आईने भोगला होता सासुरवास आणि पुन्हा भोगत आहे मूल-सूनवास!
.आपण सारे जण त्या एकाच ईश्वराचे अंश,तर का करावा कोणी कुणाला दंश? दंश करणाऱ्याला नसेल समज,तर त्या पासून दूर होणे हीच काळाची गरज! परदेशात आपल्या मुला-मुली कडे किंव्हा नातेवाईक कडे जाताना आपला पासपोर्ट ,विसा आणि क्रेडीटकार्ड जवळ ठेवायलाच हवे हे सुमती बाईंच्या कथेतून मला शिकायला मिळाले. आपले घर स्वतचे हवे व स्वतःसाठी भविष्याची तरतूद होईल इतका पैसा हवा,हेही शिकायला मिळाले.
मी दुबईत असताना बर दुबई ला माझ्यासाठी हार्ड ड्राइव खरेदी करायला गेले होते. दुकान शोधत होते. मला समोरच पंजाबी ड्रेस मधील माझ्याच वयाची महिला दिसली. मी त्यांना थांबवून दुकान कोठे ते विचारले. त्या म्हणाल्या मी दाखवते तुम्हाला,जवळच आहे. त्यांच्या कामासाठी त्या निघाल्या असतील,कशाला त्यांना त्रास म्हणून मी म्हणले "मला ठिकाण सांगा मी शोधेन,".त्या म्हणाल्या "असू दे, आपला सहवास लाभेल,बोलायला तरी मिळेल". आणि त्यांचे डोळे पाणावले. मी त्यांना घेवून दुकाना बाहेरच गप्पा मारत राहिले. त्यांचे नाव सुमती, वय ५५ वर्ष . भारतात कोकणात राहणाऱ्या,त्या मुळे मला अजूनच आपुलकी वाटली. त्या एकदम खूप भडा-भडा बोलू लागल्या . त्या मुला-सुने जवळ राहत होत्या. मुलगा-सून नोकरी करीत होते. चांगला २ बेड रूम चा ब्लोक होता .त्या स्वतः शिकलेल्या होत्या. बऱ्याच मोठ्या कुटुंबात सासुरवास भोगत,कष्ट करत ,आता कोठे सुखाचे दिवस आले असें त्यांना वाटले होते. त्यात त्यांच्या पतीचे निधन झाले,. मुलाच्या शिक्षणा साठी,लग्नासाठी जवळचे पैसे खरच झाले.मुलानी गावातील घर भाड्याने दिले,आणि त्यांना इकडे आणले. घरातील जेवण ,नाश्ता,सामान आणणे सारी कामे त्या करत होत्या,तरी सूनबाई त्यांना घालून-पाडून बोलायची. कितीही वेगळे पदार्थ बनवले,तरी अजून नाही का वेगळे काही येत तुम्हाला म्हणायची. तरी त्यांनी नवं-नविन पदार्थ शिकण्याचा प्रयत्न केला.
घरातील केर ,भांडी पासून सारेच काम त्या करत. तरी यांना घरात काय काम आहे? केले तर वेळ जात नाही म्हणून केले काम तर कोठे बिघडले अशी वाक्य! सकाळी मुला-सुने साठी डबा भरायला घेतला की सून यायची म्हणायची मी भरेन डबा,आणि जे बनवलेले असायचे ते सारेच डब्यात दोघांच्या भरून न्यायची. संध्याकाळी मुलगा आईला ओरडायचा की किती डबा भरायचा कळत नाही का तुला. सुनेने भरला सांगावे तर ती खोटे पाडायची. संध्याकाळी त्यांच्या डब्यातील उरलेले त्या खात असत. अन्न वाया घालवू नये ही आपली शिकवण ना! सकाळी त्या नाश्ता-जेवण भांडी सारे काम करून दमायच्या . पुन्हा स्वतः साठी काही बनवायचे कंटाळा यायचा. कधी मुगाच्या डाळीची खिचडी तर कधी चटणी पोळी असें काही बाही खात. मशीनला कपडे लावायचे ,बेडशिट बदलणे,कपडे वाळवणे, घड्या करून ठेवणे ,भांडी पुसून लावणे सारीच कामे असत.
