Sunday, July 17, 2011
पक्षां प्रमाणे जिवन जगणे ही जिवननीती,तारुण्यास जोपासा न वृद्धत्व लागेल पाठी!
बालपण कोमेजून, तारुण्याच्या उंबरठ्यावर ज्ञान-ध्येय्याचे शिवधनुष्य खांद्यावर घेत ही तरुण पिढी आज विविध क्षेत्रात आपले नाव उज्वल करीत विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आहेत. लहानपणापासून या मुलांवर अपेक्षांचे ओझे इतके,की त्यांचे बालपण हरवून सारखे स्पर्धेत ढकलले गेले.. यात दोष या पिढीचा कसा? जीवघेणी स्पर्धेने या तरुण पिढीचे निरागस आयुष्यच हिरावून घेतले. गावातून शहरात,शहरातून प्रांतात ,परदेशात कोठेही या मुलांना शिक्षण व नोकरी साठी जावे लागले आहे. हे करताना त्यांना शाळा,होस्टेल ,कॉलेज ,नोकरी,व्यवसाय सर्व ठिकाणी येथील भ्रष्ट राजवटीला तोंड द्यावे लागले आहे. हे सर्व करता करता त्यांचे तारुण्य कधी येते आणि जाते हे विचार करायलाही त्यांना फार फुरसत नाही. मूल जन्माला घालणे हे सुद्धा त्यांना खूप विचार पूर्वक करावे लागत आहे. स्वतःचे घर, गाडी,त्या मूळे कर्ज डोक्यावर घेवून ते प्रगती करीत आहेत. आता हे किती बरोबर व किती चूक हा प्रश्न उरलेलाच नाही.
आपल्याला देशातील सुधारणा या मुलांच्या कार्यक्षमतेमुळे अधिक झाल्या हे मान्यच करावे लागेल. इतकी भ्रष्ट राजवट असूनही आज देश नक्कीच प्रगती पथावर आहे. आपल्याला या मुलांचे पगाराचे आकडे मोठे दिसतात,परंतु त्या मागे त्यांचे अहोरात कष्ट आहेत. पाच दिवस भरपूर काम करून दोन दिवस ते आपल्या चौकटीच्या कुटुंबांसाठी देत असतात. मुलांना सतत दोष देण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा असें मला आता वाटते.
देशाचा विकास हा सहज सरळ कसा होणार? त्या साठी पुरुष-महिला दोघेही अर्थार्जन करू लागले म्हणूनच वेगाने देश विकसित होत गेला ना! महिलांचे चूल-मूल पर्यंतचे क्षेत्र आज हर क्षेत्रात पदे मिळवण्या पर्यंत वाढले. स्त्री-पुरुष मैत्री व समानता आणण्यात ही तरुण पिढीच खूप प्रमाणात यशस्वी झाली आहे. आज मुलेही संसारात आपल्या सहचारीणीला तितकाच हातभार लावतात,हे चित्र नक्कीच कौतुकास्पद आहे. आपले घर सोडून नवे घर पाहणे,तेथे स्थीर होणे हे सोपे नसते,या बाबतीत या मुलांना शाबासकीच द्यायला हवी!
आपले पालक आपल्या घरातील स्त्रियांशी कसे वागत होते हे पाहून ही मूले त्यातून चांगला धडा घेवून आपल्या कुटुंबियांशी मैत्रीचे नाते ठेवून ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरुणानकडे वेळ नाही कोणासाठी ही बाब आपण त्यांची कार्यक्षेत्र पाहून त्यांची अडचण लक्षात घ्यायला हवी. तरुणांना म्हातारपणाची काठी समजणे सोडून द्यायला परिस्थितीने भाग पाडले आहे,आता त्यावर चर्चा न करता तोडगा काढणे हेच आपल्या हाती आहे.
प्रगतीच्या वाटचालीत कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था डळमळीत झाली. लहान मुलांच्या व वृद्धांच्या समस्या भेडसावीत आहेत. त्यासाठी पाळणाघरे व वृद्धाश्रम ही समाजाची निकड होवून बसली आहे. तरुणांना या बाबत पूर्ण जबाबदार धरता येणार नाही,कारण आपणच त्यांना मोठे होण्याची स्वप्ने दाखवली आहेत. आता पक्षी पंखात बाल आणून उडायला लागले आहेत. त्यासाठी जिवननीती बदलणे हाच मार्ग आहे.
आता माणूस म्हणून जन्माला आलो,तरी पक्षान प्रमाणे जिवन जगायला शिकणे हे प्रत्येकाने स्वतःला समजवायला हवे. आपण अधिक निरोगी कसे राहू त्यासाठी बाल,तरुण,वृद्ध सर्वानीच काळजी घ्यायला हवी. जेव्हा मुलेही देश-परदेशात आजारी पडतात,अजून काही संकटे येतात,त्यांना त्यांच्याच बळावर त्या समस्या सोडवाव्या लागतात. तरुण पिढी आपला मित्र परिवार वाढवून एक-मेकांच्या सुखा-दुखाला उपयोगी पडते हे प्रशंसनीय आहे.
पालकांनीही आपले नातेवाईक व मित्र परिवार यांच्याशी चांगले संबध ठेवून एक-मेकास मदत केली, सेवा भाव ठेवला तर त्यासाठी वृद्धाश्रमात जाण्याची गरज भासणार नाही. "एक-मेका साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ",या प्रमाणे जी चार भीतीत जगण्याचा व आपल्या पुरते पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. एकत्र कुटुंबात कामाची विभागणी व्हायची,आता विभक्त कुटुंबात मात्र प्रत्येकालाच कोणत्याही वयात सक्षम असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपले ज्ञानाच्या कक्षा काळा सोबत वाढविणे गरजेचे आहे. तसे केले तरच ते सर्वांच्या हिताचे आहे. वर्तमान परिस्थितीत आपली जिवननीती आपण बदलायला हवी. गृहस्थाश्रामातून वानप्रस्थ आनंदाने स्वीकारायला हवा व आपल्या जिवनाची वाटचाल सुखाची कशी होईल यासाठी प्रयत्नशिल राहायला हवे.चिंता करून प्रकृती बिघडवणे व त्या मूळे लवकर आजारांना निमंत्रण देणे हे आपणच आत्मचिंतनाने थांबवायला हवे .
पक्षां प्रमाणे जिवन जगणे ही जिवननीती,तारुण्यास जोपासा न वृद्धत्व लागेल पाठी!
मंगला
स्पर्धा न करता ज्ञान प्राप्तीचा घ्या वसा, त्यातूनच ईश्वर आहे हा ठेवा भरवसा!
विवेकानंदांचे वाक्य नेहमी आठवते मला की मानवाला ईश्वराने प्रदान केलेल्या बुद्धीच्या एक हजार पट भागातील केवळ एक भाग तो वापरतो! खरेच आहे हे. आपण जस-जस स्वतःचा शोध घेतो तेव्हा आपल्यातील खजिना आपल्याला गवसतो!
एकच व्यक्तीत अनेक गुणांचे भांडार असते. विविध गोष्टींचे ज्ञान हे त्या व्यक्तीस प्रगल्भ करीत असते. कला,वाणिज्य,शास्त्र व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख प्रत्येकासच हवी ,त्या शिवाय ज्ञानास परिपूर्णता येत नाही!
