Sunday, January 15, 2012
ज्ञानाची धरावी कास, पुरूषार्थ जागृत होईल सर्वात! गवसेल आत्मज्ञानाचा प्रवास! जय श्रीकृष्ण!
- पुरूषार्थ म्हणजे मनुष्याने कृतार्थ होण्यासाठी धर्म,अर्थ,काम,मोक्ष या गोष्टी साधावयाच्या आहेत. धर्म......शास्त्राने मान्य केलेली समाजविषयक आणि ईश्वर विषयक कर्तव्ये निष्ठेने करणे,अर्थ... न्याय्य मार्गाने मिळून योग्य वापर करणेकाम..... हे न्याय मार्गाने विषय सुखांचा उपभोग घेवून वंश सातत्य राखणेमोक्ष ... सच्चिदानंद परमात्म्याचा अनुभव घेणे . या हरवलेल्या पुरुषार्थाला आपल्यात आपणच पुनः आणू शकतो. त्यासाठी प्रथम हवा स्वतःवर विश्वास! तेव्हाच आपण घडवून आणू हा परिवर्तनाचा इतिहास!
मनुष्यास मोहरूपी काळ सर्पाचे दंश होवून विष भिनते सुख-दुखाच्या भोवऱ्यात फसतो.कठीण प्रसंगी त्याचा धीर सुटतो.कारुण्य त्यात जागृत होते. बेडूक सर्पाला गिळू शकत नाही,मीठ पाण्याला पाझरू शकत नाही,तसे हा आपला मूढ पणा बाजूला सारून अशा प्रसंगी दयावृत्ती कामाची नाही हे लक्षात येणे महत्वाचे असते. ज्यावेळी युद्ध-प्रसंग येईल,तेव्हा ते माझे नातेवाईक आहेत ,माझे सगे संबंधी आहेत,माझे गुरु आहेत,असें मनात आणून मन व्यथित करणे चूक आहे. मोहाने व्याकूळ झालेले चित्त या वेळेस मनातील धैर्य खचवते. आयुष्य व्यर्थ वाटू लागते. अशा वेळी समोर कोण आहे हे न पाहता त्यांची दुष्प्रवृत्ती शी मुकाबला करता यायला हवा! सूर्याला काळ्या ढगांनी ग्रासावे ,ग्रीष्म काळात सर्वत्र वणवा पेटावा,तशी स्थिती होते, अंध झाल्या प्रमाणे सैरावरा धावू लागते, तेव्हाच या वीजलहरी म्हणजेच अमृतज्ञानाची म्हणजेच ईश्वराची मनुष्यरुपी अर्जुनावर कृपावृष्टी होते. विश्वरचना ज्याने केली,त्या विश्वकर्त्याचा विसर पडून मी कोणी आहे हा अहंकार माणसाला सुख-दुखात लोटतो त्यामुळे हा भ्रम दूर करणे आवश्यक आहे.
नसलेले आपण जन्मा कसे आलो व आलेल्या या जन्माच्या अस्तित्वाच्या स्थितीचाही उद्या लय होवून पुनः नसण्याच्या स्थितीतच जाणार आहोत,तर या जन्म-मृतुच्या निसर्ग स्वभाव अखंड आहे याचा विसर पडून कस चालेल! जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही मायाभ्रम आहेत व दोन्हीचाही खेद करीत नाही, हे विवेकी माणूसच बोधाने उमजू शकतो !
अविनाशी आत्मा हा सागरासमान आहे. ज्याचा उत्पत्ती-विनाश नाही ! वायूच्या गतीने पाण्याच्या लाटा बनून पाणी हलते, वायूचे स्फुरण थांबले की पाणी स्थीर होते. देह एक असला तरी वयोभेद असतातच ना! बालपण,तरुणपण संपतेच ना! या दशा निर-निराळ्या देहाच्या होतच असतात, या चैतन्याची सत्ता मात्र सर्वकाळ असते.
इंद्रियांच्या अधीन झाल्याने ज्ञान उलगडत नाही व विषय त्याला ग्रासतात व प्रेम-द्वेष, हर्ष-शोक,सुखं-दुखं,निंदा-स्तुती,गोड-कडू,सुगंध-दुर्गंध यामध्ये मनुष्य गुंतला जातो! मृगजळा समान विषयाला खरे मानून त्यातच मनुष्य ग्रस्त होतो. सत्व-रज-तम यांकडे लक्श न देता केवळ आत्मसुख घ्यावे! सुज्ञ लोक पाण्यात दुध मिसळले,तर निवडून काढणाऱ्या राजहंसा प्रमाणे ज्ञानाचा बोध करून घेतात. अग्नीत सुवर्ण शुद्ध होते, बुद्धी चातुर्याने दह्याचे ताक घुसळून लोणी काढले जाते ,भुसा आणि बी पाखडून त्यातुन भुसा बाजूला केला जातो, तसेच हा संसार शुद्ध मनाने सहजपणे करता यायला हवा!
पाण्याने भरलेल्या कुंभातील चंद्रबिंब त्या कुंभातील पाणी सांडले म्हणून ते दिसत नाही,तरी चंद्र त्याच्या स्थानीच असतो,या आकाशात मठ बांधला तर तो मठाकार होतो,परंतु मठ भंगला तरी आकाशाचे मूळ स्वरूप तसेच राहते. तसेच हे शरीर जरी नष्ट झाले तरी आत्मतत्त्व हे अमर आहे. जसे एक वस्त्र जीर्ण झाले म्हणून नवे घालावे,तसेच एका देहातून दुसऱ्या देहाचा स्विकारते हे आत्मतत्व !
या आत्मतत्वाला कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही, त्यास कोणताही प्रलय बुडवू शकत नाही, अग्नी त्यास जाळू शकत नाही व वायू त्यास शोषु शकत नाही असा हा अनादी, अनंत शाश्वत आत्मा आहे! हा देह धारण करणारा जीव दिसत नाही, हा आत्मा अनादी,निर्विकार,निराकार असून ,त्यास जाणला असता हे दुखं नाहीसे होते व उरतो फक्त परमानंद!
नदीचा उगम पासून प्रवाह असतो व ती मध्ये बरच संचय करीत-करीत शेवटी सागराला मिळत असते,तसेच या प्राणीमात्राच्या उत्पत्ती -स्थिती-लय अशा तीन अवस्था अखंडित पणे चालू असतात! ना दिसणाऱ्या अमूर्ताचे ,जन्मतःच मूर्त स्वरूप होते व पुनः मृतुनंतर अमूर्त ! दुसऱ्याचा इच्छे प्रमाणे सुवर्णाचे जसे अलंकार घडतात तसेच माये मुळे ही सृष्टी आकारली गेली आहे. मनाची निश्चलता अंतरात या परब्रम्हाचे स्वरूप अनुभवू शकते! ज्याला साक्षात्कार होतो, तेथे संसार उरत नाही! सर्वात भरून राहिलेले व सर्व देहात वसणारे चैतन्य हे एकच आहे हे उमजून या येण्या-जाण्याचे दुखं राहत नाही! जे काही भोगतो ते भोगणारे हा ईश्वरच असतो,याचा विसर पडू देवू नये!
