Wednesday, December 8, 2010
Friday, December 3, 2010
Wednesday, December 1, 2010
देवाजीच्या पुस्तकातील एक पान.........!जितेपणी आपुल्या मानसासी पुसा! पितरांच्या नावान त्या कावळ्यासी का रे देसा?
काव!काव!.....काव!काव! शेजारच्या घरातील घरातले सगळेजण लहान-मोठे हात जोडून त्या कावळ्याला विनवणी करीत होते! कावळा मात्र येरझार करीत त्याला यायचे तेव्हाच चोच मारून गेला! तो पर्यंत हे काव-काव चालूच होते! माझ्यासाठी हा प्रसंग नविन होता! हा काय प्रकार आहे म्हणून सासू बाईना विचारले. त्या म्हणाल्या माहित नाही का तूला ? आज पितरी आमावस्या आहे!
मी कुतूहल म्हणून पाहायला गेले. तर आणखीन पलीकडे ताट तयार करून आणले होते. त्यात भजी,वडे,जिलबी,सुरमई माशाची तळलेली तुकडी,आणि वर अजून अजब प्रकार म्हणजे,दारूची बाटली आणून थोडी दारू त्या ताटावर शिपडली! मला अगदीच राहावे नाही,म्हणून मी सुनीलला विचारले हा काय प्रकार आहे. तर तो अगदी भोळे-भाबडे पणाने सांगू लागला" काकू! त्या सचिनचा आजा गेला ना,त्यो ना , दारू लै ढोसायचा!,अन त्याला ही सुरमई तर लैच आवडायची बघा! कधी-मधी ग्वाड भी खायचा,म्हणूनशान जलेबी भी थेवलिअया . आता कावल्याला काय पसंद पडल,अन तोचं मारलं,ते ह्या म्हाताऱ्यानी खाल्लं असा तुम्ही समजा! तो कावळा तोचं मारल्या बिगर काव काव करत राहायचा! आपला पितर येतो नाही का त्यो'! हे ऐकून कपाळाला हात लावला मी!
घरी परत आले ,तर अलीकडे-पलीकडे सगळीकडे तोचं काव-काव चा आवाज! सकाळी लवकर उठून गृहिणीनी त्यांच्या घरातील जे कोणी स्वर्गवासी झाले होते,त्यांच्या आवडीचे पदार्थ केले होते. खिशात पैसे नाही तर उधार-उसनवार केली,कारण पितरांना जेवायला घालायचे होते. अनेक ठिकाणी मास-मच्छी,आणि दारू शिपडणे ताटावर चालू होते.कावळे ते इतकं सार खावून आणि दारूच्या नशेने झीन्गतच असावेत! त्यामुळे कोणाचे ताटात कावळ्याने आधी टोच मारली त्यांची काव-काव थांबली! आणि तृप्त झालेले व झिंगलेले कावळे येत नाहीत तर चर्चा चालू,"बया कावळा नाय ग तो शिवला अजून,म्हातारीची विच्छा अधुरीच राहिली".,तर कोणी म्हणे म्हातार्याची इच्छा अधुरी राहिली. चर्चेला वाव मिळत होता! मला हे सगळा पाहून हसू येत होत.
जिवंतपणी या लोकांचे हाल चालले होते. खायला मिळत नाही म्हणून भांडणे चालायची. इतकी बरस खाल्लात ना? जीव नाय भरला का म्हातारे?(काहीं ठिकाणी म्हातार्या) त्या पोरांच्या त्वांदातून घास काढून काय तूला देवू काय? असे संवाद खूप वेळा ऐकले होते. जी माणसे असे म्हणायची तीच हात जोडून कावळ्याला पितरे म्हणून खाण्यासाठी येण्यास विनंती करीत होती! सारा काहीं अजबच प्रकार!
मी खूप विचार केला,कि या विषयावर काहीं तरी करायला हवे. नंतर एक दिवस मीटिंग बोलावली मरीआईच्या देवळात. सर्वांच्या पुढे शांतपणे विषय मांडायचा ठरवले. त्यांच्या भावनाही दुखवायच्या नव्हत्या.
सर्वांना मी म्हणाले की" अरे जितेपणी आपल्या मानसासी पुसा,पितरांच्या नावान त्या कावल्यासी का देसा"? म्हणजे जिवंतपणी आपल्या माणसाला जे हवे-नको ते बघा,तो गेल्यावर तो पितर होऊन कावळ्याच्या रुपात येईल म्हणून त्याला का देता? कावळ्यात पितर तुम्हाला दिसतो आहे का? ही माणसे जिवंत तुमच्या समोर जेव्हा दिसतात तेव्हा त्यांना द्या! त्यांना पहा!
हा विषय त्यांना नीट समजावला. की असा गेलेला माणूस दारू प्यायला,मासे खायला येणार आहे का? दारू ही काय देण्याची वस्तू आहे का? मी त्यांना म्हणाले,त्यातले काहीं बाहेख्याली होते,त्यांना बाई आवडायची,मग तिलाही पानावर ठेवणार कि काय? तेव्हा हशा पिकला. सर्वजण हसू लागले. काकू काय बी बोलताय तुम्ही. मी म्हणाले खरे तेच सांगितले. त्या पेक्षा जिवंतपणी एक तीळ सात भावांनी खाल्ला, त्या प्रमाणे जे असेल ते सर्वांना देत जा. कधी म्हातार्या माणसाला काहीं वेगळं खावंसं वाटते,ते द्यावे. म्हातारी माणसे हे लहान मुलेच असतात. त्यांचा मान राखायला हवा,त्यांना जिवंत पणीच हवे ते मिळाले,तर त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला. मग काहीजण हा,बराबर सांगतायत काकू! असे म्हणाले. मी हेही सांगितले की दारू किंव्हा इतर व्यसनांचे लाड करू नका. पोटभर,हवे ते शक्य असेल तसे खायला द्या. त्यांची मनापासून आजारपणात सेवा करा. थोड्या-फार प्रमाणात तरी घरातल्या म्हातार्यांना हवे ते मिळू लागले .काव-काव मात्र थांबली नाही. ती अजूनही थोडीफार चालू आहे.
हे फक्त गावातच आणि गरिबांच्या घरात चालते असे नाही तर सुशिक्षित आणि शिकलेल्यान्च्या,श्रीमंतांच्या घरात वेगळ्या पद्धतीने चालते. प्रकार एकच की आधी जिवंतपणी आपल्या माणसाना नीट पहात नाहीत. त्यांना जिव्हाळ्याने वागवत नाहीत,आणि ते गेल्यावर आपल्याला त्रास देऊ नये म्हणून श्रद्धा-पक्ष करीत बसतात.
सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या माणसाना आपुलकीने जिवंतपणीच वागवा, त्यांना काय हवे ते द्या ,म्हणजे ते गेल्यावर काहीं असली कर्म-कांडे करण्याची गरज भासणार नाही!(ज्या लोकांना कर्म-कांडात रस आहे ,त्यांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही,मी त्यांची मी माफी मागते. मूळ लेखाचा हेतू समजून घ्यावा,गैरसमज करू नयेत!)
Thursday, November 25, 2010
अजाणतेपणाने केलेल्या मैत्रीत होऊ शकतो विश्वासघात..........जाणूनी एक-दुज्यासच करावा पुढे मैत्रीचा हात!
मनात विचार-चक्र चालू होते. मैत्रीचा अर्थ या मुलांना न उमजल्यामुळे, आज सुप्रियाला आपले प्राण गमवावे लागले होते. ज्याला ती आपला प्रियकर म्हणत होती,त्याने माझी-तिची ओळख नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. ज्यांचे सोबत मैत्रीण म्हणून गेली,त्या मुलीनीही मैत्रीची पाठ फिरवली होती. नुसत्या तोंड-ओळखीला मैत्री समजून काय होते,हे चित्र पाहायला मिळाले होते.खूप संतापजनक आणि विचार करायला लावणारा हा प्रसंग होता!
दोन वर्षान पूर्वी मी law कॉलेजला शिकायला जात होते ,त्यामुळे मला आजची पिढी अजून जवळून पाहता आली. काही ओळख-पाळख नसताना,कोणीही मुलगा मुलीला म्हणायचं,मला friendship देतेस काय? अरे friendship म्हणजे काय भाजीपाला आहे? की देतेस काय विचारायचे,आणि याही मुलीनी आपल्याला कोणी friendship मागत आहे ,या आनंदाने हो दिली म्हणायचे! हा प्रकार पाहून मी तर चक्रावूनच गेले होते. .
रविवारचा दिवस.......मस्त पाऊस पडत होता! बहिणीचा फोन आला,की मुळशीला जायचे का फिरायला. मी लगेच हो म्हणाले,मलाही असा पावसात फिरायला, हिरवीगार शेते पाहत,डोंगर दर्यातून वाहणारे धबधबे पाहायला खूप आवडते. आम्ही निघालो मुळशीला. पुण्या पासून ४० किलोमिटर आहे. मस्त छान गाण्याच्या भेंड्या म्हणत आम्ही मजेत मुळशीला निसर्गाचा आनंद घेत पोहोचलो. तेथील एका हॉटेल मध्ये भजी छान मिळतात असे बहिण म्हणाली,म्हणून गाडी तेथेच थांबवली.
पाऊसही जोरात पडत होता. धबधबा पाहायला जायचे होते. आम्ही भजी order केली आणि बसलो. तितक्यात काही कॉलेज युवती आणि युवक तेथे आले. आणि ते घाबरलेले दिसत होते. आम्हाला त्यांची कुजबुज कानी पडली. एका मुलीला युवक काही समजावत होता,तिला रडू आवरत नव्हते. काहीतरी त्यांच्यात झाले असेल,म्हणून आम्ही लक्ष दिले नाही.परंतु दुसरी मुलगीही रडत होती. तिलाही दोघे समजावत होते.त्यांच्यातील बोलणे कानी पडले,की सुप्रिया वाहून गेली,पण आपण तिच्या बरोबर नव्हतोच असे सांगू ,घाबरू नका. आपण येथून लगेच निघून जाऊ. आणि ते जायला निघाले. मी आणि माझ्या बहिणीने हे ऐकले,तसे आमच्या काळजात चर्र झाले! आम्ही दोघी त्या मुलं-मुलीना थांबवले आणि काय झाले विचारले. आधी कोणी काही सांगण्यास तयार होईना. आम्ही जरा त्यांना धाकानेच विचारले,तेव्हा एक मुलगी पटकन रडता रडता सांगून गेली,की आम्ही धबधबा पाहायला गेलो,पण त्या पाण्यात उतरलो,आणि दगडावरून पाय घासून सुप्रिया वाहून गेली. अजून एक मित्र पण पडला त्याला खूप लागले आहे. आम्ही त्यालाही तेथेच सोडून आलो आहोत. हे ऐकून आम्ही दोघी खूप संतापलो.