मला शाळेपासूनचे सारे विषय आठवले. तेव्हा शिवण,संगित,कार्यानुभव ,चित्रकला,हस्तकला हे विषय अभ्यासाच्या विषयां सोबत असायचे. त्याचा खरच नंतर खूप उपयोग होतो,हे मला आज कळते. शालेय जिवनात अभ्यासा सोबत खेळ असायचाच. घरातील कामेही असायची,परंतु तरीही विणकाम,भरतकाम इतर कलाकुसर खूप करायचो आम्ही मैत्रिणी. वायरच्या बास्केट, त्यांचे वेग-वेगळे आकार,सुतळीच्या आणि वायरच्या मणी ओवून पिशव्या,पर्स कितीतरी गोष्टी करायचो. बारीक मण्यांचे गळ्यातील लफ्फे, पिठाच्या चाळणीवर रेशमाने ताजमहाल,गुलाबाची फुले व त्याची केलेली फ्रेम अजून सुंदर आठवणीत नेते. क्रॉस स्टीचच्या कापडावर गणपती ,इतर काही नक्षीकाम करून पडदे,बेडशिट,उशांची कव्हर किंव्हा साध्या कापडावर नक्षी काढून ती रेशमाने काश्मिरी,टाके,गव्हाचा टाका,अळीचा टाका,साखळी याने भरतकाम करीत असू. लोकरीचे स्वेटर,टोपी,मोजे, आजीला चंची कितीयेक गोष्टी केल्या होत्या. लहान बाळांसाठी झबली,टोपडी,कुंची सारे काही घरातच स्वतः शिवण्याची सवय होती. ससुल्याची टोपी कर,सुंदर वेग-वेगळ्या आकारांची झबली कर , वेग-वेगळ्या आकाराचे कापडाचे तुकडे जोडून सुंदर दुपटी सारे काही करण्यात किती आनंद असायचा. बाळंत विडे आपणच करून दिले की त्यात किती आपलेपणा वाटायचा. लग्नात रुखवतासाठी काही बनवून देण्यांत मजा असायची. गोदडी ही आम्ही घरीच शिवायचो. तेव्हा प्रत्येकाला त्या मऊ गोदडीची उबच आवडायची.
ओर्गांडी आणि वेल्वेट ची फुले करायला ही मी शिकले होते. तीही बनवून मी कित्येकांना भेट म्हणून देत असें. संसारातील रगाड्यातून विश्रांती म्हणजे हा कामातील बदल असें. पटकन मशीन वर बसून घरातील काही शिवणकाम ,कुर्डया-पापड्या,पापड,लोणची धन्य वाळवणे, सरबत,सॉस ,तिखट,मसाला करणे हे सारे कामातील बदलच असत. हॉटेल प्रकार माहित नव्हता,त्या मुळे सर्वच पदार्थ घरी केले जात,त्या मुळे पाकशास्त्र चांगले समजत गेले.
हस्तकला,चित्रकला,पेंटिंग ही भेटकार्ड व इतर भेट वस्तू सण-समारंभ ,वाढादिवसाला देत असू. त्यामुळे घरीच मुलांना भेटकार्ड इतर वस्तू बनवायला तेव्हा शिकवायाचे. फार काही सुंदर येत नसे,पण काळ्या पेन ने सुरुची झाडे,घर इतर काही,किंव्हा रंगानी स्प्रेय करून,त्यावर कसले ठसे उमटवून, फुले,पाने रंगवून छान दिसायची ती! मुलांनीच केलेले असले,की त्यांना आनंद वाटायचा. शाळेत स्नेह संमेलनात भाग घेतला की घरूनच कधी मुकुट,तर कधी हनुमानाचा वेश,शेपटी पासून करून द्यावे लागायचे. सवई गंधर्व,भीमसेन,वसंतराव देशापणे , कुमार गंधर्व.इत्यादींची गाणी ऐकणे,एक वर्ष पेटीच्या क्लासला जाणे याने निदान कानाला स्वर तरी कळू लागले व त्याची आवड कायम राहिली. विविध भाषातील चित्रपट,नाटके खूप पहिल्याने त्यानेही ज्ञान वाढले.
व्यवसाय करताना वाणिज्य थोडे कळले व कारखाना चालविताना मशीन दुरुस्ती पासून ते तो जॉब पूर्ण करे पर्यंतची सारी प्रक्रिया समजली. दुग्ध व्यवसायात त्या व्यवसायाचे ज्ञान मिळाले. पापड व्यवसायात मिठवणी करण्यापासून ते पोह्याच्या पापडाचे पीठ भिजवून त्याची मिरगुंडे व पापड याचेही ज्ञान मिळाले. कापड उद्यागातून दुकानदारी कळली. कोंबड्या पाळण्यातून कुकुट पालनाचा व्यवसाय कलाल. शेतात भाजी लावणे,नारळाची झाडे लावणे ,धान्य लावून घेणे यातून शेती व्यवसाय कळला. घरात किरकोळ विजेचे काम असो,रंगाचे असो नाहीतर गवंड्याचे हे घरीच मी करीत असें. मोठ्या कामांसाठीच माणूस बोलावलं जात असें. पाट्यावर वाटण ही सुद्धा कलाच आहे, मोठ्या घराचे केर काढणे वेळेत चांगली कामे करणे या सुद्धा कलाच आहेत. या सर्वातून वेळेचे व कामाचे नियोजन व व्यवस्थापन कळते. घर,व्यवसाय व सामाजिक कामा मुळे माझी तिहेरी काम करण्याची क्षमता झाली होती.
आता शहरात आल्यावर बँकिंग, कॉम्पुटर सारे यायलाच हवे. पुन्हा थोडे काही विषयां मधील शिक्षण घेतले. घर आणि बाहेरची कामे त्यामुळे कामाचा वेग वाढतो. त्यामुळे ज्ञान वाढले. मुळे परदेशात असली तरी आपण आपले जिवन जगू शकतो.घर खरेदी ,कचेरीत जाणे, बिले भरणे,बँकेत जाणे हेही सर्व व्यवहारज्ञानात भरच पाडत असतात. इंटरनेट चे ज्ञान घर बसल्या जग जवळ आणते.
शाळेत काय ते निबंधा ,व स्पष्टीकरण लिहिली असतील, त्या पलीकडे कधी काही लिहिले नव्हते. येथे फेसबुक,ग्लोबल मराठी सर्व मुळे मला लेखनाची,वाचनाची ,विचारांच्या देवाण-घेवानाची आवड उत्पन्न झाली. त्या जोडीनेच फुलांच्या रचना,वेग-वेगळ्या कलाकृती,थोडीफार पेंटिंग जे सुचेल ते करणे सुरू झाले. हातात कॅमेरा आला आणि निसर्ग,फुलांच्या रचनांचे फोटो पोस्ट करू लागले. त्यामुळे सौदर्य दृष्टी वाढली. बागकामाची आवड आहेच त्यामुळे वनस्पती शास्त्रातील ज्ञान वाढले. बीएससी प्राणीशास्त्रात झाल्याने त्यातील ज्ञान व औषध या विषयातील ज्ञानही मी सरावाने शिकले. त्यामुळे सहसा डॉक्टरकडे जावे लागतच नाही. समाजकार्य करताना अनेक समस्या सोडवताना थोडे कायद्याचे ज्ञान, समाजशास्त्राचे पुस्तकातील नाही,तर त्यांच्यात काम केल्याने कसा सर्वांगीण विकास आवश्यक आहे हे कळते. माणसातील देव दिसण्याचे ज्ञान प्राप्त होते.
पर्यटनाचे आवडीने देश विदेशातील भूगोल व इतिहासाचे ज्ञान वाढवले माणूस,त्याची रहन-सहन,भाषा, तेथील विविधता, विशेषता या पाहून जगाचे ज्ञान थोडे तरी मिळते.
योगासन वर्ग केला,त्याने योग विद्या थोडीशी समजली . खेळाडू असल्याने क्रीडा शास्त्रातील थोडी माहिती झाली. व्यायामाची आवड असल्याने त्यातीलही प्रकार माहिती झाले. वाहन चालवीत असल्याने त्यातीलही थोडे ज्ञान. या सर्व ज्ञानाने आपले व्यक्तिमत्व घडत जाते. आत्म-विश्वास वाढतो.
निसर्गाशी बोलण्याची सवय झाली,म्हणून निसर्गातील विश्वशक्तीचे थोडेसे ज्ञान! असें सर्व ज्ञानाचे पोतडे असते आपल्यातच,त्यामुळे आपण स्वतःला कधी कमी लेखू नये. आपल्या अंतरंगात समाधान वसले की ईश्वर गवसला समजावा!
