रामेश्वराच्या मंदिरात ज्ञानेश्वरी सप्ताह चालू होता. मी रोज रात्री जात असे,तेथे माझी सरस्वती बाईंशी गाठ पडली,त्या म्हणाल्या " काकू मी रोज येथे ज्ञानेश्वरी चा पाठ ऐकते. मी वारकरी आहे. माझी इच्छा असूनही मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही,कारण मला लिहिता वाचता येत नाही. माझी ज्ञानेश्वरी वाचण्याची मनापासून इच्छा आहे.मला तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला शिकवाल का? ". माझ्या स्वभाव प्रमाणे मी लगेच हो म्हणाले. त्यांना खूप आनंद झाला. मी त्यांना सांगितले की मी उद्या तुमच्या घरी येते,तुमच्या जोडीने तेथील साऱ्याच निरक्षर महिलांना मी शिकवेन मी त्यांच्या नविन वसाहतीत जाण्याचे ठरले..
कुडाची आणि कौलारू घरे. त्या भागात घाटावरून आलेले लोक, हमाली करणे हा त्यांचा चरितार्थाचे साधन होते. महिला घरकाम आणि काहीजणी धुण्या-भांड्याची कामे करीत होत्या. सर्वजण वारकरी पंथाचे होते. महिलांच्या कपाळी छान मोठ्ठं कुंकू आणि पुरुषांचे कपाळी गंध, बुक्का,साऱ्यांच्याच्या गळ्यात तुळशीची माळा, प्रत्येकाच्या दारात तुळशी वृंदावन! माझ्या घरापर्यंत नेहमी या भागातून टाळ-मृदुंगाचा आणि भजनांचा आवाज ऐकू येत असे. त्या भागातील प्रमुख त्यांचे नाव माउली होते. त्यांना वयोमानाने दोन्ही डोळ्याने दिसेनासे झाले होते. तरी ते साऱ्यांना हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन देत. त्यांचा शब्द सारे प्रमाण मनात. मी प्रथम माउलीन चे घरी जाऊन त्यांना नमस्कार केला आणि माझे त्यांच्याकडे जाण्याचे प्रयोजन सांगितले. त्यांनी मला साक्षरता अभियानाला पाठींबा दिला.
मी लगेच या साक्षरता अभियानाला लागणाऱ्या वस्तूंची यादी केली. पाट्या,पेन्सिल,फळा, बाराखडीची पुस्तके आणि सरकारने साक्षरता अभियाना साठी छापलेली पुस्तके .गावात मी सामाजिक काम करते हे ठाऊक झाले होते,त्यामुळे,मी कोणाकडे काहीं हक्काने सहाय्य मागू शकत होते. माझ्यावर त्यांचा विश्वास बसला होता. भगवानदास किराणा मालकाने मला पाट्या आणि पेन्सिल दिले,काळ्या मारवाड्याने फळा आणि पुस्तके दिली. सरकारी योजनेचा साक्षरता अभियानाच्या पुस्तकांचा गठ्ठा धूळ खात पडला होता. मी तेथे गेल्यावर त्यांना कोण आनंद झाला,की कोणीतरी हे काम करणार आहे, त्यांनी ताबडतोब मला २५ पुस्तके दिली.तेव्हा माझ्याकडे सायकल होती. गावात सायकल चालवणारी मी एकटीच होते. त्यावरून माझी कामे झटपट व्हायची.२ दिवसात सारे साहित्य मिळाले. घरी साऱ्यांची बोलणी खाऊन ही कामे मी करायचे.एकत्र कुटुंब,मी मोठी सून, ३ सासवांची बोलणी! असो,असे साक्षरता अभियान सुरु झाले साक्षरता अभियानाला पाठींबा दिला