सुप्रियाच्या घरी ही सारी मूले-मुली जमून नंतर येथे फिरायला आली होती हे त्यांच्या कडूनच कळले. आणि आता असा प्रसंग झाला,तर आमची त्यांची ओळखच नाही म्हणत होती. नुसतीच कॉलेज मध्ये ओळख झाली,येथे फिरायला येण्याचा आमचा बेत ठरला,म्हणून आम्ही आलो. आम्हाला कशात अडकायचे नाही म्हणाली. सर्वांनी मद्य प्राशन केले होते. त्यामुळे पोलीसान कडे गेलो,तर आपणच अडकू ही भीती! हे पाहून आणि ऐकून आम्ही त्यांना मुस्कटात देण्याचीच भाषा केली. त्यांना म्हणालो,की तुम्हाला थोडीशीही लाज वाटत नाही,की आपली एक मैत्रीण ,वाहून गेली आणि दुसर्याला उपचारासाठी न्यायचे सोडून,पळून जाण्याचे ठरवता. कसली ही तुमची मैत्री? आधी रागावलो,नंतर त्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत ,तुम्हाला काहीही त्रास होणार नाही,आधी त्या जखमी मुलाला उपचारासाठी पाठवू या हे समजावले. तेव्हा कुठे ते तयार झाले. त्यांना सोबत घेऊन आम्ही मुलाशी पोलीस स्टेशनला तक्रार रीतसर नोंदवली. पोलिसांना घेऊन त्या मुलाला उपचारासाठी त्या मुलांसमवेत पाठवले. जखमी मुलगा ,म्हणे तो तिचा प्रियकर होता. एक-मेकांशिमास्ती करताना ती वाहून गेली,आणि कसा-बसा वाचला. पोलिसांनी विचारले,त्याला सुप्रिया बद्दल तर निर्लज्जपणे मी तिला ओळखत नाही म्हणाला. नंतर तिचा मित्र आहे म्हणून कबूल झाला.
खूपच जोरात पाऊस पडत होता,धबधब्याचे पाणी खूपच जोरात कोसळत होते. अशा परिस्थितीत ही मूले,पोहता येत नसताना का तेथे गेली? पोलिसांनी सुप्रियाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,ती मिळाली नाही. सुप्रियाचा विचार करीतच आम्ही घरी आलो. काही सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सुप्रियाची बातमी आली होती. ती दुसऱ्या दिवशी पोलिसांना टनेल मध्ये मृतावस्थेत मिळाली होती!
या मुलांची अशी मैत्री पाहून मन सुन्न झाले. की का कळत नाही या मुलं-मुलीना? जराशी ओळख झाली,की मैत्री म्हणतात. अशा प्रसंगातून आज एका मुलीचा प्राण गेला होता. स्वतःच्या जीवाच्या भीतीने तिला कोणी वाचवू शकले नव्हते. नाही वाचवू शकले,तरी अंगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा हवा,की तिच्या घरी कळवणे ,परंतु तेही नाही. ही कसली मैत्री? पालकांना जुमानत नाहीत,आणि होस्टेल वर राहणाऱ्या मुला-मुलींचे पालक तर दूर असतात. सुप्रिया आणि एक मुलगी फक्त पुण्यातील होत्या,बाकी चारही जण ,बाहेर गावचे होते. ज्या विश्वासाने शिक्षण घेण्यासठी,पालक दूर मुलांना ठेवतात,त्यांचा किती विश्वासघात करतात ही मूले! मैत्रीचा आणि त्याबरोबर स्वतःचाही घात करून घेतात. सुप्रिया एकुलती एक अपत्य होती. तिच्या पालकांचे काय? काय करायचे त्या पालकांनी? तरुण पिढीला स्वातंत्र्य हवे,पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करायचा की सदुपयोग,हे या मुलांनीच ठरवावे. राहणीमान,शिक्षण याने सुसंस्कृत ,सद्गुणी बनले पाहिजे, की असे स्वार्थी आणि अवगुणी ? त्यांचे स्वार्थी आणि कमी समजेमूळे त्यांना आणि समाजाला दोघानाही ही परिस्थिती घातक ठरणार आहे..
मैत्रीचा अर्थ विश्वास,प्रेम , एक-मेकांचे गुण-दोष स्वीकारून मैत्रीचा स्विकार,एक-मेकांना सुख-दुखाचे प्रसंगी मदत हा आहे. थोड्क्याश्या ओळखीने कोणाबरोबर कुठे जाणे,हे अतिशय चूक आहे. वर्षानुवर्षे बरोबर राहून माणूस एक-मेकाला पूर्णपणे ओळखू शकत नाही,तर नुसती तोंड-ओळखीने लगेच मैत्री कशी होते? सहवासाने एक-मेकांचा परिचय वाढतो,तेव्हा थोडे थोडे समजणे चालू होते. माझी तरी सर्वाना विनंती आहे,की पारखल्याशिवाय मैत्री पुढे वाढवू नका..जीवाला जीव देणारी मैत्री हवी, असा जीव घेणारी नको. आजचा हा प्रकार पाहून या असल्या अजाणतेपणाने केलेल्या मैत्रीमुळे सुप्रिया स्वतःचे प्राण गमावून बसली होती,म्हणून एक-मेकांना जाणल्या शिवाय मैत्रीचा हात पुढे करू नका!
अजाणतेपणाने केलेल्या मैत्रीत होऊ शकतो विश्वासघात..........जाणूनी एक-दुज्यासच करावा पुढे मैत्रीचा हात!
मनापासून विचार करा खरोखरी! बालांचे प्रश्न घेऊ या सारे मनावरी!
आम्ही बी घडलो.....तुम्ही बी घडाना! अगदी सत्य सुंदर आहे. परंतु या लहान जीवानी कोणाकडे पाहून घडायचे? हा मोठा जटील प्रश्न आहे.सारा जनसागर नीती आणि पैसा याच्या भ्रष्टाचाराने गढूळ झाला आहे. या मुलाच्या खळ-खळ वाहणाऱ्या विचारांच्या नद्या कशा घडणार? असल्या गढूळ सागरामुळे,सारे काहीं दुषित वातावरण समाजाचे झाले आहे. भौतिक सुखांचा उच्चांक गाठला जात आहे. दूरदर्शन वर लहान मुलांनी पाहू नये असे जाहिराती,मालिका चित्रपट सार्यातून प्रदर्शित होत असते. विभक्त कुटुंब पद्धतीचे फायदे आणि तोटे यांचा दुहेरी परिणाम मुलांवर झाला आहे. मुळे खूप वयाच्या मनाने अधिक हुशार होत आहेत,परंतु,त्यांचे बालपण ती विसरत आहेत.
वर्गात खूप मोठ्या संखेने विद्यार्थी असल्याकारणाने,त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात नाही. घरी पालकांना वेळ नाही. मुळातच येथे निष्ठा नसणे सुरु होते,कारण,शाळा,आणि शिकवणी सारया ठिकाणी मुळे पाट्या टाकल्या सारखी जातात. अभ्यासाच्या ओझ्याने आणि जीवघेणी स्पर्धा,त्यामुळे या लहान जीवांवर खूप ताण येतो. आपले मूळ वर्गात पहिले आले नाही तरी चालेल,परंतु त्याला त्याच्या रुची पाहून त्यात त्याच्या प्रगतीला हातभार पालकांनी लावणे गरजेचे आहे.
अगदी 3-4 वर्षांची मुळे चुरू-चुरू काहीही प्रश्न विचारतात,की त्यांच्या बाळ-मनातील प्रश्नांना उत्तर देणे कठीण होऊन बसते. आपल्या आर्थिक गरजा कमी करून आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.शिक्षण झाले आहे,म्हणून काहीहीकारून सर्वच स्त्रियांनी नोकरी केलीच पाहिजे का? स्त्री-किंव्हा पुरुष एकाने कोणी नोकरी करून घर चालणार असेल,तर एकाने घर सांभाळावे. घरी राहूनही काहीं करता येऊ शकते. आपली मानसिकता बदलली पाहीजे. त्या शिक्षणाचा उपयोग,आपल्या मुलांसाठी,कुटुंबासाठी,समाजासाठी नक्कीच होतो. कुटुंबाला गरज असेल,तर जरूर अर्थार्जन करावे,परंतु गरज नसेल,तर आपले मुल,आणि कुटुंब पाहाणे यात कमीपणा वाटण्याचे काहीच कारण नाही. नुसते बालदिन साजरा करून उपयोग नाही. त्या बालांचे प्रश्न सोडविण्याचा सर्वांनी प्रयत्न करायला हवा.
दुर्बल घटकान मध्ये अजून खूपच वेगळी परिस्थिती आहे. स्वतःचे घर नसताना,व्यसनी असताना,अनेक मुले जन्माला घालून,अजून दारिद्र वाढविण्याचे जोरदार काम चालू आहे. दारिद्ररेषेखालील लोकांची संख्या!!......अरे ही दारिद्र्यरेषा वाढतच जाणार आहे. दारू-जुगारीचे अड्डे सर्व ठिकाणीच वाढले. दूरदर्शन चा वेडे करणारा box घरोघरी.भौतिक सुखाची चटक लागलेली जनता चिंतेत मग्न होऊन बसली आहे सारी! झोपड पट्टी,पदपथांवर राहणारी मुले,बिचारी! त्यांचा काहीं दोष नसताना असे जिवन त्यांना जगावे लागते. बाल-मजुरांची संख्या दिवसेन-दिवस कमी होण्या ऐवजी वाढतच आहे. चौका-चौकातून शहरामध्ये काहीं वस्तू ,गजरे काहीही विकण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता उन्हा-तान्हातून पोट भरण्यासाठी कष्ट करीत असतात. कायदे आणि त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सर्व शहरान भोवती झोपडपट्टी आणि वसाहती कशा उभ्या राहिल्या? त्यांना कोणी विरोध का केला नाही? कारण ह्यांचा फायदा राजकारण्यांना एक गठ्ठा मते मिळण्यासाठी होतो.कधी कळणार आहे या लोकांना.तर श्रीमंतांची वेगळी स्थिती,नको तितके लाड,आणि नको तितके मुलाच्या हाती पैसे देणे,त्याचेही दुष्परिणाम मुलांवर होतातच!
सामाजिक संस्थानी यांचे साठी काम करून समाजासाठी काहीं केल्याचे समाधान मिळवायचे,आणि राजकारण्यांनी दारूचे जागो-जागी अड्डे काढून समाजाला बिघडवयाचे. काय ही तऱ्हा! मला तर तेव्हा राजकारणातील काहीं लोक असेच म्हणत,सामाजिक कामे करायला आहेत की तुमच्यासारखी माणसे,आम्ही काय मतदानाचे आदल्या दिवशी गेलो की पुरे!आमचे काम होते.शिक्षण-संस्थांपासून साऱ्याच संस्था भ्रष्टाचाराने पोखरल्या आहेत. अशा या परीस्थित आपली मुले जी घडत आहेत,ती काय पहात आहे,काय वर्तमानपत्रात रोज वाचत आहेत ,किंव्हा बातम्या ऐकत आहेत,याचा त्यांच्या अन्तर मनावर परिणाम होऊन त्यांचा कशावरच विश्वास उरलेला नाही. ना आपल्या घरावर,माणसांवर,आणि या देशातील राजकारण्यांवर! दिशाहीन समाज आपणच घडवतो आहोत! नुसतेच बालदिनाचे फलक,नेहरूंचे चित्र आणि मुलांना खाऊ-बक्षीस देऊन,काय त्या दिनामुळे विशेष बदल या मुलामध्ये घडणार हे मला कळत नाही! हा ही एक पाटी टाकण्या सारखाच कार्यक्रम असतो.
