रुग्णवाहिकेतून मी अपघात-ग्रस्त दोन जणांना घेऊन मुंबईला जे जे रूग्णालया मध्ये निघाले होते.ओंक वहीनी माझे सोबत आल्या ते खूप बरे झाले. दोघांना सलायीन लावलेले म्हणून आम्ही दोन जणी सोबत असणे खूप गरजेचे होते. रक्तस्त्राव खूप होत होता, डोकेच आपटले होते, बाकीही अवयवांची तोड-मोड झालेली. सारे दृश्य अगदी विदारक होते. प्रथमोपचार करून घेतला होता. आता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न जे जे मध्ये जाऊन करणे इतकेच हातात होते. दोघे म्हणजे मामा -भाचे होते . महाड हून मुंबईकडे मोटार सायकल वरून निघाले होते आणि वाटेत आमच्या गावाजवळील महामार्गावर हा अपघात झाला. अपघात ज्याने पाहीला तो तरुण मला ही वार्ता सांगायला आला होता. मी म्हणाले "माझ्याकडे कसा काय आलास? मी तूला ओळखत नाही.". . तो म्हणाला" आपल्याला मी ओळखतो तो अपघात मी डोळ्याने पाहीला,त्यांना वाचवणे गरजेचे आहे,तर मला वाटले,की आपणच त्यांना मदत करू शकता".
थांबलेल्या ट्रक वर यांची मोटार सायकल आदळली होती. सरकारी दवाखान्यात मी तातडीने गेले डॉक्टर म्हणाले "येथे आम्ही यांना वाचवू शकत नाही,आम्ही रुग्णवाहिका देतो आपण यांना घेऊन जाऊ शकता.नर्से एकच असल्याने आम्ही तीला सोबत पाठू शकत नाही. डॉक्टर आणि पोलीस मला माझ्या कार्या मुले ओळखत होते., त्यामुळे या व्यक्तींना आम्ही घेऊन जाऊ शकलो. नाहीतर तुम्ही कोण,काय आणि कारवाई झाल्याशिवाय जाता येणार नाही असे म्हणाले असते, तर दोघेही तेथेच गतप्राण झाले असते. पोलिसांना मी म्हणले तुमचे पंचनाम्याचे काम लवकर करा,बाकी काहीं उरले तर नंतर पाहू. माणसांचा जीव वाचवणे आधी महत्वाचे. त्यांनी माझे ऐकले,आणि आम्हाला लगेच जाऊ दिले. रुग्णवाहिका मिळाली त्यामुळे त्यांना घेऊन जाणे शक्य झाले.
इकडे घरी करवीर पीठाचे शंकराचार्य येणार म्हणून त्यांचे स्वागताची तयारी करायची होती. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मीच मुद्दा उपस्थित केला होता,की शंकराचार्य कोण? धर्मगुरू म्हणजे काय? हे नुसते मठात बसून हे तळागाळातील समाजाला कधी कळणार. सामाजिक समरसतेचे नुसते फलक लावून समरसता होत नाही. सर्व पांढर-पेशा वर्गात पाद्य-पूजने करीत राहण्या पेक्षा अशा सर्व वस्त्यान मध्ये जाऊन त्यांनी प्रबोधन करणे हे महत्वाचे आहे. सारया समाजाला प्रवाहात ओढून घेण्याचे काम गुरुंनी करायला हवे. माझे बोलणे काहीं जणांना आगाऊ पणाचे वाटले. मी नेहमीच बंडखोर ठरले होते. तरी कार्यक्रम ठरला. वाड्यात कार्यकर्त्यांना मी मुंबईला जाऊन येत आहे ,तयारी करून ठेवा. ठरल्या प्रमाणे कार्यक्रम होईल. असे सांगितले. घर -सामाजिक काम -व्यवसाय साऱ्यांची झटपट सूचना सांगून व्यवस्था लावावी लागायची..मी नसताना ही व्यवस्था नीट होईल याची खात्री असायची. कार्यक्रमा पेक्षा जीव वाचवणे जास्ती महत्वाचे होते..
रुग्णवाहिका कधी एकदा जे जे ला पोहोचते असे झाले होते. कारण दोघांपैकी एकाची हालत खूप खराब दिसत होती.जे जे रुग्णालयात एकदाचे पोहोचलो. त्यांना दाखल करून,त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. रक्ताची गरज होती. रक्त-गट o + ve होता हे फार बरे झाले,कारण त्याचा रक्तदाता लगेच मिळू शकतो. जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना फोन करून रक्त-दात्यांची व्यवस्था केली. तासाभरात रक्त मिळाले. वेळ जसा जात होता तसे,त्यांचे मरण समोर दिसत होते. अगदी हतबल झाले होते. जे शक्य आहे,ते सारे करण्याचा प्रयत्न केला. शस्त्रक्रिया झाली ,मामा वाचला आणि भाचा गेला होता. भाचा गाडी चालवीत होता,त्याला जास्त मार बसला होता. खूप दुखं झाले,रडू आले, कारण गाडीत तो भाचा हिचके देत होता,रक्त-स्त्राव थांबत नव्हता. त्याचेवर तेथेच गावात इलाज झाला असता,तर तो कदाचित वाचला असता.
सरकारी दवाखाने आधुनिक व सुसज्ज नसल्याने ,तेव्हा त्यांच्या कुवतीबाहेरच्या केसेस मुंबईलाच घेऊन जाव्या लागत असत. आम्ही मुंबईला जातानाच,त्या मामाचे गावी फोन करून कळवले. होते,त्यांचे नातेवाईक जे जे ला आले होते. त्यांच्याकडे त्यांना सोपवून आम्ही गावी संध्याकाळी परतलो. मनात संमिश्र भाव होते. एक वाचला आणि एक गेला. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्यात हसू ! तरुण मुलाच्या जाण्याने अतिशय दुखं झाले होते. परंतु दोघांपैकी एक तरी वाचला याचे समाधान लाभले होते.
घरी आल्यावर आवरून आधी ठरलेला कार्यक्रम हसत मुखाने करणे आवश्यक होते. करवीर पीठाचे शंकराचार्य आमचे घरी आले होते, नंतर त्यांचे वाड्यात प्रवचन झाले. माझ्या या सर्व सामाजिक कार्यात आधी थोडा विरोध आणि नंतर मुला-बाळांसह कुटुंबीयांचे पाठबळ मिळाले म्हणूनच करणे शक्य झाले.
जेव्हा-जेव्हा अपघात होतात तेव्हा आपण बघ्याची भुमीका न घेता,मदतीचा हात पुढे करायला हवा. आपल्या या मदतीने एखाद्याचे जिवन आपण त्यास बहाल करीत असतो . जिवनभर हे चांगले कर्म आपल्याला सुखद आनंद देत असते. माझ्या लक्षात आले की हा ईश्वर आपल्यातच असतो,बाहेर कोठेही शोधावा लागत नाही.
तूची आहेस रे जगन्नाथ.............दे पिडीतांस मदतीचा हात!