिरवली होती. नुसत्या तोंड-ओळखीला मैत्री समजून काय होते,हे चित्र पाहायला मिळाले होते.खूप संतापजनक आणि विचार करायला लावणारा हा प्रसंग होता!
दोन वर्षान पूर्वी मी law कॉलेजला शिकायला जात होते ,त्यामुळे मला आजची पिढी अजून जवळून पाहता आली. काही ओळख-पाळख नसताना,कोणीही मुलगा मुलीला म्हणायचं,मला friendship देतेस काय? अरे friendship म्हणजे काय भाजीपाला आहे? की देतेस काय विचारायचे,आणि याही मुलीनी आपल्याला कोणी friendship मागत आहे ,या आनंदाने हो दिली म्हणायचे! हा प्रकार पाहून मी तर चक्रावूनच गेले होते. .
रविवारचा दिवस.......मस्त पाऊस पडत होता! बहिणीचा फोन आला,की मुळशीला जायचे का फिरायला. मी लगेच हो म्हणाले,मलाही असा पावसात फिरायला, हिरवीगार शेते पाहत,डोंगर दर्यातून वाहणारे धबधबे पाहायला खूप आवडते. आम्ही निघालो मुळशीला. पुण्या पासून ४० किलोमिटर आहे. मस्त छान गाण्याच्या भेंड्या म्हणत आम्ही मजेत मुळशीला निसर्गाचा आनंद घेत पोहोचलो. तेथील एका हॉटेल मध्ये भजी छान मिळतात असे बहिण म्हणाली,म्हणून गाडी तेथेच थांबवली.
पाऊसही जोरात पडत होता. धबधबा पाहायला जायचे होते. आम्ही भजी order केली आणि बसलो. तितक्यात काही कॉलेज युवती आणि युवक तेथे आले. आणि ते घाबरलेले दिसत होते. आम्हाला त्यांची कुजबुज कानी पडली. एका मुलीला युवक काही समजावत होता,तिला रडू आवरत नव्हते. काहीतरी त्यांच्यात झाले असेल,म्हणून आम्ही लक्ष दिले नाही.परंतु दुसरी मुलगीही रडत होती. तिलाही दोघे समजावत होते.त्यांच्यातील बोलणे कानी पडले,की सुप्रिया वाहून गेली,पण आपण तिच्या बरोबर नव्हतोच असे सांगू ,घाबरू नका. आपण येथून लगेच निघून जाऊ. आणि ते जायला निघाले. मी आणि माझ्या बहिणीने हे ऐकले,तसे आमच्या काळजात चर्र झाले! आम्ही दोघी त्या मुलं-मुलीना थांबवले आणि काय झाले विचारले. आधी कोणी काही सांगण्यास तयार होईना. आम्ही जरा त्यांना धाकानेच विचारले,तेव्हा एक मुलगी पटकन रडता रडता सांगून गेली,की आम्ही धबधबा पाहायला गेलो,पण त्या पाण्यात उतरलो,आणि दगडावरून पाय घासून सुप्रिया वाहून गेली. अजून एक मित्र पण पडला त्याला खूप लागले आहे. आम्ही त्यालाही तेथेच सोडून आलो आहोत. हे ऐकून आम्ही दोघी खूप संतापलो.
सुप्रियाच्या घरी ही सारी मूले-मुली जमून नंतर येथे फिरायला आली होती हे त्यांच्या कडूनच कळले. आणि आता असा प्रसंग झाला,तर आमची त्यांची ओळखच नाही म्हणत होती. नुसतीच कॉलेज मध्ये ओळख झाली,येथे फिरायला येण्याचा आमचा बेत ठरला,म्हणून आम्ही आलो. आम्हाला कशात अडकायचे नाही म्हणाली. सर्वांनी मद्य प्राशन केले होते. त्यामुळे पोलीसान कडे गेलो,तर आपणच अडकू ही भीती! हे पाहून आणि ऐकून आम्ही त्यांना मुस्कटात देण्याचीच भाषा केली. त्यांना म्हणालो,की तुम्हाला थोडीशीही लाज वाटत नाही,की आपली एक मैत्रीण ,वाहून गेली आणि दुसर्याला उपचारासाठी न्यायचे सोडून,पळून जाण्याचे ठरवता. कसली ही तुमची मैत्री? आधी रागावलो,नंतर त्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत ,तुम्हाला काहीही त्रास होणार नाही,आधी त्या जखमी मुलाला उपचारासाठी पाठवू या हे समजावले. तेव्हा कुठे ते तयार झाले. त्यांना सोबत घेऊन आम्ही मुलाशी पोलीस स्टेशनला तक्रार रीतसर नोंदवली. पोलिसांना घेऊन त्या मुलाला उपचारासाठी त्या मुलांसमवेत पाठवले. जखमी मुलगा ,म्हणे तो तिचा प्रियकर होता. एक-मेकांशिमास्ती करताना ती वाहून गेली,आणि कसा-बसा वाचला. पोलिसांनी विचारले,त्याला सुप्रिया बद्दल तर निर्लज्जपणे मी तिला ओळखत नाही म्हणाला. नंतर तिचा मित्र आहे म्हणून कबूल झाला.