या बालांवर रोज घरातूनच आई-वडील,मोठी माणसे,गुरुजनांचा आदर ,देशप्रेमाचे बाळकडू दिले जायला हवे! आपण त्यांच्या जीवनाला जसा आकार देऊ,तसेच त्यांचे जिवन घडेल! त्यांना त्यांचे लहानपण उपभोगू द्या. नुसतेच घोकम-पट्टी करून पोपट नका बनवू, त्यांना अभ्यास म्हणजे खरा स्व अभ्यास वाटू दे! थोडा खेळ थोडी मस्ती हवीच! दिवाळीला दारात चिखलात हात घालून किल्ला बनवू द्या, आपल्या संस्कृतीचा त्यांच्यावर चांगला परिणाम व्हावा असे प्रयत्नशील राहायला हवे. नक्कीच त्याचा मुलांवर परिणाम चांगला होतो,हे मी अनुभवाने सांगत आहे. लहानपण देगा देवा ,मुगी साखरेचा ठेवा! असेच मुलांना वाटायला हवे, नाहीतर या जीवघेण्या स्पर्धा आणि अभ्यासाच्या ओझ्यामुळे लहानपण नको देवा असे म्हणायची पाळी येईल या मुलावर!
मनापासून विचार करा खरोखरी! बालांचे प्रश्न घेऊ या मनावरी!
छंद हीच माझी साधना.......उमजली मज अंतरंगाची भावना!
माझ्या स्वयमपाकघरा जवळच मी बाग केली आहे . त्यामुळे laptop ,कॅमेरा ही आयुधे टेबलावर नेहमीच असतात. काम करता करता फुलपाखरू दिसले,पक्षी दिसला,फुलांची रचना सुचली की लागलीच ती केले जाते आणि laptop वर टाकून फेसबुक वर पोस्ट केली जाते..अनेकानी मला प्रश्न विचारले,की तुम्हाला इतका वेळ कसा मिळतो,तुमी कशा कलाकृती बनवता,म्हणून हे सांगण्याचा प्रयास मी केला आहे!
दोन वर्षांपूर्वीची ही घटना ! माझी किंकाळी ऐकून,संगिता धावत आली. मी धुपकन पडले होते आणि मला उठता येत नव्हते. पाचव्या मजल्यावरील गच्चीतील घर आणि लिफ्ट नाही! MRI काढला. spinal fracture होते. आणि इतरही काही बिघाड झाले होते. दोन्ही मूले परदेशात,मुलगी लग्न होऊन सासरी. वाईट वाटून,रडून सारे काही झाले. कमरेला पट्टा,खाली बसायला मऊ रिंग,असे दागिने लागले.
माझे law चे प्रथम वर्ष झाले होते आणि ,दुसऱ्या वर्षा चालू होते. मूले मोठी झाली,संसारिक जबाबदाऱ्या कमी झाल्या म्हणून मी पुन्हा शिक्षण माझ्या ४५ व्या वर्षी चालू केले होते. हे मी माझ्या मुलांच्या पाठींब्याने करू शकले. माझ्या मोठ्या मुलाने मला सांगितले की" कागद-पेन घेऊन बस,आता पर्यंत फक्त दुसर्यांचे जिवन जगलीस,आता स्वतःला विचार आणि जो काही आत्मा मानतेस ना,त्या तुझ्या आत्म्याला काय हवे ते विचार आणि लिही व त्याप्रमाणे कृती कर. आम्हाला जसे लहानपणी तू शिकवलेस,,तसे आता आम्ही तुला काही सांगू ते ऐक". आणि खरच मुलाच्या या गुरुवाणीने मला हा ज्ञान-मार्ग दाखवला. मी खरेच कागद-पेन घेऊन लिहून काढले, मला जे काही करायला मिळाले नव्हते अन माझी इच्छा आहे, ते मी लिहिले..मला गाणी ऐकायला आवडतात. मला नव-नविन विषयांचा अभ्यास करायला आवडतो,मला फिरायला आवडते, photography .इत्यादी. धाकट्या मुलानी कॅमेरा आणून दिला. मला सर्व गाण्यांच्या CD आणून दिल्या. चांगले चित्रपट पाहण्यासाठी library लावून दिली. Gardening चे १ वर्षाचा course फर्गुसन कॉलेज मधून केला,Amfi ,Irda ,च्या परीक्षा पास झाले. हे सारे करतानाच एकीकडे घराची दुरुस्ती,मुलांची लग्न पण झाली. मूले परदेशात गेली.
LLB चे पहिले वर्ष झाले,आणि माझा हा छोटा अपघात घरातच झाला,त्यामुळे मला अपंगत्व आले. आता पर्यंत जिवनात सर्व अडचणींवर मात करीत जगण्याची सवय झाली होती. तरुण पणातच rhumatic arthritis झाला होता,परंतु त्यातूनही मी माझ्या इच्छा शक्तीमुळे,त्यावर मात करू शकले होते,आणि तसेच मी २५ वर्ष सामाजिक काम करीत राहिले होते. मी माझ्याशीच सुसंवाद साधू लागले. सुरुवातीला जगजीत सिंग च्या गझल ऐकणे पसंद केले,नंतर संदीप खरेची आयुष्यावर बोलू काही,सुरेश इत्यादी. सुरेश भट,श्रीधर फडके ,एकाच या जन्मी फिरुनी पुन्हा जन्मेन मी ,आम्ही एकटेच जगू एव्हढंच ना वगैरे,परंतु मुलानी मला मेल करून इंगिल्श गाणी, lyrics त्यांच्या links ,VDO पाठवले,ते मी ऐकू लागले. I have a dream ,hero ,words ,paint my love , इत्यादी, ते मम आत्मा गमला पर्यंत सारी गाणी ऐकू लागले. तेव्हा माझे रडणे थांबले. प्रथम मी computer जवळ जाऊन शिकणे चालू केले. शिकवायला गुगल गुरु होताच अगदीच अडले,तर काही जणांना phone करून विचारायचे.हळू-हळू त्यात प्रगती झाली. मूले परदेशी असल्याने त्यांना मेल करणे,स्कॅन करून कागद-पत्रे पाठवणे,फोटो पाठवणे,सारे काही जमू लागले. त्यात आनंद वाटू लागला.
सकाळी बागेत पक्षाचा आवाज आला,म्हणून सहज कॅमेरा कडे हात वळला,आणि अशी photography ला सुरुवात झाली. बागेत खूप प्रकारची झाडे लावली होती. त्यांचा फोटो काढू लागले. झोपल्यावर बसून,सांगितला सूचना करी,मला पाने -फुले आणून दे. नंतर शो केस मधील क्रोकरी खाली उतरू लागली. एक-एक ग्लास पासून ते बाउल पर्यंत सारे काही घेऊन,त्यात फुलांच्या रचना,या सूर्याच्या किरणन मध्ये सुरु झाल्या. रात्री दुखत असल्याने झोप येत नसे,झोपेच्या गोळ्या डॉक्टरांनी दिल्या होत्या,परंतु,मला औषधान पासून मुक्ती हवी होती. मी रात्रीचे वेळेस फुलणारी,रातराणी,गुलबक्षी,आणि इतर फुले घेऊन,घरातील मेणबत्त्या,चिमण्या,बाहुल्या,साऱ्यांना गोळा केले. ओटा ,जेवणाचे table हा माझा photo studio झाला. कॅमेरा कसा धरायचा,किंव्हा कसा वापरायचा काही ज्ञान नाही,परंतु सरावाने हा सारा खेळ सुरु झाला.कपाटातील साड्या ,ओढण्या या backroundla येऊ लागल्या.कपडे भिजविताना साबणाचा फेस दिसला तर तो केलेल्या रचनेवर टाकून फोटो काढ,सूर्याची किरणे सकाळी table वर येत,तेथे पाना-फुलांची रचना मांडून सूर्य किरणे कॅमेरात पकडण्याचा छंद लागला. घरात ज्या ज्या वस्तू आहेत,अगदी चांदीची छोटी भांडी,देव-घरातील देव ,माझे दागिने,जपाची रुद्राक्षांची माळ, सारे काही या कलाकृतीन मध्ये भाग घेऊ लागले.
माझी मुलगी,वहिनी,सून,मूले,सारे त्यांच्याकडे नको असलेल्या वस्तू मला आणून देऊ लागल्या. भेट म्हणून,रंगीत दगड, छोट्या चिमण्या मिळाल्या. संक्रांतीला पूजतात ते छोटे मातीचे गडू,दही-हंडीचा छोटसे मातीचे भांडे,सारे काही माझ्याकडे जमा होऊ लागले. फुलांच्या परड्या,sponge नातेवाईक किंव्हा मला मिळायच्या,त्याही आठवणीने,माझ्याकडे येऊ लागल्या. वस्तू दिसल्या की काहीतरी सुचायचे आणि कोणत्याही वेळी सुचायचे,तेव्हा बनवणे चालू झाले.हे छंद जोपासायला खूप पैसा लागत नाही .मला प्रथम माझ्या भावाने २४०० रुपयांचा canon digital कॅमेरा दिला,नंतर ७००० रुपयांचा caanon digital व आता १८'००० रुपयांचा fujifilm 18x कॅमेरा मुलांनी दिला आहे.
मुलीचे बाळंतपण करायला गेले,तरी छोटी छोटी डिश garden मध्ये रोपे नेली,आणि तेव्हा flat मध्ये लहान लहान कलाकृती करू लागले. बाळ-बालांतीन,सारी कामे असायची,पण तरी त्यातूनच बाळाचे फोटो काढणे आणि कलाकृती आणि बड-बड्गीते व अंगाई लिहिणे हेही जमू लागले. सारे माझी चेष्टा करायचे,पण या छंदात तिकडे लक्ष देणेही व्हायचे नाही.आवड असली की सवड मिळते.
रोज झोपाळ्यावर बसून चहा पीत सूर्यास्त आणि पक्षी पाहायचे,परंतु आता चहा ऐवजी कॅमेरा हाती आला,आणि रोजचे सूर्यास्ताचे फोटो,आकाशाचे बदलते रंग,बगळ्यांची माळ,घरी,पोपटांचे ठावे,आणि इतर पक्षी कॅमेरात कैद करणे सूर झाले. असा माझा छंद photography आणि कलाकृती करण्याचा वाढतच गेला. दुबईला मुलाकडे गेले,तेथेही मी शेजारी बांधकामाच्या विटा आणल्या ,दुकानातून कुंड्या रोपे आणली. छोटे छोटे पॉट केले,आणि तेथेही हा छन्द चालूच राहिला.
दुबईला इमारतीवरूनच सूर्यास्ताचे सुंदर विलोभनीय दृश्य दिसायचे. मला तेथील लोकांनी अगदी वरती जाऊन फोटो काढण्याची परवानगी दिली. नंतर मी संध्याकाळी सूर्याचा शोध घेत,दुबईला,त्याच्या मागे काही किलो मीटर चालू लागले,आणि मला चालता येत नाही हे विसरूनच गेले. मुलगा-सून खूप खूष झाले. रोज फोटो त्यांना ऑफिस मधून आले की दाखवायचे. तेही कौतुक करायचे. धाकटा मुलगा मला photography तील त्रुटी सांगू लागला,तेव्हा कळू लागले,फोटो हलला म्हणजे काय, micro मध्ये फुलांचे ,फुलपाखराचे ,दावा-बिंदूंचे फोटो कसे छान येतात.,हे कळू लागले.
