Friday, October 29, 2010

देवाच्या पुस्तकातील एक पान.........! सिंधूचे हाती आला सुधाकराचा प्याला .........!

                            एके दिवशी रात्री घरातील कामे उरकून  माझ्या बाळाला निजवून  झोपणार ,इतक्यात शेजारून जोरात रडण्याचा आवाज आला आणि  तितक्यातच  दार ठोठावले गेले.. सुनील रडतच  सांगायला आला होता "काकू आज्जी गेली"आणि  अजून जोरात रडू लागला. मी सासूबाईना व ह्यांना सांगून त्याचे सोबत घरी गेले.  
                            वाड्यात सर्वांना निरोप द्यायला मी सुनील ला पाठवले. तो  निरोप देऊन एकदम हिरमुसल्या तोंडाने येऊन मला म्हणाला " काकू, सगळे बाया-बापडे म्हणत्यात, दारू ची सोय असल, तर बसू  रातभर रडायला मैतापाशी ! सुनील,त्याची आई - बाबा आणि आज्जी असे कुटुंब होते. त्याचे बाबा रोज दारू पिऊन शिवीगाळ आणि त्याच्या आईला मारहाण करीत.बऱ्याचदा मी त्यांची भांडणे सोडवायला जात . ती बिचारी धुणी-भांड्यांचे काम करून घर चालवीत होती. तेही पैसे तिच्याकडून नवरा काढून घ्यायचा. 
                           सुनीलची आई म्हणजे सखू बाई  म्हणाली ",काकू, निसते बापेच न्हाय,तर बाया भी समद्या दारू ढोसतात.आता समदी बेवडी, दारूची सोय केल्याबिगर इथ बुड टेकायची न्हायीत". सुनील, त्या अन्नाला निरोप धाड, कुठून भी पैकाची सोय बघ, म्हनावं, नी सोय लाव त्यांची".
                           मी सखुला म्हणाले, सुनील कोठेही जाणार नाही. अजिबात दारूची व्यवस्था करायची नाही, दारू पिऊनच यांना जोर-जोराने खोटा गळा काढत  आज्जी जवळ बसायचे असेल, तर ते नाही आले तरी चालतील. ती घाबरली ,म्हणाली," काकू मला वाळीत टाकतील समदी, तुम्हाला काय बी ठाव नाय".  या म्हातारीला उचलून श्यान पुरायला कोण हात भी नाय लावणार" मी पुन्हा अवाक होऊन विचारले....अग पुरायचे का? जळीत करायचे ना!  ती म्हणाली" इथ खायला नाय पैका,तर जलीताला पैका कुठून आणू?. सावकार ,तर दारात भि न्हाय उभा करणार, लई कर्ज घेतलाय या मूडद्याने ,दारू ध्होसन्या  पायी घर बी गहान टाकलंय यानं, व्याज फेडल्या-बिगर तो पै भी नाय द्यायचा. स्वताची आईस गेली, तरी याला शुद्ध नाय, तिच्या तोंडात मरते time ला सुनिलनच पाणी ओतला. म्हातारी sick पडली, तरी दवा-दारू मीच केला,"आणि तीला खूप रडू कोसळले.  मी तीला जवळ घेऊन समजावले. मी तीला म्हणाले"  माझ्यावर विश्वास ठेव, मी उद्या  आपल्या मरीआईच्या  देवळात सगळ्याची मीटिंग बोलावते आणि  त्यांना समजावून सांगते."  तिने माझ्यावर विश्वास ठेवला, मी रात्रभर तिच्या येथेच थांबले, कोणीही वाड्यातले फिरकले नाहीत.
                          आज्जीला प्रथे प्रमाणे अंगाला तूप लावून ठेवणे, पायाच्या दोन्ही अंगठ्यांना पकडून दोरा बांधणे ,नीलगिरी प्रेता भोवती शिंपडणे, दिवा लावणे ,उदबत्त्या  लावणे, प्रेताला आंघोळ, नवे कपडे सारे काहीं मी केले. त्यांच्या घरात काहीच साहित्य नव्हते. माझे वय तेव्हा २६ वर्ष होते, पण अशा प्रसंगांमुळे  मन खंबीर बनत गेले. घरून पद्धती प्रमाणे कोरा चहा करून  नेला. सकाळी मी माझ्या सहकारी कार्यकर्त्यांना सुनीलची आजी गेली आहे, त्याची पुढील व्यवस्थेचे  पाहण्यास सांगितले. सगळेजण साहित्य घेऊन आले आणि ह्यांच्यासह सार्यांनी मिळून  आज्जीची अंतयात्रेचे विधी पूर्ण केले..
