माझ्या स्वयमपाकघरा जवळच मी बाग केली आहे . त्यामुळे laptop ,कॅमेरा ही आयुधे टेबलावर नेहमीच असतात. काम करता करता फुलपाखरू दिसले,पक्षी दिसला,फुलांची रचना सुचली की लागलीच ती केले जाते आणि laptop वर टाकून फेसबुक वर पोस्ट केली जाते..अनेकानी मला प्रश्न विचारले,की तुम्हाला इतका वेळ कसा मिळतो,तुमी कशा कलाकृती बनवता,म्हणून हे सांगण्याचा प्रयास मी केला आहे!
दोन वर्षांपूर्वीची ही घटना ! माझी किंकाळी ऐकून,संगिता धावत आली. मी धुपकन पडले होते आणि मला उठता येत नव्हते. पाचव्या मजल्यावरील गच्चीतील घर आणि लिफ्ट नाही! MRI काढला. spinal fracture होते. आणि इतरही काही बिघाड झाले होते. दोन्ही मूले परदेशात,मुलगी लग्न होऊन सासरी. वाईट वाटून,रडून सारे काही झाले. कमरेला पट्टा,खाली बसायला मऊ रिंग,असे दागिने लागले.
माझे law चे प्रथम वर्ष झाले होते आणि ,दुसऱ्या वर्षा चालू होते. मूले मोठी झाली,संसारिक जबाबदाऱ्या कमी झाल्या म्हणून मी पुन्हा शिक्षण माझ्या ४५ व्या वर्षी चालू केले होते. हे मी माझ्या मुलांच्या पाठींब्याने करू शकले. माझ्या मोठ्या मुलाने मला सांगितले की" कागद-पेन घेऊन बस,आता पर्यंत फक्त दुसर्यांचे जिवन जगलीस,आता स्वतःला विचार आणि जो काही आत्मा मानतेस ना,त्या तुझ्या आत्म्याला काय हवे ते विचार आणि लिही व त्याप्रमाणे कृती कर. आम्हाला जसे लहानपणी तू शिकवलेस,,तसे आता आम्ही तुला काही सांगू ते ऐक". आणि खरच मुलाच्या या गुरुवाणीने मला हा ज्ञान-मार्ग दाखवला. मी खरेच कागद-पेन घेऊन लिहून काढले, मला जे काही करायला मिळाले नव्हते अन माझी इच्छा आहे, ते मी लिहिले..मला गाणी ऐकायला आवडतात. मला नव-नविन विषयांचा अभ्यास करायला आवडतो,मला फिरायला आवडते, photography .इत्यादी. धाकट्या मुलानी कॅमेरा आणून दिला. मला सर्व गाण्यांच्या CD आणून दिल्या. चांगले चित्रपट पाहण्यासाठी library लावून दिली. Gardening चे १ वर्षाचा course फर्गुसन कॉलेज मधून केला,Amfi ,Irda ,च्या परीक्षा पास झाले. हे सारे करतानाच एकीकडे घराची दुरुस्ती,मुलांची लग्न पण झाली. मूले परदेशात गेली.
LLB चे पहिले वर्ष झाले,आणि माझा हा छोटा अपघात घरातच झाला,त्यामुळे मला अपंगत्व आले. आता पर्यंत जिवनात सर्व अडचणींवर मात करीत जगण्याची सवय झाली होती. तरुण पणातच rhumatic arthritis झाला होता,परंतु त्यातूनही मी माझ्या इच्छा शक्तीमुळे,त्यावर मात करू शकले होते,आणि तसेच मी २५ वर्ष सामाजिक काम करीत राहिले होते. मी माझ्याशीच सुसंवाद साधू लागले. सुरुवातीला जगजीत सिंग च्या गझल ऐकणे पसंद केले,नंतर संदीप खरेची आयुष्यावर बोलू काही,सुरेश इत्यादी. सुरेश भट,श्रीधर फडके ,एकाच या जन्मी फिरुनी पुन्हा जन्मेन मी ,आम्ही एकटेच जगू एव्हढंच ना वगैरे,परंतु मुलानी मला मेल करून इंगिल्श गाणी, lyrics त्यांच्या links ,VDO पाठवले,ते मी ऐकू लागले. I have a dream ,hero ,words ,paint my love , इत्यादी, ते मम आत्मा गमला पर्यंत सारी गाणी ऐकू लागले. तेव्हा माझे रडणे थांबले. प्रथम मी computer जवळ जाऊन शिकणे चालू केले. शिकवायला गुगल गुरु होताच अगदीच अडले,तर काही जणांना phone करून विचारायचे.हळू-हळू त्यात प्रगती झाली. मूले परदेशी असल्याने त्यांना मेल करणे,स्कॅन करून कागद-पत्रे पाठवणे,फोटो पाठवणे,सारे काही जमू लागले. त्यात आनंद वाटू लागला.
