एके दिवशी सकाळीच ठाकूर घरी सांगायला आला की ' देवराम लाकडे तोडताना झाडावरून खाली पडला,आणि त्याचे मांडीचे हाड मोडले होते. त्याच्यावर इलाज करायचे सोडून ,आता या नवऱ्याचा काहीं उपयोग नाही म्हणून त्याची पत्नी त्याला सोडून द्यायला निघाली आहे' हे ऐकून माझे मन सुन्न झाले! प्रथम मी त्याला सांगितलेकी देवरामला दवाखान्यात दाखल करू आणि तसे केले.
या विषयावर काहीतरी करायला हवे म्हणून मी भोरकस च्या ठाकूर आदिवासी महिलांची बैठक त्या दिवशी घेतली.त्यांच्या पुढे मी देवरामचा विषय ठेवला. एखाद्या महिलेवर हा प्रसंग आला व तिच्या पतीने तीला सोडले तर आपल्याला चालेल का? महिलां वर अन्याय होतो म्हणून आपण ओरड करतो,त्याच महिलेने पुरुषावर ही अन्याय करणे योग्य आहे का? देवरामच्या पत्नीची मी कान-उघाडणी केली. एक स्त्री घर बसवते व तीच उद्वस्तही करू शकते. देवराम १० वी शिकलेला,निर्व्यसनी,कष्टाळू,समाजाच्या उन्नती साठी झटणारा व कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित पणे पार पडणारा आहे.गुणवान पती असताना ,त्याच्यावर संकट आले,म्हणून आपण त्याला मानसिक पाठबळ देऊन कुटुंबाची जबाबदारी त्याच्या पत्नीने त्या काळात घ्यायला हवी. आपल्याला अहिल्याबाई,किंव्हा झाशीची राणी इतके कर्तृत्व नाही झेपणार,परंतु स्वतःचा संसार धीराने करता येईल इतके सामर्थ्य स्त्री मध्ये हवेच! त्याच्या पत्नीला तिची चूक कळून आली. इतर महिलानाही हे पटले.
वाडीतील लोकांना मी सांगितले की आपण सर्व जण मिळून देवारामला बरे करण्या साठीचे प्रयत्न करू. तो बरा होई पर्यंत त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊ. सर्वांनी मदतीचा हात पुढे केला. मी डॉक्टरांना जाऊन भेटून देवरामची शस्त्र-क्रिया करवून घेतली. मी कुबड्यांसाठी गावभर फिरले,शेवटी फडके वकिलां कडून मिळाल्या .त्याचे बील मी भरले,देवराम ला संकोच वाटत होता. तो म्हणाला मी आपले पैसे नक्की परत करणार. पण अर्थार्जन कसे करावे हा मुद्दा होता,कारण आता पायामुळे तो लाकडे तोडू शकणार नव्हता. मी त्याच्या गावात काय नाही याचा अभ्यास केला. लहान-सहान किराण्याच्या गोष्टीन साठी वाडीवरून मैलोन-मैल चालत जाऊन आणावे लागायचे. आमच्या दवाखान्यातील औषधांच्या प्लास्टिक बरण्या ,वर्तमान पत्राची रद्दी ,आणि १००० रुपये भांडवल देऊन त्याला छोटेसे त्याच्या घरातच दुकान काढून दिले. त्याला रोजचे ६० -८० रुपये नफा मिळू लागला. देवारामाचे घर असे पुन्हा स्थिरावले. त्याची प्रकृती बरी झाली त्याने त्या दुकानाचे स्वरूप मोठे केले,त्याला पत-संस्थे कडून १५००० रुपयाचे कर्ज मिळवून दिले. देवरामने माझ्या पासून सर्वांचे पैसे नफ्यातून परतफेड केली.आता बँकेचे कर्ज फिटून तो आनंदाने पत्नी-मुलासह जिवन जगत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करीत आहे.
समाजाचा सर्वांगीण विकास आपणच करायला हवा,स्वाभिमानाने जगायला हवे. सरकारी किंव्हा परदेशातील पैशांच्या मदतीने तुमचा विकास होणार नाही,त्यामुळे तुम्हाला फुकटचे मिळण्याची सवय लागली आहे,हे मी गावाला पटवले. शिक्षण,आरोग्य,व्यसन-मुक्ती अंध-श्रद्धा निर्मुलन,या सारया विषयांचा पाठ पुरावा केला. .स्थानिक वाडीवर प्रत्येकाचे मंडळ असले म्हणजे सर्व घरगुती आणि सामाजिक प्रश्न तेथेच सोडवले जावेत,पोलीस आणि वकील यांच्याकडे जायला लागू नये असा प्रयत्न केला. नृत्य स्पर्धा,खेळ,विविध सण, आरोग्य शिबिरे , सामाजिक प्रबोधनाने नक्कीच सर्वांगीण विकासाला मदत झाली.
माझी लहान दुचाकी होती. मी घरो-घरी जाऊन जुने आणि चांगल्या स्थितीतील कपडे,वस्तू गोळा करून वाडीवर द्यायचे. मला सारे आधुनिक बोहारीण म्हणायचे ! हा खारीचा वाटा उचलून स्वतः पलीकडे जावून थोडे समाजाचे हित साधण्यात मला खरे जगणे वाटे.
गाडगेबाबा महाराजाचे वाक्य नेहमी आठवते,'देवांना हे एव्हढे मोठे पुस्तक लिहिले आहे ते वाचा आधी'! या देवाच्या पुस्तकातील काहीं पाने वाचता आली यात जिवनाचे सार्थक झाले असे वाटले!
No comments:
Post a Comment