Friday, October 29, 2010

देवाच्या पुस्तकातील एक पान.........! कमल कळी ...... देवा! तूला का बरे भावली....?

                                 " वहीनी! कमल गेली की हो आपली"  दोन बखत आली व्हती तुमची गाठ घ्याया, तीला तुमचे संग बात करायची व्हती....तुमची गाठ नाय पडली, अन त्या मुदड्यान डाव साधला वो तिचा!   सोन्या सारखी  बाईल,पोटुशी व्हती अन मारली वो या सैतानानं,अन
 यो बाहेर शेन खात व्हता मुडदा, त्या रांडच्या पायी जीव घेतला ओ पोरीचा!  आनंदी बाई रडता रडता सांगू लागली. मी पुण्याहून गावी आले आणि लगो-लग आनंदी बाई धावत आली. 
                                  मी उपचारासाठी पुण्याला २ महिने गेले होते. येथील सर्व कामांची घडी मी नीट लावून गेले होते. माझा दुध डेरी चा व्यवसाय ३ मुलांना सोपवला होता. कमल चे नवऱ्याला दुध गाडीवर वाहन चालक म्हणून काम दिले होते. सारे काहीं सुरळीत  चालले होते. असे अचानक काय झाले? माझी तर मतीच खुंटली!  या बातमीने मला अजून मानसिक धक्का बसला असता,म्हणून  मला घरच्यांनी कळवले नव्हते.
                                   कमल ला ७ वा महिना चालू झाला होता. मी तिचे ओटीभरण ठरवले होते. मला तीची सारी हौस-मौस करायची होती. कमल ला संसाराची खूप हौस होती.  तिचे लग्न  माझ्या घरीच हॉल मध्ये लावून दिले होते. तीला सारा काहीं संसार  माझ्या मैत्रिणींसह सार्यांनी दिला होता. वाडीवर भाड्याने झोपडे घेऊन दिले  होते.ती माझ्याकडून  जेवण बनवायला खूप छान शिकली होती. पुरण -पोळी पासून सारे काहीं उत्तम बनवू लागली होती. छान तिचे सारे मी डोहाळे पुरवत होते.  खूप खुश होती कमल आपल्याला बाळ होणार म्हणून. माझ्या बाळाचे कपडे तिने केव्हाच नेले होते,तिच्या बाळासाठी. मी तिला म्हणाले होते अग मी अजून छान छान बाळासाठी कपडे शिवेन.  तेव्हा खूप आनंदाने हसली होती.                                  
                                    माझी व कमल ची गाठ कशी पडली,हे सारे मला रडताना आठवू लागले. माझ्यावर एकूणच घर,मुले,व्यवसाय सामाजिक काम असा ताण पडू लागला,म्हणून मदतीला मुलगी पहावी असे मैत्रीण हेमाला बोलले. मला ती म्हणाली "अग कमल आहे ना! माझे बाळासाठी मी तीला काहीं महिने ठेवले होते. आम्ही साठे न! ,माझ्या सासु बाईना  कातकरीनीचे घरात येणे चालत नाही. म्हणून तीला कामावरून काढून टाकावे लागले ग!  खूप चांगली आहे ती, स्वच्छ राहते, हुशार आणि विश्वासू आहे. मी निरोप देते तीला ". 
                                   हेमाने निरोप दिल्यावर  कमल घरी आली. १६ वर्षांची, सडपातळ,रंगाने काळी, अगदी स्वच्छ त्यांच्या पद्धतीचे लुगडे चापून-चोपून नेसलेली, कपाळी मोठ्ठं कुंकू लावलेले,डोक्यावर फुल असे लावले होते की जणू कुंडीत खचले आहे. ती अगदी शुद्ध मराठीत  हुशारीने बोलली" हेमावहीनी नी चिठ्ठी दिली आहे." माझ्या लक्षात मुद्दा आला. मी तिचा पगार ठरवून उद्या-पासून कामाला ये सांगितले. ती येवू लागली. 
                                   मला ठाकरणी आणि कातकरणी येथे आल्यावरच पाहायला मिळाल्या होत्या. माझ्या लग्नाचे आधी मी बॉबी चित्रपट पाहीला होता. मी नंतर माझ्या दादाला म्हणाले होते ",अरे माझ्या गावात कित्ती बॉबी आहेत." तेव्हा तो खो-खो हसला आणि  म्हणाला होता "त्या ठाकरणी आहेत "  मला तेव्हाच्या माझ्या बालिश पणाचे अजून हसू येते.