संकल्प-विकल्प संपतील, अंतरात वैराग्य भावना तेव्हाच जागरूक होईल व स्थिरबुद्धीने समाधानी वृत्ती येईल. तृप्त मनाने ,सत्कृत्य करण्याची प्रवृत्ती अंगी बाणवून ,फलाची अपेक्षा न धरता आपल्या चित्ताची साम्यावस्था आणून , सर्वत्र एकरुपत्वाचा भाव हृदयी आणणे गरजेचे आहे . कासव जसे आपली इच्छेप्रमाणे अवयव आवरून घेते,त्या प्रमाणे आपण आपल्या इंद्रियान वर ताबा ठेवला पाहिजे. यश,संपत्ती,कीर्ती या मुळे पुनः पुनः षड्रिपू जागृत होतात,म्हणून आसक्ती तून मुक्त होवू , तेव्हाच देह भावाचे भान हरपून सो अहं भावाचा प्रत्यय येतो!
सूर्य जसा आकाशात अलिप्त राहून आपल्या किरणांनी सर्व जगाला प्रकाशित करतो, तसेच मनुष्याचे काम-क्रोध हीन , इंद्रियांशी उदासीन मन ,स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत जावून स्वतःतच विश्व पाहू लागते व अखंड विश्वात ज्ञान रुपात वावरते .
स्व धर्माचा विसर पडून स्वतःवर दुसर्यांचे आघात झेलण्याची वेळ आली आहे. ज्यांनी स्वधर्म सोडला त्यांची अपकीर्ती झाली! त्यासाठी आपला पुरुषार्थाला जाणून स्वधर्माने वागून मनी द्वेष न ठेवता अधर्म कृत्यांशी मुकाबला करायलाच हवा! .श्री कृष्णार्पन्नमस्तुज्ञानाची धरावी कास, पुरूषार्थ जागृत होईल सर्वात! गवसेल आत्मज्ञानाचा प्रवास! जय श्रीकृष्ण!मंगला
प्रमेय रुचीस आले !
प्रमेय म्हणजे सिन्धांत! या जिवनगीतेला जाणून घेणे , जन्माचे प्रयोजन जाणून घेणे, यासाठी ज्या स्मृती,पुराणे,सहा शास्त्रे ,वेद,या साऱ्यात धर्म व समाजशास्त्र नियम आत्मसात करून ज्यांनी या शब्दांच्या संपत्तीला शास्त्र्यता आणली व ब्रम्हज्ञानाने मृदुता येवून साक्षीभाव अंगीकारता येतो हे सांगितले त्यांच्या या ज्ञानाचा सिद्धांत समजून घेण्याची आपली मन व बुद्धीची बैठक तयार करणे.
सो अहं भाव म्हणजे सच्चिदानंदाचे परमात्म्याचे मूळ स्वरूप निधीध्यास पूर्वक अभ्यास "मी " रूपाने जाणणे होते. साहित्यातील नवरस शृंगार,वीर,करून,अदभूत,हास्य,भयानक,बिभत्स्य,रौद्र,शांत हे या प्रमेयाला जाणून घेण्याचे माधुर्य आणतात हे जाणून घेणे म्हणजे प्रमेय रुचीस आले याची अनुभूती येते! ज्या प्रमाणे भ्रमर फुलाच्या पाकळ्या व पराग कणांनाही न दुखावता मधुसेवन करतो, चंद्रविकासी कमळ स्वस्थानी राहूनच चंद्र उदयास आलिंगन देते,तसाच या प्रीतीचा संभोग घ्यावा! प्रीती ही अतीन्द्रियानी अनुभवायची असते. मन व इंद्रियांच्या द्वारे अनुभवली जाणारी प्रीती ही शाश्वत नसते.
संसार हा आत्म स्वरूपाच्या विस्मरणामुळे भासमान होणारा ,सतत बदल होत असणारा ,अत्यंत अस्थिर व क्षणभंगुर आहे. सुखं-दुखे माणसाला खरी वाटू लागतात . प्रेम म्हणजे आसक्ती असें समजून तो त्यात सुखं-दुखं ओढवून घेतो. यातून त्याला चिरंतन आनंद लाभत नाही. त्यासाठी अखंड,चिरंतन व अवीट असें ज्ञान जेव्हा तो अतिद्रीयांच्या द्वारा ज्ञाना संबंधी चर्चा,विचार साधनेतून मिळवतो,तेव्हा त्याला आत्मज्ञानाची अनुभूती येवून या ज्ञान तेजाचे रूप अनु-रेणूत सारया विश्वात आहे याची जाणीव होते. अखंड प्रेमाचा झरा त्याच्या हृदयी वसतो.
जिवन सरितेला या सागराशी मिलन होण्याची जाणीव होते. सरिता वाहत असताना जसे आसपासचे झरे ,नाले , सर्वांचे पाणी घेवून काट्या कुत्यातून दगडातून ठेचकाळत ,बाजूचा परिसर हिरवा गार करीत सागराच्या दिशेने वाटचाल चालू ठेवते,तसेच जिवनात येणाऱ्या सुखं-दुखानचा अडसर दूर सारून या ज्ञान सागराची ओढ आपण ठेवली पाहिजे.
या जिवन कलेच्या सिद्धांताची रत्ने नम्रपणे व वासना विरहित,अहंकारमुक्त ,स्थीर मनाने जो जिवन गीतेचा मतितार्थ जाणतो तो अतीन्द्रियानी या प्रमेयाची खुण समजून घेतो. सामान्य माणूस मन व इंद्रिये यांच्या द्वारे जे ज्ञान मिळेल तेच आकलन करतो,परंतु या अपरा प्रवृत्तीचे पृथ्वी,आप,तेज,वायू,मन,बुद्धी,अहंकार,या आठ विभागांची साम्यावस्था म्हणजे समत्वाने राहणे हे अतीद्रियानीच जाणले जावू शकते.हे जाणले तरच ज्ञानाग्नीतून विवेक अंगी बाणला जातो व विरक्तता येते.
व्यवहारी जिवनात राहूनही साक्षीभाव अंगी बाणवून निरिच्छ व समाधानी हृदयात शाश्वत, समभाव दृष्टीचे प्रेम वसते . ज्ञान हेच तेज व अज्ञान हे तेज रहित असते याची जाणीव ज्ञानात रमल्यानेच होते. जिवन गीता उमजली व सच्चिदानंदाचे स्वरुपाची अनुभूती येण्याची क्षमता आली ब्राम्हज्ञानाशी आलिंगन झाले हे प्रमेय रुचीस आले !
