कोंदण चुकले ,हिरा गळला! कोळशा परी जिवनी जळला! संस्कारांचा होता जो कुंभ, नशिबाने फोडुनी केला भंग!
विदुषकाचा मुखवटा असा गळला ,व्यसनात डूबोविनी जिवनी अवकळा, संस्काराचे बीज पदरी अंकुरले ,गोपाला होऊनी त्यानेच सावरले! मातेचे जरी पावूल चुकले,मातेची माता होऊनी ऋण फेडले!
मी मॉरीशसला फिरायला गेले होते. त्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. तेथील स्थानिक कलाकारांचे नृत्य व त्यात काही हौशी नृत्यात सामील झालेले होते काहीजण पेयपान,जेवण याचा आनंद घेत होते. माझी नजर एका टेबला कडे गेली तेथे माझी खूप जुनी सखी बसली होती,हाती मद्याचा प्याला! पाहून मी अवाक झाले. मी तिला एक संस्कारित मुलगी,लहानपणापासून एका सामाजिक संस्थेची स्वयंसेविका म्हणून ओळखत होते.. लग्नानंतरही तिचे सामाजिक कार्याबद्दल,तिला मिळालेल्या पुरस्कारा बद्दल ऐकले होते .व्यसन मुक्तीचे काम तिने वाड्या-पाड्यातून खूप केले होते. तिचा पती तिला एक-एक पेग देवून स्वतःही पिवून जात होता आणि स्वतःत्या नृत्यात इतर महिलां सोबत नाचत होता. तोही एक प्रतिष्ठित व सामाजिक काम करणारा डॉक्टर होता! निरीक्षणांतून मला खूप काही उमजले. त्याचा रंगेल पणा,तिची व्यथित नजर होवून अजून घोट पचवणे खूप काही सांगून गेले.
मी त्या सखी जवळ गेले ,तिचे नाव माधुरी! ,मला पाहून ती इतकी खूष झाली,आणि एखाद्या पक्क्या बेवड्या प्रमाणे बडबडून आनंद व्यक्त करू लागली. हसून झाल्यावर एकदम रडू आले तिला! मला "सॉरी ""सॉरी" म्हणत राहिली. म्हणाली "माझा खामोशी चित्रपट झाला गं! वेड्यांना शहाणे करता करता अशी मीच वेडी झाले.,दुसर्यांचे व्यसन सोडवताना,माझ्या हाती कधी प्याला आला कळलेच नाही "आणि नवऱ्याला खूप घाण शीव्या देवू लागली. "अगं मी पत्नीच्या सन्मानाने नाही गं,रांड होवून राहिले याची! अक्कल नसताना मुलं झाली गं! फसले मी फसले! "तिला रडू आवरत नव्हते. मी कशी साडी नेसायची,पूजा अर्चा,व्रत वैकल्ये, वट सावित्री पूजा,याला नमस्कार करणं,तुळशीला पाणी घालणे,आणि या हल्कटाने बाहेर पाणी घालत फिरायचे! वृक्षारोपण करतो मेला! " मोठ्या संस्थांचा पदाधिकारी म्हणून मिरवतो,पण पक्का शेणातला किडा आहे. सेवेच्या नावा खाली किती गं महिलांना फसवलं याने! पुन्हा वावरतो असा की "तो मी नव्हेच"! याच्या बरोबर राहिले लागले गं! मरायचं प्रयत्न केला मेले नाही गं! माहेरचे म्हणे" चुलीतले लाकूड चुलीत जाळले पाहिजे ,जळते आहे अशी! " मी तिला म्हणले चल मी तुला रूम मध्ये घेवून जाते. तिचे हे रूप मला खूप अस्वस्थ करून गेले. माझेच डोळे ओलावले. काय होती माधुरी आणि काय ही अवस्था!