                                   मी पुण्यात असताना  कमलचे जिवनात बरेच मोठे वादळ आले. सगळी तिच्या जिवनाची वाताहात झाली. तिच्या नवऱ्याचे दुसऱ्या बाईशी संबंध सुरु होते. त्यावरून कमल त्याच्याशी भांडायची. तो ऐकत नाही पाहून ती त्याला सोडून देणार होती, तीला हे सांगण्या साठीच मला भेटायचे होते. तीला विश्वास होता,की वहीनी यातून  काहीतरी मार्ग काढतील. पण तिच्या माहेरच्यांनी मध्यस्थी केली आणि तिचा नवरा  तीला कर्जत ला वाडीवर घेऊन गेला. काहीं दिवसातच त्याने कमल चा काटा काढला. या दुष्ट नराधमाला आपले मुल,जिच्या पोटात आहे, तीला  दुसऱ्या स्त्रीच्या लोभापायी ठार मारताना  काहीही वाटले नाही.
                                   बाई-आणि बाटली दोन्ही व्यसने जिवनाचे ३-१३ करतात. कमलला दारू पिणारा नवरा नको, म्हणून तिने त्यांच्या समाजात, उशिरा म्हणजे १८ व्या वर्षी लग्न केले. दारू पीत नव्हता, पण बाईच्या नादामुळे आज त्याने आपल्या ७ महिन्याच्या गरोदर पत्नीला कोयत्याने मारले होते आणि पळून गेला होता. वाडीतील लोकांनी तीला सरकारी.दवाखान्यात नेले,परंतु,ती आणि बाळ दोघेही गेले
                                   हे सारे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. अशी जनावर स्थितीतील माणसे या जगत आहेत हे कळले . मला रडू आवरत नव्हते. किती-तरी दिवस स्वप्नात कमल येऊन मला हाक मारत होती" वहिनी! वहीनी! " तिचे  संसाराचे आणि मुलाचे स्वप्न अधुरेच राहिले होते.
                             तिच्या घरचे तिच्या अंत्यविधींसाठी  घरून पैसे घेऊन गेले होते. मी त्यांना बोलावून घेतले आणि  म्हणाले "आपण त्या नराधमाचा पोलिसांना शोध घ्यायला लावू ,त्याला शिक्षा झालीच पाहिजे" ते म्हणाले "आता काय करायचे ,कमल तर गेली. आम्ही रोज कामावर जाऊ तेव्हा आमची चूल पेटते,या लफड्यात कोण पडणार". सारे काहीं अचंभित करणारे होते. याला सगळी परिस्थितीच जबाबदार होती.
                            मी खूप विचार केला.काहीतरी करायलाच हवे. अशा किती कमलचा बळी जात असेल आणि त्याचा पत्ताही लागत नसेल! काय आपल्या देशातील बांधवांची ही स्थिती, मन विषणं करून सोडणारी.  माणसातील हा जनावरपणा  कधी जाणार ? कसा जाणार ?  या प्रश्नाचे उत्तर कमलच्या जाण्याने मी शोधले आणि आदिवासीनमध्ये  सर्वांगीणविकासाचे काम करायचे ठरवून ते सुरु केले. मी व्यवसाय करणे सुरु केले, की ज्यामुळे काहीं जणांना रोजगार देऊ शकले ,संसाराला हातभार,आणि सामाजिक कामासाठी पैसा मला स्वतःचा उपलब्ध  झाला. रजिस्टर मंडळ करून,कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवला . तालुक्याचा अभ्यास करून १५० वाड्यानवर  जाऊन आले. वाड्यातील लोकही मला कार्यकर्ते म्हणून मिळाले. आणि काम सुरु झाले. काहीं वर्ष या कामातून जे काहीं समाजिक प्रबोधन करता आले, काहीं समस्या सोडवता आल्या ,मदतीचा हात देता आला ,काहीं कमलला वाचवू शकलो आणि काहीं देवरामचे प्रश्न सोडवता आले याचे मनाला थोडेसे समाधान लाभले.
                             माझ्या मुलीला कमल ने तिच्या पद्धतीची साडी नेसवली होती,तो फोटो पाहताना ,मला कमल प्रकर्षाने आठवते. मी देवालाच हा नेहमी प्रश्न विचारते की  "२० वर्षांची कमल, कळी स्वरुपात होती, ती  देवा तूला  का बरे आवडली "? 


No comments:

Post a Comment