शालन मला म्हणाली " काय हो वहीनी! कशी पटकन कोंबडी सारखी उचललीत गीताला! लै डेंजर बाई आहात हो तुम्ही! भरंवसा नाही तुमचा काहीं पण करता बिनधास्त!". मला खूप मनापासून हसू आले. ही शालन बोलायला खूप फटकळ,पण माझ्यावर तिचा खूपच जीव जडला तिचा मला म्हणायची तुम्ही फिरता झोळ्या घेऊन,भिका मागत,मी त्या लोकांसाठी काहीं नाही करणार,पण तुमच्यासाठी जान हाजीर आहे! मी बाहेरून उन्हा-तान्हाची थकलेली आलेली दिसले,की पहिली भाकरी-कालवण जे काहीं केले असेल,ते खाल्ल्याशिवाय घरात जाऊ द्यायची नाही. पाहिलं मुकाट खायचं, मला माहिती आहे,घरी जाऊन तुम्ही परत कामात जुंपता आणि खाण्याचे हाल करता. तिच्या प्रेमाची तुलना कशाशी होऊ शकत नाही!
गीताला भेटायला जायचे होते. गीताचे मला कालच पत्र आले होते.तिच्या भावाने तीला रत्नांगिरी जवळील गावात त्याचे जवळ बळजबरीने राहायला नेले होते,आणि तो तिचे तिच्या मना-विरुद्ध बिजवराशी लग्न लावणार होता! हे पत्र वाचल्यावर मला लगेचच कृती करणे आवश्यक होते. गीताचा प्रियकर संदीप मला चार दिवसा-पूर्वीच देवदासच्या अवतारात भेटून, गीता शिवाय मी जगू शकत नाही सांगून गेला होता. संदीप वाहन-चालक,निर्व्यसनी २६ वर्षांचा चांगला मुलगा आहे.आणि गीता सडसडीत,दिसायला नाजूक पाकोळी सारखी,पण पोलीयोने अपंगत्व येऊन एका पायाला धरून चालणारी २४ वर्षांची मुलगी. एस टी कॉलोनी मध्ये मी संस्कार वर्ग घ्यायचे त्यातील ही एक विद्यार्थिनी! नंतर माझ्या सोबत दुर्गावाहीनीचे काम करायची. घरच्यांचा लग्नाला विरोध कारण,ती सुतार,तो मराठा,म्हणून तिच्या भावाने तीला गावी नेऊन ठेवले.
मी संदीपला निरोप धाडला,तो तर एका पायावरच पळत आला, गीताच्या पत्रातील बातमी ऐकून ,तो म्हणाला "काकू, मी लगेच गाडी काढतो आपण गीताला आणायचंच. मी त्याला म्हणाले आपण प्रयत्न करून पाहू,निदान तीला मी भेटेन तरी. मी लगेच शालन आणि तिचे पतींना आमच्या सोबत उद्या सकाळी रत्नागिरीला यायचे आहे असे फर्मान काढले. गाडी संदीपने मिळवली,आणि सकाळी आम्ही रत्नागिरीला गीता मिशन वर गेलो.दुपारी गीताचे भावाचे घर शोधून काढले,मी आणि शालन-प्रदीप तिच्या घरी गेलो. मला पाहून गीता काकू म्हणून बिलगलीच. इतकी कृष झालेली दिसली गीता,की मला खूपच वाईट वाटले. इकडेच बैठकीला आलो होतो,सहज गीताची आठवण झाली म्हणून आलो असे गीताच्या वाहिनीला मी म्हणाले चहा करायला वाहिनी आत गेली,तितक्यात मी गीताकडून पहिले तिच्या जन्माचा दाखला घेतला. कसे तीला न्यायचे हा गहन प्रश्न होता.संदीप आमच्या सोबत आला आहे,हे तीला मी सांगितले. त्यामुळे,तीला आशेचा किरण दिसला. त्यांच्याकडून चहा गप्पा करून निघालो,पण गीताला कसे न्यायचे हा प्रश्न काहीं सुटला नव्हता. आम्हाला गीताने डोळ्यतील आसवानीच निरोप दिला. माझे मन गलबलून आले होते. संदीपला तर गीता दिसलीही नव्हती. तो तर तीला भेटायला वेडा-पिसाच झाला होता. तीला घेतल्या शिवाय जायचे नाही,परत गाडी फिरवून पाहू ना काकू आपण,: त्याचा हिरमुसला चेहरा मला पाहवेना!