कोणाशीही स्पर्धा न करता ज्ञान प्राप्तीचा घ्या वसा,त्यातूनच ईश्वर आहे हा ठेवा भरवसा!
(आपण ही सर्वांनी आपले जिवनातील अनुभव सांगावेत,त्यामुळे माझ्या ज्ञानात अधिक भर पडेल)
मंगला
खेळाची असेल ना आवड, तर वय वाढायलाच नसते सवड!
" ग्रांड मा तुसी ग्रेट हो!! सलाम कुबूल किजीये " असें म्हणून सलाम करणारी निरागस मुलं आज मला आठवली आणि मनापासून हसू आलं! दोन वर्ष मला चालता येत नव्हते हे मी विसरूनही गेले आहे आता! माझे छंद,निसर्ग व लहान मुलांची आवड याने माझी प्रकृती कधी सुधारली हे कळलेच नाही मला. मला दुबईत असताना लहान मुलांच्यात खेळण्याचा खूप छान आनंद मिळाला. खेळण्याने माणसाचे मन कसे प्रसन्न होते. आमच्या इमारतीत आसामी ,हिमाचल,दक्षिणात्य अशी कुटुंबे होती. मी फोटोग्राफी करायला रोज संध्याकाळी जायचे गच्चीत जायचे तेथे या लहानग्यांशी मैत्री झाली. एक दिवस त्यांच्या सोबत तलावात पोहोण्याचा मस्त अनुभव घेतला. नंतर कधी टेबल टेनिस खेळले. त्यांना मी आपले खेळ आणि व्यायाम प्रकार शिकवले. सूर्यनमस्कार अगदी आवडीने शिकली मुलं. रस्सीखेच आणि पंजा लढवण्यात त्यांना हरवलं आणि ते म्हणाले "ग्रांड मा तुसी ग्रेट हो,सलाम कुबूल किजीये!". मग मला हे थ्री इडीअट चित्रपटातील संवाद म्हणत आहेत कळले. खूप खूप हसले.
बर दुबईत भाची कडे गेले होते,तेथे त्या मुलां सोबत बास्केट बॉल खेळले. कोण आनंद झाला मला! बारावीत असताना अंतर महाविद्यालयीन स्पर्धा ही मी बास्केट बॉल ची खेळले होते. ७७ साला नंतर आता खेळता आले होते! (११ वि पासून साडी नेसून कॉलेजला जायचे,घरच्यांना न सांगता खेळले. घरी खेळाला विरोध होता. नंतर घरी ते कळले आणि खेळ बंद झाला) माझे लग्न झाल्यानंतर मी सायकल वर सगळीकडे जायचे .मुलानाही पुढे खुर्ची लावून त्यात पाच-पाच किलो मिटर फिरवून आणण्याचे. एकदा स्पर्धा होती,म्हणून पाहण्यास बोलावले होते. तेथील संयोजक म्हणाले "तुम्हाला उतरायचे का स्पर्धेत",मी लगेच हो म्हणाले. मी एकटी साडीत होते .माझी जुनी आटलास सायकल होतीच सोबत ,उतरले तशीच स्पर्धेत आणि आला की नंबर पाहिला!
माहेरी सुट्टीत आले की माझी मुलं आणि भाचवंड ना घेवून असेच सारे खेळ खेळायचो.नाहीतर सारी भाचवन्डे गावी यायची. त्यांना बैल गाडी,टांग्यातून सैर करून आणायचे. शेतावर,नदीवर घेवून जायचे,धम्माल यायची.
.
सामाजिक कामात सर्व ठिकाणी खेळांच्या स्पर्धा आवर्जून भरावयाचे. त्यात लहान-थोर,स्त्री-पुरुष सर्वजण सहभागी असायचे. संगित खुर्ची,चमचा लिंबू,धावणे,गोळा फेक इत्यादी स्पर्धा व्हायच्या. मी स्वतः खेळायचे,त्या मुळे इतरही महिला भाग घेत असत! सासरी गौरी-गणपतीत सर्व मंगळा गौरीचे खेळ खेळत असू. स्थानिक नृत्य व गाणी याने रात्री जागवणे होत असें. उत्सवात गावातील सर्वजण सहभागी असत. आज या सारया आठवणीनी इतकं सुखद वाटत आहे.
हे सारे खेळाचे अंग लहानपणा पासून असल्याने टिकले. वाड्यात आम्ही खूप जण आणि आम्ही भावंडे पकडा-पकडी, विष-अमृत ,डबडा ऐस-पैस,लगोर,विटी-दांडू,गोट्या,पतंग,पत्ते,सागर-गोटे,काचा-पाणी,व्यापार,बुद्धिबळ, क्रिकेट,बॅडमिंटन,सारे खेळ खेळायचो. शाळेत पाचवी पासूनच मी अंतरशालेय डॉजबोल टीम, धावणे,गोळा फेक, यात होते. रोज खेळाचा सकाळी सव्वा सहा वाजता जावून सराव,सात वाजता शाळा असायची! ते दिवस आठवले की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. माझी प्रशस्ती पत्रक सारी जपून ठेवली आहेत, ती पाहून कधी त्या आठवणीत रमायला खूप आवडते.
नातवा बरोबर विविध खेळ चालू असतात. ही साखरेची पोती पाठकुळी घ्यायला खूप मज्जा वाटते. घोडा-घोडा करून लाकडी की काठी गाणं,काय मुलं खूष होतात! त्याला टिपरी पाणी,लगोरी खेळायला शिकवले. "पतंग आण ना आजी "म्हणाला, आता मी तोही आणणार आहे. बागेत नातवाला हाताच्या बोटांमध्ये झाडाचे पान ठेवून,दुसऱ्या हाताने मारुन फटकन आवाज काढून दाखवला की किती गम्मत वाटते. फुलाची भिंगरी करून मस्त सोडतात. पाऊस आला की आम्ही सारे मस्त भिजतो,कागदाची होडी करून सोडतो पाण्यात. किती-किती खूष होतात ना मूले. फिरायला गेलो सागर किनारी की मस्त लाटा अंगावर घेत नातवाना खेळवते. मागील शनिवारी मुळशीला गेलो होतो. नातवंडा सोबत पकडापकडी खेळलेच पण नात म्हणाली " छोट्या गवताच्या टेकडा वरून घरंगळून खाली यायचे. आज्जी तू कर ना,".मी कधी आज पर्यंत केले नव्हते,पण त्यांच्या सोबत तोही अनुभव घेतला. खूप मज्जा आली.
घरी संध्याकाळी आकाशातील सर्व पक्षांची ओळख नातवन्डाना करून देते. बगळ्यांची माळ,पोपटांचे थवे,घारी,साळुंक्या,बुल-बुल,वट वाघुल,कावळे,कबुतर सारे दिसतात. झाडांची फुलांचे रंग,नावे विचारत असतो नातू. ते शिकल्यावर रंग ओळखण्याचा खेळ घेते. आंधळी कोशिंबीर,मामाचे पत्र हरवले,मिरची पाणी, मजेत खेळतात. पत्ते खेळताना आकडे,रंग बरच काही समजते.
सारखी इलेक्ट्रोनिकची खेळणी, कॉम्पुटर ,आयपॉड यातून जरा चिमुकल्यांची सुटका होते. माझेही सदा जपलेले हे बालपण तसेच शाबूत राहते, म्हणून तर मी म्हणते खेळाची असली ना आवड तर वय वाढायलाच नसते सवड!
मंगला
संस्कार देणाऱ्यांच्या हातीच आले मद्याचे प्याले, कुटुंब-समाजाची संस्कृती रसातळाला घेवून गेले!
कोंदण चुकले ,हिरा गळला! कोळशा परी जिवनी जळला! संस्कारांचा होता जो कुंभ, नशिबाने फोडुनी केला भंग!
विदुषकाचा मुखवटा असा गळला ,व्यसनात डूबोविनी जिवनी अवकळा, संस्काराचे बीज पदरी अंकुरले ,गोपाला होऊनी त्यानेच सावरले! मातेचे जरी पावूल चुकले,मातेची माता होऊनी ऋण फेडले!