एखादे काम राहिले की सून मुद्दाम हून मुला समोर काहीतरी बोलायची,की तो बोलायचं,तुला इतकेसे काम होत नाही का. गावाला कसे सर्वान साठी करायचीस. त्यांचे घराचे भाडे यायचे त्या पैशात त्या येथील घर खर्च व स्वतःचा खर्च भागवीत असत. शेजार-पाजार वेगळ्या भाषेचे लोक होते,त्यामुळे कोणाशी फारसा संवाद नाही. कोणी घरात मैत्रिणीला बोलवावे तर ते आवडत नसे. येथे कोणीही आपले आई-वडील आणून ठेवत नाहीत,आम्ही ठेवले तुला,म्हणजे तुझ्यावर किती मेहेरबानी करीत आहोत म्हणायचे. पती गेल्याचे दुखातून ती सारली नव्हती,आणि या आपल्याच पोटच्या मुलाचे घरी अशी वागणूक,म्हणजे कामवाली पेक्षा बेहत्तर होती. सून काही बोली मुलाला सांगायला जावे,तर त्याने तिला सांगितलेच होते की तिच्या बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही. यांच्या विक एंड पार्टी,त्यांच्या मित्र-मैत्रीणीना जेवायला घालणे,ते असतील तेव्हा घरा बाहेर निघून जाणे. कोठे तरी मॉल मध्ये रात्री ११ वाजे पर्यंत थांबून घरी परत येणे. कारण त्यांच्या ओल्या पार्टी मध्ये त्या तेथे नकोत. भारतात परत जाते म्हणाल्या तर म्हणे कोठे राहशील? त्या घरी राहिलीस तर तुझा उदर-निर्वाह कसा होणार? सुमती त्यांना म्हणाली मी काहीही करेन,भाजी-पोळी विद्यार्थ्यांना करून देईन, माझे पोट मी भरेन , मला पेनशन मिळते त्यात माझे भागेल. पण मला माझ्या घरी जायचे. तर पास पोर्ट मुलाकडे. मागितला तर म्हणे,विसा चे काम चालू आहे. टाळं -टाळ करीत होते. तिकीट काढायचे तर म्हणे सांग तुझे कोण असेल त्यांना! ही काय उत्तरे झाली! सुमती बाईना रडू आवरत नव्हते.
मी तेथेच कॉफी शोप मध्ये एका ठिकाणी त्यांना घेवून बसले. खरेदीचा विषय सोडून दिला. त्यांची कथा ऐकून माझे डोके सुन्न झाले होते. गावातील घर सून नावावर करून मागत होती,त्याला सुमती बाईनी नकार दिला,त्या मुळे ती अजूनच खार खावून वागत होती. आई कशी आहेस हे कोणी विचारात नव्हते. घरात राहून संवाद फार कमी. घरातील फोन सुमती ने वापरायचा नाही. तिला फोन करण्या साठी नेट केफे मध्ये जावे लागे. त्यांचे माहेर मुंबईत होते. मी त्यांना सल्ला दिला की भावाला तुमचे तिकीट काढून पाठवायला सांगा आणि आपल्या घरी राहायला जा! मी त्यांना म्हणाले की मी बोलू का आपल्या मुला-सुनेशी! तर त्या म्हणाल्या अजिबात नको,कारण त्यांच्यात पैशाने इतके बदल घडवले आहेत,की ते आई चे नातेच विसरले आहेत. येथे कामवालीला खूप पैसे द्यावे लागतात,त्यामुळे मी येथे राहणेही त्यांना हवे,आणि त्यांना ते घरात असताना मी नको! मी पहाटे उठून जेवण-नाश्ता बनवून आता डबे मीच भरून ठेवते. त्यांना जगण्याची इछाच उरली नव्हती,सांगणार कोणाला? माहेरी वाटत होते आपली बहिण परदेशात राहते. गाडीतून फिरते. मजेत आहे. सुमतीला मी सांगितले आता भावा पासून काही लपवू नकोस. आणि भारतात परत जा. तिच्या पतीची पेनशन मिळत होती. तिचा त्यावर उदर-निर्वाह होवू शकत होता. एकट्याने जगण्याची तिला सवय नव्हती,पण आता आपल्यानीच तिला कणखर बनवून या निर्णयाला आणले होते. सुमतीने तिचा सेल नंबर मला दिला,मी ही माझा नंबर दिला. तिला सांगितले की मी तुला काहीही गरज पडेल तेव्हा मदत करेन,परंतु या पुढे असहाय पणे जगू नकोस. मानाने जग! तुझ्या गावात जावून तुला काही समाज कार्य करता आले तर कर. मुक्त हो सारया नात्या-गोत्यांच्या बंधनातून! गृहाथाश्रमातील चटके हेच शिकवत असतात,त्यासाठीच वेळेवर संसारातून निवृत्त व्हायचे !