मी गाडी परत गीताच्या घराच्या दिशेने नेण्यास सांगितले आणि काय आश्चर्य .........समोर गीता दिसली! गीता तिच्या मैत्रिणी सोबत चहा पावडर आणायला गेली होती!. मी लगेच गाडी थांबवली. गीताला म्हणाले तुला संदीपशी लग्न करायचे आहे. ती हो म्हणाली. आता गाडीत आहे तशी बस,ती म्हणाली मी गाऊन वर आहे, मी तीला म्हणाले काहीं फरक पडत नाही,यायचे आहे ना,ती हो म्हणाली,मी तीला गाडीतूनच वरती खेचून घेतली,आणि गाडी स्टार्ट करायला सांगितले. शालन वाहिनी आणि तिचे पती काळजीग्रस्त झाले. " काय बाई ही ,कोंबडी सारखी उचलली पोरीला"! मला खो-खो हसू आले.
वातावरण निवळण्याचा मी प्रयत्न केला. काहीं काळजी करू नका. ही दोघे सज्ञान आहेत. कोणी काहीं करू शकत नाहीत . काहीं झाले तरी मी आहे ना,काळजी करू नका. गाडी मी गणपतीपुळ्याच्या दिशेने न्यायला सांगितली. माझ्या गळ्यात एक लहान आणि एक मोठे अशी २ मंगळसूत्र असायची. माझ्या गळ्यातील एक मंगळसूत्र आणि माझी जोडवी गीताला घातली. वाटेत जरी कोणी अडवले तरी काळजी नाही. गणपतीपुळ्याला सायंकाळी पोहोचलो.तेथे भटजींना लग्नाची तयारी करायला सांगितले,आणि पटकन गीताला साडी नेसवून नवरी तयार केली. संदीप तर काय तयारच होता. गीताला पाहून तर त्याला स्वर्गच मिळाला होता.गणपतीच्या साक्षीने दोघांचा विवाह देवळात केला, फोटो काढले. दोघांना जेवणाची पाकिटे देऊन पुण्याकडे जाणाऱ्या एस ती मध्ये बसवले. आणि असे हे गीता मिशन सफल झाले. दोन प्रेमी जीवाना एकत्र आणले, या खुशीत आम्ही होतो. गावी रात्री उशिरा आलो. पहाटेच दाराची बेल वाजली. गीताचा भाऊ आणि वडील अनेक लोकांना घेऊन आला होता. मी त्यांना शांतपणे सांगितले, आम्ही गीताला भेटून सरळ घरी आलो आहोत,ती कुठे गेली,हे आम्हाला कसे ठाऊक असणार. सारेजण मुकाट परत गेले
गीताचे लग्न ती सज्ञान असताना तिच्या मर्जी विरुद्ध तिच्या घरचे करीत होते, संदीप मुलगा कसा आहे हे थुक होते म्हणूनच मला असे वेगळे पाऊल उचलावे लागले.
गीता-संदीप ला गावी बोलावून कार्यकर्ते,संदीपचे नातेवाईक,मित्रा यांच्या साक्षीने परत मला घातल्या आणि आनंदाने ते घरी गेले. गीताचे आई-वडील तिच्याकडे जाऊ-येऊ लागले. भाऊ मात्र येत नाही. असो, गीता वाड्यातील मुलांचा शनिवार-रविवार २ तास देवळात अभ्यास घेत असे. कोणतेही सामाजिक काम ती हिरहिरीने करत असे. १२ वी नंतर कॉलोनी मधील संस्कार केंद्र गीताने ,मनिषाचे साहय्याने चालू ठेवला होता. दिल्लीला माझ्या सोबत महिला मेळाव्यालाही ती आली होती. पदवीधर झाल्या नंतर गीता नोकरी करीत होती. गीताचे अपंगत्वा मूळे कुठेच अडले नव्हते , कारण तिच्या मनाच्या पंखांनी तीला तिच्या जिवनात भरारी कशी मारायची हे शिकवले होते.
गीता आता कचेरीत स्टांप वेन्डोर आहे. २ मुलांसह छान संसार चालू आहे. संदीपने लहान मुले होती तेव्हा मुलांना घरी स्वतः थांबून सांभाळले.,आणि गीताच्या कमाईत घर चालवले. दोघेही लग्न नंतर एकही तक्रार घेऊन माझ्या कडे आली नाहीत. या गोष्टी नक्कीच कौतुकास्पद आहेत. दोघांचा हसत-मुख चेहरा,माझ्या चेहऱ्यावरही कायमचे हास्य देऊन गेला.. गीतेचे मनाचे पंख मलाही भरारी मारायला शिकवून गेले! गीता फोन करून मला खुशाली कळवीत असते . तिचा गोड आवाज मला अगदी तृप्त करून जातो!
No comments:
Post a Comment