विवेकानंदांचे वाक्य नेहमी आठवते मला की मानवाला ईश्वराने प्रदान केलेल्या बुद्धीच्या एक हजार पट भागातील केवळ एक भाग तो वापरतो! खरेच आहे हे. आपण जस-जस स्वतःचा शोध घेतो तेव्हा आपल्यातील खजिना आपल्याला गवसतो!
एकच व्यक्तीत अनेक गुणांचे भांडार असते. विविध गोष्टींचे ज्ञान हे त्या व्यक्तीस प्रगल्भ करीत असते. कला,वाणिज्य,शास्त्र व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख प्रत्येकासच हवी ,त्या शिवाय ज्ञानास परिपूर्णता येत नाही!
मला शाळेपासूनचे सारे विषय आठवले. तेव्हा शिवण,संगित,कार्यानुभव ,चित्रकला,हस्तकला हे विषय अभ्यासाच्या विषयां सोबत असायचे. त्याचा खरच नंतर खूप उपयोग होतो,हे मला आज कळते. शालेय जिवनात अभ्यासा सोबत खेळ असायचाच. घरातील कामेही असायची,परंतु तरीही विणकाम,भरतकाम इतर कलाकुसर खूप करायचो आम्ही मैत्रिणी. वायरच्या बास्केट, त्यांचे वेग-वेगळे आकार,सुतळीच्या आणि वायरच्या मणी ओवून पिशव्या,पर्स कितीतरी गोष्टी करायचो. बारीक मण्यांचे गळ्यातील लफ्फे, पिठाच्या चाळणीवर रेशमाने ताजमहाल,गुलाबाची फुले व त्याची केलेली फ्रेम अजून सुंदर आठवणीत नेते. क्रॉस स्टीचच्या कापडावर गणपती ,इतर काही नक्षीकाम करून पडदे,बेडशिट,उशांची कव्हर किंव्हा साध्या कापडावर नक्षी काढून ती रेशमाने काश्मिरी,टाके,गव्हाचा टाका,अळीचा टाका,साखळी याने भरतकाम करीत असू. लोकरीचे स्वेटर,टोपी,मोजे, आजीला चंची कितीयेक गोष्टी केल्या होत्या. लहान बाळांसाठी झबली,टोपडी,कुंची सारे काही घरातच स्वतः शिवण्याची सवय होती. ससुल्याची टोपी कर,सुंदर वेग-वेगळ्या आकारांची झबली कर , वेग-वेगळ्या आकाराचे कापडाचे तुकडे जोडून सुंदर दुपटी सारे काही करण्यात किती आनंद असायचा. बाळंत विडे आपणच करून दिले की त्यात किती आपलेपणा वाटायचा. लग्नात रुखवतासाठी काही बनवून देण्यांत मजा असायची. गोदडी ही आम्ही घरीच शिवायचो. तेव्हा प्रत्येकाला त्या मऊ गोदडीची उबच आवडायची.
ओर्गांडी आणि वेल्वेट ची फुले करायला ही मी शिकले होते. तीही बनवून मी कित्येकांना भेट म्हणून देत असें. संसारातील रगाड्यातून विश्रांती म्हणजे हा कामातील बदल असें. पटकन मशीन वर बसून घरातील काही शिवणकाम ,कुर्डया-पापड्या,पापड,लोणची धन्य वाळवणे, सरबत,सॉस ,तिखट,मसाला करणे हे सारे कामातील बदलच असत. हॉटेल प्रकार माहित नव्हता,त्या मुळे सर्वच पदार्थ घरी केले जात,त्या मुळे पाकशास्त्र चांगले समजत गेले.
हस्तकला,चित्रकला,पेंटिंग ही भेटकार्ड व इतर भेट वस्तू सण-समारंभ ,वाढादिवसाला देत असू. त्यामुळे घरीच मुलांना भेटकार्ड इतर वस्तू बनवायला तेव्हा शिकवायाचे. फार काही सुंदर येत नसे,पण काळ्या पेन ने सुरुची झाडे,घर इतर काही,किंव्हा रंगानी स्प्रेय करून,त्यावर कसले ठसे उमटवून, फुले,पाने रंगवून छान दिसायची ती! मुलांनीच केलेले असले,की त्यांना आनंद वाटायचा. शाळेत स्नेह संमेलनात भाग घेतला की घरूनच कधी मुकुट,तर कधी हनुमानाचा वेश,शेपटी पासून करून द्यावे लागायचे. सवई गंधर्व,भीमसेन,वसंतराव देशापणे , कुमार गंधर्व.इत्यादींची गाणी ऐकणे,एक वर्ष पेटीच्या क्लासला जाणे याने निदान कानाला स्वर तरी कळू लागले व त्याची आवड कायम राहिली. विविध भाषातील चित्रपट,नाटके खूप पहिल्याने त्यानेही ज्ञान वाढले.