मंगला
कुत्र्याचा प्रामाणिकपणा असतो मालकाशी, तसेच अरे माणसा तू प्रामाणिक रहा या पृथ्वीशी!
प्यार का पंचनामा चित्रपट पाहिला आणि माणसाचे कुत्रे कसे बनते हे जे वास्तव आहे ते पाहताना हसू आले. पण एक प्रश्न मनात आला की कुत्रा प्रामाणिक असतो,हा आपल्या पालकांशी प्रामाणिकपणा दाखवतो,पण येथे पालकांशी प्रामाणिक न राहाता नविन ओळख होणारयाशी प्रामाणिक होणे व लाळ घोटेपणा करणे म्हणजे खरे याला कुत्ता म्हणणे ही बरोबर नाही! कारण तो जर कुत्ता असताच तर तो त्यांच्यावर भुंकला असता,पट्टा घालून कसा फिरला असता नाही का!
आपण पुस्तकात वाचतो सर्प,विंचू हा विषारी प्राणी आहे, गाय,कुत्रा पाळीव प्राणी आहे. वाघ-सिंह जंगली प्राणी! माणसाला बुद्धी आहे म्हणून तो कोणाला पाळीव प्राणी,कोणाला विषारी,कुणाला जंगली विशेषणे लावतो. परंतू हे सर्व गूण त्याच्यात आहेतच ना! ते शोधण्याची त्याची बुद्धी कुठे गेली! माणसाच्या विषाला औषधच नाही,सर्पाच्या ,विंचवाच्या विषाला तरी औषध आहे! गाय आणि कुत्रा पाळले तर ते मालकाशी प्रामाणिक राहतात,माणूस राहतो का प्रामाणिक?
वाघ -सिंह भूक लागेल तेव्हाच शिकार करतात,परंतु माणूस सततच भुकेला असतो,कधी पैसा, कधी प्रेम त्याच्या भूकाना अंतच नसतो! अजगर ज्या प्रमाणे भूक लागेल तेव्हाच खातो व नाहीतर तो स्वस्थ बसतो,हे का नाही जमत माणसाला! चांगले गूण घेणे व आपल्यातील वाईट गुणांना दूर करणे ही बुद्धी माणसला केंव्हा येईल! जे पालक निस्वार्थी पणाने मुलांना वाढवतात व ज्यांचे सेवा भाव,परोपकार गूण आहेत,त्यांना हा पाळीव प्राणी करीत आहे. ज्यांच्यात हे गूण नाहीत त्यांना तो दाराबाहेर ठेवत आहे. प्रत्येकाचा व वस्तुचाही गरजे पुरता वापर करून युज अन्ड थ्रो ही प्रवृत्ती वाढत आहे! प्राण्यातील दुर्गुण घेवून हा माणूस प्राणी बनला आहे असें वाटते! सर्वात भयंकर जमात आहे ही! अख्या पृथ्वीतलाला जिने जेरीस आणले अशी ही एकच माणूस जमात! सारया निसर्गाचा समतोल बिघडवून ,फक्त स्वतःचा स्वार्थ पाहणारी ही जमात अजून किती स्वतचे व इतरानचे नुकसान करणार आहे?
हे प्राणी अशी देवाची मंदिरे करून त्या एखाद्या कुत्रा,वाघाला देव करून वाटेल तसे वागायला तरी मोकळे होत नाहीत,परंतु माणूस दगडातील देवाला चांगले गूण अर्पून स्वैर वागण्यास स्वतःला मुक्त व भाविक समजतो! इतका खोटारडेपणा करणारा एकही प्राणी या भूतलावर नाही! माणसाला कोणता प्राणी म्हणावे तर एकही नाव देत येणार नाही,कारण तो कोणालाही डसतो,कोणालाही फसवतो,ज्याला आपल्या रक्ताच्या नात्यांची चाड नाही,तो इतरानचा काय विचार करणार? आता तर एक नविन जमात तयार होत आहे. जो कोणी अधिक पैसा व सुख देईल असा जोडीदार शोधणे व बानडगुळा सारखे जिवन जगणे! या बानडगुळ जमातीने अनेक जणानचे जिणे हराम केले आहे. यावर काही इलाज शोधायलाच लागेल! कारण ते पूर्ण वृक्षाचे शोषण करीत आहेत!
प्राण्यांना निसर्गानेच कपडे परिधान करून पाठवले आहेत, त्या मुळे त्यांची नग्नता दिसत नाही,माणूस आपल्या हाताने आपले वरचे व आतील वस्त्र उतरवून अंतर-बाह्य नग्नतेचे प्रदर्शन करीत आहे! ही नग्नता सर्व गोष्टीनाचा वीट आला म्हणून संन्यासी मनोवृत्तीने आलेली नाही,किंव्हा सुख-दुखाची चाड म्हणून आली नाही,तर ती फक्त भोग-विलास व स्वार्थीपणाने ,निर्लज्ज पणाने आली आहे. बुद्धिवादी प्राण्याला असें नग्न होणे शोभा देते का?
रज-तम गुणांनी इतके घेरले आहे की सत्व लोप पावत चालले आहे. पैसा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो हे क्षणो-क्षणी दिसून येत आहे! आताच जागा हो रे माणसा,नाहीतर फक्त या प्रेतात प्राण शिल्लक असलेले,मन मेलेले प्राणी फिताना सर्वत्र दिसतील! माणसाचा जन्म हा स्व शोध घेवून जन्माचे प्रयोजन कशासाठी ,हे त्या चेतना शक्तीला शोधण्यासाठी आहे. असें सडक्या विचारांचे प्राणी बनून मारण्या व मरण्यासाठी नाही! माणुसकीने वागला तर तो माणूस, माणुसकी सोडून वागला तर त्याचा काहीच राहणार नाही मागमूस! जन्म-मरणाच्या फेर्यात फिअत राहील वर्षानुवर्षे, पापाच्या चिखलात लोळत राहील ,एकाच जन्मातील या चिखलातून कमळा प्रमाणे उगवले तर होईल जिवन धन्य, त्याला नसेल जन्म-मरणाचे गम्य! कुत्र्याचा प्रामाणिकपणा असतो मालकाशी, तसेच अरे माणसा तू प्रामाणिक रहा या पृथ्वीशी!
मंगला!
मनात जोपासू आपलेपणाची भावना, तेव्हाच साकार होईल कुटुंब-समाज व देशातील सुराज्याची कल्पना!
