नारळी पौर्णिमेचा दिवस,पाऊस मुसळधार कोसळत होता. रात्री ८ चे सुमारास दिवे गेलेले. सगळीकडे काळोख होता. कोकणात पाऊस पडला की वीज लगेच तासनतास जाते. सुलभाला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. तिने घरीच खूप वेळ काढला होता,कारण तीला दवाखान्यात न्यायलाच कोणी नव्हते. नातेवाईक म्हणजे गौरीचे आज्जी--आजोबा,इतर सारे समोरच रहात होते,परंतु सुलाभाची मुलगी गौरी हाक मारायला गेली तर कोणी आले नाहीत. कारण त्यांचे सख्य नव्हते. तीची लहान मुलगी आणि तिचे पती असे तिचे विभक्त कुटुंब. विभक्त कुटुंबाचे तोटे असे सामोरी आले होते. सर्वांशी सलोख्याने वागणे ,हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सुलाभाचा पती एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होता.सामाजिक हित जपताना आपल्या कुटुंबाचेही हित जपलेच पाहिजे. सुलभा आणि सतीश दोघांना हे नंतर समजावून सांगणार होते.
सतीश लगबगीने आमच्या घरी आला म्हणाला" वहीनी सुलभाला दवाखान्यात न्यायला हवे." त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती,म्हणून धर्मादाय दवाखान्यात न्यायचे म्हणाला. तेव्हा विचार करीत बसायला वेळ नव्हता. घरी माझे भाऊ रक्षा-बंधानासाठी येणार होते,ते आल्यावर त्यांना बसवून घ्यायला घरी सांगितले संगीताला म्हणजेच माझ्या दत्तक मुलीला आणि मी हातातील कामे टाकून,टोर्च आणि छत्री घेऊन त्याच्या सोबत निघाले. त्याला रिक्षा आणायला पाठवले आणि मी तिच्याजवळ थांबले. सुलभाची स्थिती पाहता,ती प्रसुतीला फार काळ घेणार नव्हती.
आम्ही तीला रिक्षेने त्या दवाखान्यात नेले. तेथे अंधार,डॉक्टर नाहीत. एक म्हातारी आया फक्त होती. डॉक्टरांना फोन करून बोलावयाचे तर तेथील फोन पावसाने बंद पडला होता. मी त्या आया सुलोचना बाईना म्हणाले आधी आपण सुलभाला प्रसूती गृहात नेऊ. तीला कसे बसे तेथ पर्यंत नेले. दोनच मेणबत्त्या होत्या,त्या लावल्या. सतीशला टोर्च धरून उभे केले. बाहेरच बाकावर तिच्या मुलीला बसवले. हिचे प्रसूती कळानी ओरडणे चालू होते. तपासून पहिले,तर ती लगेच प्रसूत होणार होती.
बाळाचे पाय आधी बाहेर आले,परंतु बाकी बाळ बाहेर काहीं केल्या येईना. आया घाबरली,मी तीला म्हणाले,आता हा माझाही पहिलाच अनुभव आहे,परंतु आपण काहीही करून हिला सोडवायचे आहे. बाळाच्या गळ्याभोवातली नाळ गुंडाळली गेली होती. सारीच विचित्र स्थिती होती. परंतु तसेच प्रयत्न करीत राहून,तीला धीर देत राहिलो. कारण सुलभ गळपटली होती.,डोळे फिरवू लागली. काय करणार? आम्ही दोघींनी मिळून कसे-बसे बाळ सुखरूप बाहेर काढले. नाळ कापून आई पासून वेगळे केले. मी त्याची नाळ सोडवली. गळ्याभोवती गच्च नाळ,आणि पायाळू त्यामुळे बाळ गुदमरले होते. ते बाहेर आले,पण रडले नाही. त्यामुळे काळजी वाढली. आयाला सुलभाचे पुढील काम पुरे करायला सांगितले.