दुबईतील,झाडे,पक्षी,फुले,सूर्यास्त या सर्वांनी मला बरे करून टाकले होते. शहाण्यांना जगण्याचे कायदे असतात,वेड्यांना सारे फायदेच फायदे,हे मला कळले. आणि चंद्रशेखर गोखलेजींची चारोळी अनुभवली. कीर्तनकारांकडून एकदा ऐकले होती कथा" की एक राक्षस,असतो, तो चांगला असतो,त्याला कितीही काम दिले,तरी तो पुन्हा काम मागायला यायचा,तेव्हा ,त्याला देवाने एक खांब दिला आणि त्याला सांगितले,की तू यावर चढणे-उतरणे चालू ठेव. आणि त्या प्रमाणे मनाच्या राक्षसाला नाम-स्मरणात गुंतवून ठेवा." हे ऐकले होते,पण जमले नव्हते. या छंदाने मात्र मला त्याची प्रचीती दिली, आणि कालबाह्य साक्षीभावाने जगणे जमले. मी मलाच म्हणते छंद हीच साधना,ज्यामुळे मला उमजली अंतरंगाची भावना!
माझी या जनता-जनार्दनास प्रार्थना .....सामर्थ्यशाली देश बनवू हीच या दीपावलीची कामना!
निसर्गदत्त पुरुष म्हणून तुम्हाला काय अभिप्रेत आहे? असा प्रश्न आज एका मैत्रिणीने मला केला. त्यावर मी निसर्गदत्त स्त्री आणि पुरुष मला कसे अभिप्रेत आहेत,ते मांडण्याचा माझ्या कुवती प्रमाणे प्रयास केला आहे.
सर्व जीव सृष्टीत निसर्गतः नर आणि मादी हाच फक्त फरक! मानवही तसाच होता. सशक्त आणि कमजोर या गुणांवर जिवित राहत असे,अशा प्राणी अवस्थेतून मानवाने आजचा फारच मोठा सुधारणेचा पल्ला गाठला आहे. आज मानवाने चंद्रावर पोहोचण्य इतकी प्रगती केली आहे. तशीच त्याने मानवी सम्बधांचीही प्रगती केली.
निसर्गाने स्त्रीआणि पुरुष यांना काहीं जन्मतःच विशिष्ट गुण प्रदान केले आहेत. जसे स्त्री कडे सहनशीलता, निर्वाज्य प्रेम, मातृत्व, लज्जा, हळवेपणा, गृहिणी धर्म, क्षमाक्षीलता इत्यादी आले आहेत. तसेच पुरुषाकडे अर्थार्जन, पत्नीचे ,कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे संरक्षण, पितृत्व, शौर्य इत्यादी गुण आले आहेत.
मी माझ्या एकच जन्मात स्वतःची बदलती रूपे पहिली. आपल्या वेशात बदल झाला,म्हणून प्रवृत्तीत बदल होण्याचे कारण काय? मी ही पिढी नुसार बदलले,पण त्या मुळे वैचारिक बदल झाला नाही. ज्ञानाने जिवनात प्रगल्भता आली. कितीही जिवनात चढ-उतार आले,तरी आपण त्यासाठी आपली मुल्ये गहाण टाकली नाहीत,आणि सद-सद विवेक बुद्धीला कायम जागरूक ठेवले आपण फक्त इतिहासातील थोरजनांचे पाठ पढत राहणार आहोत का पिढ्यानु -पिढ्या? आपण आपल्या घरात शिवबा, झाशीची राणी नाही बनवू शकलो,तरी त्या विचारांची मुले तर घडवू शकतो.त्यामुळे समाज सामर्थ्यशाली तरी होईल,तेव्हाच नेते सामर्थ्यशाली होतील,आणि देशही सामर्थ्यशाली होईल.
स्त्रीने स्वतःचे संरक्षणाचा प्रयत्न करणे,पुरुषाच्या बरोबरीने वाटचाल जरूर करावी,परंतु ही वाटचाल करताना तिनेही स्वतःची स्त्रीत्वाचे गुण सोडू नयेत. लज्जा स्त्रीत्वाचा गुणधर्म आहे, अनेकजणी त्यालाच फाट्यावर मारायला निघाल्या आहेत जाहिराती,चित्रपटातून अंग-प्रदर्शन करून अर्थार्जन करणे,हे कितपत बरोबर आहे. द्रोपदिचे वस्त्रहरण केले,म्हणून कृष्ण मदतीस धावला,येथे या स्त्रिया स्वतःचे राज-रोस पणे वस्त्रहरण करून घेत आहेत,यांच्या मदतीला कोण आणि कसे धावणार? अर्थार्जनासाठी हा एक-मेव मार्ग नाही. लवकर श्रीमंतीकडे जाताना,चुकीच्या मार्गाने आपण ती सापशिडी-वरून जात आहोत,हे कळत नाही का? स्वतःच गिळंकृत झाल्यावर काय कळणार?
गृहिणीचे कर्तव्य न बजावता, आपल्या कुटुंबियांची व्याख्याच बदलून टाकली आहे मी,माझा पती आणि मुले,असे चौकोनी कुटुंब. आई-बापाने काय घोडं मारलं आहे,की ते नको असतात. ज्यांनी आपल्या पतीला अस्तित्व दिले,तेच परके कसे ठरतात? फक्त एका पुरुषाला हातातील बाहुले बनविण्यात तीला स्त्री-स्वातंत्र्याचे भूषण वाटते. स्त्री स्वातंत्र्यात हे अभिप्रेत नाही. स्त्रीला तिचा आत्म सन्मान अभिप्रेत आहे. माता ही सहृदय सर्वांची माताच असली पाहिजे. जिजामाता या सर्वांच्या माता होत्या,तो आदर्श कसा आपण घेत नाही. फक्त स्वतःचे मुलाला प्रेम केले,हा मातृत्वाचा अर्थ अभिप्रेत नाही. एका स्त्री मध्ये माया-ममता हा निसर्गदत्त गुण आहे. तिने स्वतःच्या भुमीका बजावताना त्याची जाणीव ठेवायला हवी. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू होते,असे न होता तिने सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला हवेत. तेव्हाच पती-पत्नी,सासू-सून,नणंद-भावजय,जावा-जावा, ही सर्व नाती सुखाची होतील. कुटुंब,समाज आणि देशाला स्त्रीही तितक्याच शौर्यतेने योगदान देऊ शकते. तेव्हाच हा समाज समर्थशाली होईल.
आताच्या बदललेल्या परिस्थितीचे मूळ कारण,निसर्गाच्या प्रमाणे मनुष्य चालला नाही. मानव प्राण्याला बुद्धीचा वापर करण्याची क्षमता असल्याने,त्याने निसर्गाचा समतोल बिघडवला. स्त्री मध्ये ही शूरता असते, हे आपण,झाशीच्या राणी,अहिल्या देवी, अनेक उदाहरणातून पाहतो. स्त्री आणि पुरुष समानता ही योग्यच ,परंतु पुरुष स्वतःचे कर्तृत्व विसरू लागला आहे. स्त्रीशी पुरुषाने मैत्रीच्या नात्याने वागावे,याचा अर्थ,पुरुषाने षंढ व्हावे असा नाही. लग्न करणे, मुले जन्माला घालणे,स्वतःचे स्त्रीवर आणि कुटुंबियां वर रुबाब दाखवणे किंव्हा एकाहून अधिक स्त्रियांशी संबंध ठेवणे ,किंव्हा बलात्कार करणे हा काहीं पुरुषार्थ नाही.
आपली आई,पत्नी ,भगिनी,मुलगी किंव्हा कोणत्याही स्त्रीचे रक्षण करणे,स्वतःची पत्नी सोडून इतरांना भगिनी अथवा मातेच्या नजरेने प्रतिष्ठा देणे,कुटुंबाचे पालन-पोषण करण्याची क्षमता, विश्वास,धैर्य, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती,आपले,कुटुंब,समाज आणि देशा प्रती आपली कर्तव्यांची जाण, शौर्य, चांगला मुलगा,पती आणि पिता होण्याची लक्षणे त्यात असणे,इत्यादी मध्ये मला पुरुषार्थ अभिप्रेत आहे.
आज हा पुरुषार्थ कमी झाला,आणि समाज षंढ झाला असे म्हणावे लागते.कारण हा पुरुषार्थ कमी झाला. कोणाला अन्यायाची चाड वाटत नाही,गुलामगिरीची प्रवृत्ती हे षंढपणाचे लक्षण आहे. हा षंढ पणा जाणे गरजेचे आहे.
आर्थिक उन्नतीसाठी,लाच घेणे,भ्रष्टाचार करणे आपली मुल्ये गहाण टाकणे या गोष्टी प्रथमतः बंद व्हायला हव्यात. नुसते पैशात सुख नसून, आपल्या सद-सद विवेक बुद्धीला जागी ठेवून, सदाचरणाने जगण्यांत सुख आहे. स्वतःचे आई-वडिलांचा जेव्हा विचार कराल,तेव्हाच समाजाचा,आणि देशाचा विचार करू शकाल. जो जन्मदात्याचा विचार करेल,तोच जन्म-भूमीचा विचार करेल.
रोज आपल्या देशातील परिस्थितीवर आपण ताशेरे झोडत बसतो,तर ही परिस्थिती बनविण्यास आपणच कारणीभूत आहोत हे आपल्यालाच समजायला हवे. सामर्थ्यशाली समाज हा असाच नुसता चर्चा करून कसा होईल? आपण प्रत्येकाने स्वतः समर्थ बनू या आणि आपले कुटुंब,समाज आणि देशाला सामर्थ्यशाली बनवू या! हीच या दीपावलीची परमेश्वरचरणी म्हणजेच जनता-जनार्दनास प्रार्थना!
देवाच्या पुस्तकातील एक पान....! तन-मनाची निर्मळता........जागवी मानवात मानवता.....!