मी जेथे असेन,ते आपले आहे ,तेव्हा त्या त्या ठिकाणी आपली प्रत्येक कृती ही आपलेपणानेच असायला हवी. या पृथ्वीवरील जे जे आहे ते सर्वांचे आहे व त्याचे जतन करायला हवे,त्याची काळजी घ्याला हवी हे माणसाला कळायला हवे. ज्या भूमीत जन्माला आलो,त्याचा फक्त फायदा घेण्यासाठी आपण आहोत का? त्याच मातृभूमीच्या कुशीत जन्माला येवून ,मोठे होवून तिचे लचके तोडत राहणे,हे गिधाडापेक्षा ही भयंकर आहे. ही गिधाडे मेलेल्या माणसाना नोचतात,येथे तर माणूस माणसाला जिवंतणीच नोचत आहे! याचा अर्थ माणूस माणसाचे माणूसपण गमावून बसला आहे.
पृथ्वीला माता म्हणतो. तिच्यावरच सारी सृष्टी निर्माण झाली. पृथ्वी माता सारे चांगले-वाईट आपल्या सहन करते व तिचे कर्तव्य करीत राहते. ती विशाल हृदयाची माता आहे. एका चांगल्या गृहिणीने पतिव्रतेचे प्रेम,त्याग ,कर्तव्य,क्षमाशीलता,परोपकार, संगोपन हे गूण अंगी ठेवून सदा प्रसन्न राहण्याचे काम करीत राहावे .ती आपल्या कुटुंबाचा विचार करते,तसेच आहे या पृथ्वी मातेचे! जसे बाह्य दर्शन ,तसेच अंतरात प्रतिबिंब दिसायला हवे! चंद्र जसा आकाशात दिसतो,तसेच त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसते. आपण आपले गूण विसरत चाललो आहोत. आपणही प्रत्येक जण आपले सद्गुणांचे रूप घडवले,तर त्याचे प्रतिबिंब सगळीकडे तसेच दिसेल!
भाड्याचे घर आहे हा देह,तरी त्याला काय हवे,तो कसा सुंदर दिसेल,याची चिंता करतो,तसेच आपले घर हे फक्त माझे आहे हा भाव मनात न आणता ते आपले आहे ही भावना मनात सदैव असली पाहिजे. या आपलेपणाच्या भावनेने माणूस आपल्यांशी नेहमी सदवर्तन करतो,आपल्यांना फसवत नाही,त्यांचे भले चिंततो. आता विभक्त कुटुंब पद्धतीने आपलेपणाची भावनाच कमी केली. आपले आई-वडील ज्यांना आपले वाटत नाहीत,त्यांचे घर आपले वाटत नाही,तेथे ते समाज आपला ही भावना स्वतःत कशी निर्माण करतील ? यात पालक व मूले या दोघांचीही सारखीच जबाबदारी आहे हा आपलेपणा टिकविण्याची!
भाड्याचे घर आहे म्हणून त्याला कसेही वापर ,ते कुठे आपले आहे असें मनात आणणे ही वृत्ती, माणसाचा स्वतः मध्ये आपुलकीची भावना नष्ट करते.. या पृथ्वीतलावर वृक्ष तोड,धरणे बांधणे मोठ-मोठ्या इमारती तयार करणे,रसायने पाण्यात सोडून व इतर प्रदूषण करणे या कृतीने पृथ्वीला माणूस स्वतःच्या स्वार्था साठी खायीत लोटत आहे.
जिने जन्म दिला तिची अशी अवस्था केली,तर ती कृश होणारच! या कृश झालेल्या पृथ्वीला l औषधोपचार कोण करणार? तिचे सांत्वन कोण करणार? तिला राग आला की तिचे रूप ती दाखवत असते. प्रलय,भूकंप,वादळ हिम वर्षाव सारया कृतीतून ती आपला सात्विक राग दाखवीत असते, तिच्यातील ज्वालामुखी खदखदत असतो,जेव्हा पृष्ठभाग नाजूक होतो,तेव्हा ती त्याला भंग करून बाहेर आग ओकत येते. तसेच झाले आहे आता देशाचे,हा प्रक्षोभाचा ज्वालामुखी खदखदत आहे, परंतु हा प्रक्षोभ कोणावर? फक्त दुसर्याकडे बोट दाखवून प्रक्षोभ शांत कसा होईल? मूळ आपलेपणाची भावना व सदवर्तन माणसाने प्रत्येकाने केले तर ही अराजकाची स्थिती येईल का? आज चौकात पोलिसाने गाडी अडवली,म्हणू हातावर पैसे देणे असो,नाहीतर माझे कोणतेही काम पटकन व्हावे म्हणून पैसे सरकवणे असो,या सर्वातूनच भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते. आताचेच एक उदाहरण देते,पासपोर्ट काढायला माझी मैत्रिण गेली होती,,तर तेथे रंग,३०० रुपये दिले तर तुम्हाला लगेच आत सोडतो असें तेथील एक जण म्हणतो , ती अवाक झाली ,की हे ३०० रुपयेचे किती भाग आतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा वाटा सांगत आहेत! तिने पैसे दिले नाहीत व रांगेत उभे राहूनच काम केले,परंतु असें किती जण करतात?
देवाच्या दारात द्वारपाल असतो,द्वारपालाला जर चोरी करायला बसवले तर त्या देवळातील संपत्तीचे रक्षण कोण करे,त्या देवळाचे पावित्र्य कसे राखले जाईल. बाहेर आण्णा हजारेन चे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालू आहे ,आणि येथे सामान्य माणसावर खरा परिणाम झाला आहे का? की हे फक्त दुसऱ्याने भ्रष्टाचार करायचा नाही,मी केला तर चालेल, असें कसे? या साठी मूळ प्रत्येक माणसात आहे व ती प्रवृत्ती बदलायला हवी.
हा देश आपल्या सर्वांचा आहे,या देशाचे नागरिक म्हणून माझी जी कर्तव्ये आहेत,ती मी करेन,माझ्या देशातील,सर्व बांधव माझे आहेत,त्यांच्याशी मी कर्तव्य भावनेने वागेन व त्यांच्या हिताचा विचार करेन ,हे सारे लहानपणा पासून जोरात प्रतिज्ञा म्हणत आलो,परंतु आचरण केले नाही! यात आपल्या सर्वांचाच दोष आहे. आपले पणाची भावना गमावून माणसाने दुखं पदरी ओढवून घेतलें आहे. मी आणि माझे ही वृत्ती माणसाला अहंकाराने उन्मत्त करते व त्याची विचार करण्याची दिशाच बदलते. मला जे हवे ते मी मिळवणारच,ते कोणत्याही मार्गाने असो,दुसऱ्याचे मी ओरबाडून घेणार हे पाप नाही का? असें दुसऱ्याच्या हक्काचे कितीही माझे म्हणून जमा केले,तरी मरताना सारे येथेच राहणार! माझा देह माझा नाही,तर ही संपत्ती माझी कशी असेल हे कधी कळणार माणसाला!