मी भारतात आल्यावर माधुरीची भेट घेतली आणि तिची सारी कथा ऐकली. समाजातील प्रतिमा व घरातील प्रतिमेत जमिन अस्मानचा फरक होता! तो वयानेही तिच्या पेक्षा दहा वर्ष मोठा होता. स्त्रीला जणू एक जनावर समजून कोणाच्या तरी दावणीला बांधले असा हा प्रकार होता! ज्या सामाजिक संस्थेचे ती काम करायची त्याच संस्थेचे तो कार्यं करायचा. घरच्यांनी व संस्थेने जुळवून केलेला विवाह होता. तिचा पती खूप विक्षिप्त स्वभावाचा होता. लग्नाचे पहिले रात्रीच तू माझी दासी आहेस आणि दासी सारखेच वागवणार तुला म्हणाला होता. माझ्या कुटुंबाची देखभाल आणि मी सांगेन तसेच तुला वागावे लागेल. मी सांगेन त्या मर्यादेत सामाजिक काम करायचे. पक्का संशयी, फक्त महिलां सोबतच काम करायचे . सखी साठी हा खूपच मोठा धक्का होता. काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे त्याचे होते,स्वतः गैर कृत्ये करीत होता ,त्या मुळे बाईको ला मुठीत नव्हे तर पाया खाली चिरडत होता. मारहाणीने त्रस्त झाली होती सखी. घरा पर्यंत येणारी त्याची लफडी तिने व मुलांनी नको ते डोळ्याने पहिले होते. मूले मोठी झाल्यावर तिने माहेरी शिक्षणासाठी पाठवली. घरापासून त्यांना दूर ठेवणे हिताचे होते. माधुरीचे कार्यं पाहून लोक याच्या पेक्षा तिला अधिक सन्मान देतात असें त्याला वाटू लागले.गावात आता माधुरी डॉक्टर ची बाईको म्हणून नाही तर ती सामाजिक कार्यकर्ती म्हणून लोक ओळखू लागले. तिला जी आमंत्रणे यायची त्यावर तिचे नाव व आडनाव काही वेळा असायचे,तर हा म्हणायचं हे निमंत्रण घेवून त्यांना परत दे,आणि माझे नाव मध्ये घालायला लाव,माझ्या मुळे तूला लोक ओळखतात. अशा त्याच्या मी येथे लिहू शकत नाही इतक्या गोष्टी मला माधुरीने सांगितल्या.
आता एकटेपणाने मात्र माधुरीच्या नशिबाचा घात केला,नवऱ्याने तिच्या हाती दारूचा प्याला दिला,आणि तेथेच या संस्काराना तडा जावून मानसिक खचलेल्या अवस्थेत , अधिक खचून सखी व्यसनी झाली! आजारी पडली. सामाजिक काम पूर्णतः बंद झाले. हेच त्याला करायचे होते. तिला घरात असें व्यसनी करून डांबून ठेवले,म्हणजे ही माझ्या पेक्षा अधिक मोठी होणार नाही,हा त्याचा डाव!