मी मॉरीशसला फिरायला गेले होते. त्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. तेथील स्थानिक कलाकारांचे नृत्य व त्यात काही हौशी नृत्यात सामील झालेले होते काहीजण पेयपान,जेवण याचा आनंद घेत होते. माझी नजर एका टेबला कडे गेली तेथे माझी खूप जुनी सखी बसली होती,हाती मद्याचा प्याला! पाहून मी अवाक झाले. मी तिला एक संस्कारित मुलगी,लहानपणापासून एका सामाजिक संस्थेची स्वयंसेविका म्हणून ओळखत होते.. लग्नानंतरही तिचे सामाजिक कार्याबद्दल,तिला मिळालेल्या पुरस्कारा बद्दल ऐकले होते .व्यसन मुक्तीचे काम तिने वाड्या-पाड्यातून खूप केले होते. तिचा पती तिला एक-एक पेग देवून स्वतःही पिवून जात होता आणि स्वतःत्या नृत्यात इतर महिलां सोबत नाचत होता. तोही एक प्रतिष्ठित व सामाजिक काम करणारा डॉक्टर होता! निरीक्षणांतून मला खूप काही उमजले. त्याचा रंगेल पणा,तिची व्यथित नजर होवून अजून घोट पचवणे खूप काही सांगून गेले.
मी त्या सखी जवळ गेले ,तिचे नाव माधुरी! ,मला पाहून ती इतकी खूष झाली,आणि एखाद्या पक्क्या बेवड्या प्रमाणे बडबडून आनंद व्यक्त करू लागली. हसून झाल्यावर एकदम रडू आले तिला! मला "सॉरी ""सॉरी" म्हणत राहिली. म्हणाली "माझा खामोशी चित्रपट झाला गं! वेड्यांना शहाणे करता करता अशी मीच वेडी झाले.,दुसर्यांचे व्यसन सोडवताना,माझ्या हाती कधी प्याला आला कळलेच नाही "आणि नवऱ्याला खूप घाण शीव्या देवू लागली. "अगं मी पत्नीच्या सन्मानाने नाही गं,रांड होवून राहिले याची! अक्कल नसताना मुलं झाली गं! फसले मी फसले! "तिला रडू आवरत नव्हते. मी कशी साडी नेसायची,पूजा अर्चा,व्रत वैकल्ये, वट सावित्री पूजा,याला नमस्कार करणं,तुळशीला पाणी घालणे,आणि या हल्कटाने बाहेर पाणी घालत फिरायचे! वृक्षारोपण करतो मेला! " मोठ्या संस्थांचा पदाधिकारी म्हणून मिरवतो,पण पक्का शेणातला किडा आहे. सेवेच्या नावा खाली किती गं महिलांना फसवलं याने! पुन्हा वावरतो असा की "तो मी नव्हेच"! याच्या बरोबर राहिले लागले गं! मरायचं प्रयत्न केला मेले नाही गं! माहेरचे म्हणे" चुलीतले लाकूड चुलीत जाळले पाहिजे ,जळते आहे अशी! " मी तिला म्हणले चल मी तुला रूम मध्ये घेवून जाते. तिचे हे रूप मला खूप अस्वस्थ करून गेले. माझेच डोळे ओलावले. काय होती माधुरी आणि काय ही अवस्था!
मी भारतात आल्यावर माधुरीची भेट घेतली आणि तिची सारी कथा ऐकली. समाजातील प्रतिमा व घरातील प्रतिमेत जमिन अस्मानचा फरक होता! तो वयानेही तिच्या पेक्षा दहा वर्ष मोठा होता. स्त्रीला जणू एक जनावर समजून कोणाच्या तरी दावणीला बांधले असा हा प्रकार होता! ज्या सामाजिक संस्थेचे ती काम करायची त्याच संस्थेचे तो कार्यं करायचा. घरच्यांनी व संस्थेने जुळवून केलेला विवाह होता. तिचा पती खूप विक्षिप्त स्वभावाचा होता. लग्नाचे पहिले रात्रीच तू माझी दासी आहेस आणि दासी सारखेच वागवणार तुला म्हणाला होता. माझ्या कुटुंबाची देखभाल आणि मी सांगेन तसेच तुला वागावे लागेल. मी सांगेन त्या मर्यादेत सामाजिक काम करायचे. पक्का संशयी, फक्त महिलां सोबतच काम करायचे . सखी साठी हा खूपच मोठा धक्का होता. काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे त्याचे होते,स्वतः गैर कृत्ये करीत होता ,त्या मुळे बाईको ला मुठीत नव्हे तर पाया खाली चिरडत होता. मारहाणीने त्रस्त झाली होती सखी. घरा पर्यंत येणारी त्याची लफडी तिने व मुलांनी नको ते डोळ्याने पहिले होते. मूले मोठी झाल्यावर तिने माहेरी शिक्षणासाठी पाठवली. घरापासून त्यांना दूर ठेवणे हिताचे होते. माधुरीचे कार्यं पाहून लोक याच्या पेक्षा तिला अधिक सन्मान देतात असें त्याला वाटू लागले.गावात आता माधुरी डॉक्टर ची बाईको म्हणून नाही तर ती सामाजिक कार्यकर्ती म्हणून लोक ओळखू लागले. तिला जी आमंत्रणे यायची त्यावर तिचे नाव व आडनाव काही वेळा असायचे,तर हा म्हणायचं हे निमंत्रण घेवून त्यांना परत दे,आणि माझे नाव मध्ये घालायला लाव,माझ्या मुळे तूला लोक ओळखतात. अशा त्याच्या मी येथे लिहू शकत नाही इतक्या गोष्टी मला माधुरीने सांगितल्या.
आता एकटेपणाने मात्र माधुरीच्या नशिबाचा घात केला,नवऱ्याने तिच्या हाती दारूचा प्याला दिला,आणि तेथेच या संस्काराना तडा जावून मानसिक खचलेल्या अवस्थेत , अधिक खचून सखी व्यसनी झाली! आजारी पडली. सामाजिक काम पूर्णतः बंद झाले. हेच त्याला करायचे होते. तिला घरात असें व्यसनी करून डांबून ठेवले,म्हणजे ही माझ्या पेक्षा अधिक मोठी होणार नाही,हा त्याचा डाव!
माधुरीच्या गावी जावून मी तिच्या सासू सासऱ्यानशी बोलले. त्यांनी पूर्णपणे सुनेची बाजू घेवून आपला मुलगा नालायक आहे. आम्ही त्यापुढे हतबल आहोत. आम्ही मुलां साठी पैशांची व्यवस्था करू,पण आपण माधुरीला येथून घेवून जा! आमच्यासाठी,समाजासाठी खूप केले हो पोरीने,पण आमचा मुलगा नालायक निघाला माहेरी जावून तिच्या आई-वडिलांशी बोलले. गडगंज श्रीमंती व प्रतिष्ठित लोक! त्यांची चांगली कान उघाडणी केली . "आपल्या मुलीला चुलीत जाळण्याचे लाकूड करण्यापेक्षा चुलीत न जाळणारे लाकूड बनवा!" कोणत्या प्रतिष्ठेला घाबरता तुम्ही,त्यासाठी आपल्या पोटच्या मुलांना साहाय्य करायला नको. तुम्ही तिचा विवाह केलात,आपली ही जबाबदारी आहे. आपण मदत केली नाहीत तर मी तिला मदत करेन,पण अशा नराधमा पासून तिची मुक्तता करेन! माझ्या सखीने आज पर्यंत अनेकानंच्या कल्याणासाठी कार्यं केले आहे. आपली मुलगी,स्वतःचे दुखं विसरून,विदुषक बनून जगाच्या सुखासाठी झटली.याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. माहेरच्यांचे डोळे तिच्या मुलांनीही उघडले होतेच ,पण तरी त्यांनी दुर्लक्ष केले होते. कारण त्यांच्या घरात मुला-बाळांची लग्ना व्हायची होती. मुलगी परत आली म्हणजे लोक नावे ठेवतील. मला संताप झाला हे ऐकून ! मी म्हणाले कोणत्या काळात जगता आहात आपण? जो समाज अशा नराधमाना वाळीत न टाकता ,फक्त स्त्रीला दोषी ठरवतो असल्या समाजाचा कसला विचार करता? सखी जे पैसे साठवत होती ते मुलाकडे व्यवहार दिल्याने काही दिवसांचा तरी प्रश्न नव्हता. तेव्हा माहेरच्यानी माधुरी व मुलांना राहण्याची व्यवस्था केली. सासर्यांनी पैशाने मदत केली.