आपल्याकडे वेळ कमी,म्हणून आपण फास्ट विचार बदलणार, फास्ट रिलेशनशिप करणार ,आपण फास्ट फूड खाणार, फास्ट व्यसन करणार, फास्ट गाडी चालवणार,फास्ट पैसे कमावणार,परंतु या फास्ट ला जर ब्रेक देवून विचार करा,की निसर्गाच्या विरुद्ध जाल तर हे फास्ट जाणे तुम्हाला एक दिवस दुखाच्या खाईत लोटेल. अविचाराने केलेली कोणतीही कृती माणसाला तात्पुरती सुखं देणारी वाटली ,तरी ती त्याला दुखं व असमाधानाच बहाल करते. तेथे नव-नविन आजारांचे माहेर घर दिसेल,तेथे आपलेपणाचा अंकुर संपून फक्त भस्म करणारा मी चा अहंकार असेल! सारे काही जवळ असूनही तो माणूस खरा भिकारीच असेल! नुसती बंगले,गाडी,पैसा ये भौतिक गोष्टी माणसाला फक्त सुखी करू शकत नाही,ते सुखाचे एक साधन आहे व ते योग्य मार्गानेच मिळवायला हवे.
आपल्यातील दुष्प्रवृत्तीनचा अंत करणे हे प्रत्येक माणूस स्वतःच करू शकतो, तेव्हाच सद विचारांची गंगा वाहील. हे विचार आपल्या भोवतालचा भागही सदविचारांनी हिरवागार करतील, तेव्हाच कुटुंब-समाज व देश याचे आपल्याला सुराज्य करता येईल! देवळात जावून माझ्या पापांची क्षमा नसते मागायची,तर मी पाप करणार नाही अशी बुद्धी व कृती गरजेची असते. देवाला मोठ्या देणग्या,अभिषेक चढवून पापे कमी झाली का? कधी कळणार रे ! आता तरी जागे व्हायला हवे आपल्याला,नाहीतर सारीकडे अराजक माजेल,त्यात आपणच एक-मेकांना संपवत असू व उरेल फक्त दुखं फक्त दुखं! या सुखाच्या डोहात समाधानी वृत्तीच राहू शकते व हे समाधान व आपलेपणाची भावना माणसाला सदवर्तनानेच मिळू शकते. या साठी आपण दर-रोज स्वतःशी बोलू या,स्वतःतील गूण दोषांचा हिशोब घेवू या, व दोषांना दूर करू या,हीच जनता जनार्दनाला माझी प्रार्थना!
मनात जोपासू आपलेपणाची भावना, तेव्हाच साकार होईल कुटुंब-समाज व देशातील सुराज्याची कल्पना!
मंगला
श्रीमत् भगवतगीता देई ऐसे जिवन ज्ञान, अंतरी गवसे अमूल्य आत्मतेजो धनं!
जेथे जीव तेथे भाव, तेथे प्रेमाचा तो गाव! जेथे श्रद्धा आणि भक्ती ,तेथे भगवंताची प्रीती!
न करावे नुसते वाचन ,करावे त्यासह आत्मचिंतन ,श्रीमत् भगवतगीता देई ऐसे जिवन ज्ञान, अंतरी गवसे अमूल्य आत्मतेजो धनं! त्रिगुण,मन-बुद्धी यांनी खेळ मांडणारी प्रकृती म्हणजे माया व हिचा निर्माता निर्गुण तेजात्मा हे जेव्हा ज्ञान दृष्टीने उमजते, तेव्हाच कळते हे चैतन्य व मनुष्य जन्माचे प्रयोजन! उमजते की मी आहे ही आणि मी नाही ही!
आपले जिवन हीच खरे चालती बोलती गीता असते! त्यात क्षण-क्षणाला येणारे अनुभव हे आपल्याला काही शिकवून जात असतात! अज्ञानाने सत्य दिसत नाही,त्यासाठी ज्ञान दृष्टी लागते हे मात्र खरे ! निसर्गात,माणसात ,सजिव-निर्जीव साऱ्यात या चैतन्याची अनुभूती येते! स्वतःला जाण्याचे अनेक प्रकारचे मार्ग आहेत, कर्म योग,भक्ती योग इत्यादी, भक्ती मार्ग हाही एक साधन आहे! या भक्ती मार्गातून या विश्वकर्त्याला जाणणे साध्य होते! श्रद्धा व भक्ती व विश्वास आपल्यातील या चैतन्याला जाणून घेण्यास उपयुक्त ठरतात. नुसतीच श्रद्धा व भक्ती असून चालत नाही,तर आपले आचरण हे शुद्ध निर्मळ भावाने असणे गरजेचे असते.
अधर्माने वागणाऱ्या माणसाला त्याचे फळं याच जन्मी भोगावे लागते. अधर्मी व्यक्तीचा तामसपणा त्याला स्वतःच्या कृतींचे परीक्षण करण्यची बुद्धीच देत नसतो,त्या मुळे तो त्याच्या कर्मणा मध्ये खूष असतो. त्याच्या डोळ्यावर अज्ञाना ने झापड आलेली असते. देह म्हणजे मीच,आणि तो फक्त अनीतीने उपभोगण्यासाठी आहे अशी या माणसाची वृत्ती होते. दुसऱ्याचे ते आपले समजणे ,गैर व्यवहार करणे ,म्हणजे आपण दुसऱ्यावर अन्याय करीत आहोत हे या अधर्मी माणसाला समजतच नाही. जेव्हा त्याला उपरती होते, तेव्हा त्याचे डोळे उघडतात व स्वतःच्या कर्मांच्या चूक की बरोबर हे तो विचार करू शकतो व स्वतःत चांगले बदल घडवू शकतो . स्व धर्माने वागणे म्हणजे निती ,विवेक व भान ठेवून वागणे हे त्याला कळते. जो स्वतःला जाणेल,तोच दुसरयाला जाणू शकतो!
माणसातील रज-तम गुणांचा असर त्याला मी पणातून मुक्त होवू देत नाही,सत्व गुणांनी या गुणांवर मात करून तरीही शिल्लक राहिलेला मी नंतर निर्विकार स्थिती करून नष्ट करावा लागतो. तेव्हा येतो साक्षी भाव! निर्विकारतेतूनच हा निर्गुण अशा आत्मतेज सागराशी भेट होते! माणसाच्या जन्माचे प्रयोजन कळते. सत्व-रज-तम या त्रिगुणाना निर्मित केले या निर्गुण आत्मतेजाने. ज्ञानाने या त्रिगुणाना जिंकून उदासीनता आणणे म्हणजे निर्गुण आत्मतेजाशी मिलन होते. नदी सागराला मिळते तेव्हा तिची स्वतःची सारी खळ-बळ थांबवते वाऱ्या सारखे मन हलके फुलके होवून , सहज भाव अंगी येतो. देह म्हणजे मी नसून हे पंचतात्वानी घडवलेले अशाश्वत शरीर आहे हे कळते. त्रिगुण,मन-बुद्धी यांनी खेळ मांडणारी प्रकृती म्हणजे माया व हिचा निर्माता निर्गुण तेजात्मा हे जेव्हा ज्ञान दृष्टीने उमजते,तेव्हाच कळते हे चैतन्य व मनुष्य जन्माचे प्रयोजन! उमजते की मी आहे ही आणि मी नाही ही!
