" ग्रांड मा तुसी ग्रेट हो!! सलाम कुबूल किजीये " असें म्हणून सलाम करणारी निरागस मुलं आज मला आठवली आणि मनापासून हसू आलं! दोन वर्ष मला चालता येत नव्हते हे मी विसरूनही गेले आहे आता! माझे छंद,निसर्ग व लहान मुलांची आवड याने माझी प्रकृती कधी सुधारली हे कळलेच नाही मला. मला दुबईत असताना लहान मुलांच्यात खेळण्याचा खूप छान आनंद मिळाला. खेळण्याने माणसाचे मन कसे प्रसन्न होते. आमच्या इमारतीत आसामी ,हिमाचल,दक्षिणात्य अशी कुटुंबे होती. मी फोटोग्राफी करायला रोज संध्याकाळी जायचे गच्चीत जायचे तेथे या लहानग्यांशी मैत्री झाली. एक दिवस त्यांच्या सोबत तलावात पोहोण्याचा मस्त अनुभव घेतला. नंतर कधी टेबल टेनिस खेळले. त्यांना मी आपले खेळ आणि व्यायाम प्रकार शिकवले. सूर्यनमस्कार अगदी आवडीने शिकली मुलं. रस्सीखेच आणि पंजा लढवण्यात त्यांना हरवलं आणि ते म्हणाले "ग्रांड मा तुसी ग्रेट हो,सलाम कुबूल किजीये!". मग मला हे थ्री इडीअट चित्रपटातील संवाद म्हणत आहेत कळले. खूप खूप हसले.
बर दुबईत भाची कडे गेले होते,तेथे त्या मुलां सोबत बास्केट बॉल खेळले. कोण आनंद झाला मला! बारावीत असताना अंतर महाविद्यालयीन स्पर्धा ही मी बास्केट बॉल ची खेळले होते. ७७ साला नंतर आता खेळता आले होते! (११ वि पासून साडी नेसून कॉलेजला जायचे,घरच्यांना न सांगता खेळले. घरी खेळाला विरोध होता. नंतर घरी ते कळले आणि खेळ बंद झाला) माझे लग्न झाल्यानंतर मी सायकल वर सगळीकडे जायचे .मुलानाही पुढे खुर्ची लावून त्यात पाच-पाच किलो मिटर फिरवून आणण्याचे. एकदा स्पर्धा होती,म्हणून पाहण्यास बोलावले होते. तेथील संयोजक म्हणाले "तुम्हाला उतरायचे का स्पर्धेत",मी लगेच हो म्हणाले. मी एकटी साडीत होते .माझी जुनी आटलास सायकल होतीच सोबत ,उतरले तशीच स्पर्धेत आणि आला की नंबर पाहिला!
माहेरी सुट्टीत आले की माझी मुलं आणि भाचवंड ना घेवून असेच सारे खेळ खेळायचो.नाहीतर सारी भाचवन्डे गावी यायची. त्यांना बैल गाडी,टांग्यातून सैर करून आणायचे. शेतावर,नदीवर घेवून जायचे,धम्माल यायची.
.
सामाजिक कामात सर्व ठिकाणी खेळांच्या स्पर्धा आवर्जून भरावयाचे. त्यात लहान-थोर,स्त्री-पुरुष सर्वजण सहभागी असायचे. संगित खुर्ची,चमचा लिंबू,धावणे,गोळा फेक इत्यादी स्पर्धा व्हायच्या. मी स्वतः खेळायचे,त्या मुळे इतरही महिला भाग घेत असत! सासरी गौरी-गणपतीत सर्व मंगळा गौरीचे खेळ खेळत असू. स्थानिक नृत्य व गाणी याने रात्री जागवणे होत असें. उत्सवात गावातील सर्वजण सहभागी असत. आज या सारया आठवणीनी इतकं सुखद वाटत आहे.
हे सारे खेळाचे अंग लहानपणा पासून असल्याने टिकले. वाड्यात आम्ही खूप जण आणि आम्ही भावंडे पकडा-पकडी, विष-अमृत ,डबडा ऐस-पैस,लगोर,विटी-दांडू,गोट्या,पतंग,पत्ते,सागर-गोटे,काचा-पाणी,व्यापार,बुद्धिबळ, क्रिकेट,बॅडमिंटन,सारे खेळ खेळायचो. शाळेत पाचवी पासूनच मी अंतरशालेय डॉजबोल टीम, धावणे,गोळा फेक, यात होते. रोज खेळाचा सकाळी सव्वा सहा वाजता जावून सराव,सात वाजता शाळा असायची! ते दिवस आठवले की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. माझी प्रशस्ती पत्रक सारी जपून ठेवली आहेत, ती पाहून कधी त्या आठवणीत रमायला खूप आवडते.
नातवा बरोबर विविध खेळ चालू असतात. ही साखरेची पोती पाठकुळी घ्यायला खूप मज्जा वाटते. घोडा-घोडा करून लाकडी की काठी गाणं,काय मुलं खूष होतात! त्याला टिपरी पाणी,लगोरी खेळायला शिकवले. "पतंग आण ना आजी "म्हणाला, आता मी तोही आणणार आहे. बागेत नातवाला हाताच्या बोटांमध्ये झाडाचे पान ठेवून,दुसऱ्या हाताने मारुन फटकन आवाज काढून दाखवला की किती गम्मत वाटते. फुलाची भिंगरी करून मस्त सोडतात. पाऊस आला की आम्ही सारे मस्त भिजतो,कागदाची होडी करून सोडतो पाण्यात. किती-किती खूष होतात ना मूले. फिरायला गेलो सागर किनारी की मस्त लाटा अंगावर घेत नातवाना खेळवते. मागील शनिवारी मुळशीला गेलो होतो. नातवंडा सोबत पकडापकडी खेळलेच पण नात म्हणाली " छोट्या गवताच्या टेकडा वरून घरंगळून खाली यायचे. आज्जी तू कर ना,".मी कधी आज पर्यंत केले नव्हते,पण त्यांच्या सोबत तोही अनुभव घेतला. खूप मज्जा आली.
घरी संध्याकाळी आकाशातील सर्व पक्षांची ओळख नातवन्डाना करून देते. बगळ्यांची माळ,पोपटांचे थवे,घारी,साळुंक्या,बुल-बुल,वट वाघुल,कावळे,कबुतर सारे दिसतात. झाडांची फुलांचे रंग,नावे विचारत असतो नातू. ते शिकल्यावर रंग ओळखण्याचा खेळ घेते. आंधळी कोशिंबीर,मामाचे पत्र हरवले,मिरची पाणी, मजेत खेळतात. पत्ते खेळताना आकडे,रंग बरच काही समजते.
सारखी इलेक्ट्रोनिकची खेळणी, कॉम्पुटर ,आयपॉड यातून जरा चिमुकल्यांची सुटका होते. माझेही सदा जपलेले हे बालपण तसेच शाबूत राहते, म्हणून तर मी म्हणते खेळाची असली ना आवड तर वय वाढायलाच नसते सवड!
मंगला