"आम्ही डोंगराचे राहणार,चाकर शिवबाचे होणार " ...गाणे ऐकू येत होते मला खूप आंतरिक आनंद झाला होता. ,की येथेच काहीं दिवसान पूर्वी कसे वातावरण होते आणि आता कसे सुंदर झाले. वस्तीतून रोज सायंकाळी चव्हाटा(मरीआई मदिरा समोरील मोकळे अंगण) लहान मुलाच्या गाणी,खेळ याने दुमदुमून जायचा. माझा मोठा मुलगा ४ थी इयत्ते पासून १००-१२५ वस्तीतील मुलांचा शिक्षक झाला होता. धाकट्या भावालाही तो सोबत न्यायचा,आणि शिशु गटाचे काम धाकटा पहायचा. खूप लहान वयातच ही मुले तयार होत गेली. नुकतीच मौंजी-बंधन झालेला माझा बटू एखाद्या चाणक्य सारखा शोभायचा. त्याची अक्कल-हुशारी,इतक्या मुलांना शिकवणे,,त्या मुलांचे गट पडणे,बैठकी घेणे, त्यात विषय मांडणे,समस्या सोडविणे. शिबिरांना मुलांना नेणे, स्पर्धांचे आयोजन, सण-उत्सव , सारे काहीं करायचा. माझ्याकडून प्लास्टिक डबे घेऊन त्याला वरती चिरा पाडून,त्याचा गल्ला करून मुलांना दिला होता. त्या गळ्यावर भारतमातेचे स्टीकर लावले होते. इ भावना अशी छोट्या-छोट्या गोष्टीतून देश-प्रेमाची भावना अंगी भिनते त्यात जमतील तसे मुले पैसे साठवायची हा गल्ला मुलांना खूपच उपयोगी पडायचा. बचतीची सवय आपोआपच झाली. ही मुले हातात पैसे आले की,व्यसनात घालवायची. आता या पिसांचा उपयोग,त्यांच्या स्वतः साठी केला जाऊ लागला. त्याचे त्यांना कुतूहलही वाटे. त्याच्या त्याला आजही ही मुले शिक्षकच म्हणतात.
माझी मुलगी आमच्या घराच्या अंगणात,प्राजक्तीच्या पारावर भोवती,मुलीनाचा वर्ग घ्यायची. संध्याकाळी रोज येत तास हा वर्ग भरीत असे . माझ्या घरातील लोकांचा विरोध हळू-हळू ही कामे बघून मावळला. माझे सासू-सासरे न सांगताच या मुलीनकडे मी नसताना लक्ष देऊ लागले. एखादी गोष्ट सांगू लागले.मुलांना मार्गदर्शन आणि पाठबळ माझे असे.परंतु या कामात सातत्य आणि नियमितपणा होता. त्यामुळेच त्याचा उपयोग होऊ शकला.
चव्हाट्यातील हे चित्र पाहून,त्यांचे घरच्यांना स्वतःत सुधारणा हळू-हळू स्वतःत करावीशी वाटली . मुलं-मुलीना संध्याकाळी घरात दिवा लावून आई-वडील आणि मोठ्यांना रोज नमस्कार करायचे शिकवले होते. महेश म्हणाला " काकू , का म्हणून मी पाया पडू,या बेवड्यांच्या? शिवीगाळी शिवाय की भी कानी पडत नाय". मेल्या-मुडद्या शवाय बातचीत नाय करीत ते! आज्जी अन बा ला शुद्ध कुठ असतीया? माझ्या आशीचे फकस्त पाया पडीन मी,तीच बघते आमचा समदा." मी सारया मुलांना शांतपणे सांगितले की कसेही असली घरी मोठी माणसे,तरी त्यांना नमस्कार करा,संध्याकाळी शुद्धीवर नसतील,तर सकाळी करा. त्यांनाच त्यांची चूक कळेल. आणि ते चूक सुधारतील. या नमस्काराचा खूप परिणाम झाला. व्यसनी पालकांना स्वतःच लाज वाटू लागली. ज्यांना शक्य ते मुलांचा वर्ग पाहाणे,त्यांना मदत करणे असे करू लागली,आणि बरेचसे पालक कार्यकर्ते म्हणून मला मिळाले.