श्रीमत् भगवतगीता देई ऐसे जिवन ज्ञान, अंतरी गवसे अमूल्य आत्मतेजो धनं!
मंगला
आकाशगंगेप्रमाणे असावे कुटुंब, प्रत्येक सदस्य स्वतंत्र कक्षेत दंग! तेथे भरावे आपुलकीचे रंग, सारेच पक्षी उडतील स्वच्छंद!
निसर्गाकडून फक्त पक्षी स्वतंत्रपणे घरटे बांधतात व स्वच्छंदी जगतात हे फक्त माणसाला उमजले , निसर्गातून सूर्य सर्वाना प्रकाश देतो, सागर सर्वाना समाविष्ट करतो, नदी सर्वाना सारखेच पाणी देते, पृथ्वीचे मानवाने कितीही भाग पडले तरी ती एकसंध व सहनशील राहते, वारा सर्वाना सारखाच स्पर्श करतो, आकाश सर्वांनाच सारखे छत देते, वृक्ष सर्वाना सारखी सावली देतो, परंतु कोणीही फलाची अपेक्षा धरत नाही! मग या सारया गुणातून मनाची विशालता, परोपकार, निरपेक्षता हे गूण कसे माणूस घेत नाही! त्याच्या सोयीचे ते उचलतो व अर्थ लावतो!
आपल्या संस्कृतीचा अर्थ असता उमजला,तर कुटुंब संस्था ,समाज व देश असा रसातळाला पोहोचला नसता! ना उमजला स्वधर्म,ना उमजले आपुले कर्म! स्वार्थाने पोखरला आहे मन, देह झाले आहे मनाचा गुलाम! गृहस्थाश्रमातील व्यक्तींनी अर्थार्जन करणे आहे,त्यांच्यावर ज्ञानोपासना करणारा वर्ग (ब्रम्हचार्याश्राम ) वानप्रस्थाश्रम व संन्यास्थाश्रमाच्या सर्वच व्यति अर्थ या विषयावर अवलंबून असतात. काळा प्रमाणे जरी जगण्याचा मार्ग जो तो निवडत असला,तरी या गोष्टींचा विचार व्हायला नको का? माणसाने वानप्रस्थी न होता अर्थार्जन करत राहणे याची गरज आता भासू लागली आहे. वृद्ध माणसांची कार्य क्षमता कमी झाली असें समजून तरुण वर्ग हे लोक आपल्या जागा अडवतात असें समजतात. वृधाश्रमानची व पाळणा घरांची संख्या वाढणे या गोष्टी घडत आहेत. आपण असलेली घडी जेव्हा कुटुंबसंस्थेची बदलतो,तेव्हा त्याचे सुपरिणाम व दुष्परिणाम दोन्हीही दिसून येतात!
प्रत्येकाला आपले विचार स्वातंत्र्य द्यावे, ज्याला हवे त्याने आपले स्वतंत्र घरटे बांधावे. निसर्गात जे घडते तेच घडणार! सोन्याचा पिंजरा करून कोणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही! प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. काही जण मुलांच्या विचार स्वातंत्र्यावर गदा आणतात,तर काही ठिकाणी मूले पालकांच्या! जो मनाने कमकुवत असतो तो चेपला जातो! मैत्रीचे नाते मुला-सुनांशी ठेवूनही परिस्थितीत फार बदल घडले असें नाही! शेवटी हे जिवन मार्गाचे प्रयोग आहेत.
मुलीने व मुलाने दोघानेही आपले घर सोडावे व वेगळे राहावे हे तर चालू आहेच! प्रश्न फक्त असा आहे की की स्वातंत्र्याच्या कल्पना जर इतक्या हव्या आहेत,तर या मुलांनी आपले शिक्षण स्वतःच्या कमाईवर करावे. आपले कॉलेज चे शिक्षण,गाड्या पेट्रोल चा खर्च,मित्र-मैत्रिणच्या पार्टी ,स्वतचे लग्न सारा खर्च पालकांच्या खिशातून न करता स्वबळावर करावा. स्वातंत्र्याची कल्पना ही परदेशातून उचलली ना, मग तेथील मूले स्वबळावर सारे करतात. मैत्री, प्रेम किंव्हा लीविग इन रिलेशनशिप वर्षानुवर्षा राहायचे, भारतीय संस्कृती प्रमाणे लग्न करायचे, देणी-घेणी मान-पान करायचे, पालकानकडून सारे काही करून घेतल्यावर नविन घरट्यात जायचे . दोन्ही दगडीवर हात ठेवून तरुण पिढीतील अनेकांनी पालकांना ग्रस्त केले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ,लग्ना साठी कर्ज काढून पालक हप्ते भरत राहतात. वृक्षाचे बांडगुळ बनून वृक्षाला कमकुवत करायचे ही प्रवृत्ती पण अनेक ठिकाणी दिसून येते. काही पालक मुलांवर आपले विचार लादून त्यांना हैराण करतात हेही चित्र दिसून येते. तरुण वर्गात जात-पात न मानणे, स्व बळावर शिक्षण स्व बळावर लग्न, ,हुंडा पद्धतीचा विरोध, कौटुंबिक जबाबदारीची जाणीव असें काही ठिकाणी चांगले चित्र पहावयास मिळते तर काही पालक आपल्या आडमुठ्या स्वभावाने ,काळानुसार स्वतःत बदल न केल्याने मुलांच्या प्रगतीस अडसर आणणे किंव्हा त्रासदायक ठरत असतात.
स्वतःची विचार प्रणाली स्वतःच्या जीवावर राबवावी मग ते पालक असोत नाहीतर मूले! कुटुंब संस्थेला मुळापासून उखडताना भाव-भावनांच्यात गुंतून प्रेमाला व नात्यांना पारखे झालो, म्हणून गळा कोणीच काढू नये. गरजे पुरती मैत्री व नाती, न देईल कोणास मनी तृप्ती!
सोन्याचा पिंजरा आपल्या घराचा होवू देऊ नये हे अगदी बरोबर आहे,परंतु ज्या पालकांनी दिले मुलांना मोकळे आकाश, त्या मुलांनी का बरे समजला त्या घराला पिंजरा? का नाही ते राहू शकले आपल्या पालकान समवेत? मोकळे आकाश दिले, म्हणून वृद्धाश्रम कमी होणार नाहीत! फक्त स्वतः साठी जगणे ही प्रवृत्ती कुटुंब , समाज व देशाच्या प्रती काय आपली कर्तव्ये जाणणार? कुटुंब, समाज व देशाची ही स्थिती का, यावर आपण मग कोणीच ओरडा करू नये!