"आम्ही डोंगराचे राहणार,चाकर शिवबाचे होणार " ...गाणे ऐकू येत होते मला खूप आंतरिक आनंद झाला होता. ,की येथेच काहीं दिवसान पूर्वी कसे वातावरण होते आणि आता कसे सुंदर झाले. वस्तीतून रोज सायंकाळी चव्हाटा(मरीआई मदिरा समोरील मोकळे अंगण) लहान मुलाच्या गाणी,खेळ याने दुमदुमून जायचा. माझा मोठा मुलगा ४ थी इयत्ते पासून १००-१२५ वस्तीतील मुलांचा शिक्षक झाला होता. धाकट्या भावालाही तो सोबत न्यायचा,आणि शिशु गटाचे काम धाकटा पहायचा. खूप लहान वयातच ही मुले तयार होत गेली. नुकतीच मौंजी-बंधन झालेला माझा बटू एखाद्या चाणक्य सारखा शोभायचा. त्याची अक्कल-हुशारी,इतक्या मुलांना शिकवणे,,त्या मुलांचे गट पडणे,बैठकी घेणे, त्यात विषय मांडणे,समस्या सोडविणे. शिबिरांना मुलांना नेणे, स्पर्धांचे आयोजन, सण-उत्सव , सारे काहीं करायचा. माझ्याकडून प्लास्टिक डबे घेऊन त्याला वरती चिरा पाडून,त्याचा गल्ला करून मुलांना दिला होता. त्या गळ्यावर भारतमातेचे स्टीकर लावले होते. इ भावना अशी छोट्या-छोट्या गोष्टीतून देश-प्रेमाची भावना अंगी भिनते त्यात जमतील तसे मुले पैसे साठवायची हा गल्ला मुलांना खूपच उपयोगी पडायचा. बचतीची सवय आपोआपच झाली. ही मुले हातात पैसे आले की,व्यसनात घालवायची. आता या पिसांचा उपयोग,त्यांच्या स्वतः साठी केला जाऊ लागला. त्याचे त्यांना कुतूहलही वाटे. त्याच्या त्याला आजही ही मुले शिक्षकच म्हणतात.
माझी मुलगी आमच्या घराच्या अंगणात,प्राजक्तीच्या पारावर भोवती,मुलीनाचा वर्ग घ्यायची. संध्याकाळी रोज येत तास हा वर्ग भरीत असे . माझ्या घरातील लोकांचा विरोध हळू-हळू ही कामे बघून मावळला. माझे सासू-सासरे न सांगताच या मुलीनकडे मी नसताना लक्ष देऊ लागले. एखादी गोष्ट सांगू लागले.मुलांना मार्गदर्शन आणि पाठबळ माझे असे.परंतु या कामात सातत्य आणि नियमितपणा होता. त्यामुळेच त्याचा उपयोग होऊ शकला.
चव्हाट्यातील हे चित्र पाहून,त्यांचे घरच्यांना स्वतःत सुधारणा हळू-हळू स्वतःत करावीशी वाटली . मुलं-मुलीना संध्याकाळी घरात दिवा लावून आई-वडील आणि मोठ्यांना रोज नमस्कार करायचे शिकवले होते. महेश म्हणाला " काकू , का म्हणून मी पाया पडू,या बेवड्यांच्या? शिवीगाळी शिवाय की भी कानी पडत नाय". मेल्या-मुडद्या शवाय बातचीत नाय करीत ते! आज्जी अन बा ला शुद्ध कुठ असतीया? माझ्या आशीचे फकस्त पाया पडीन मी,तीच बघते आमचा समदा." मी सारया मुलांना शांतपणे सांगितले की कसेही असली घरी मोठी माणसे,तरी त्यांना नमस्कार करा,संध्याकाळी शुद्धीवर नसतील,तर सकाळी करा. त्यांनाच त्यांची चूक कळेल. आणि ते चूक सुधारतील. या नमस्काराचा खूप परिणाम झाला. व्यसनी पालकांना स्वतःच लाज वाटू लागली. ज्यांना शक्य ते मुलांचा वर्ग पाहाणे,त्यांना मदत करणे असे करू लागली,आणि बरेचसे पालक कार्यकर्ते म्हणून मला मिळाले.
अम्बीचा दारू पिऊन रोज रात्री तमाशा चालू असे . मुलगा आणि ती दोघेही रोज टल्ली होत आणि रोज भांडणे. सुनेने पोटाच्या खाचा करून या दोघांना आणि चार मुलांना रांदून खायला घालायचे! सून खंगत चाललेली मला दिसली. मी तीला डॉक्टर कडे जाऊन तपासणी करू म्हणाले. ती ऐकायला तयार नाही. जिवन असे नरकासारखे झाले,की मरण जवळ करू पाहतो .
आस पास क्षय रोगाच्या केसेस खूप होत्या. अनेक रोगांचे प्राबल्य वस्तीत दिसत होते. माझ्या मुलांना मला येथेच वाढवायचे होते. मी खूप विचार केला,की काय करू शकते? प्रथम संस्कार वर्ग,शेजारीच फुग्याची दारूचा गुत्ता बंद करणे, रोगांचे निर्मुलन करणे. हे प्रमुख विषयांवर विचार केला.
अनिल दारू आणून वस्तीत विकत असे. ते त्याच्या चरितार्थाचे साधन होते. दारूचा गुत्ता बंद करायचा म्हणजे,आपण आधी त्यांना दुसरे काम देणे गरजेचे असते. मी त्याला आवश्यक मदत केली. त्याला नाक्यावर सरबताची गाडी लावण्याचा व्यवसाय सुरु करून दिला. त्यासाठी पतपेढीतून कर्ज उपलब्ध करून दिले. अनिलचे घर व्यवस्थित चालू लागले. दारूचा गुत्ता जवळचा बंद झाल्याने मला सामाजिक काम करणे सोपे झाले. अगदी कोणी वेश्या व्यवसाय करीत असेल तरी तीला आपण अर्थार्जनाचे साधन मिळवून दिले,तीला समाजात त्रास होणार नाही याची काळजी घेतली,तरच ते शक्य होते.
नुसतेच हे बंद करा,ते बंद करा म्हणून चालत नाही.त्यामुळे चोऱ्या-माऱ्या वाढतात.
रोगांचे निर्मुलन केले,म्हणजे मी माझ्या मुलांना वस्तीत संस्कार वर्ग घ्यायला पाठवू शकत होते. म्हणून सर्वात प्रथम आरोग्य शिबीर हा विषय हाती घेतला. डॉक्टरांना त्यांच्या संस्थेत पत्र दिले. त्यांच्या कडे नमुना म्हणून मिळणारी औषधे खूप असतात,ती खूप वायाही जात असतात. ती औषधे डॉक्टरांनी द्यावीत,आणि २-३ डॉक्टरांनी तपासणीसाठी २ तास वेळ द्यावा. डॉक्टरांचे संस्थेकडून मला सहकार्य लाभले. लोकांनीही त्यांच्या कडे उरलेली औषधे माझ्याकडे आणून दिली. मी माझ्या दुचाकी वरून सर्व डॉक्टर्स कडून औषधे गोळा केली. त्या पूर्वीच मी औषधे या विषयाचे जाड मोठे पुस्तक अभ्यासले. सारी औषधे मी कोणत्या रोगावर कोणते औषध हे पाहून बाजूला केली त्यावर नाव दिले. एका डॉक्टर मैत्रिणीला घरी बोलावून तिचे मार्गदर्शन घेतले. आणि वस्तीत आरोग्य शिबीर ठरवले. घरो-घरी पुन्हा -पुन्हा जाऊन सर्वांना बोलावून आणले. वस्तीतील लहान-मोठ्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग दिला. सर्वाची तपासणी या शिबिरात केली असे शिबीर मी वर्षातून दोनदा भरवित असे. प्रत्येकाला त्याच्या आजारावर उपचार आणि औषधे हे लक्ष घालून करवून घ्यावे लागायचे. कोणाला मोठा आजार असेल,तर काहीं दात्यांचे सहकार्याने त्यांच्यावर उपचार करीत असू.आरोग्य शिबिरांचा खूप उपयोग होई,त्यामुळे,बऱ्याच रोगांचे प्रमाण घटले होते. हे शिबीर भरविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत .परंतु कोणतेही काम हाती घेतले की पूर्ण केले,तरच समाधान लाभते.
अम्बीची सून मात्र अजिबात तपासणीला येण्यास तयार नव्हती. मी स्वतः जाऊन विनवणी करून तीची तपासणी करवून घेतली.,तर तीला कॅन्सर झाला होता. ती फार काळ जगणार नव्हती. उपचाराच्या पलीकडे तीची स्थिती गेली होती. म्हणजे मला जे दिसले होते तिच्याकडे रोज पाहून,त्यात काहीतरी तथ्य होते. तिच्या चार मुलांचे काय? माझ्या पुढे मोठ्हे प्रश्न चिन्ह उभे राहिले. काहीं दिवसातच अम्बीची सून गेली. पाठोपाठ २ वर्षात तिचा नवरा आणि सासू हेही दारू धोसंयाने गेले. घरात फक्त चार मुले उरली. त्यांच्या मामा-मामींना त्यांचे कडे लक्ष देण्यास सांगितले. १२ वर्षांचा मोठा मुलगा महेश अर्थार्जनाला लागला. चपला शिवून पैसे कमवू लागला ,आणि भावंडाने पोट भरू लागला. महेश ला शाळा सोडावी लागली त्या मुलांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला. दत्तक -पालक पहिले,की ज्यांनी एकाचे शिक्षणाचा खर्च द्यायचा..
मी संस्कार वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. महेश आपल्या भावंडाना बरोबर वर्गात घेऊन येत असे,वस्तीतील खूप मुले-मुली येऊ लागल्या. येथे घरात मला विरोध पत्करावा लागला. मला म्हणायचे कोणती घाणेरडी मुले घरात घेऊन येतेस, फारशी पुसून दे, मी द्यायचे पुसून. शेवटी बाहेर अंगण चांगले करून,सारवून मी तेथे संस्कारवर्ग घेवू लागले. त्यांचे पाढे पाठ करवून घेणे,श्लोक शिकवणे,गोष्टी ,,खेळ घेणे,आणि नंतर देश-भक्तीपर गीत शिकवणे. स्वच्छता शिकवणे, असां वर्ग चालू ठेवला होता. या मुलांना त्या काळी शाळेत ७५% उपस्थिती की पुढील वर्गात ढकलत. त्यांना काहीं लिहिता -वाचता येत नसे. साधी बाराखडी ४थिच्य मुलांना शिकवावी लागायची. शिक्षक फळ्यावर काय लिहितात ते पाहून उतरवायचे ,इतकेच जमायचे या मुलांना. माझा कारखाना होता,तेथेच मी काम करिताना या मुलांना बाजूला बसवून शिकवत राहायचे.
मी सर्व तालुक्यातील शाळांचे निरीक्षण करून आले,आणि शिक्षणाधिकार्यांना भेटले. काहीं ठिकाणी एक शिक्षकी शाळा,तोही खूप खडे करीत असे. द्वी शिक्षकी शाळांमध्ये,शेताची कामे निघाली की एक शिक्षक लावणीला ,कधी कापणीला जायचा,दुसरा एकच शाळा चालवायचा. जाणू त्यांच्या घराच्या सोयी साठीच द्वी शिक्षक शाळा होती. अतिरेक म्हणजे,शाळेतील मुलाणाचाही काहीं ठिकाणी शेतावरील आणि घराची कामे करून घेण्यासाठी उपयोग करून घेतला जात असे. सारे काहीं संतापजनक होते.शिक्षणाधिकार्यांनी हतबलता दाखवली,कारण सर्व क्षेत्रात पक्षीय राजकारणाचे प्राबल्य.