मुलांनी आईचे आई बनून जसे व्यसनी मुलाला आई सुधरवते,तसे तिच्यासाठी वेळ देवून, तिची अवहेलना न करता,ती आपले मूल आहे असें वागवले, प्रेमाने तिला तिच्यातील संस्कारांची जाणीव देवून,तू आम्हाला कसे घडवलेस सांगून ,तिच्या वर औषधोपचार करून तिला व्यसन मुक्त केले. तिच्या सह गप्पा गोष्टी,हास्य-विनोद,तिला चित्रपट चांगले दाखवणे, तिला चांगली पुस्तके,चांगली गाणी,तिला रोज फुले आणून देणे, रोज देव पूजा झाली की तिला नमस्कार करणे या मुळे तिला स्वतःच्या वर्तनाची लाज वाटली व आपण असें वागूनही मूले आपल्याला नमस्कार करतात याने खरे तर तिचे व्यसन सुटले. मुले मोठी होती,कर्तबगार निघाली. माधुरीसाठी तिच्या मुलांनी अथक परिश्रम घेतले. आता मुले कमावती झाली. लग्न झाली. तिला पुन्हा मुलांनी नवा जन्म दिला. तिच्यातील नैराश्या दूर करून तिला आनंदी राहण्यास शिकवले. आज ती मुला-सुनान सोबत खूप सुखी जिवन जगत आहे.
येथे माधुरीवर हा प्रसंग आला,तसेच अनेक पुरुषांच्या जिवनात दूरवर्तनी पत्नी आल्याने असेच प्रसंग आलेले मी पहिले आहेत. काळाचा फेरा काय घडवून आणतो, नशिबाचा फेरा कसं उलट-सुलट फिरत असतो हे पाहायला मिळाले! या कथेतून पालकांनी धडा घायला हवा की मानसिक खच्ची न होता,व्यसनी न होता , आपण धैर्याने जिवन जगायला हवे. समाजाच्या टोचन्यानकडे लक्श ना देता या स्त्री असो वा पुरुष त्यांनी खंबीर पणे तोंड देत आनंदी व यशस्वी जिवन जगावे. आपल्या मुलांच्या जीवनावर आपल्या वर्तनाने जे परिणाम होतात ते मुलांचे जिवन दुखी करून टाकतात. कोणावर कधी आणि कशी वेळ येईल काही सांगू शकत नाही! आपल्या मुलाच्या हिताचा विचार हा व्हायलाच हवा, आणि कोणाचा तोल ढळला तर त्याला कुटुंब व समाजाने प्रेमाने सावरावे! माधुरीच्या मुलांसारखी आई वर जीवा पाड प्रेम करणारी मूले सर्वाना लाभोत ही ईश्वर चरणी प्रार्थना!
मंगला
सुराज्याची घ्या शपथ, संचारू दे शिवबा प्रत्येकात!
लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडत असताना आपण शांत राहावे, इतके आपण मृत झालो आहोत का? आपली मानसिक गुलामी नष्ट करा . देवाजवळ जातो आपण तर नमस्कार करताना त्याच्यातील निर्मळता आपल्यात आहे का पहा. आताची देशाची परिस्थिती पाहता डोक्यात एक विचार येवून गेला. असें वाटले सर्व जनता खरच सुराज्य साठी आसुसलेली आहे,तर काय बरं करायला हवे? प्रत्येकाने लहान मोठी लाच देणे घेणे केले आहे,त्यांनी सर्व हा काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा करावा. तेव्हा त्यांना गंगेत न्हावून पवित्र झाल्या सारखे वाटेल. प्रत्येकाने शपथ घ्यायला हवी , मी आता पर्यंत ज्या चुका केल्या त्या परत करणार नाही,माझ्या देशाचे सुराज्य करण्यासाठी मी लाच देणार नाही व घेणार नाही. एकजूट होवून मग आंदोलन होवू शकते. जे ऐकणार नाहीत,ज्यांना पाप क्षालन करायचे नाही त्यांना एकजुटीने धडा शिकवू शकतो. आता असें होते आहे की जो कोणी भ्रष्टाचार विरुद्ध बोलायला जातो ,त्याच्याबद्दलच शंका घेतली जाते. त्या साठी प्रत्येकाने आपले व्यवहार स्वच्छ करा. कष्टकरी समाजाला त्यांचा हक्क मिळवून द्यायला हवा,आपण चार आकडी पगार मिळवतो,त्यानाही मिळायला हवे. त्या शिवाय देशातील गरिबी नष्ट होणार नाही. सुजलाम सुफलाम देश तेव्हाच पाहायला मिळेल. करा आता पासूनच याची सुरुवात! घ्या सुराज्याची शपथ! आपल्यात प्रत्येकात शिवाजी संचारायला हवा! त्या शिवाय हे सुराज्य होणे नाही! सुराज्याची घ्या शपथ, संचारू दे शिवबा प्रत्येकात!
मंगला
मुला-सुनाशी मैत्री जरी वाढवली, तरीही वृद्धाश्रम,पाळणाघरांची संख्या नाही घटली!
फेसबुकवर किंव्हा वर्तमानपत्रे व इतर माध्यमातून सद्य कौटुंबिक समस्यान बद्दल खूप चर्चा सातत्याने वाचायला मिळते . पाळणाघर आणि वृद्धाश्रमांची गरज ही वाढत आहे. त्यासाठी वृद्धाश्रम आणि पाळणाघरांची संख्या कमी पडत आहे. त्यासाठी सर्व पिढ्यांनी विचार करण्याची गरज आहे.
पालक आपल्या मुलांचे वयाच्या २६-२७ पर्यंत संगोपन करताना दिसते. काही मूले १०-१२ वि नंतर पायावर उभे राहून शिक्षण घेतात. आता मुलांचे शिक्षण, नंतर नोकरी किंव्हा व्यवसाय ,नंतर विवाह. आताच पालकांच्या पुढे मुलांनी ठरवून विवाह,प्रेम विवाह ते लीविंग relationship पर्यंत बदल पाहावे लागले. मूले येथे देशात किंव्हा परदेशात राहिली तरी ती अनेक कारणांमुळे विभक्त राहणे पसंत करतात. नातवानचे संगोपन आपल्या आई-वडिलांनी करावे,तर तेही या मुलांच्या मर्जीने असते. ते जेथे राहतील तेथे पालकांनी जायचे स्वतःला अपग्रेड करायचे आणि ते करूनही त्यांना चांगले शब्द किंव्हा मान दिला जात नाही. आताच्या अनेक घरान मध्ये माहेरच्या माणसांची अधिक दखल फूट पाडताना दिसत आहे. मुलाना पालक की पत्नी तर ते पत्नी सोबत म्हणून तिचा विचार अधिक करणे पसंत करतात . चूक-बरोबर कोण हे पहिले जात नाही. आयुर्मान वाढले आहे,पालकांना त्यांच्या आई-वडील,सासू-सासरे यानाही बऱ्याच ठिकाणी पाहावे लागत आहे.या सर्व परिस्थितीत पालक मानसिक खच्ची होत आहेत .जरी केली सुनेशी मैत्री, तरी मुलं-सुनवास होणार नाही याची नाही खात्री!