माधुरीच्या गावी जावून मी तिच्या सासू सासऱ्यानशी बोलले. त्यांनी पूर्णपणे सुनेची बाजू घेवून आपला मुलगा नालायक आहे. आम्ही त्यापुढे हतबल आहोत. आम्ही मुलां साठी पैशांची व्यवस्था करू,पण आपण माधुरीला येथून घेवून जा! आमच्यासाठी,समाजासाठी खूप केले हो पोरीने,पण आमचा मुलगा नालायक निघाला माहेरी जावून तिच्या आई-वडिलांशी बोलले. गडगंज श्रीमंती व प्रतिष्ठित लोक! त्यांची चांगली कान उघाडणी केली . "आपल्या मुलीला चुलीत जाळण्याचे लाकूड करण्यापेक्षा चुलीत न जाळणारे लाकूड बनवा!" कोणत्या प्रतिष्ठेला घाबरता तुम्ही,त्यासाठी आपल्या पोटच्या मुलांना साहाय्य करायला नको. तुम्ही तिचा विवाह केलात,आपली ही जबाबदारी आहे. आपण मदत केली नाहीत तर मी तिला मदत करेन,पण अशा नराधमा पासून तिची मुक्तता करेन! माझ्या सखीने आज पर्यंत अनेकानंच्या कल्याणासाठी कार्यं केले आहे. आपली मुलगी,स्वतःचे दुखं विसरून,विदुषक बनून जगाच्या सुखासाठी झटली.याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. माहेरच्यांचे डोळे तिच्या मुलांनीही उघडले होतेच ,पण तरी त्यांनी दुर्लक्ष केले होते. कारण त्यांच्या घरात मुला-बाळांची लग्ना व्हायची होती. मुलगी परत आली म्हणजे लोक नावे ठेवतील. मला संताप झाला हे ऐकून ! मी म्हणाले कोणत्या काळात जगता आहात आपण? जो समाज अशा नराधमाना वाळीत न टाकता ,फक्त स्त्रीला दोषी ठरवतो असल्या समाजाचा कसला विचार करता? सखी जे पैसे साठवत होती ते मुलाकडे व्यवहार दिल्याने काही दिवसांचा तरी प्रश्न नव्हता. तेव्हा माहेरच्यानी माधुरी व मुलांना राहण्याची व्यवस्था केली. सासर्यांनी पैशाने मदत केली.
मुलांनी आईचे आई बनून जसे व्यसनी मुलाला आई सुधरवते,तसे तिच्यासाठी वेळ देवून, तिची अवहेलना न करता,ती आपले मूल आहे असें वागवले, प्रेमाने तिला तिच्यातील संस्कारांची जाणीव देवून,तू आम्हाला कसे घडवलेस सांगून ,तिच्या वर औषधोपचार करून तिला व्यसन मुक्त केले. तिच्या सह गप्पा गोष्टी,हास्य-विनोद,तिला चित्रपट चांगले दाखवणे, तिला चांगली पुस्तके,चांगली गाणी,तिला रोज फुले आणून देणे, रोज देव पूजा झाली की तिला नमस्कार करणे या मुळे तिला स्वतःच्या वर्तनाची लाज वाटली व आपण असें वागूनही मूले आपल्याला नमस्कार करतात याने खरे तर तिचे व्यसन सुटले. मुले मोठी होती,कर्तबगार निघाली. माधुरीसाठी तिच्या मुलांनी अथक परिश्रम घेतले. आता मुले कमावती झाली. लग्न झाली. तिला पुन्हा मुलांनी नवा जन्म दिला. तिच्यातील नैराश्या दूर करून तिला आनंदी राहण्यास शिकवले. आज ती मुला-सुनान सोबत खूप सुखी जिवन जगत आहे.
येथे माधुरीवर हा प्रसंग आला,तसेच अनेक पुरुषांच्या जिवनात दूरवर्तनी पत्नी आल्याने असेच प्रसंग आलेले मी पहिले आहेत. काळाचा फेरा काय घडवून आणतो, नशिबाचा फेरा कसं उलट-सुलट फिरत असतो हे पाहायला मिळाले! या कथेतून पालकांनी धडा घायला हवा की मानसिक खच्ची न होता,व्यसनी न होता , आपण धैर्याने जिवन जगायला हवे. समाजाच्या टोचन्यानकडे लक्श ना देता या स्त्री असो वा पुरुष त्यांनी खंबीर पणे तोंड देत आनंदी व यशस्वी जिवन जगावे. आपल्या मुलांच्या जीवनावर आपल्या वर्तनाने जे परिणाम होतात ते मुलांचे जिवन दुखी करून टाकतात. कोणावर कधी आणि कशी वेळ येईल काही सांगू शकत नाही! आपल्या मुलाच्या हिताचा विचार हा व्हायलाच हवा, आणि कोणाचा तोल ढळला तर त्याला कुटुंब व समाजाने प्रेमाने सावरावे! माधुरीच्या मुलांसारखी आई वर जीवा पाड प्रेम करणारी मूले सर्वाना लाभोत ही ईश्वर चरणी प्रार्थना!
मंगला