बालपण कोमेजून, तारुण्याच्या उंबरठ्यावर ज्ञान-ध्येय्याचे शिवधनुष्य खांद्यावर घेत ही तरुण पिढी आज विविध क्षेत्रात आपले नाव उज्वल करीत विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आहेत. लहानपणापासून या मुलांवर अपेक्षांचे ओझे इतके,की त्यांचे बालपण हरवून सारखे स्पर्धेत ढकलले गेले.. यात दोष या पिढीचा कसा? जीवघेणी स्पर्धेने या तरुण पिढीचे निरागस आयुष्यच हिरावून घेतले. गावातून शहरात,शहरातून प्रांतात ,परदेशात कोठेही या मुलांना शिक्षण व नोकरी साठी जावे लागले आहे. हे करताना त्यांना शाळा,होस्टेल ,कॉलेज ,नोकरी,व्यवसाय सर्व ठिकाणी येथील भ्रष्ट राजवटीला तोंड द्यावे लागले आहे. हे सर्व करता करता त्यांचे तारुण्य कधी येते आणि जाते हे विचार करायलाही त्यांना फार फुरसत नाही. मूल जन्माला घालणे हे सुद्धा त्यांना खूप विचार पूर्वक करावे लागत आहे. स्वतःचे घर, गाडी,त्या मूळे कर्ज डोक्यावर घेवून ते प्रगती करीत आहेत. आता हे किती बरोबर व किती चूक हा प्रश्न उरलेलाच नाही.
आपल्याला देशातील सुधारणा या मुलांच्या कार्यक्षमतेमुळे अधिक झाल्या हे मान्यच करावे लागेल. इतकी भ्रष्ट राजवट असूनही आज देश नक्कीच प्रगती पथावर आहे. आपल्याला या मुलांचे पगाराचे आकडे मोठे दिसतात,परंतु त्या मागे त्यांचे अहोरात कष्ट आहेत. पाच दिवस भरपूर काम करून दोन दिवस ते आपल्या चौकटीच्या कुटुंबांसाठी देत असतात. मुलांना सतत दोष देण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा असें मला आता वाटते.
देशाचा विकास हा सहज सरळ कसा होणार? त्या साठी पुरुष-महिला दोघेही अर्थार्जन करू लागले म्हणूनच वेगाने देश विकसित होत गेला ना! महिलांचे चूल-मूल पर्यंतचे क्षेत्र आज हर क्षेत्रात पदे मिळवण्या पर्यंत वाढले. स्त्री-पुरुष मैत्री व समानता आणण्यात ही तरुण पिढीच खूप प्रमाणात यशस्वी झाली आहे. आज मुलेही संसारात आपल्या सहचारीणीला तितकाच हातभार लावतात,हे चित्र नक्कीच कौतुकास्पद आहे. आपले घर सोडून नवे घर पाहणे,तेथे स्थीर होणे हे सोपे नसते,या बाबतीत या मुलांना शाबासकीच द्यायला हवी!
आपले पालक आपल्या घरातील स्त्रियांशी कसे वागत होते हे पाहून ही मूले त्यातून चांगला धडा घेवून आपल्या कुटुंबियांशी मैत्रीचे नाते ठेवून ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरुणानकडे वेळ नाही कोणासाठी ही बाब आपण त्यांची कार्यक्षेत्र पाहून त्यांची अडचण लक्षात घ्यायला हवी. तरुणांना म्हातारपणाची काठी समजणे सोडून द्यायला परिस्थितीने भाग पाडले आहे,आता त्यावर चर्चा न करता तोडगा काढणे हेच आपल्या हाती आहे.
प्रगतीच्या वाटचालीत कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था डळमळीत झाली. लहान मुलांच्या व वृद्धांच्या समस्या भेडसावीत आहेत. त्यासाठी पाळणाघरे व वृद्धाश्रम ही समाजाची निकड होवून बसली आहे. तरुणांना या बाबत पूर्ण जबाबदार धरता येणार नाही,कारण आपणच त्यांना मोठे होण्याची स्वप्ने दाखवली आहेत. आता पक्षी पंखात बाल आणून उडायला लागले आहेत. त्यासाठी जिवननीती बदलणे हाच मार्ग आहे.
आता माणूस म्हणून जन्माला आलो,तरी पक्षान प्रमाणे जिवन जगायला शिकणे हे प्रत्येकाने स्वतःला समजवायला हवे. आपण अधिक निरोगी कसे राहू त्यासाठी बाल,तरुण,वृद्ध सर्वानीच काळजी घ्यायला हवी. जेव्हा मुलेही देश-परदेशात आजारी पडतात,अजून काही संकटे येतात,त्यांना त्यांच्याच बळावर त्या समस्या सोडवाव्या लागतात. तरुण पिढी आपला मित्र परिवार वाढवून एक-मेकांच्या सुखा-दुखाला उपयोगी पडते हे प्रशंसनीय आहे.
पालकांनीही आपले नातेवाईक व मित्र परिवार यांच्याशी चांगले संबध ठेवून एक-मेकास मदत केली, सेवा भाव ठेवला तर त्यासाठी वृद्धाश्रमात जाण्याची गरज भासणार नाही. "एक-मेका साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ",या प्रमाणे जी चार भीतीत जगण्याचा व आपल्या पुरते पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. एकत्र कुटुंबात कामाची विभागणी व्हायची,आता विभक्त कुटुंबात मात्र प्रत्येकालाच कोणत्याही वयात सक्षम असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपले ज्ञानाच्या कक्षा काळा सोबत वाढविणे गरजेचे आहे. तसे केले तरच ते सर्वांच्या हिताचे आहे. वर्तमान परिस्थितीत आपली जिवननीती आपण बदलायला हवी. गृहस्थाश्रामातून वानप्रस्थ आनंदाने स्वीकारायला हवा व आपल्या जिवनाची वाटचाल सुखाची कशी होईल यासाठी प्रयत्नशिल राहायला हवे.चिंता करून प्रकृती बिघडवणे व त्या मूळे लवकर आजारांना निमंत्रण देणे हे आपणच आत्मचिंतनाने थांबवायला हवे .
पक्षां प्रमाणे जिवन जगणे ही जिवननीती,तारुण्यास जोपासा न वृद्धत्व लागेल पाठी!
मंगला