गीतेतील तत्वज्ञान जेव्हा खरे अनुभवायला लागते ,तेव्हा कळते की सांगणे सोपे व अंगीकारणे अवघड असते. आपल्या पोटच्या मुलांनी आपल्याशी आपुलकीने बोलावे,चौकशी करावी या मानसिक आधाराची अपेक्षा तर राहतेच ना ! मुला-मुलीनी कितीही वाजता रात्री घरी येणे,त्यांचे अधिक स्वतंत्र पणे वागणे हे मुला-मुलीना गैर वाटत नाही. घराचे मंदिर असावे अशा अपेक्षा करणाऱ्यांची कुचम्बना होते. काळी वाटते ,त्यावरून वैचारिक मतभेद होतात. पालक व्यसनी असणे मुलांच्या हितकारक नसते,त्यातही आताच्या पिढीचा स्वार्थीपणा असतो,की त्यामूळे त्यांच्या मुलाना ते कसे सांभाळतील. म्हणजे आईने तुळशीला पाणी घालावे व यांनी दारू ढोसावी ही अपेक्षा असते. वीकएंड संकल्पना आली आहे,त्यात हेच दिसून येते,की तेव्हा यांच्या मुलाना सांभाळले,तर पालक चांगले,नाहीतर ते वाईट. फक्त स्वार्थाने संबंध सुधारू शकत नाहीत. त्यासाठी मुलं-सुनांनी ही हे आपले घर आहे ही भावना बाळगायला हवी. माझे -तुझे हे फार सुरू झाले आहे. तुमचे तेही माझे आणि माझे ते माझे हा विचार बरोबर नाही! आई-वडील,घरातील देव कोणी सांभाळायचे हा प्रश्न सगळीकडे उपस्थित होतो आहे. तेथे पालकांनीही देव संकल्पना बदलायला हवी. देव कोणावर लादू नयेत.
अनेक पालकानच्या समस्या मी पहिल्या देश -परदेशात! समस्या खूप चिंताजनक आहेत. स्त्री अर्थार्जन करायला लागली,तिचेही विचार बदलले. शिक्षण,पैसा आला. त्यामुळे उन्मत्तपणा, अहंकार वाढीस लागले. मुलीना स्वयंपाकघरात जाणे पसंतच नाही,बरे जे करतात त्यांना करतात म्हणावे तर तेथेही केले सासूने म्हणून काय बिघडले असा व्यवहार! ज्या बाईने सासुरवास भोगला तिला पुन्हा तिच्या चांगुलपणाच्या व्यवहाराने ,सुनेशी मैत्रीच्या नात्याने वागूनही सुनवास भोगावा लाग्नारयानची संख्या वाढली,आणि पालक वेगळे राहणे,अलिप्त होणे पसंत करू लागले. व्यक्ती तितक्या प्रकृती,त्यामुळे काही ठिकाणी सासुरवास सुनांना भोगावा लागतो आहे. वेगळे राहिले की ही समस्या सुटते आहे. स्त्री आर्थिक स्वतंत्र झाल्याने सासुरवास प्रकारचे प्रमाण कमी झाले.
मान द्यावा आणि घ्यावा हे खरे आहे. मुलाना प्रेम दिले तसेच त्यांना चुका करताना पालक काही गोष्टी सांगतात. दोन्ही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आताच्या पिढीत अरेतुरेत किंव्हा आई-बाबांचे नावच मूले घेतात. आता हे परिवर्तन घडत आहे. त्यांच्या पिढीच्या समस्या अजून वेगळ्या असतील.त्यानाही उमजेल.
मुलाना त्यांच्या पद्धतीने जिवन जगू द्यावे,मूले पाश्चात्य संस्कृतीचा त्यांना हवा तेवढाच अंगीकार करतात,असें दिसून येत आहे.कर्तव्यांची जाण त्यांना द्यावी लागत आहे. पालकान मध्ये एकटा पालक असणार्यंची सख्याही बरीच आहे. त्यांच्यावर मूले असताना जवळ नाहीत म्हणून एकटे राहणे,किंव्हा त्यांच्याशी जमवून घेणे हे पर्याय राहतात. अनेक ठिकाणी मुलं होई पर्यंत मूले एकत्र राहतात,आणि जरा मोठी झाली,की वेगळे होतात. या मध्ये भावनांची गुंतवणूक झालेली असते. त्यातून बाहेर पडणे कठीण होते. भविष्य बघून आणि देव-देव करून मानसिक शांतता मिळत नाही,ती स्वत:चे चिंतन करूनच आणावी लागते. पक्षान प्रमाणे निरपेक्ष पणे जिवन जगणे शिकावे लागते.
मुलांनी १६ व्या वर्षी आपल्या पायावर उभे राहून स्वतचे शिक्षण पुरे करावे. कोणीही कोणाकडून फार अपेक्षा बाळगू नयेत. पालकांच्याही आर्थिक विवंचना कमी होतील.स्वतः साठी पैसे शिल्लक ठेवू शकतील. या मूळे मुलेही सुखी आणि पालकही सुखी! मूले मोठी झाली,आप -आपल्या मार्गाला लागली हे दुरून पाहण्याची पालकांना सवय होईल व मुलानाही सवय होईल. भावनांच्या गुंतवणुकीने सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या भावनांना आवर घालणे व दूर राहून संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करणे हा मार्ग उचित वाटतो. आताच्या काळात पूर्वीचे नियम लागू होवू शकत नाही हे लक्षात आले आहे.
आपल्या संस्कृतीचे सण-उत्सवांचे अर्थ हे कुटुंब-समाज एकत्र कसा राहील,स्नेहभाव कसा वाढीला लागेल या अर्थानी आहेत.पण ते समजून घेण्याची सर्वांची क्षमता हवी! आपली मानवधर्म सांगणारी संस्कृती आहे . निसर्गाशी जो मैत्री करेल,त्यास जिवन उमजेल. जाणा आपुला स्वधर्म, रुजवा मनी मानवधर्म!
मंगला
आई या हाकेतील उमजावा लागतो अर्थ, अर्थ हाती आले म्हणून आई होते का कधी व्यर्थ?
आईने भोगला होता सासुरवास आणि पुन्हा भोगत आहे मूल-सूनवास!
.आपण सारे जण त्या एकाच ईश्वराचे अंश,तर का करावा कोणी कुणाला दंश? दंश करणाऱ्याला नसेल समज,तर त्या पासून दूर होणे हीच काळाची गरज! परदेशात आपल्या मुला-मुली कडे किंव्हा नातेवाईक कडे जाताना आपला पासपोर्ट ,विसा आणि क्रेडीटकार्ड जवळ ठेवायलाच हवे हे सुमती बाईंच्या कथेतून मला शिकायला मिळाले. आपले घर स्वतचे हवे व स्वतःसाठी भविष्याची तरतूद होईल इतका पैसा हवा,हेही शिकायला मिळाले.
मी दुबईत असताना बर दुबई ला माझ्यासाठी हार्ड ड्राइव खरेदी करायला गेले होते. दुकान शोधत होते. मला समोरच पंजाबी ड्रेस मधील माझ्याच वयाची महिला दिसली. मी त्यांना थांबवून दुकान कोठे ते विचारले. त्या म्हणाल्या मी दाखवते तुम्हाला,जवळच आहे. त्यांच्या कामासाठी त्या निघाल्या असतील,कशाला त्यांना त्रास म्हणून मी म्हणले "मला ठिकाण सांगा मी शोधेन,".त्या म्हणाल्या "असू दे, आपला सहवास लाभेल,बोलायला तरी मिळेल". आणि त्यांचे डोळे पाणावले. मी त्यांना घेवून दुकाना बाहेरच गप्पा मारत राहिले. त्यांचे नाव सुमती, वय ५५ वर्ष . भारतात कोकणात राहणाऱ्या,त्या मुळे मला अजूनच आपुलकी वाटली. त्या एकदम खूप भडा-भडा बोलू लागल्या . त्या मुला-सुने जवळ राहत होत्या. मुलगा-सून नोकरी करीत होते. चांगला २ बेड रूम चा ब्लोक होता .त्या स्वतः शिकलेल्या होत्या. बऱ्याच मोठ्या कुटुंबात सासुरवास भोगत,कष्ट करत ,आता कोठे सुखाचे दिवस आले असें त्यांना वाटले होते. त्यात त्यांच्या पतीचे निधन झाले,. मुलाच्या शिक्षणा साठी,लग्नासाठी जवळचे पैसे खरच झाले.मुलानी गावातील घर भाड्याने दिले,आणि त्यांना इकडे आणले. घरातील जेवण ,नाश्ता,सामान आणणे सारी कामे त्या करत होत्या,तरी सूनबाई त्यांना घालून-पाडून बोलायची. कितीही वेगळे पदार्थ बनवले,तरी अजून नाही का वेगळे काही येत तुम्हाला म्हणायची. तरी त्यांनी नवं-नविन पदार्थ शिकण्याचा प्रयत्न केला.