काहीं जणांना माझ्या मुलांचा व माझ्या कामाचा द्वेष वाटू लागला., त्रास देण्याचा खूप प्रयत्न झाला . पण मी खंबीरपणे मुलांच्या पाठीशी उभी राहिले. आणि कार्य चालूच ठेवले होते. माझा मोठा मुलगा ११ वी पर्यंत हे काम करीत होता. नंतर शिक्षणासाठी पुण्यात आला. एका ठिकाणी वर्षानुवर्षे त्या कामात गाडून घ्यावे लागते,.तेव्हा त्या कामाचे फलस्वरूप दिसते. आता बी पेरलं आणि लगेच झाड उगवले असे होत नाही. संस्काराचे बीज,बालवयातच पेरावे लागते, जिवनात कितीही ,कुठेही स्वतःची घसरण झाली,तरी हे बीजंच त्याला सांभाळते आणि त्याची सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवते.
मी नेहमी हा संत तुकारामाचा अभंग मुलांना टाळ्यांच्या तालावर शिकवायचे........
आम्ही बी घडलो,तुम्ही बी घडाना,
परिसाच्या संगे लोह बी घडले,
लोह बी घडले सुवर्णाची झाले.
सागराच्या संगे नदी बी घडली,
नदी बी घडली सागरची झाली!.
संस्कार घडवी असे सुंदर मन.....साकारी अविकारीत निर्मळ तन.........!
Saturday, October 30, 2010
देवाच्या पुस्तकातील एक पान......! तूच आहेस रे जगन्नाथ......दे पिडीतांस मदतीचा हात.....!
रुग्णवाहिकेतून मी अपघात-ग्रस्त दोन जणांना घेऊन मुंबईला जे जे रूग्णालया मध्ये निघाले होते.ओंक वहीनी माझे सोबत आल्या ते खूप बरे झाले. दोघांना सलायीन लावलेले म्हणून आम्ही दोन जणी सोबत असणे खूप गरजेचे होते. रक्तस्त्राव खूप होत होता, डोकेच आपटले होते, बाकीही अवयवांची तोड-मोड झालेली. सारे दृश्य अगदी विदारक होते. प्रथमोपचार करून घेतला होता. आता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न जे जे मध्ये जाऊन करणे इतकेच हातात होते. दोघे म्हणजे मामा -भाचे होते . महाड हून मुंबईकडे मोटार सायकल वरून निघाले होते आणि वाटेत आमच्या गावाजवळील महामार्गावर हा अपघात झाला. अपघात ज्याने पाहीला तो तरुण मला ही वार्ता सांगायला आला होता. मी म्हणाले "माझ्याकडे कसा काय आलास? मी तूला ओळखत नाही.". . तो म्हणाला" आपल्याला मी ओळखतो तो अपघात मी डोळ्याने पाहीला,त्यांना वाचवणे गरजेचे आहे,तर मला वाटले,की आपणच त्यांना मदत करू शकता".
थांबलेल्या ट्रक वर यांची मोटार सायकल आदळली होती. सरकारी दवाखान्यात मी तातडीने गेले डॉक्टर म्हणाले "येथे आम्ही यांना वाचवू शकत नाही,आम्ही रुग्णवाहिका देतो आपण यांना घेऊन जाऊ शकता.नर्से एकच असल्याने आम्ही तीला सोबत पाठू शकत नाही. डॉक्टर आणि पोलीस मला माझ्या कार्या मुले ओळखत होते., त्यामुळे या व्यक्तींना आम्ही घेऊन जाऊ शकलो. नाहीतर तुम्ही कोण,काय आणि कारवाई झाल्याशिवाय जाता येणार नाही असे म्हणाले असते, तर दोघेही तेथेच गतप्राण झाले असते. पोलिसांना मी म्हणले तुमचे पंचनाम्याचे काम लवकर करा,बाकी काहीं उरले तर नंतर पाहू. माणसांचा जीव वाचवणे आधी महत्वाचे. त्यांनी माझे ऐकले,आणि आम्हाला लगेच जाऊ दिले. रुग्णवाहिका मिळाली त्यामुळे त्यांना घेऊन जाणे शक्य झाले.
इकडे घरी करवीर पीठाचे शंकराचार्य येणार म्हणून त्यांचे स्वागताची तयारी करायची होती. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मीच मुद्दा उपस्थित केला होता,की शंकराचार्य कोण? धर्मगुरू म्हणजे काय? हे नुसते मठात बसून हे तळागाळातील समाजाला कधी कळणार. सामाजिक समरसतेचे नुसते फलक लावून समरसता होत नाही. सर्व पांढर-पेशा वर्गात पाद्य-पूजने करीत राहण्या पेक्षा अशा सर्व वस्त्यान मध्ये जाऊन त्यांनी प्रबोधन करणे हे महत्वाचे आहे. सारया समाजाला प्रवाहात ओढून घेण्याचे काम गुरुंनी करायला हवे. माझे बोलणे काहीं जणांना आगाऊ पणाचे वाटले. मी नेहमीच बंडखोर ठरले होते. तरी कार्यक्रम ठरला. वाड्यात कार्यकर्त्यांना मी मुंबईला जाऊन येत आहे ,तयारी करून ठेवा. ठरल्या प्रमाणे कार्यक्रम होईल. असे सांगितले. घर -सामाजिक काम -व्यवसाय साऱ्यांची झटपट सूचना सांगून व्यवस्था लावावी लागायची..मी नसताना ही व्यवस्था नीट होईल याची खात्री असायची. कार्यक्रमा पेक्षा जीव वाचवणे जास्ती महत्वाचे होते..
रुग्णवाहिका कधी एकदा जे जे ला पोहोचते असे झाले होते. कारण दोघांपैकी एकाची हालत खूप खराब दिसत होती.जे जे रुग्णालयात एकदाचे पोहोचलो. त्यांना दाखल करून,त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. रक्ताची गरज होती. रक्त-गट o + ve होता हे फार बरे झाले,कारण त्याचा रक्तदाता लगेच मिळू शकतो. जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना फोन करून रक्त-दात्यांची व्यवस्था केली. तासाभरात रक्त मिळाले. वेळ जसा जात होता तसे,त्यांचे मरण समोर दिसत होते. अगदी हतबल झाले होते. जे शक्य आहे,ते सारे करण्याचा प्रयत्न केला. शस्त्रक्रिया झाली ,मामा वाचला आणि भाचा गेला होता. भाचा गाडी चालवीत होता,त्याला जास्त मार बसला होता. खूप दुखं झाले,रडू आले, कारण गाडीत तो भाचा हिचके देत होता,रक्त-स्त्राव थांबत नव्हता. त्याचेवर तेथेच गावात इलाज झाला असता,तर तो कदाचित वाचला असता.
सरकारी दवाखाने आधुनिक व सुसज्ज नसल्याने ,तेव्हा त्यांच्या कुवतीबाहेरच्या केसेस मुंबईलाच घेऊन जाव्या लागत असत. आम्ही मुंबईला जातानाच,त्या मामाचे गावी फोन करून कळवले. होते,त्यांचे नातेवाईक जे जे ला आले होते. त्यांच्याकडे त्यांना सोपवून आम्ही गावी संध्याकाळी परतलो. मनात संमिश्र भाव होते. एक वाचला आणि एक गेला. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्यात हसू ! तरुण मुलाच्या जाण्याने अतिशय दुखं झाले होते. परंतु दोघांपैकी एक तरी वाचला याचे समाधान लाभले होते.
घरी आल्यावर आवरून आधी ठरलेला कार्यक्रम हसत मुखाने करणे आवश्यक होते. करवीर पीठाचे शंकराचार्य आमचे घरी आले होते, नंतर त्यांचे वाड्यात प्रवचन झाले. माझ्या या सर्व सामाजिक कार्यात आधी थोडा विरोध आणि नंतर मुला-बाळांसह कुटुंबीयांचे पाठबळ मिळाले म्हणूनच करणे शक्य झाले.
जेव्हा-जेव्हा अपघात होतात तेव्हा आपण बघ्याची भुमीका न घेता,मदतीचा हात पुढे करायला हवा. आपल्या या मदतीने एखाद्याचे जिवन आपण त्यास बहाल करीत असतो . जिवनभर हे चांगले कर्म आपल्याला सुखद आनंद देत असते. माझ्या लक्षात आले की हा ईश्वर आपल्यातच असतो,बाहेर कोठेही शोधावा लागत नाही.
तूची आहेस रे जगन्नाथ.............दे पिडीतांस मदतीचा हात!
Friday, October 29, 2010
देवाच्या पुस्तकातील एक पान........! ज्ञानची असे हरी ... घडी-घडी ठरे ते सर्वोपकारी....!
नारळी पौर्णिमेचा दिवस,पाऊस मुसळधार कोसळत होता. रात्री ८ चे सुमारास दिवे गेलेले. सगळीकडे काळोख होता. कोकणात पाऊस पडला की वीज लगेच तासनतास जाते. सुलभाला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. तिने घरीच खूप वेळ काढला होता,कारण तीला दवाखान्यात न्यायलाच कोणी नव्हते. नातेवाईक म्हणजे गौरीचे आज्जी--आजोबा,इतर सारे समोरच रहात होते,परंतु सुलाभाची मुलगी गौरी हाक मारायला गेली तर कोणी आले नाहीत. कारण त्यांचे सख्य नव्हते. तीची लहान मुलगी आणि तिचे पती असे तिचे विभक्त कुटुंब. विभक्त कुटुंबाचे तोटे असे सामोरी आले होते. सर्वांशी सलोख्याने वागणे ,हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सुलाभाचा पती एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होता.सामाजिक हित जपताना आपल्या कुटुंबाचेही हित जपलेच पाहिजे. सुलभा आणि सतीश दोघांना हे नंतर समजावून सांगणार होते.
सतीश लगबगीने आमच्या घरी आला म्हणाला" वहीनी सुलभाला दवाखान्यात न्यायला हवे." त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती,म्हणून धर्मादाय दवाखान्यात न्यायचे म्हणाला. तेव्हा विचार करीत बसायला वेळ नव्हता. घरी माझे भाऊ रक्षा-बंधानासाठी येणार होते,ते आल्यावर त्यांना बसवून घ्यायला घरी सांगितले संगीताला म्हणजेच माझ्या दत्तक मुलीला आणि मी हातातील कामे टाकून,टोर्च आणि छत्री घेऊन त्याच्या सोबत निघाले. त्याला रिक्षा आणायला पाठवले आणि मी तिच्याजवळ थांबले. सुलभाची स्थिती पाहता,ती प्रसुतीला फार काळ घेणार नव्हती.
आम्ही तीला रिक्षेने त्या दवाखान्यात नेले. तेथे अंधार,डॉक्टर नाहीत. एक म्हातारी आया फक्त होती. डॉक्टरांना फोन करून बोलावयाचे तर तेथील फोन पावसाने बंद पडला होता. मी त्या आया सुलोचना बाईना म्हणाले आधी आपण सुलभाला प्रसूती गृहात नेऊ. तीला कसे बसे तेथ पर्यंत नेले. दोनच मेणबत्त्या होत्या,त्या लावल्या. सतीशला टोर्च धरून उभे केले. बाहेरच बाकावर तिच्या मुलीला बसवले. हिचे प्रसूती कळानी ओरडणे चालू होते. तपासून पहिले,तर ती लगेच प्रसूत होणार होती.