                            मी घरातून  पटकन पिठले-भात करून त्यांच्या कडे नेला. ह्यांचा मला अशा कामास पाठींबा होता. बाकी सर्वांचा विरोध होता. सासवांचे  व नण्दांचे एक-एक विचित्र शब्द ऐकावे लागत. .....भटाला दिली ओसरी अन भट हात पाय पसरी........! मला अजूनही ही म्हण मी प्रथमच ऐकल्यामुळे लक्षात आहे. आधी वाईट वाटायचे मग अंगवळणी पडले. घरातील जबाबदाऱ्या पार पडून समाजासाठी वेळ द्यायला ह्यांचा विरोध नव्हता.                                        
                          सामाजिक हेतूने माहेरच्यांनी माझा अंतर-जातीय ठरवून केलेला विवाह असला,तरी माझ्यासाठी हे सगळे अवाक करणारे अनुभव होते. शहरातील जिवन आणि येथील जिवनात जमीन-आसमानाचा फरक दिसला.नशिबाला दोष देण्या-पेक्षा आपण या वाड्यातील सारे प्रश्न हाती घेऊन,काम करावे असे मी ठरवले  व्यसन मुक्ती,संस्कारवर्ग, स्थानिक रजिस्टर मंडळ ही कामे प्रथम या लोकां-पुढे मांडायची असे ठरवून मीटिंग  संध्याकाळी मरी आईचे देवळात बोलावली. सावकाराच्या पार्टीतले लोक अजिबात आले नाहीत. त्यांच्या दृष्टीने ही कोण मीटिंग बोलावणारी?  महिला -पुरुष जे टल्ली होते, ते प्रथम देवळाकडे आले. मी साऱ्यांना बसायला सांगितले. त्यांची बेवडी- भंकस  ऐकून घ्यावी लागली.
                          काहीं महिला पुरुष दारू न पीता आले, हे माझ्यासाठी तेथील काम सुरु करण्यास मदतीचे ठरले. त्यांच्याशी  मी वाड्यातील समस्यां बद्दल चर्चा केली. सावकार आणि राजकारण्यांनी यांना व्यसने लावली होती. शेतात काम करणाऱ्याना स्पिरीट प्यायला दिले जाते,कारण ते त्या नशेत भरपूर काम करतात हे मी जेव्हा डोळ्यांनी पहिले, तेव्हा असा माणूस किती दुष्ट प्राणी आहे हे कळून चुकले. तेव्हा पुरुषांनीच महिलांना दारूचे व्यसन स्वतःचे स्वार्थासाठी कसे लावले हे सांगितले..
                          सारे काहीं ऐकून आता अचंभित होण्या पेक्षा मी काय करू शकते याचा विचार सुरु केला,कारण सिंधूचे  हाती सुधाकराचा प्याला आला होता! गडकरी असते तर यावरही नाटक  निश्चित निघाले असते. असे माझे गावातील व्यसन मुक्ती संस्कार वर्ग ,मंडळ स्थापना, मासिक वर्गणी ,त्यात स्थानिक समस्या सोडवणे, कोणाकडे मयत झाल्यावर दारूची मागणी न करणे,त्या ऐवजी सोडा पिणे ,१३ व्या ला मटण ऐवजी उकडलेली अंडी  असे ठराव केले. अंतिम क्रिया-विधींची मंडळा कडून तरतूद  ,कामे  कशी सुरू झाली  त्यातील एक-एक कथा रूपाने आपण पुढे असेच ठेवणार आहे. (आपल्याला हे ठराव वाचून हसू येईल,परंतु आर्थिक आणि मानसिक  स्थिती पाहून आणि हळू-हळू प्रथेत बदल केला तर समाज ऐकतो. पूर्ण नवे बदल दिले,तर त्यांना झेपत नाही,हा माझा अनुभव आहे.)
                          माझा  देश आणि  माझे  बांधव हे केवळ प्रतिज्ञा म्हणण्या पुरते नसून ,आपण त्या प्रमाणे वागायला हवे. डोळे उघडे ठेऊन समाजात वावरायला हवे, आपल्याला जे शक्य असेल, तेथे आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाला करून द्यायला हवा. आज त्यातून जी काहीं सुधारणा झाली,त्यात मला आपण समाजासाठी थोडेसे तरी योगदान देऊ शकलो,याचे आंतरिक समाधान मिळते!

No comments:

Post a Comment