घरातील केर ,भांडी पासून सारेच काम त्या करत. तरी यांना घरात काय काम आहे? केले तर वेळ जात नाही म्हणून केले काम तर कोठे बिघडले अशी वाक्य! सकाळी मुला-सुने साठी डबा भरायला घेतला की सून यायची म्हणायची मी भरेन डबा,आणि जे बनवलेले असायचे ते सारेच डब्यात दोघांच्या भरून न्यायची. संध्याकाळी मुलगा आईला ओरडायचा की किती डबा भरायचा कळत नाही का तुला. सुनेने भरला सांगावे तर ती खोटे पाडायची. संध्याकाळी त्यांच्या डब्यातील उरलेले त्या खात असत. अन्न वाया घालवू नये ही आपली शिकवण ना! सकाळी त्या नाश्ता-जेवण भांडी सारे काम करून दमायच्या . पुन्हा स्वतः साठी काही बनवायचे कंटाळा यायचा. कधी मुगाच्या डाळीची खिचडी तर कधी चटणी पोळी असें काही बाही खात. मशीनला कपडे लावायचे ,बेडशिट बदलणे,कपडे वाळवणे, घड्या करून ठेवणे ,भांडी पुसून लावणे सारीच कामे असत.
एखादे काम राहिले की सून मुद्दाम हून मुला समोर काहीतरी बोलायची,की तो बोलायचं,तुला इतकेसे काम होत नाही का. गावाला कसे सर्वान साठी करायचीस. त्यांचे घराचे भाडे यायचे त्या पैशात त्या येथील घर खर्च व स्वतःचा खर्च भागवीत असत. शेजार-पाजार वेगळ्या भाषेचे लोक होते,त्यामुळे कोणाशी फारसा संवाद नाही. कोणी घरात मैत्रिणीला बोलवावे तर ते आवडत नसे. येथे कोणीही आपले आई-वडील आणून ठेवत नाहीत,आम्ही ठेवले तुला,म्हणजे तुझ्यावर किती मेहेरबानी करीत आहोत म्हणायचे. पती गेल्याचे दुखातून ती सारली नव्हती,आणि या आपल्याच पोटच्या मुलाचे घरी अशी वागणूक,म्हणजे कामवाली पेक्षा बेहत्तर होती. सून काही बोली मुलाला सांगायला जावे,तर त्याने तिला सांगितलेच होते की तिच्या बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही. यांच्या विक एंड पार्टी,त्यांच्या मित्र-मैत्रीणीना जेवायला घालणे,ते असतील तेव्हा घरा बाहेर निघून जाणे. कोठे तरी मॉल मध्ये रात्री ११ वाजे पर्यंत थांबून घरी परत येणे. कारण त्यांच्या ओल्या पार्टी मध्ये त्या तेथे नकोत. भारतात परत जाते म्हणाल्या तर म्हणे कोठे राहशील? त्या घरी राहिलीस तर तुझा उदर-निर्वाह कसा होणार? सुमती त्यांना म्हणाली मी काहीही करेन,भाजी-पोळी विद्यार्थ्यांना करून देईन, माझे पोट मी भरेन , मला पेनशन मिळते त्यात माझे भागेल. पण मला माझ्या घरी जायचे. तर पास पोर्ट मुलाकडे. मागितला तर म्हणे,विसा चे काम चालू आहे. टाळं -टाळ करीत होते. तिकीट काढायचे तर म्हणे सांग तुझे कोण असेल त्यांना! ही काय उत्तरे झाली! सुमती बाईना रडू आवरत नव्हते.
मी तेथेच कॉफी शोप मध्ये एका ठिकाणी त्यांना घेवून बसले. खरेदीचा विषय सोडून दिला. त्यांची कथा ऐकून माझे डोके सुन्न झाले होते. गावातील घर सून नावावर करून मागत होती,त्याला सुमती बाईनी नकार दिला,त्या मुळे ती अजूनच खार खावून वागत होती. आई कशी आहेस हे कोणी विचारात नव्हते. घरात राहून संवाद फार कमी. घरातील फोन सुमती ने वापरायचा नाही. तिला फोन करण्या साठी नेट केफे मध्ये जावे लागे. त्यांचे माहेर मुंबईत होते. मी त्यांना सल्ला दिला की भावाला तुमचे तिकीट काढून पाठवायला सांगा आणि आपल्या घरी राहायला जा! मी त्यांना म्हणाले की मी बोलू का आपल्या मुला-सुनेशी! तर त्या म्हणाल्या अजिबात नको,कारण त्यांच्यात पैशाने इतके बदल घडवले आहेत,की ते आई चे नातेच विसरले आहेत. येथे कामवालीला खूप पैसे द्यावे लागतात,त्यामुळे मी येथे राहणेही त्यांना हवे,आणि त्यांना ते घरात असताना मी नको! मी पहाटे उठून जेवण-नाश्ता बनवून आता डबे मीच भरून ठेवते. त्यांना जगण्याची इछाच उरली नव्हती,सांगणार कोणाला? माहेरी वाटत होते आपली बहिण परदेशात राहते. गाडीतून फिरते. मजेत आहे. सुमतीला मी सांगितले आता भावा पासून काही लपवू नकोस. आणि भारतात परत जा. तिच्या पतीची पेनशन मिळत होती. तिचा त्यावर उदर-निर्वाह होवू शकत होता. एकट्याने जगण्याची तिला सवय नव्हती,पण आता आपल्यानीच तिला कणखर बनवून या निर्णयाला आणले होते. सुमतीने तिचा सेल नंबर मला दिला,मी ही माझा नंबर दिला. तिला सांगितले की मी तुला काहीही गरज पडेल तेव्हा मदत करेन,परंतु या पुढे असहाय पणे जगू नकोस. मानाने जग! तुझ्या गावात जावून तुला काही समाज कार्य करता आले तर कर. मुक्त हो सारया नात्या-गोत्यांच्या बंधनातून! गृहाथाश्रमातील चटके हेच शिकवत असतात,त्यासाठीच वेळेवर संसारातून निवृत्त व्हायचे !
सुमती आपल्या मुला-सुनेवर जीवापाड प्रेम करते. त्यासाठी ती आज ५ वर्ष हे अपमान गिळत आली. अजून नातवंडाचा पत्ता नाही,त्यांना त्यांच्या मर्जीने जगायचे आहे. दोघेही सिगारेट -दारू सारे शौक करतात. कसं होणार मूल? सुनेत काहीही स्त्रीत्व व गृहिणीची लक्षणेच नव्हती. नुसत्या मोठ्या डिग्र्या आणि गले लाठ्ह पगार! त्यामुळे माणुसकी झाली पसार! या सर्व कारणांनी ती दुखीच होती.. मी तिला समजावले अगं,अपेक्षांचा अंत कर. या अपेक्षा दुखाचे कारण बनतात. तू खंबीर हो,आणि हसत मुखाने स्वतः साठी आधी जग,नंतर तुला वाटले तर कोणाला मदत कर. अनाथ आश्रमातील किंव्हा गावातील मुलांना जमवून काही शिकव. आपण शिकवत राहायचे . चांगले कधीही सोडायचे नाही. भले एकटे पडलो तरी चालेल,परंतु सत्याची कास सोडायची नाही! नाहीतर स्वतःला एखाद्या छंदात गुंतवून घे. मी कसा वेळ घालवते,मी काय काय शिकले, निसर्गाचे वेड,छंद सारे तिला सांगितले. तिचा चेहरा खुलला. मला जमेल असं काही म्हणाली. मी तिला म्हणले अगं तुला या पेक्षाही अधिक जमेल.