बाळाचे पाय आधी बाहेर आले,परंतु बाकी बाळ बाहेर काहीं केल्या येईना. आया घाबरली,मी तीला म्हणाले,आता हा माझाही पहिलाच अनुभव आहे,परंतु आपण काहीही करून हिला सोडवायचे आहे. बाळाच्या गळ्याभोवातली नाळ गुंडाळली गेली होती. सारीच विचित्र स्थिती होती. परंतु तसेच प्रयत्न करीत राहून,तीला धीर देत राहिलो. कारण सुलभ गळपटली होती.,डोळे फिरवू लागली. काय करणार? आम्ही दोघींनी मिळून कसे-बसे बाळ सुखरूप बाहेर काढले. नाळ कापून आई पासून वेगळे केले. मी त्याची नाळ सोडवली. गळ्याभोवती गच्च नाळ,आणि पायाळू त्यामुळे बाळ गुदमरले होते. ते बाहेर आले,पण रडले नाही. त्यामुळे काळजी वाढली. आयाला सुलभाचे पुढील काम पुरे करायला सांगितले.
सतीशला गरम पाणी करायला सांगितले,त्याच्या मुलीला तोवर टोर्च धरून उभे केले. ती लहान आहे-वगैरे विचार करायला वेळ नव्हता. पटकन बाळाला मी स्वच्छ आंघोळ घातली ,उलटे धरले थोपटवले आणि काय आश्चर्य ते रडले.......ते बाळ मुलगी होती. तिच्या रडण्याने आमच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर आली. आमचा जीव भांड्यात पडला. त्या दोन मेणबत्त्या केव्हाच विझल्या होत्या. फक्त टोर्च चे उजेडात काम चालू होते. सुलभाही बाळाचा आवाज ऐकल्यावर मानसिक स्थिरावली. तीला धीर देत राहिलो. पण तीची वारच पडत नव्हती. एकदाची वार पडली आणि पुन्हा जीव भांड्यात पडला, टाक्यांचे उरकले. तेथील स्वच्छता,आणि सुलभाचे आवरले. बाळ-बाळनतिन सुखरूप होते. सतीश व त्याची मुलगी दोघेही आनंदले. त्याची मुलगी गौरीला खूप आनंद झाला. आम्ही सारेजण या धावपळीने घामा-घूम झालो होतो. मानसिक ताण दोघेजण सुखरूप आहेत पाहून कमी झाला.
दोघांना तेथे ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. सतीशला मी रिक्षा घेऊन यायला सांगितले. दूरवर जाऊनही रिक्षा काहीं मिळाली नाही. पाऊस कोसळतच होता. दिवे आले नव्हतेच. मला आठवले की माझे भाऊ गाडी घेऊन आले असतील, मी सतीशला आमच्या घरी जाऊन गाडी घेऊन यायला सांगितले. बाळ-बाळनतिन घरी सुखरूप पोहोचवले. आणि मी रात्री साडे अकराला घरी आले.
माझे भाऊ बिचारे माझी वाट पहात घरी थांबले होते.. माझे आवरून रक्षा-बंधन करून आम्ही जेवलो. पण आजच्या जेवणात मला अमृतमयी समाधान लाभले. सुलभाला डिंकाचे अलीवाचे लाडू ,बाळाचे कपडे. देण्यापासून सागर संगीत बाळंतपण केले ,कारण सुलभाची आई लहानपणीच वारली होती. माझे शिवण मशीन होते. असे बाळाचे कपडे पटकन शिवून देता येत.
कोणासाठी काहीं केलेले बोलून दाखवू नये म्हणतात,परंतु आताच्या काळात आपली आई असो नाहीतर सासू कोणीही आले तरी तो पाहुणा आला आणि त्यामुळे लगेच घरात तारांबळ उडते. त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळा-ढवळ होते. मी आणि माझा नवरा-मुले इतकेच कुटुंब अशी व्याख्या केली आहे या पिढीने. कोणासाठी काहीं करण्याची सवय राहिलेली नाही.फार थोडे अपवाद पाहायला मिळतात. .
माझे शिक्षण वाया गेले नव्हते. मी नेहमी म्हणायचे की मी जीवशास्त्राची पदवीधर आहे,आणि माझे शिक्षण चुलीत वाया चालले आहे. पण आज मला माझ्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष झाला होता. वैद्यकीय शास्त्राच्या पहिल्या वर्षांची पुस्तके मी घरी अभ्यासली होती. आज त्याचा उपयोग एक जीव वाचविण्यासाठी झाला होता. ज्ञान कधीच वाया जात नाही.हे अगदी खरे. आपण आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ शकतो,इतरांना मार्गदर्शन करू शकतो,समाजात वावरण्याचा आत्म-विश्वास वाढतो,आणि ज्ञान कुठेही -कसेही उपयोगी पडते..
देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे.........परंतु या अनुभवाने मला सुचले......ज्ञानची असे हरी ... घडी-घडी ठरे ते सर्वोपकारी!
देवाच्या पुस्तकातील एक पान.........! कमल कळी ...... देवा! तूला का बरे भावली....?
" वहीनी! कमल गेली की हो आपली" दोन बखत आली व्हती तुमची गाठ घ्याया, तीला तुमचे संग बात करायची व्हती....तुमची गाठ नाय पडली, अन त्या मुदड्यान डाव साधला वो तिचा! सोन्या सारखी बाईल,पोटुशी व्हती अन मारली वो या सैतानानं,अन
यो बाहेर शेन खात व्हता मुडदा, त्या रांडच्या पायी जीव घेतला ओ पोरीचा! आनंदी बाई रडता रडता सांगू लागली. मी पुण्याहून गावी आले आणि लगो-लग आनंदी बाई धावत आली.
मी उपचारासाठी पुण्याला २ महिने गेले होते. येथील सर्व कामांची घडी मी नीट लावून गेले होते. माझा दुध डेरी चा व्यवसाय ३ मुलांना सोपवला होता. कमल चे नवऱ्याला दुध गाडीवर वाहन चालक म्हणून काम दिले होते. सारे काहीं सुरळीत चालले होते. असे अचानक काय झाले? माझी तर मतीच खुंटली! या बातमीने मला अजून मानसिक धक्का बसला असता,म्हणून मला घरच्यांनी कळवले नव्हते.
कमल ला ७ वा महिना चालू झाला होता. मी तिचे ओटीभरण ठरवले होते. मला तीची सारी हौस-मौस करायची होती. कमल ला संसाराची खूप हौस होती. तिचे लग्न माझ्या घरीच हॉल मध्ये लावून दिले होते. तीला सारा काहीं संसार माझ्या मैत्रिणींसह सार्यांनी दिला होता. वाडीवर भाड्याने झोपडे घेऊन दिले होते.ती माझ्याकडून जेवण बनवायला खूप छान शिकली होती. पुरण -पोळी पासून सारे काहीं उत्तम बनवू लागली होती. छान तिचे सारे मी डोहाळे पुरवत होते. खूप खुश होती कमल आपल्याला बाळ होणार म्हणून. माझ्या बाळाचे कपडे तिने केव्हाच नेले होते,तिच्या बाळासाठी. मी तिला म्हणाले होते अग मी अजून छान छान बाळासाठी कपडे शिवेन. तेव्हा खूप आनंदाने हसली होती.
माझी व कमल ची गाठ कशी पडली,हे सारे मला रडताना आठवू लागले. माझ्यावर एकूणच घर,मुले,व्यवसाय सामाजिक काम असा ताण पडू लागला,म्हणून मदतीला मुलगी पहावी असे मैत्रीण हेमाला बोलले. मला ती म्हणाली "अग कमल आहे ना! माझे बाळासाठी मी तीला काहीं महिने ठेवले होते. आम्ही साठे न! ,माझ्या सासु बाईना कातकरीनीचे घरात येणे चालत नाही. म्हणून तीला कामावरून काढून टाकावे लागले ग! खूप चांगली आहे ती, स्वच्छ राहते, हुशार आणि विश्वासू आहे. मी निरोप देते तीला ".
हेमाने निरोप दिल्यावर कमल घरी आली. १६ वर्षांची, सडपातळ,रंगाने काळी, अगदी स्वच्छ त्यांच्या पद्धतीचे लुगडे चापून-चोपून नेसलेली, कपाळी मोठ्ठं कुंकू लावलेले,डोक्यावर फुल असे लावले होते की जणू कुंडीत खचले आहे. ती अगदी शुद्ध मराठीत हुशारीने बोलली" हेमावहीनी नी चिठ्ठी दिली आहे." माझ्या लक्षात मुद्दा आला. मी तिचा पगार ठरवून उद्या-पासून कामाला ये सांगितले. ती येवू लागली.
मला ठाकरणी आणि कातकरणी येथे आल्यावरच पाहायला मिळाल्या होत्या. माझ्या लग्नाचे आधी मी बॉबी चित्रपट पाहीला होता. मी नंतर माझ्या दादाला म्हणाले होते ",अरे माझ्या गावात कित्ती बॉबी आहेत." तेव्हा तो खो-खो हसला आणि म्हणाला होता "त्या ठाकरणी आहेत " मला तेव्हाच्या माझ्या बालिश पणाचे अजून हसू येते.
मी पुण्यात असताना कमलचे जिवनात बरेच मोठे वादळ आले. सगळी तिच्या जिवनाची वाताहात झाली. तिच्या नवऱ्याचे दुसऱ्या बाईशी संबंध सुरु होते. त्यावरून कमल त्याच्याशी भांडायची. तो ऐकत नाही पाहून ती त्याला सोडून देणार होती, तीला हे सांगण्या साठीच मला भेटायचे होते. तीला विश्वास होता,की वहीनी यातून काहीतरी मार्ग काढतील. पण तिच्या माहेरच्यांनी मध्यस्थी केली आणि तिचा नवरा तीला कर्जत ला वाडीवर घेऊन गेला. काहीं दिवसातच त्याने कमल चा काटा काढला. या दुष्ट नराधमाला आपले मुल,जिच्या पोटात आहे, तीला दुसऱ्या स्त्रीच्या लोभापायी ठार मारताना काहीही वाटले नाही.
बाई-आणि बाटली दोन्ही व्यसने जिवनाचे ३-१३ करतात. कमलला दारू पिणारा नवरा नको, म्हणून तिने त्यांच्या समाजात, उशिरा म्हणजे १८ व्या वर्षी लग्न केले. दारू पीत नव्हता, पण बाईच्या नादामुळे आज त्याने आपल्या ७ महिन्याच्या गरोदर पत्नीला कोयत्याने मारले होते आणि पळून गेला होता. वाडीतील लोकांनी तीला सरकारी.दवाखान्यात नेले,परंतु,ती आणि बाळ दोघेही गेले
हे सारे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. अशी जनावर स्थितीतील माणसे या जगत आहेत हे कळले . मला रडू आवरत नव्हते. किती-तरी दिवस स्वप्नात कमल येऊन मला हाक मारत होती" वहिनी! वहीनी! " तिचे संसाराचे आणि मुलाचे स्वप्न अधुरेच राहिले होते.
तिच्या घरचे तिच्या अंत्यविधींसाठी घरून पैसे घेऊन गेले होते. मी त्यांना बोलावून घेतले आणि म्हणाले "आपण त्या नराधमाचा पोलिसांना शोध घ्यायला लावू ,त्याला शिक्षा झालीच पाहिजे" ते म्हणाले "आता काय करायचे ,कमल तर गेली. आम्ही रोज कामावर जाऊ तेव्हा आमची चूल पेटते,या लफड्यात कोण पडणार". सारे काहीं अचंभित करणारे होते. याला सगळी परिस्थितीच जबाबदार होती.