पृथ्वीचे जरी कितीही मानवाने भाग पडले,तरी पृथ्वी आपला एक संधपणा कायम ठेवते, वृक्ष सर्वाना सारखीच सावली देतो,सूर्य सर्वाना सारखाच प्रकाश देतो,हे गुणही निसर्गा कडून घ्यायलाच हवेत! नुसते पक्षी स्वतंत्र घरटे करतात इतकेच गूण घेवून उपयोग नाही! अधिकार समजतात,तर कर्तव्य, परोपकार ही अंगी असायलाच हवा ना! निसर्गच सांगत आहे हे!
स्वतंत्र भरारी घेताना बंधन मुक्त जिवन जगायचे,तर तेथे कोणतेच बंधन नसेल!
आकाशगंगे प्रमाणे असावे कुटुंब,
प्रत्येक सदस्य स्वतंत्र कक्षेत असेल दंग!
तेथे भरावे सर्वांनी आपुलकीचे रंग,
सारेच पक्षी उडतील असें स्वच्छंद!
मंगला
एका आईची ऐकत होते कथा! कथेतून मायाजाल उमजत गेला होता!
एका आईची ऐकत होते कथा!
कथेतून मायाजाल उमजत गेला होता!
डोळ्यात आसवे आणून सांगू लागली ती बाई......
काय असेल बरं या आई या शब्दात जादू?
आई हा शब्दं ऐकण्यास कान होतात बेकाबू!
आई या शब्दातच खरे तर आहे प्राण,
या शब्दाविना शरीर कसे होते बेजान!
नको तिला पैसा-अडका,नको जमिन जुमला,,
बाळानो, आई या शब्दांनीच बांधला तिने बंगला!
आई शब्दा शिवाय झाली रे ती भिकारी,
पदर पसरून करीत आहे ती लाचारी!
आई शब्दाची कळली तिला महती,
हाक न मारुनी कठोर शिक्षा देता किती?
गुन्हेगारानाही माफी असते रे,
आई ला एकदम अशी फाशी देवू नका रे!
असेन मी जगातील सर्वात वाईट आई,
पण प्रेम माझे नक्कीच रे खोटे नाही ,बाळानो नक्कीच रे खोटे नाही!
मी भरवला तुम्हाला कावू-चीवूचा घास,
तुमच्या हास्यात माझ्या हास्याचा प्रवास!
गाईली मी तुम्हा अंगाई,तुमच्या निजेतच मला निज येई!
तुमच्या किल-बिलीने घर होतं गुंजत,
फुललेला संसार पाहण्यास मन होतं रमत!
कितीही मी बदलले,तरी नाही तुम्ही मला समजून घेतले,
अपमानानच्या ओझ्यात जिवन जगणे मुश्कील झाले!
कळले मला, प्रेम असें मागून नाही ना मिळत !
का माझे जिवन साऱ्यानसाठी बसले असें जाळत?
मला सुद्धा मुलां सारखी धरता आली असती वाट,
पैसे देवून दूर वाढवले असते नाही का आरामात!
पण अशी जिवनकल्पना शिवलीच नाही गं कधी मनात!
रडू लागली बाई बोलता बोलता हमसून हमसून
बाईंच्या कथे व व्यथेवर उत्तर दिले मी समजावून
माझ्या आता पर्यंतच्या जीवनाने शिकवले खूप,
कोणाचे वाईट केले नाही,याने झोप येते आपसूक!
माझ्या बाळांवर माझी आहे, अशी अखंड प्रीती,
स्वतः साठी जगण्याची नव्हती कसली अनुभूती!
माझ्या बाळांनीच गुरु होवून मज शिकवली जिवन-नीती!
आई या शब्दातील विशालता उमजून लाभली मनी तृप्ती !
समाधानाने येते शाश्वत प्रेमाची प्रचीती!
स्वशोधात आनंदाने गवसेल चैतन्याची ज्योती!
मंगला
ठाई ठाई दिसे सृष्टित सर्वत्र गुरु, सदगुण अंगिकारून होवू ,स्वतः स्वतःचाच गुरु!
माणूस जन्माला येतो तेव्हा प्रथम त्याला शिकवणारी त्याची माता ही गुरु असते. मुलाला बोलायला-चालायला सारे काही ती शिकवते. आपण लहानाचे मोठे होत असताना जे कोणी आपणास मार्गदर्शन करतात,ते आपले गुरूच असतात. वडील आपले पालन पोषण करतात आपल्याला शिक्षण देतात,स्वतःच्या पायावर उभे करण्यास मदत करतात,तेही आपले गुरूच! शाळेत शिक्षक आपणास विद्याभ्यास शिकवतात, तेही आपले गुरु, म्हणून तर म्हणतात मातृदेवो भव,पितृदेवो भव,गुरु:देवो भव ! जे आपले गुरु तेच देवाच्या स्थानी असतात. तुकाराम महाराज म्हणतात ........
सद्गुरूच्या संगे शिष्य बी घडले,
शिष्य बी घडले, सद्गुरूची झाले!
आम्ही बी घडलो ,तुम्ही बी घडाना!
रस्त्याने वाट दाखवणाराही गुरूच! निसर्ग आपणास सारे काही देत असतो,परंतु आपल्याकडून काही मिळण्याची अपेक्षा बाळगत नाही.फलाची अपेक्षा न धरता कर्म करावे हे निसर्ग आपणास शिकवत असतो! सूर्याकडून परोपकार, आकाशाकडून विशालता, सागराकडून अथांगता,चंद्राकडून शितलता, पृथ्वीकडून सहनशिलता ,वायूकडून सहजता शिकण्यास मिळते. चंद्र कलेकलेने वाढतो व कलेकलेने कमी होतो,तरी आपले शितल किरण देवून आल्हाद देण्याचे कार्य करीत राहतो. तसेच यश असो वा अपयश माणसाने न ढळता आपले कर्म नीतीने करीत राहिले पाहिजे. वारा सर्वत्र संचार करतो,एका जागेशी बांधील न राहाता विश्वची माझे घर हे आपणास शिकवतो!
वायुसम मन असावे हलके फुलके ,सहजच स्पर्शत जावे जगाचे गलके!
पृथ्वीचे मानवाने कितीही खंड पडले,अक्षांश -रेखांश, सागराला विभक्त करण्याचा प्रयत्न केला,नकाशे तयार केले,तरी पृथ्वीचा एकसंधपणा भग्न पावत नाही! क्षमाशीलता व उदारातेची शिकवण पृथ्वी आपणास देते. अजगर आहारा पुरती हालचाल करतो व इतर वेळी पडून राहतो. सर्वकाळ संतुष्ट कसे राहावे हे त्याच्या कडून शिकण्यास मिळते. मधमाशी मध गोळा करते व मध गोळा करण्या पायी स्वतःच्या प्राणास मुकते, तिच्या कडून माणसाने संग्रह टाळावा ही शिकवण मिळते. हत्ती हा हत्तीणीच्या पाशात अडकतो व खड्ड्यात पडतो,तेव्हा मोहविवशता कशी टाळावी हे त्याचेकडून शिकण्यास मिळते. पतंग हा कीटक ज्योतीचा मोह धरून ज्योती जवळ जातो व सर्वनाश ओढवून घेतो,या वरून मोहाचा त्याग करण्याची शिकवण मिळते.