सुमतीने अश्रू पुसले,मला म्हणाली,"देवानेच पाठवले बघ तुला ! मला आज खूप हलक वाटत आहे. मी आज पर्यंत सारे मनात ठेवले,आज माझा खूपच अपमान झाला सकाळी. त्यामुळे राहवलेच नाही.माझा तुझ्याशी प्रथम भेटीत असं बोलण्याचा बांध फुटला,मला क्षमा कर!". मी तिला म्हणाले "अगं,वेडी का खुळी! माझ्याशी बोलून तुला बरे वाटले, आणि मी तुला बहिणी सारखी वाटले,हे माझे भाग्य आहे.मला तुला जी मदत करता येईल ती मी आवश्य करेन"..
एकटी स्त्री आहे म्हणले की समाज तर तिला टोचण्या देत असतो हे ऐकले होते,पण आपलाच एकुलता एक मुलगा व सुने कडून ही वागणूक म्हणजे माणुसकी हरवल्याची लक्षणे दिसत होती. अरे म्हातारपणीची काठी होता येत नाही तर त्यांना शाब्दिक लाठ्या का मारता रे! हे पाप आहे! उशिरा लक्षात येईल,तो पर्यंत आईच नसेल,आणि असली तरी आता तिला तुमची हाकच परकी वाटेल! तारुण्य आणि पैसा माणसाला मुजोर बनवतात,या पुढे जो बधत नाही तो खरा माणूस! आई विषयी इतक्या कविता वाचत आले,आणि आज एका आईची ही विटंबना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. वाटलं,खरच ईश्वर दाखवून देत आहे की कोणी नसतं गं आपलं,आपणच असतो आपले! आपला शोध घेवून गवसावा आपल्या अंतरातील ईश्वराला,सुख-दुखांचा दूर करावा पसारा! आपल्याला सारे सुखं मिळाले तरी दुसरा दुखी आहे पाहून दुखं होतेच ना! प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते हे खरे, तिच्याही काही चुका असतील,परंतु ती सारे खोटे तर नाही ना बोलणार! ती आई आहे हे सुद्धा खरे ना!
मंगला
हृदयी वसे श्रद्धा-भक्ती -सबुरी , अंतरंगी गवसे त्यासी श्रीहरी !
सुखं-शांती-समाधान यासाठी सर्वांची धडपड चालू आहे. इच्छा,आकांक्षा,ईर्ष्या ,असूया,वासना महत्वाकांक्षा,अतृप्ती आणि विविध कामना माणसाचे जिवन गढूळ करतात. सुखं म्हणजे काय हे नक्की समजून घ्यायला हवे. आपला अहंकार व त्यामुळे असमाधान हे मूळ दुखाचे कारण आहे. आत्मसंशोधनाने आपल्या मनाच्या सूक्ष्म हालचालींचे निरीक्षण करणे हा समाधान मिळविण्याचा मार्ग आहे. जिवनमुल्यांचा बदल व गुरुशब्दास न पाळणे हे आत्मिक,नैतिक,धार्मिक सामाजिक बदल घडवीत असतात. आपण पोथ्या-पुराने वाचतो,परंतु या वाचनातून आपली प्रगल्भता वाढवून आपण स्वतः स्वतचे गुरु व्हायला हवे.
आपण आपली सारी सुखे भौतीकतेत शोधत आहोत.आपली विचारसरणी विसरून भौतिक जिवन पद्धतीचा अंगीकार करून आपण आपली शाश्वत मुल्ये विसरत चालले आहोत. भक्ती कशाशी खातात? श्रद्धा म्हणजे काय? प्रेम कशाला म्हणतात हे सत्य ,नीती,सदाचार आपल्याला गुरुज्ञानाने कळेल.
गुरु कोठे शोधायचा नसतो,तो ग्रंथातून आपणास मिळतो. आपल्याला अडचणी आल्या की गुरुकडे जावून गुरुचे बाजारीकरण झाले आहे. स्वतचे गुरु व्हा स्वतःच, हाची उत्तम मार्ग आहे एकच! गुरूला ईश्वर मानले तर गुरु विषयी मनात संदेह नसावा. श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास असतो,ही निरपेक्ष असते. या साठी मनाची स्थीर अवस्था हवी. मन अस्थिर असेल तर श्रद्धा ढळते. त्यामुळे भक्ती ही अविचलीत होते. चैतन्य रुपी ईश्वरा शिवाय मूर्तीपूजा व्यर्थ ठरते. योग्य प्रयत्नांनी आपण आपल्या मनाचा मागोवा घ्यायला हवा ,ज्या क्षणी आत्मबोध होईल त्या क्षणी आत्म साक्षात्काराचा अनुभव येईल.
जसे नारळाचे पाणी गोड त्यातील खोबऱ्याची चव कमी,तसे अधिक शिक्षित होवूनही असमाधान दिसत आहे.प्रत्येकास विचारपूर्वक आचरणाची गरज आहे. आपल्या अंतरंगात आपण डोकावले तर निरीक्षण आणि श्रद्धेने मानवाचे जिवन तत्काळ बदलण्याचे सामर्थ्य आहे.समाजकार्य-दान-धर्म करून कीर्ती-प्रतिष्ठा मिळवतो, त्याने आशा-आकांक्षा ,इच्छा,हव्यास,वित्त हे जिवनात अहंकार निर्माण करीत असतात.
जसे बोटीतून प्रवास करताना बोट हलते,मळमळ होते, ,मुलं हवे असले तरी डोहाळे -प्रसुतीच्या वेदना सहन कराव्या लागतातच. जेथे इच्छा आहे तेथे कट-कट -वेदना चुकविता येत नाहीच! पैशाच्या मुळे सुखं थोडे व संग्रहाने दुखी-असमाधानीच होतो माणूस. आपल्या गरजा कमी करायला हव्यात ,आपले स्वतचे स्वास्थ्य,आपले कुटुंबाचे सुख मिळाविण्यासाठी एक-मेकांचा सहवास हा गरजेचा आहे.
आत्म संशोधनाचे सामर्थ्य वाढवले की ईश्वराजवळ मागणेच संपून जाते. मन निरिच्छ होते. चैतन्य स्वरूप ब्रम्हा हे शाश्वत आहे,त्याला जन्म-मृतू नाही हे उमजते.खरया ज्ञानाच्या प्राप्तीने सत्याचे दर्शन होते. जाणीव आणि नेणीव या मनाच्या दोन अवस्था असतात. जाणीवे मध्ये अहंभाव असतो,नेणीवेत तो नसतो.
निर्गुण परमेश्वराचे सगुण स्वरूप मानता,तर घरात आपले आई-वडील आहेत त्यांची मनोभावे सेवा करा. आपला विवेक सदैव जागा राहायला हवा.दया-क्षमा-शांती हे गूण अंगी उतरवायला हवेत. यातून निर्भेळ आनंद मिळतो. माणसात दडलेले देवत्व त्याला गवसेल तेव्हा त्याचे अंतर-बाह्य जिवन उजळून निघेल.जो स्वतःस ओळखतो तोच ईश्वरास जाणतो.
आज लाखो वारकरी श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर पंढरपूरला विठू माउलीचे दर्शनास जातात, तशीच श्रद्धा व भक्ती आपण अंगिकारली तर स्वतःला जाणणे कठीण नाही,याच मावूलीचे दर्शन आपल्या अंतरंगात नक्की होणारच. हृदयी वसे श्रद्धा-भक्ती -सबुरी , अंतरंगी गवसे त्यासी हरी ! बोला पांडुरंग! जय जय पांडुरंग!
मंगला
Subscribe to:
Posts (Atom)