व्यवसाय करताना वाणिज्य थोडे कळले व कारखाना चालविताना मशीन दुरुस्ती पासून ते तो जॉब पूर्ण करे पर्यंतची सारी प्रक्रिया समजली. दुग्ध व्यवसायात त्या व्यवसायाचे ज्ञान मिळाले. पापड व्यवसायात मिठवणी करण्यापासून ते पोह्याच्या पापडाचे पीठ भिजवून त्याची मिरगुंडे व पापड याचेही ज्ञान मिळाले. कापड उद्यागातून दुकानदारी कळली. कोंबड्या पाळण्यातून कुकुट पालनाचा व्यवसाय कलाल. शेतात भाजी लावणे,नारळाची झाडे लावणे ,धान्य लावून घेणे यातून शेती व्यवसाय कळला. घरात किरकोळ विजेचे काम असो,रंगाचे असो नाहीतर गवंड्याचे हे घरीच मी करीत असें. मोठ्या कामांसाठीच माणूस बोलावलं जात असें. पाट्यावर वाटण ही सुद्धा कलाच आहे, मोठ्या घराचे केर काढणे वेळेत चांगली कामे करणे या सुद्धा कलाच आहेत. या सर्वातून वेळेचे व कामाचे नियोजन व व्यवस्थापन कळते. घर,व्यवसाय व सामाजिक कामा मुळे माझी तिहेरी काम करण्याची क्षमता झाली होती.
आता शहरात आल्यावर बँकिंग, कॉम्पुटर सारे यायलाच हवे. पुन्हा थोडे काही विषयां मधील शिक्षण घेतले. घर आणि बाहेरची कामे त्यामुळे कामाचा वेग वाढतो. त्यामुळे ज्ञान वाढले. मुळे परदेशात असली तरी आपण आपले जिवन जगू शकतो.घर खरेदी ,कचेरीत जाणे, बिले भरणे,बँकेत जाणे हेही सर्व व्यवहारज्ञानात भरच पाडत असतात. इंटरनेट चे ज्ञान घर बसल्या जग जवळ आणते.
शाळेत काय ते निबंधा ,व स्पष्टीकरण लिहिली असतील, त्या पलीकडे कधी काही लिहिले नव्हते. येथे फेसबुक,ग्लोबल मराठी सर्व मुळे मला लेखनाची,वाचनाची ,विचारांच्या देवाण-घेवानाची आवड उत्पन्न झाली. त्या जोडीनेच फुलांच्या रचना,वेग-वेगळ्या कलाकृती,थोडीफार पेंटिंग जे सुचेल ते करणे सुरू झाले. हातात कॅमेरा आला आणि निसर्ग,फुलांच्या रचनांचे फोटो पोस्ट करू लागले. त्यामुळे सौदर्य दृष्टी वाढली. बागकामाची आवड आहेच त्यामुळे वनस्पती शास्त्रातील ज्ञान वाढले. बीएससी प्राणीशास्त्रात झाल्याने त्यातील ज्ञान व औषध या विषयातील ज्ञानही मी सरावाने शिकले. त्यामुळे सहसा डॉक्टरकडे जावे लागतच नाही. समाजकार्य करताना अनेक समस्या सोडवताना थोडे कायद्याचे ज्ञान, समाजशास्त्राचे पुस्तकातील नाही,तर त्यांच्यात काम केल्याने कसा सर्वांगीण विकास आवश्यक आहे हे कळते. माणसातील देव दिसण्याचे ज्ञान प्राप्त होते.
पर्यटनाचे आवडीने देश विदेशातील भूगोल व इतिहासाचे ज्ञान वाढवले माणूस,त्याची रहन-सहन,भाषा, तेथील विविधता, विशेषता या पाहून जगाचे ज्ञान थोडे तरी मिळते.
योगासन वर्ग केला,त्याने योग विद्या थोडीशी समजली . खेळाडू असल्याने क्रीडा शास्त्रातील थोडी माहिती झाली. व्यायामाची आवड असल्याने त्यातीलही प्रकार माहिती झाले. वाहन चालवीत असल्याने त्यातीलही थोडे ज्ञान. या सर्व ज्ञानाने आपले व्यक्तिमत्व घडत जाते. आत्म-विश्वास वाढतो.
निसर्गाशी बोलण्याची सवय झाली,म्हणून निसर्गातील विश्वशक्तीचे थोडेसे ज्ञान! असें सर्व ज्ञानाचे पोतडे असते आपल्यातच,त्यामुळे आपण स्वतःला कधी कमी लेखू नये. आपल्या अंतरंगात समाधान वसले की ईश्वर गवसला समजावा!
कोणाशीही स्पर्धा न करता ज्ञान प्राप्तीचा घ्या वसा,त्यातूनच ईश्वर आहे हा ठेवा भरवसा!
(आपण ही सर्वांनी आपले जिवनातील अनुभव सांगावेत,त्यामुळे माझ्या ज्ञानात अधिक भर पडेल)
मंगला