Sunday, July 17, 2011

हृदयी वसे श्रद्धा-भक्ती -सबुरी , अंतरंगी गवसे त्यासी श्रीहरी !

       सुखं-शांती-समाधान यासाठी सर्वांची धडपड चालू आहे. इच्छा,आकांक्षा,ईर्ष्या ,असूया,वासना महत्वाकांक्षा,अतृप्ती  आणि विविध कामना माणसाचे जिवन  गढूळ करतात. सुखं म्हणजे काय हे नक्की समजून घ्यायला हवे. आपला अहंकार व त्यामुळे असमाधान हे मूळ दुखाचे कारण आहे. आत्मसंशोधनाने आपल्या मनाच्या सूक्ष्म हालचालींचे निरीक्षण करणे हा समाधान मिळविण्याचा मार्ग आहे. जिवनमुल्यांचा बदल व गुरुशब्दास न पाळणे  हे आत्मिक,नैतिक,धार्मिक सामाजिक बदल घडवीत असतात. आपण पोथ्या-पुराने वाचतो,परंतु या वाचनातून आपली प्रगल्भता  वाढवून आपण स्वतः स्वतचे गुरु व्हायला हवे.  
      आपण आपली सारी सुखे भौतीकतेत शोधत आहोत.आपली विचारसरणी विसरून भौतिक जिवन पद्धतीचा अंगीकार करून आपण आपली शाश्वत मुल्ये विसरत चालले आहोत. भक्ती कशाशी खातात? श्रद्धा म्हणजे काय? प्रेम कशाला म्हणतात  हे सत्य ,नीती,सदाचार आपल्याला गुरुज्ञानाने कळेल.
        गुरु कोठे शोधायचा नसतो,तो ग्रंथातून आपणास मिळतो. आपल्याला अडचणी आल्या की गुरुकडे जावून  गुरुचे बाजारीकरण झाले आहे. स्वतचे गुरु व्हा स्वतःच, हाची उत्तम मार्ग आहे एकच! गुरूला ईश्वर मानले तर गुरु विषयी मनात संदेह नसावा. श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास असतो,ही निरपेक्ष असते. या साठी मनाची स्थीर अवस्था हवी. मन अस्थिर असेल तर श्रद्धा ढळते. त्यामुळे भक्ती ही अविचलीत होते. चैतन्य रुपी ईश्वरा शिवाय मूर्तीपूजा व्यर्थ ठरते. योग्य प्रयत्नांनी आपण आपल्या मनाचा मागोवा घ्यायला हवा ,ज्या क्षणी आत्मबोध होईल त्या क्षणी आत्म साक्षात्काराचा अनुभव येईल. 
       जसे नारळाचे पाणी गोड त्यातील खोबऱ्याची चव कमी,तसे अधिक शिक्षित होवूनही असमाधान दिसत आहे.प्रत्येकास  विचारपूर्वक आचरणाची गरज आहे. आपल्या अंतरंगात आपण डोकावले तर निरीक्षण आणि श्रद्धेने मानवाचे जिवन तत्काळ बदलण्याचे सामर्थ्य  आहे.समाजकार्य-दान-धर्म करून कीर्ती-प्रतिष्ठा मिळवतो, त्याने आशा-आकांक्षा ,इच्छा,हव्यास,वित्त हे जिवनात अहंकार निर्माण करीत असतात.
      जसे बोटीतून प्रवास करताना बोट हलते,मळमळ  होते, ,मुलं हवे असले तरी डोहाळे -प्रसुतीच्या वेदना सहन कराव्या लागतातच. जेथे इच्छा आहे तेथे कट-कट -वेदना चुकविता येत नाहीच! पैशाच्या मुळे सुखं थोडे व  संग्रहाने दुखी-असमाधानीच होतो माणूस. आपल्या गरजा कमी करायला हव्यात ,आपले स्वतचे स्वास्थ्य,आपले कुटुंबाचे सुख मिळाविण्यासाठी एक-मेकांचा सहवास हा गरजेचा आहे. 
       आत्म संशोधनाचे सामर्थ्य वाढवले की ईश्वराजवळ मागणेच संपून जाते. मन निरिच्छ होते. चैतन्य स्वरूप ब्रम्हा  हे शाश्वत आहे,त्याला जन्म-मृतू नाही हे उमजते.खरया ज्ञानाच्या प्राप्तीने सत्याचे दर्शन होते. जाणीव आणि नेणीव या मनाच्या दोन अवस्था असतात. जाणीवे मध्ये अहंभाव असतो,नेणीवेत तो नसतो. 
       निर्गुण परमेश्वराचे सगुण स्वरूप मानता,तर घरात आपले आई-वडील आहेत त्यांची मनोभावे सेवा करा. आपला विवेक सदैव जागा राहायला हवा.दया-क्षमा-शांती हे गूण अंगी उतरवायला हवेत. यातून निर्भेळ आनंद मिळतो. माणसात दडलेले  देवत्व त्याला गवसेल तेव्हा त्याचे अंतर-बाह्य जिवन उजळून निघेल.जो स्वतःस ओळखतो  तोच ईश्वरास जाणतो. 
       आज लाखो वारकरी श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर पंढरपूरला विठू माउलीचे दर्शनास जातात, तशीच श्रद्धा व भक्ती आपण अंगिकारली तर स्वतःला जाणणे कठीण नाही,याच मावूलीचे दर्शन आपल्या अंतरंगात नक्की होणारच. हृदयी वसे श्रद्धा-भक्ती -सबुरी , अंतरंगी गवसे त्यासी  हरी ! बोला पांडुरंग! जय जय  पांडुरंग!
                                                                                                                                                        मंगला