अम्बीचा दारू पिऊन रोज रात्री तमाशा चालू असे . मुलगा आणि ती दोघेही रोज टल्ली होत आणि रोज भांडणे. सुनेने पोटाच्या खाचा करून या दोघांना आणि चार मुलांना रांदून खायला घालायचे! सून खंगत चाललेली मला दिसली. मी तीला डॉक्टर कडे जाऊन तपासणी करू म्हणाले. ती ऐकायला तयार नाही. जिवन असे नरकासारखे झाले,की मरण जवळ करू पाहतो .
आस पास क्षय रोगाच्या केसेस खूप होत्या. अनेक रोगांचे प्राबल्य वस्तीत दिसत होते. माझ्या मुलांना मला येथेच वाढवायचे होते. मी खूप विचार केला,की काय करू शकते? प्रथम संस्कार वर्ग,शेजारीच फुग्याची दारूचा गुत्ता बंद करणे, रोगांचे निर्मुलन करणे. हे प्रमुख विषयांवर विचार केला.
अनिल दारू आणून वस्तीत विकत असे. ते त्याच्या चरितार्थाचे साधन होते. दारूचा गुत्ता बंद करायचा म्हणजे,आपण आधी त्यांना दुसरे काम देणे गरजेचे असते. मी त्याला आवश्यक मदत केली. त्याला नाक्यावर सरबताची गाडी लावण्याचा व्यवसाय सुरु करून दिला. त्यासाठी पतपेढीतून कर्ज उपलब्ध करून दिले. अनिलचे घर व्यवस्थित चालू लागले. दारूचा गुत्ता जवळचा बंद झाल्याने मला सामाजिक काम करणे सोपे झाले. अगदी कोणी वेश्या व्यवसाय करीत असेल तरी तीला आपण अर्थार्जनाचे साधन मिळवून दिले,तीला समाजात त्रास होणार नाही याची काळजी घेतली,तरच ते शक्य होते.
नुसतेच हे बंद करा,ते बंद करा म्हणून चालत नाही.त्यामुळे चोऱ्या-माऱ्या वाढतात.
रोगांचे निर्मुलन केले,म्हणजे मी माझ्या मुलांना वस्तीत संस्कार वर्ग घ्यायला पाठवू शकत होते. म्हणून सर्वात प्रथम आरोग्य शिबीर हा विषय हाती घेतला. डॉक्टरांना त्यांच्या संस्थेत पत्र दिले. त्यांच्या कडे नमुना म्हणून मिळणारी औषधे खूप असतात,ती खूप वायाही जात असतात. ती औषधे डॉक्टरांनी द्यावीत,आणि २-३ डॉक्टरांनी तपासणीसाठी २ तास वेळ द्यावा. डॉक्टरांचे संस्थेकडून मला सहकार्य लाभले. लोकांनीही त्यांच्या कडे उरलेली औषधे माझ्याकडे आणून दिली. मी माझ्या दुचाकी वरून सर्व डॉक्टर्स कडून औषधे गोळा केली. त्या पूर्वीच मी औषधे या विषयाचे जाड मोठे पुस्तक अभ्यासले. सारी औषधे मी कोणत्या रोगावर कोणते औषध हे पाहून बाजूला केली त्यावर नाव दिले. एका डॉक्टर मैत्रिणीला घरी बोलावून तिचे मार्गदर्शन घेतले. आणि वस्तीत आरोग्य शिबीर ठरवले. घरो-घरी पुन्हा -पुन्हा जाऊन सर्वांना बोलावून आणले. वस्तीतील लहान-मोठ्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग दिला. सर्वाची तपासणी या शिबिरात केली असे शिबीर मी वर्षातून दोनदा भरवित असे. प्रत्येकाला त्याच्या आजारावर उपचार आणि औषधे हे लक्ष घालून करवून घ्यावे लागायचे. कोणाला मोठा आजार असेल,तर काहीं दात्यांचे सहकार्याने त्यांच्यावर उपचार करीत असू.आरोग्य शिबिरांचा खूप उपयोग होई,त्यामुळे,बऱ्याच रोगांचे प्रमाण घटले होते. हे शिबीर भरविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत .परंतु कोणतेही काम हाती घेतले की पूर्ण केले,तरच समाधान लाभते.
