मंडळाची बैठक बोलावली गेली होती. विषय होता एका विवाहितेने एका मुलावर प्रेम करणे. हा व्यभिचार आहे.असे सर्वांचे मत होते. म्हणून तीला आपल्या वाड्यात प्रवेश द्यायचा नाही असा विचार मांडत होते. विचार मांडणार्यांची अंडी-पिल्ली मला ठाऊक होती. पण पुरुषांना असे बोलून दाखवले तर ते डिवचले गेले असते. मी तेव्हा बैठकीत वातावरण तप्त नको व्हायला म्हणून तो विषय माझ्याकडे सोपवा असे सर्वांना विनंती केली. मी त्या मुलीला म्हणजेच गिरजाच्या पोरीला मला येऊन भेटण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी ती मला भेटायला आली. तिचे नाव सुनंदा होते. तीला ४ मुले होती आणि वय तिचे फक्त २३ होते. मी तीला बोलते करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती सांगू लागली तीची कथा. गिरीजा ही तीची आई,तीला ५ मुली,त्यातील ही मोठी मुलगी. वडील दारूच्या व्यसनाने तिच्या लहानपणीच वारले होते गिरीजाने भाजी विकण्याचा व्यवसाय करून या मुलींचे पोट भरण्याचा प्रयत्न केला. १३ व्या वर्षीच सुनंदाचे लग्न गिरीजाने परिस्थिमुळे पैसा नाही म्हणून एका बेवड्याशी लाऊन दिले. दारू आणि जुगार या व्यसनाने हिचा पती वेढला गेला होता. तीला मारहाण करी आणि घराबाहेर कधी रात्र-रात्र ठेवायचा. जेवण-खाणाचे हाल. त्यातून ४ मुले जन्माला घातली. ही मुले आता गिरीजाच सांभाळत होती. सुनंदा या जाचाला कंटाळून गाव सोडून बोरिवलीतील झोपड पट्टीत राहायला गेली होती. तेथे ती घरकाम करून ते पैसे आईला द्यायला येत असे,आणि मुलांची भेट होत असे. या काळात वाड्यातील एका तरुणाशी तिचे प्रेम जमले. तोही बोरिवलीतच कामाला होता. आता हा खूप वेगळा विषय आहे,हे माझ्या लक्षात आले. कोणतीही स्त्री कारण नसताना उगाचच व्यभिचार करेल,हे माझ्या मनाला पटत नव्हते. याला काहीं अपवाद आहेत.
सुनंदा सांगू लागली " काकू, मला अक्कल नसण्याच्या काळात मुले झाली.प्रेम काय असते ते पती कडून कधीच कळले नव्हते. फक्त वासना -पूर्तीचे मी त्याचे साधन होते. मला मनाला हे खूप खटकू लागले. आता या पुढे तरी मुल नको हा विचार केला.या ४ मुलांचे पोट भरता येत नव्हते. या सारया परिस्थितून मी सुटका करून घेण्यासाठी स्वतःचे कुटुंब-नियोजनाची शस्त्रक्रिया करवून घेतली. मुंबईला नातेवाईकांकडे गेले,पण तिथे अनुभव चांगला नाही आला. नंतर झोपडे भाड्याने घेऊन काम मिळवले,आणि गुजराण करू लागले. माझ्या आयुष्यात हा राकेश आला. प्रथम नजरा-नजर आणि नंतर ओळख वाढत गेली. मी त्याच्याकडे आकर्षित झाले. मलाही प्रेम काय असते हे प्रथमच कळले. त्याला माझी कहाणी ठाऊकच होती. मी माझ्या कुटुंब-नियोजन शस्त्र क्रियेबद्दल त्याला सांगितले व आपली ओळख येथेच थांबवू या, मी तुला मुल देऊ शकणार नाही, चांगली मुलगी तुला मिळू शकते, माझी ४ मूले आहेत . माझ्या साठी तू स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस.. . पण काकू तो हे सर्व स्वीकारून लग्न करायला तयार आहे".. मी तीला वचारले की मुलांचे काय? ती म्हणाली आई जबाबदारी घेत आहे,नंतर आम्ही बरोबर मुलांना नेऊ. तिचे हे सर्व बोलणे ऐकून झाल्यावर मी तीला राकेशला बरोबर घेऊन यायला सांगितले. राकेशशी तिच्या समोरच सर्व मुद्दे बोलून घेतले. त्याने जो निर्णय घेतला आहे,त्याच्या सारया बाजूंचा विचार केला. मी त्याला म्हणाले तू फक्त सहानुभूती पोटी तिच्याशी लग्न करू नकोस. नंतर तो सर्व ठाऊक असूनही तिच्याशीच लग्न करणार यावर ठाम होता. सुनंदाला प्रथम तिच्या नवऱ्या कडून घटस्फोट घेणे आवश्यक होते.