मी खूप विचार केला.काहीतरी करायलाच हवे. अशा किती कमलचा बळी जात असेल आणि त्याचा पत्ताही लागत नसेल! काय आपल्या देशातील बांधवांची ही स्थिती, मन विषणं करून सोडणारी. माणसातील हा जनावरपणा कधी जाणार ? कसा जाणार ? या प्रश्नाचे उत्तर कमलच्या जाण्याने मी शोधले आणि आदिवासीनमध्ये सर्वांगीणविकासाचे काम करायचे ठरवून ते सुरु केले. मी व्यवसाय करणे सुरु केले, की ज्यामुळे काहीं जणांना रोजगार देऊ शकले ,संसाराला हातभार,आणि सामाजिक कामासाठी पैसा मला स्वतःचा उपलब्ध झाला. रजिस्टर मंडळ करून,कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवला . तालुक्याचा अभ्यास करून १५० वाड्यानवर जाऊन आले. वाड्यातील लोकही मला कार्यकर्ते म्हणून मिळाले. आणि काम सुरु झाले. काहीं वर्ष या कामातून जे काहीं समाजिक प्रबोधन करता आले, काहीं समस्या सोडवता आल्या ,मदतीचा हात देता आला ,काहीं कमलला वाचवू शकलो आणि काहीं देवरामचे प्रश्न सोडवता आले याचे मनाला थोडेसे समाधान लाभले.
माझ्या मुलीला कमल ने तिच्या पद्धतीची साडी नेसवली होती,तो फोटो पाहताना ,मला कमल प्रकर्षाने आठवते. मी देवालाच हा नेहमी प्रश्न विचारते की "२० वर्षांची कमल, कळी स्वरुपात होती, ती देवा तूला का बरे आवडली "?
देवाच्या पुस्तकातील एक पान...........! अपंग तन जरी गीतेचे ... मनाचे पंख असे भरारी घेते!
शालन मला म्हणाली " काय हो वहीनी! कशी पटकन कोंबडी सारखी उचललीत गीताला! लै डेंजर बाई आहात हो तुम्ही! भरंवसा नाही तुमचा काहीं पण करता बिनधास्त!". मला खूप मनापासून हसू आले. ही शालन बोलायला खूप फटकळ,पण माझ्यावर तिचा खूपच जीव जडला तिचा मला म्हणायची तुम्ही फिरता झोळ्या घेऊन,भिका मागत,मी त्या लोकांसाठी काहीं नाही करणार,पण तुमच्यासाठी जान हाजीर आहे! मी बाहेरून उन्हा-तान्हाची थकलेली आलेली दिसले,की पहिली भाकरी-कालवण जे काहीं केले असेल,ते खाल्ल्याशिवाय घरात जाऊ द्यायची नाही. पाहिलं मुकाट खायचं, मला माहिती आहे,घरी जाऊन तुम्ही परत कामात जुंपता आणि खाण्याचे हाल करता. तिच्या प्रेमाची तुलना कशाशी होऊ शकत नाही!
गीताला भेटायला जायचे होते. गीताचे मला कालच पत्र आले होते.तिच्या भावाने तीला रत्नांगिरी जवळील गावात त्याचे जवळ बळजबरीने राहायला नेले होते,आणि तो तिचे तिच्या मना-विरुद्ध बिजवराशी लग्न लावणार होता! हे पत्र वाचल्यावर मला लगेचच कृती करणे आवश्यक होते. गीताचा प्रियकर संदीप मला चार दिवसा-पूर्वीच देवदासच्या अवतारात भेटून, गीता शिवाय मी जगू शकत नाही सांगून गेला होता. संदीप वाहन-चालक,निर्व्यसनी २६ वर्षांचा चांगला मुलगा आहे.आणि गीता सडसडीत,दिसायला नाजूक पाकोळी सारखी,पण पोलीयोने अपंगत्व येऊन एका पायाला धरून चालणारी २४ वर्षांची मुलगी. एस टी कॉलोनी मध्ये मी संस्कार वर्ग घ्यायचे त्यातील ही एक विद्यार्थिनी! नंतर माझ्या सोबत दुर्गावाहीनीचे काम करायची. घरच्यांचा लग्नाला विरोध कारण,ती सुतार,तो मराठा,म्हणून तिच्या भावाने तीला गावी नेऊन ठेवले.
मी संदीपला निरोप धाडला,तो तर एका पायावरच पळत आला, गीताच्या पत्रातील बातमी ऐकून ,तो म्हणाला "काकू, मी लगेच गाडी काढतो आपण गीताला आणायचंच. मी त्याला म्हणाले आपण प्रयत्न करून पाहू,निदान तीला मी भेटेन तरी. मी लगेच शालन आणि तिचे पतींना आमच्या सोबत उद्या सकाळी रत्नागिरीला यायचे आहे असे फर्मान काढले. गाडी संदीपने मिळवली,आणि सकाळी आम्ही रत्नागिरीला गीता मिशन वर गेलो.दुपारी गीताचे भावाचे घर शोधून काढले,मी आणि शालन-प्रदीप तिच्या घरी गेलो. मला पाहून गीता काकू म्हणून बिलगलीच. इतकी कृष झालेली दिसली गीता,की मला खूपच वाईट वाटले. इकडेच बैठकीला आलो होतो,सहज गीताची आठवण झाली म्हणून आलो असे गीताच्या वाहिनीला मी म्हणाले चहा करायला वाहिनी आत गेली,तितक्यात मी गीताकडून पहिले तिच्या जन्माचा दाखला घेतला. कसे तीला न्यायचे हा गहन प्रश्न होता.संदीप आमच्या सोबत आला आहे,हे तीला मी सांगितले. त्यामुळे,तीला आशेचा किरण दिसला. त्यांच्याकडून चहा गप्पा करून निघालो,पण गीताला कसे न्यायचे हा प्रश्न काहीं सुटला नव्हता. आम्हाला गीताने डोळ्यतील आसवानीच निरोप दिला. माझे मन गलबलून आले होते. संदीपला तर गीता दिसलीही नव्हती. तो तर तीला भेटायला वेडा-पिसाच झाला होता. तीला घेतल्या शिवाय जायचे नाही,परत गाडी फिरवून पाहू ना काकू आपण,: त्याचा हिरमुसला चेहरा मला पाहवेना!
मी गाडी परत गीताच्या घराच्या दिशेने नेण्यास सांगितले आणि काय आश्चर्य .........समोर गीता दिसली! गीता तिच्या मैत्रिणी सोबत चहा पावडर आणायला गेली होती!. मी लगेच गाडी थांबवली. गीताला म्हणाले तुला संदीपशी लग्न करायचे आहे. ती हो म्हणाली. आता गाडीत आहे तशी बस,ती म्हणाली मी गाऊन वर आहे, मी तीला म्हणाले काहीं फरक पडत नाही,यायचे आहे ना,ती हो म्हणाली,मी तीला गाडीतूनच वरती खेचून घेतली,आणि गाडी स्टार्ट करायला सांगितले. शालन वाहिनी आणि तिचे पती काळजीग्रस्त झाले. " काय बाई ही ,कोंबडी सारखी उचलली पोरीला"! मला खो-खो हसू आले.
वातावरण निवळण्याचा मी प्रयत्न केला. काहीं काळजी करू नका. ही दोघे सज्ञान आहेत. कोणी काहीं करू शकत नाहीत . काहीं झाले तरी मी आहे ना,काळजी करू नका. गाडी मी गणपतीपुळ्याच्या दिशेने न्यायला सांगितली. माझ्या गळ्यात एक लहान आणि एक मोठे अशी २ मंगळसूत्र असायची. माझ्या गळ्यातील एक मंगळसूत्र आणि माझी जोडवी गीताला घातली. वाटेत जरी कोणी अडवले तरी काळजी नाही. गणपतीपुळ्याला सायंकाळी पोहोचलो.तेथे भटजींना लग्नाची तयारी करायला सांगितले,आणि पटकन गीताला साडी नेसवून नवरी तयार केली. संदीप तर काय तयारच होता. गीताला पाहून तर त्याला स्वर्गच मिळाला होता.गणपतीच्या साक्षीने दोघांचा विवाह देवळात केला, फोटो काढले. दोघांना जेवणाची पाकिटे देऊन पुण्याकडे जाणाऱ्या एस ती मध्ये बसवले. आणि असे हे गीता मिशन सफल झाले. दोन प्रेमी जीवाना एकत्र आणले, या खुशीत आम्ही होतो. गावी रात्री उशिरा आलो. पहाटेच दाराची बेल वाजली. गीताचा भाऊ आणि वडील अनेक लोकांना घेऊन आला होता. मी त्यांना शांतपणे सांगितले, आम्ही गीताला भेटून सरळ घरी आलो आहोत,ती कुठे गेली,हे आम्हाला कसे ठाऊक असणार. सारेजण मुकाट परत गेले
गीताचे लग्न ती सज्ञान असताना तिच्या मर्जी विरुद्ध तिच्या घरचे करीत होते, संदीप मुलगा कसा आहे हे थुक होते म्हणूनच मला असे वेगळे पाऊल उचलावे लागले.
गीता-संदीप ला गावी बोलावून कार्यकर्ते,संदीपचे नातेवाईक,मित्रा यांच्या साक्षीने परत मला घातल्या आणि आनंदाने ते घरी गेले. गीताचे आई-वडील तिच्याकडे जाऊ-येऊ लागले. भाऊ मात्र येत नाही. असो, गीता वाड्यातील मुलांचा शनिवार-रविवार २ तास देवळात अभ्यास घेत असे. कोणतेही सामाजिक काम ती हिरहिरीने करत असे. १२ वी नंतर कॉलोनी मधील संस्कार केंद्र गीताने ,मनिषाचे साहय्याने चालू ठेवला होता. दिल्लीला माझ्या सोबत महिला मेळाव्यालाही ती आली होती. पदवीधर झाल्या नंतर गीता नोकरी करीत होती. गीताचे अपंगत्वा मूळे कुठेच अडले नव्हते , कारण तिच्या मनाच्या पंखांनी तीला तिच्या जिवनात भरारी कशी मारायची हे शिकवले होते.
गीता आता कचेरीत स्टांप वेन्डोर आहे. २ मुलांसह छान संसार चालू आहे. संदीपने लहान मुले होती तेव्हा मुलांना घरी स्वतः थांबून सांभाळले.,आणि गीताच्या कमाईत घर चालवले. दोघेही लग्न नंतर एकही तक्रार घेऊन माझ्या कडे आली नाहीत. या गोष्टी नक्कीच कौतुकास्पद आहेत. दोघांचा हसत-मुख चेहरा,माझ्या चेहऱ्यावरही कायमचे हास्य देऊन गेला.. गीतेचे मनाचे पंख मलाही भरारी मारायला शिकवून गेले! गीता फोन करून मला खुशाली कळवीत असते . तिचा गोड आवाज मला अगदी तृप्त करून जातो!
Subscribe to:
Posts (Atom)