सकाळी बागेत पक्षाचा आवाज आला,म्हणून सहज कॅमेरा कडे हात वळला,आणि अशी photography ला सुरुवात झाली. बागेत खूप प्रकारची झाडे लावली होती. त्यांचा फोटो काढू लागले. झोपल्यावर बसून,सांगितला सूचना करी,मला पाने -फुले आणून दे. नंतर शो केस मधील क्रोकरी खाली उतरू लागली. एक-एक ग्लास पासून ते बाउल पर्यंत सारे काही घेऊन,त्यात फुलांच्या रचना,या सूर्याच्या किरणन मध्ये सुरु झाल्या. रात्री दुखत असल्याने झोप येत नसे,झोपेच्या गोळ्या डॉक्टरांनी दिल्या होत्या,परंतु,मला औषधान पासून मुक्ती हवी होती. मी रात्रीचे वेळेस फुलणारी,रातराणी,गुलबक्षी,आणि इतर फुले घेऊन,घरातील मेणबत्त्या,चिमण्या,बाहुल्या,साऱ्यांना गोळा केले. ओटा ,जेवणाचे table हा माझा photo studio झाला. कॅमेरा कसा धरायचा,किंव्हा कसा वापरायचा काही ज्ञान नाही,परंतु सरावाने हा सारा खेळ सुरु झाला.कपाटातील साड्या ,ओढण्या या backroundla येऊ लागल्या.कपडे भिजविताना साबणाचा फेस दिसला तर तो केलेल्या रचनेवर टाकून फोटो काढ,सूर्याची किरणे सकाळी table वर येत,तेथे पाना-फुलांची रचना मांडून सूर्य किरणे कॅमेरात पकडण्याचा छंद लागला. घरात ज्या ज्या वस्तू आहेत,अगदी चांदीची छोटी भांडी,देव-घरातील देव ,माझे दागिने,जपाची रुद्राक्षांची माळ, सारे काही या कलाकृतीन मध्ये भाग घेऊ लागले.
माझी मुलगी,वहिनी,सून,मूले,सारे त्यांच्याकडे नको असलेल्या वस्तू मला आणून देऊ लागल्या. भेट म्हणून,रंगीत दगड, छोट्या चिमण्या मिळाल्या. संक्रांतीला पूजतात ते छोटे मातीचे गडू,दही-हंडीचा छोटसे मातीचे भांडे,सारे काही माझ्याकडे जमा होऊ लागले. फुलांच्या परड्या,sponge नातेवाईक किंव्हा मला मिळायच्या,त्याही आठवणीने,माझ्याकडे येऊ लागल्या. वस्तू दिसल्या की काहीतरी सुचायचे आणि कोणत्याही वेळी सुचायचे,तेव्हा बनवणे चालू झाले.हे छंद जोपासायला खूप पैसा लागत नाही .मला प्रथम माझ्या भावाने २४०० रुपयांचा canon digital कॅमेरा दिला,नंतर ७००० रुपयांचा caanon digital व आता १८'००० रुपयांचा fujifilm 18x कॅमेरा मुलांनी दिला आहे.
मुलीचे बाळंतपण करायला गेले,तरी छोटी छोटी डिश garden मध्ये रोपे नेली,आणि तेव्हा flat मध्ये लहान लहान कलाकृती करू लागले. बाळ-बालांतीन,सारी कामे असायची,पण तरी त्यातूनच बाळाचे फोटो काढणे आणि कलाकृती आणि बड-बड्गीते व अंगाई लिहिणे हेही जमू लागले. सारे माझी चेष्टा करायचे,पण या छंदात तिकडे लक्ष देणेही व्हायचे नाही.आवड असली की सवड मिळते.
रोज झोपाळ्यावर बसून चहा पीत सूर्यास्त आणि पक्षी पाहायचे,परंतु आता चहा ऐवजी कॅमेरा हाती आला,आणि रोजचे सूर्यास्ताचे फोटो,आकाशाचे बदलते रंग,बगळ्यांची माळ,घरी,पोपटांचे ठावे,आणि इतर पक्षी कॅमेरात कैद करणे सूर झाले. असा माझा छंद photography आणि कलाकृती करण्याचा वाढतच गेला. दुबईला मुलाकडे गेले,तेथेही मी शेजारी बांधकामाच्या विटा आणल्या ,दुकानातून कुंड्या रोपे आणली. छोटे छोटे पॉट केले,आणि तेथेही हा छन्द चालूच राहिला.
दुबईला इमारतीवरूनच सूर्यास्ताचे सुंदर विलोभनीय दृश्य दिसायचे. मला तेथील लोकांनी अगदी वरती जाऊन फोटो काढण्याची परवानगी दिली. नंतर मी संध्याकाळी सूर्याचा शोध घेत,दुबईला,त्याच्या मागे काही किलो मीटर चालू लागले,आणि मला चालता येत नाही हे विसरूनच गेले. मुलगा-सून खूप खूष झाले. रोज फोटो त्यांना ऑफिस मधून आले की दाखवायचे. तेही कौतुक करायचे. धाकटा मुलगा मला photography तील त्रुटी सांगू लागला,तेव्हा कळू लागले,फोटो हलला म्हणजे काय, micro मध्ये फुलांचे ,फुलपाखराचे ,दावा-बिंदूंचे फोटो कसे छान येतात.,हे कळू लागले.
दुबईतील,झाडे,पक्षी,फुले,सूर्यास्त या सर्वांनी मला बरे करून टाकले होते. शहाण्यांना जगण्याचे कायदे असतात,वेड्यांना सारे फायदेच फायदे,हे मला कळले. आणि चंद्रशेखर गोखलेजींची चारोळी अनुभवली. कीर्तनकारांकडून एकदा ऐकले होती कथा" की एक राक्षस,असतो, तो चांगला असतो,त्याला कितीही काम दिले,तरी तो पुन्हा काम मागायला यायचा,तेव्हा ,त्याला देवाने एक खांब दिला आणि त्याला सांगितले,की तू यावर चढणे-उतरणे चालू ठेव. आणि त्या प्रमाणे मनाच्या राक्षसाला नाम-स्मरणात गुंतवून ठेवा." हे ऐकले होते,पण जमले नव्हते. या छंदाने मात्र मला त्याची प्रचीती दिली, आणि कालबाह्य साक्षीभावाने जगणे जमले. मी मलाच म्हणते छंद हीच साधना,ज्यामुळे मला उमजली अंतरंगाची भावना!
No comments:
Post a Comment