मी खूप विचार केला सुनंदाच्या बाजूने,मला तिचे जिवन पुन्हा सुखी करता आले,तर ....पण समाज काय म्हणेल? हा प्रश्न होता. ज्या मुलीचा बाल-विवाह झाल्या मूले तीला असंख्य यातना भोगाव्या लागल्या होत्या,तीला पुन्हा चांगले जिवन जगण्याची संधी चालून आली होती. राकेश च्या घरच्यांचा विरोध होता,तो योग्यही होता. कारण त्यांना आपल्या मुलाने ४ मूले असलेल्या बाईशी लग्न करणे,(सुनंदा २३ वर्षांची..)आणि आपल्याला ही वंशाचा दिवा देऊ शकणार नाही असे वाटत होते. प्रश्न जिकिरीचा होता..तरीही राकेश बरोबर सुनंदा सुखी राहू शकते या निर्णयावर मी आले. सुनंदाला मी घटस्फोट आधी मिळविण्यास सांगितले.
सुनंदाला घटस्फोट मिळाला,कारण तिच्या पतीला ही दुसऱ्यावर प्रेम करते हे कळले होते आणि ती आता त्याचे जवळ राहत नव्हती.तीला रांड-छिनाल हे शब्द ऐकवत शेवटी सह्या दिल्या. खूप सोपे असते ना! एखाद्याला वाटेल ते शब्द वापरणे. पण तिच्यावर ही वेळ आणली कोणी?......... त्या पतीनेच ना? .
मंडळाच्या बैठकीत पुन्हा मी हा विषय सविस्तर पणे मांडला. इतरांचेही विचार ऐकून घेतले. मी म्हणाले " चुलीतले लाकूड चुलीत जाळणे हे आता पुरे झाले. स्त्रीलाही तिचे आयुष्य आहे, आत्म-सन्मान,भावना,आहेत. पती-पत्नी दोघांनीही संसार जबाबदारीने ,विश्वासाने केला तरच टिकतो. सर्व सत्य परिस्थिती डोळ्या समोर असताना आपण जुन्या रूढी-परंपरेत गुंतून राहायचे का? सुनंदा वर अत्याचार होत होते, ती आणि तीची मुले उपाशी तडफडत होती,तेव्हा कुठे गेला होता समाज? का जाब नाही विचारला तिच्या नवऱ्याला कोणी? सुनंदा एकटी गाव सोडून गेली, तेव्हा तीला कोणी आधार दिला का? तीची मुले आई कडे, तीला त्यांचे पासून दूर राहावे लागते,तर या मुलांच्या भविष्याचा विचार करायला नको का? या लग्नाने,मुलांना आई-वडील मिळणार आहेत. आता ती रीतसर लग्न करणार आहे,तर त्या मध्ये कोणी आडकाठी आणण्याचे कारण नाही." माझे हे बोलणे ऐकून सारे गप्प झाले. राकेशच्या घरचे आपला मुलगा ऐकताच नाही,लग्न करेन तर सुनंदाशीच म्हणाला म्हणून लग्न करून द्यायला तयार झाले.. राकेशचे मला खूप कौतुक वाटले,की आपले स्वतःचे मुल होणार नाही,तरी तो तिच्या मुलांना आपली मूले मानायला तयार झाला. २५ वर्षांचाच राकेश,पण मला त्याचे हे विचार प्रगल्भ वाटले.
गिरजाच्या पोरीने असे बंड करून ४ मुले आणि समाजाच्या परवानगीसह पुन्हा देवळात लग्न केले. हो! हे जगावेगळे निर्णय घेतले मी, पण मला त्यात अजिबात चूक वाटत नाही उलट मला आता ती दोघे मुलांना बरोबर घेऊन सुखाने संसार करीत आहेत याचा आनंद होतो!
No comments:
Post a Comment