खूपच जोरात पाऊस पडत होता,धबधब्याचे पाणी खूपच जोरात कोसळत होते. अशा परिस्थितीत ही मूले,पोहता येत नसताना का तेथे गेली? पोलिसांनी सुप्रियाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,ती मिळाली नाही. सुप्रियाचा विचार करीतच आम्ही घरी आलो. काही सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सुप्रियाची बातमी आली होती. ती दुसऱ्या दिवशी पोलिसांना टनेल मध्ये मृतावस्थेत मिळाली होती!
या मुलांची अशी मैत्री पाहून मन सुन्न झाले. की का कळत नाही या मुलं-मुलीना? जराशी ओळख झाली,की मैत्री म्हणतात. अशा प्रसंगातून आज एका मुलीचा प्राण गेला होता. स्वतःच्या जीवाच्या भीतीने तिला कोणी वाचवू शकले नव्हते. नाही वाचवू शकले,तरी अंगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा हवा,की तिच्या घरी कळवणे ,परंतु तेही नाही. ही कसली मैत्री? पालकांना जुमानत नाहीत,आणि होस्टेल वर राहणाऱ्या मुला-मुलींचे पालक तर दूर असतात. सुप्रिया आणि एक मुलगी फक्त पुण्यातील होत्या,बाकी चारही जण ,बाहेर गावचे होते. ज्या विश्वासाने शिक्षण घेण्यासठी,पालक दूर मुलांना ठेवतात,त्यांचा किती विश्वासघात करतात ही मूले! मैत्रीचा आणि त्याबरोबर स्वतःचाही घात करून घेतात. सुप्रिया एकुलती एक अपत्य होती. तिच्या पालकांचे काय? काय करायचे त्या पालकांनी? तरुण पिढीला स्वातंत्र्य हवे,पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करायचा की सदुपयोग,हे या मुलांनीच ठरवावे. राहणीमान,शिक्षण याने सुसंस्कृत ,सद्गुणी बनले पाहिजे, की असे स्वार्थी आणि अवगुणी ? त्यांचे स्वार्थी आणि कमी समजेमूळे त्यांना आणि समाजाला दोघानाही ही परिस्थिती घातक ठरणार आहे..
मैत्रीचा अर्थ विश्वास,प्रेम , एक-मेकांचे गुण-दोष स्वीकारून मैत्रीचा स्विकार,एक-मेकांना सुख-दुखाचे प्रसंगी मदत हा आहे. थोड्क्याश्या ओळखीने कोणाबरोबर कुठे जाणे,हे अतिशय चूक आहे. वर्षानुवर्षे बरोबर राहून माणूस एक-मेकाला पूर्णपणे ओळखू शकत नाही,तर नुसती तोंड-ओळखीने लगेच मैत्री कशी होते? सहवासाने एक-मेकांचा परिचय वाढतो,तेव्हा थोडे थोडे समजणे चालू होते. माझी तरी सर्वाना विनंती आहे,की पारखल्याशिवाय मैत्री पुढे वाढवू नका..जीवाला जीव देणारी मैत्री हवी, असा जीव घेणारी नको. आजचा हा प्रकार पाहून या असल्या अजाणतेपणाने केलेल्या मैत्रीमुळे सुप्रिया स्वतःचे प्राण गमावून बसली होती,म्हणून एक-मेकांना जाणल्या शिवाय मैत्रीचा हात पुढे करू नका!
अजाणतेपणाने केलेल्या मैत्रीत होऊ शकतो विश्वासघात..........जाणूनी एक-दुज्यासच करावा पुढे मैत्रीचा हात!
No comments:
Post a Comment