सुमती आपल्या मुला-सुनेवर जीवापाड प्रेम करते. त्यासाठी ती आज ५ वर्ष हे अपमान गिळत आली. अजून नातवंडाचा पत्ता नाही,त्यांना त्यांच्या मर्जीने जगायचे आहे. दोघेही सिगारेट -दारू सारे शौक करतात. कसं होणार मूल? सुनेत काहीही स्त्रीत्व व गृहिणीची लक्षणेच नव्हती. नुसत्या मोठ्या डिग्र्या आणि गले लाठ्ह पगार! त्यामुळे माणुसकी झाली पसार! या सर्व कारणांनी ती दुखीच होती.. मी तिला समजावले अगं,अपेक्षांचा अंत कर. या अपेक्षा दुखाचे कारण बनतात. तू खंबीर हो,आणि हसत मुखाने स्वतः साठी आधी जग,नंतर तुला वाटले तर कोणाला मदत कर. अनाथ आश्रमातील किंव्हा गावातील मुलांना जमवून काही शिकव. आपण शिकवत राहायचे . चांगले कधीही सोडायचे नाही. भले एकटे पडलो तरी चालेल,परंतु सत्याची कास सोडायची नाही! नाहीतर स्वतःला एखाद्या छंदात गुंतवून घे. मी कसा वेळ घालवते,मी काय काय शिकले, निसर्गाचे वेड,छंद सारे तिला सांगितले. तिचा चेहरा खुलला. मला जमेल असं काही म्हणाली. मी तिला म्हणले अगं तुला या पेक्षाही अधिक जमेल.
सुमतीने अश्रू पुसले,मला म्हणाली,"देवानेच पाठवले बघ तुला ! मला आज खूप हलक वाटत आहे. मी आज पर्यंत सारे मनात ठेवले,आज माझा खूपच अपमान झाला सकाळी. त्यामुळे राहवलेच नाही.माझा तुझ्याशी प्रथम भेटीत असं बोलण्याचा बांध फुटला,मला क्षमा कर!". मी तिला म्हणाले "अगं,वेडी का खुळी! माझ्याशी बोलून तुला बरे वाटले, आणि मी तुला बहिणी सारखी वाटले,हे माझे भाग्य आहे.मला तुला जी मदत करता येईल ती मी आवश्य करेन"..
एकटी स्त्री आहे म्हणले की समाज तर तिला टोचण्या देत असतो हे ऐकले होते,पण आपलाच एकुलता एक मुलगा व सुने कडून ही वागणूक म्हणजे माणुसकी हरवल्याची लक्षणे दिसत होती. अरे म्हातारपणीची काठी होता येत नाही तर त्यांना शाब्दिक लाठ्या का मारता रे! हे पाप आहे! उशिरा लक्षात येईल,तो पर्यंत आईच नसेल,आणि असली तरी आता तिला तुमची हाकच परकी वाटेल! तारुण्य आणि पैसा माणसाला मुजोर बनवतात,या पुढे जो बधत नाही तो खरा माणूस! आई विषयी इतक्या कविता वाचत आले,आणि आज एका आईची ही विटंबना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. वाटलं,खरच ईश्वर दाखवून देत आहे की कोणी नसतं गं आपलं,आपणच असतो आपले! आपला शोध घेवून गवसावा आपल्या अंतरातील ईश्वराला,सुख-दुखांचा दूर करावा पसारा! आपल्याला सारे सुखं मिळाले तरी दुसरा दुखी आहे पाहून दुखं होतेच ना! प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते हे खरे, तिच्याही काही चुका असतील,परंतु ती सारे खोटे तर नाही ना बोलणार! ती आई आहे हे सुद्धा खरे ना!
मंगला