सतीशला गरम पाणी करायला सांगितले,त्याच्या मुलीला तोवर टोर्च धरून उभे केले. ती लहान आहे-वगैरे विचार करायला वेळ नव्हता. पटकन बाळाला मी स्वच्छ आंघोळ घातली ,उलटे धरले थोपटवले आणि काय आश्चर्य ते रडले.......ते बाळ मुलगी होती. तिच्या रडण्याने आमच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर आली. आमचा जीव भांड्यात पडला. त्या दोन मेणबत्त्या केव्हाच विझल्या होत्या. फक्त टोर्च चे उजेडात काम चालू होते. सुलभाही बाळाचा आवाज ऐकल्यावर मानसिक स्थिरावली. तीला धीर देत राहिलो. पण तीची वारच पडत नव्हती. एकदाची वार पडली आणि पुन्हा जीव भांड्यात पडला, टाक्यांचे उरकले. तेथील स्वच्छता,आणि सुलभाचे आवरले. बाळ-बाळनतिन सुखरूप होते. सतीश व त्याची मुलगी दोघेही आनंदले. त्याची मुलगी गौरीला खूप आनंद झाला. आम्ही सारेजण या धावपळीने घामा-घूम झालो होतो. मानसिक ताण दोघेजण सुखरूप आहेत पाहून कमी झाला.
दोघांना तेथे ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. सतीशला मी रिक्षा घेऊन यायला सांगितले. दूरवर जाऊनही रिक्षा काहीं मिळाली नाही. पाऊस कोसळतच होता. दिवे आले नव्हतेच. मला आठवले की माझे भाऊ गाडी घेऊन आले असतील, मी सतीशला आमच्या घरी जाऊन गाडी घेऊन यायला सांगितले. बाळ-बाळनतिन घरी सुखरूप पोहोचवले. आणि मी रात्री साडे अकराला घरी आले.
माझे भाऊ बिचारे माझी वाट पहात घरी थांबले होते.. माझे आवरून रक्षा-बंधन करून आम्ही जेवलो. पण आजच्या जेवणात मला अमृतमयी समाधान लाभले. सुलभाला डिंकाचे अलीवाचे लाडू ,बाळाचे कपडे. देण्यापासून सागर संगीत बाळंतपण केले ,कारण सुलभाची आई लहानपणीच वारली होती. माझे शिवण मशीन होते. असे बाळाचे कपडे पटकन शिवून देता येत.
कोणासाठी काहीं केलेले बोलून दाखवू नये म्हणतात,परंतु आताच्या काळात आपली आई असो नाहीतर सासू कोणीही आले तरी तो पाहुणा आला आणि त्यामुळे लगेच घरात तारांबळ उडते. त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळा-ढवळ होते. मी आणि माझा नवरा-मुले इतकेच कुटुंब अशी व्याख्या केली आहे या पिढीने. कोणासाठी काहीं करण्याची सवय राहिलेली नाही.फार थोडे अपवाद पाहायला मिळतात. .
माझे शिक्षण वाया गेले नव्हते. मी नेहमी म्हणायचे की मी जीवशास्त्राची पदवीधर आहे,आणि माझे शिक्षण चुलीत वाया चालले आहे. पण आज मला माझ्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष झाला होता. वैद्यकीय शास्त्राच्या पहिल्या वर्षांची पुस्तके मी घरी अभ्यासली होती. आज त्याचा उपयोग एक जीव वाचविण्यासाठी झाला होता. ज्ञान कधीच वाया जात नाही.हे अगदी खरे. आपण आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ शकतो,इतरांना मार्गदर्शन करू शकतो,समाजात वावरण्याचा आत्म-विश्वास वाढतो,आणि ज्ञान कुठेही -कसेही उपयोगी पडते..
देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे.........परंतु या अनुभवाने मला सुचले......ज्ञानची असे हरी ... घडी-घडी ठरे ते सर्वोपकारी!
No comments:
Post a Comment