अम्बीची सून मात्र अजिबात तपासणीला येण्यास तयार नव्हती. मी स्वतः जाऊन विनवणी करून तीची तपासणी करवून घेतली.,तर तीला कॅन्सर झाला होता. ती फार काळ जगणार नव्हती. उपचाराच्या पलीकडे तीची स्थिती गेली होती. म्हणजे मला जे दिसले होते तिच्याकडे रोज पाहून,त्यात काहीतरी तथ्य होते. तिच्या चार मुलांचे काय? माझ्या पुढे मोठ्हे प्रश्न चिन्ह उभे राहिले. काहीं दिवसातच अम्बीची सून गेली. पाठोपाठ २ वर्षात तिचा नवरा आणि सासू हेही दारू धोसंयाने गेले. घरात फक्त चार मुले उरली. त्यांच्या मामा-मामींना त्यांचे कडे लक्ष देण्यास सांगितले. १२ वर्षांचा मोठा मुलगा महेश अर्थार्जनाला लागला. चपला शिवून पैसे कमवू लागला ,आणि भावंडाने पोट भरू लागला. महेश ला शाळा सोडावी लागली त्या मुलांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला. दत्तक -पालक पहिले,की ज्यांनी एकाचे शिक्षणाचा खर्च द्यायचा..
मी संस्कार वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. महेश आपल्या भावंडाना बरोबर वर्गात घेऊन येत असे,वस्तीतील खूप मुले-मुली येऊ लागल्या. येथे घरात मला विरोध पत्करावा लागला. मला म्हणायचे कोणती घाणेरडी मुले घरात घेऊन येतेस, फारशी पुसून दे, मी द्यायचे पुसून. शेवटी बाहेर अंगण चांगले करून,सारवून मी तेथे संस्कारवर्ग घेवू लागले. त्यांचे पाढे पाठ करवून घेणे,श्लोक शिकवणे,गोष्टी ,,खेळ घेणे,आणि नंतर देश-भक्तीपर गीत शिकवणे. स्वच्छता शिकवणे, असां वर्ग चालू ठेवला होता. या मुलांना त्या काळी शाळेत ७५% उपस्थिती की पुढील वर्गात ढकलत. त्यांना काहीं लिहिता -वाचता येत नसे. साधी बाराखडी ४थिच्य मुलांना शिकवावी लागायची. शिक्षक फळ्यावर काय लिहितात ते पाहून उतरवायचे ,इतकेच जमायचे या मुलांना. माझा कारखाना होता,तेथेच मी काम करिताना या मुलांना बाजूला बसवून शिकवत राहायचे.
मी सर्व तालुक्यातील शाळांचे निरीक्षण करून आले,आणि शिक्षणाधिकार्यांना भेटले. काहीं ठिकाणी एक शिक्षकी शाळा,तोही खूप खडे करीत असे. द्वी शिक्षकी शाळांमध्ये,शेताची कामे निघाली की एक शिक्षक लावणीला ,कधी कापणीला जायचा,दुसरा एकच शाळा चालवायचा. जाणू त्यांच्या घराच्या सोयी साठीच द्वी शिक्षक शाळा होती. अतिरेक म्हणजे,शाळेतील मुलाणाचाही काहीं ठिकाणी शेतावरील आणि घराची कामे करून घेण्यासाठी उपयोग करून घेतला जात असे. सारे काहीं संतापजनक होते.शिक्षणाधिकार्यांनी हतबलता दाखवली,कारण सर्व क्षेत्रात पक्षीय राजकारणाचे प्राबल्य.
काहीं जणांना माझ्या मुलांचा व माझ्या कामाचा द्वेष वाटू लागला., त्रास देण्याचा खूप प्रयत्न झाला . पण मी खंबीरपणे मुलांच्या पाठीशी उभी राहिले. आणि कार्य चालूच ठेवले होते. माझा मोठा मुलगा ११ वी पर्यंत हे काम करीत होता. नंतर शिक्षणासाठी पुण्यात आला. एका ठिकाणी वर्षानुवर्षे त्या कामात गाडून घ्यावे लागते,.तेव्हा त्या कामाचे फलस्वरूप दिसते. आता बी पेरलं आणि लगेच झाड उगवले असे होत नाही. संस्काराचे बीज,बालवयातच पेरावे लागते, जिवनात कितीही ,कुठेही स्वतःची घसरण झाली,तरी हे बीजंच त्याला सांभाळते आणि त्याची सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवते.
मी नेहमी हा संत तुकारामाचा अभंग मुलांना टाळ्यांच्या तालावर शिकवायचे........
आम्ही बी घडलो,तुम्ही बी घडाना,
परिसाच्या संगे लोह बी घडले,
लोह बी घडले सुवर्णाची झाले.
सागराच्या संगे नदी बी घडली,
नदी बी घडली सागरची झाली!.
संस्कार घडवी असे सुंदर मन.....साकारी अविकारीत निर्मळ तन.........!
No comments:
Post a Comment