सरस्वती बाईने या कामासाठी उत्साहाने आपली घराची ओसरी सारवून ठेवली. बसायला गोणपाट पसरली. सरस्वतीचे ओटीवर सारया महिला जमल्या. मी त्यांना साक्षरतेचे महत्व पटवून दिले. बऱ्याच जणींनी हे कसे शक्य आहे, आम्हाला या वयात कसे येईल,हा प्रश्न केला. घरची -बाहेरची कामे यातून वेळ कसा काढणार.? मी त्याचा गोंगाट थांबवला. सरस्वतीबाई आणि मी त्यांना पुन्हा साक्षरतेचे महत्व समजावले. प्रत्येकीची समस्या ऐकून घेतली.आणि माझ्या लक्षात आले की दुपारी ३-४ सगळ्यांना वेळ मिळू शकतो. मी त्यांना सांगितले की दुपारी थकल्यावर अंग टाकता ना,ते टाकू नका,त्या वेळात येथे साऱ्याजणी जमा. ज्ञानेश्वरी वाचता येणे हे त्या कष्टकरी बायांचे स्वप्न होते. माझ्या पुढे खूप मोठे हे आव्हाहन होते.माझी ३ लहान मुले,घरातील १० माणसांचा जेवण -खाण,पाणी, भरण्यापासून सारी कामे, मी या महिलां पैकीच एक होते. फक्त मी पदवीधर होते एव्हढाच फरक. शिक्षणाचा उपयोग कुठेही होतो ते वाया जात नाही,हेही लक्षात आले.
प्रथम ४ महिला आल्या शिकायला.,नंतर सगळ्यांच्या घरी जाऊन मी घरच्यांना समजावले,तेव्हा १८ महिला येऊ लागल्या. धावत-पळत बिचारया पाटी-पेन्सिल घेऊन यायच्या. अ आ पासून सारे सुरु झाले. प्रत्येकीच्या कुवती प्रमाणे वेगळी प्रगती दिसून येत होती. मी त्यांना आधी सही करायला शिकवले. त्यामुळे त्यांना आता आपण अंगठा बहाद्दर नाही,आता सही करू शकतो हा आत्म-विश्वास निर्माण झाला.१ वर्ष होऊन गेले,बाराखडी येऊ लागली.
लोक त्यांच्या सवयीन प्रमाणे टोमणे मारायचे. काहीजण हिला पैसा मिळत असेल,तर काहीं जण हिला काम-धंदा नाही,वगैरे. कामाच्या दगदगीने मला rhumatik arthritis झाला. काहीं दिवस मला चालणे अशक्य झाले. माझी मुलगी ८ वर्षांची होती.तेव्हा.ती म्हणाली आई मला सांगून ठेव काय शिकवायचे, ते मी शिकवेन. मला या चिमुरडीचे खूप कौतुक वाटले. बाराखडी आणि शब्द चालू होती . मी तीला कागदावर लिहून द्यायचे काय शिकवायचे . मला बरे नसताना, माझ्या दत्तक मूलीसोबत ती जाऊन ती शिकवायची..पण वर्ग बंद पडू दिला नाही. त्या महिलानाही कौतुक वाटायचे की इतकी लहान मुलगी शिकवायला येते,त्याही खाडा न करता यायच्या. मला बरे वाटल्यावर मी पुन्हा जाऊ लागले. आणि २ वर्षांनी त्या वाचायला शिकल्या.
सरस्वती बाई प्रथम ज्ञानेश्वरी वाचायला शिकल्या .त्या मला नमस्कार करू लागल्या,मी त्यांना अडवले ,म्हणाले " हे देवाचे कार्य, देवच करवून घेतो,आपण निम्मित्त मात्र असतो" सरस्वती बाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, माझे ही डोळे पाणावले. आपल्याला आज वाचता येते हा त्यांचा आनंद, मी शब्दात वर्णन करू शकत नाही. कोणतेही काम धेय्य पुढे ठेऊन,नियोजन करून चिकाटीने केले,तर ते यशस्वी होते. असे हे सफल झालेले साक्षरता अभियान मला माझ्या जिवनात एक सुप्त आनंद देऊन गेले.
No comments:
Post a Comment