सागरातून रत्न-माणिक-मोती मिळतात, तसेच त्यात विविध प्रकारचे लहान मोठे जलचरही असतात .सागर आपणास समतावृत्ती व आपले वैशिश्ठ्य कायम ठेवण्याची शिकवण देतो! वृक्ष आपणास सावली देतात ,फळे-फुले देतात. वृक्षा कडून दुसऱ्यास सतत उपयोगी पडण्याची शिकवण मिळते. कुत्रा हा प्राणी त्याचा इमान राखण्याचा गूण आपल्यास शिकवतो. नारळाच्या झाडास कल्पवृक्ष म्हणले आहे,त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतो,तसेच आपणही सर्व तऱ्हेने, सर्वानसाठी उपुक्त ठरावे ही शिकवण मिळते. ग्रंथ आपणास जिवन ज्ञान देत असतात, ते आपले गुरूच होत. सृष्टित ठाई ठाई आपणास शिकवण मिळत असते व देणारे सारे गुरूच असतात,फक्त हे जाणण्या साठी आपले डोळे उघडे हवेत व आचरण हवे. तसे झाले तर स्वतःच होतो स्वतःचा गुरु, सहजभावाने ,नीतीने विवेकाने भानावर राहून ,या जन्माचे प्रयोजन उमजते व तो आपल्यातील सूर्याला गवसणी घालून आत्मतेजात रंगून जातो!
तेजातून तेजाकडे जाणारा हा किनारा,
स्वतःस शोधण्याचा जिवन सागराचा पसारा!
ना ऐल तीरी कोणी,ना पैल तीरी कोणी,
आत्मतेजाच्या रंगात अस्तित्वाची वाजेल धुनी!
मंगला
फुलांची साधी-सोपी रचना,मनास देई प्रसन्नतेचा खजिना!!!!!
फुलांच्या रचना करण्या बाबत काही जण कशा करतात हे जाणून घ्यायला उत्सुक आहेत,म्हणून मी कशा रचना करते ते लिहित आहे. मला प्रथम फुलांचे फोटो काढण्याची आवड होती. नंतर ती फुले फुलदाणीत ठेवायचे. हळू हळू कपाटातील काचेची विविध भांडी,शोभेच्या वस्तू,फुले,पणे असें एकत्रित ठेवून रचना करू लागले. सूर्य प्रकाशात त्याचे किरण त्यात रचनान मध्ये टिपणे आवडू लागले. या कलाकृती झोपाळ्यावर,किंव्हा टेबल वर ठेवून,त्यावर ओढण्या ठेवून त्यावर ही फुलांची रचना ठेवून रंग-संगती लावू लागले. जास्वंदी,तगर,जाई,जुई,सायली,रातराणी, विविध रंगाचे गुलाब,बाल्सम झेंडू,सोनटक्का,ऑफिस time , विविध रंगाची लिली ,alamanda ,गणेश फूल, व ऋतू प्रमाणे येणारी फुले इत्यादी फुले व त्यात शतावरी,गवतासारख्या किव्हा इतर कुंडीत उगवणाऱ्या लहान वनस्पती वापरू लागले. कधी साबणाचा फेसही घेवून फुले खोवली,असें विविध प्रकार सुचू लागले. यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज नाही.
विविध रंगाचे शिपले,दगड, बाहुल्या,पक्षी,मेणबत्ती याचा वापर काल्कृतीत करता येतो. रात्री फोटो मी आपल्या जेवण बनविण्याच्या ओट्यावर काढले आहेत. यासाठी खूप पैसा लागत नाही,घरच्य वस्तूंचा वापर करून आपण आपला हा छंद जोपासू शकतो. मी अगदी जपाची माळ देवांच्या मूर्ती,सारे काही कलाकृतीत वापरले आहे. ज्या वेळेस जे सुचेल ते घेते. या साठी एखद्या सध्या वस्तूकडे बघण्याची वेगळी दृष्टी हवी. फुलांचा आकार कसा आहे,ते कसे ठेवले तर त्याची रचना कसा आकार घेईल,हे विचार करून जमते. काही फुलांच्या पाकळ्या घेवून त्यावर दुसरी फुले ठेवून रचना छान दिसू शकते. काही रंगीत पाने लहान असतील तर त्यांचा दुसऱ्या एखाद्या फुलाचे डोळे म्हणून वापर करता येवू शकतो,काही फुले गणपतीच्या सारखी दिसतात,त्यांना तसे ठेवून रचना करता येते. आपली एकाग्रता व काहीतरी कल्पना सुचून त्या प्रमाणे फुलांची रचना होते. फोटो काढण्याचेही मी प्रशिक्षण घेतलेले नाही,जसे येते तसा फोटो काढते.
मत्सालायाची काचेची पेटी नुसती पडून होती,त्यात सुंदर रचना केली. यात वाळू,माती,लहान झाडांची रोपे,फुले बाहुल्या वापरून एखादे दृश्य बनवता येते व ते छान दिसते. त्यात तळे,दोनगर,देऊळ,घर असें काहीही दाखवता येते. अशा अनेक काचेच्या बरण्या, डिश मग,ग्लास,वाट्या साऱ्यांचा वापर करता येवू शकतो. विविध आकाराचे तरे असतील त्यांचाही वापर करता येवू शकतो.विजेच्या माळा मी फुलांच्या रचनान मध्ये वापरल्या आहेत.
फुले घरात असतील तर ती वापरावीत नाहीतर बाहेरून फुले आणून त्यांची रचना करावी,पण विकतची फुले आणण्यासाठी पैसा अधिक लागतो. मी माझ्या घरच्य टेरेस मध्येच जुने माठ,डबे,बदल्या,दुधाचे तरे,व लहान-मोठ्या कुंडी मध्ये अशी अनेक प्रकारची झाडे लावली,व त्यातूनच हा छंद जडला. ज्यानं आवड आहे,ते सह या फुलांच्या रचना करून त्याचा आनंद घेवू शकतात. त्या फुलांच्या सहवासात प्रसन्न वाटते,त्या मुळे दिवसाची सुरुवात छान झाली,की दिवसही उत्साहाने जातो!
मंगला
https://fbcdn-sphotos-a.akamaihd.net/hphotos-ak-snc6/46966_1582737929027_1253087005_1592855_3012545_n.jpg
Subscribe to:
Posts (Atom)